असे म्हणतात की, अमाप सत्कृत्ये करणाऱ्याच्या पाठीशी देव असतो, पण थोडे सत्कृत्य केले तरी मनुष्याची पूजा केली जाते. सत्कर्माचे मोजमाप होते. दुर्योधनाची ही माहिती वाचली की, त्याची प्रचीती येते. महाभारत वाचले की जाणवते, दुर्योधन अत्यंत वाईट वृत्तीचा आणि षडयंत्री होता. शकुनीमामाच्या सल्ल्याने त्याने पाच पांडवांना अपमानित किंवा त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. त्याला पिताश्री धृतराष्ट्राचा भक्कम आधार होता हेही खरे असले तरी तो शूर आणि साहसी होता हे मान्य करावेच लागेल. त्याने जे काही योग्य-अयोग्य निर्णय घेतले ते बघून असे वाटते की, तो खंबीर आणि निडर होता. जरी तो महाकाव्यातील सर्वात घृणास्पद पात्रांपैकी एक असला तरी तो एक हुशार, दयाळू आणि धैर्यवान मनुष्य असल्याचे जाणवते. कौंतेय पुत्र कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवले जायचे, त्या काळात सगळ्यांचा विरोध असूनही त्याने कर्णाला एका प्रांताचा राजा बनवले. त्याला अत्यंत आदर दिला. उदार कर्ण आपल्यासाठी जिवाची बाजी लावेल याची त्याला खात्री होती. कर्ण शूर असला तरी दुर्योधनाने त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली हेही महत्त्वाचे. नाण्याच्या दोन बाजू असतात हेही सत्य आहे, पण दोन्ही बाजू मानवतेसाठी फायदेशीर आहेत का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
अशा या शूर दुर्योधनाचे केरळात सुंदर मंदिर आहे, ज्याला पेरुविरुथी मालनदा किंवा मलानाडा असेही म्हणतात. मात्र आश्चर्याची गोष्ट हे दुर्योधनाचे मंदीर नसून हा ज्येष्ठ कौरव असलेला दुर्योधन चक्क केरळ सरकारला करही भरतो. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील दुर्योधन मंदिर सरकारी नोंदीनुसार कर भरतात ही अधिक आश्चर्याची गोष्ट आहे.

केरळच्या ‘या’ गावात दुर्योधन एक सौम्य, संरक्षक देवता आहे
पेरुविरुथी मलानाडा येथील मंदिरात दररोज दुर्योधनाला ताडी दिली जाते. मात्र येथे दुर्योधनाची मूर्ती नाही. तर, दुर्योधनाच्या शस्त्राची पूजा येथे केली जाते. महाभारतात दुर्योधनाची ओळख द्रौपदीला कपडे उतरवण्याचा आदेश देणारा, पांडवांचे राज्य चोरण्याचा कट रचणारा राजा अशी आहे. परंतु या गावात तो एक सौम्य, संरक्षक देवता म्हणून पूजला जातो. गावकरी त्याला ‘अप्पूपा’ (आजोबा) म्हणतात.
मंदिरात मूर्ती नसणे, ताडीचा प्रसाद देणे या प्रथा अनेक दक्षिणेकडील मंदिरांमध्ये इतर गैर-वैदिक पद्धतींप्रमाणेच आहेत. गावकऱ्यांकडून ताडीचा प्रसाद घेणे अधिक मनोरंजक आहे. मात्र सर्वांत आश्चर्यकारक म्हणजे दुर्योधनाचे मंदिर कर भरते. हा कर मंदिराच्या उत्पन्नावर नाही. भारतात सर्व मंदिरे करमुक्त आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या पोरुवाझी गावात 15 एकर मंदिराच्या जमिनीवर शुल्क आकारले जाते.

कर लागू झाला तेव्हापासून जमीन कर दुर्योधनच्या नावाने भरला जातोय
‘जेव्हा मंदिरासाठी पट्टा जाहीर करण्यात आला तेव्हा जमीन देवतेच्या नावावर नोंदवण्यात आली. जमीन करार क्रमांक आणि सर्वेक्षण तपशील दाखवतात की जमीन दुर्योधनच्या मालकीची आहे. केरळमध्ये जेव्हापासून कर लागू झाला तेव्हापासून हा जमीन कर दुर्योधनच्या नावाने भरला गेला आहे,’ असे एका स्थानिक प्रशासकाने सांगितले. मंदिराच्या 15 एकर जमिनीपैकी आठ एकर भातशेती, तर उर्वरित वनजमीन असल्याचे मंदिर समितीचे सचिव रजनीश आर. सांगतात. जेव्हा तुम्ही पुरूवाझ्झीत असाल, तेव्हा दुर्योधनाचा धिक्कार करू नका.
केरळमधील कोल्लम जिह्यातील पोरुवाझी गावात वसलेले हे मंदिर नकारात्मक पद्धतीने चित्रित केलेल्या पात्राच्या चांगुलपणाचे प्रतीक आहे. दुर्योधन हा एक इर्षावान भाऊ होता, वहिनी द्रौपदीला आणि पांडवांना वाईट वागणूक देऊनही दुर्योधनामध्ये काही प्रशंसनीय गुण होते. पण ते केवळ त्याने स्वार्थापोटी वापरले असे महाभारत सांगते. काम, क्रोध, मोह, मत्सर यांचे मिश्रण म्हणजे दुर्योधन. त्याने कधीही कुणाचीही पर्वा केली नाही. त्याला जे हवे ते तो करायचा. पुत्रप्रेमाने आंधळे झालेले त्याचे आईवडील त्याला बळ देत होते हेही खरे.

काय आहे दंतकथा…?
पांडव वनवासात असताना दुर्योधन त्यांना शोधण्यासाठी गेला होता अशी आख्यायिका आहे. केरळच्या दक्षिणेकडील जंगलात शोध घेत असताना आज जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी पोहोचला. त्याला खूप तहान लागली आणि त्याने एका वृद्ध महिलेकडे थोडे पाणी मागितले. एका खालच्या जातीतील एका वृद्ध महिलेने त्याला ताडी फळाचे पाणी दिले. दुर्योधनाने ते पाणी बिनदिक्कतपणे घेतले. कारण तहानच तशी लागली होती आणि तो भेदभाव मानत नव्हता.
त्याच्या शाही पोशाखाकडे पाहून वृद्ध महिलेला तो कोणीतरी राजा असल्याचे समजले. आपल्यासारख्या अस्पृश्य महिलेने दिलेले पाणी दुर्योधनासारख्या राजाने प्यायले हे पाहून तिला वाईट वाटले, पण दुर्योधनाचा जाती व्यवस्थेवर कधीच विश्वास नव्हता. उलट त्याने त्या अस्पृश्य महिलेस समजावले आणि पाणी दिले त्याबद्दल आभार मानले, तिला नमस्कार केला. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने दुर्योधनाचा आदर सत्कार केला. त्या अस्पृश्य वृद्धेच्या पाहुणचाराने तो खूपच प्रभावित झाला होता. मग त्या वृद्धेकडे त्याने भोजन केले आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो तेथे एका टेकडीवर बसला. त्याने गावात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी भोलेनाथ शंकराची प्रार्थना केली. एवढेच नाही तर गावकऱ्यांना शेतजमीनही दिली. दुर्योधनाच्या दूताकडून मिळालेल्या सोने आणि पैसेरूपी दानाने हर्षित होऊन गावकऱ्यांनी दुर्योधनाचा जयजयकार केला. एकूण काय तर दुर्योधनाने गावकरी मंडळींच्या जीवनात आनंद निर्माण केला.
असे म्हणतात की, दुर्योधनाने कुरुक्षेत्राच्या युद्धात यश मिळाल्यास परत त्या गावात येण्याचे वचन गावकऱ्यांना दिले होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात कौरवांचा पराभव झाला. दुर्योधन मारला गेला आणि पुन्हा भेटू शकला नाही, पण आपला शब्द पाळण्यासाठी दुर्योधन बांधील होता. एका रात्री गावातील एका वृद्धाने दुर्योधनाला स्वप्नात पाहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या घरासमोर वडाचे रोप दिसले. त्या म्हाताऱ्याने ते रोप लावले आणि तिथे पूजेची वेदी बांधली. त्यानंतर दुर्योधनाची पूजा सुरू झाली.

दुर्योधनाने ज्या ठिकाणी ध्यान केले होते त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी आदर म्हणून पोरुवाझी पेरुविरुथी मलानाडा मंदिर बांधले. विशेष म्हणजे हे मंदिर दरवर्षी दुर्योधनाच्या नावावर मालमत्ता करदेखील भरते. यावरून गावकऱ्यांचे त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर दिसून येतो. खरंतर मंदिराचे आजपर्यंतचे पुजारी कुरव समाजातून आलेले आहेत. या मंदिरात मूर्ती नाही. विशेष म्हणजे या मंदिरात इतर हिंदू मंदिरांप्रमाणे दुसऱ्या समाजातून आलेले आहेत. या मंदिरात मूर्ती नाही. विशेष म्हणजे या मंदिरात इतर हिंदू मंदिरांप्रमाणे दुसऱ्याही मूर्ती नाहीत. तुम्ही आत गेल्यास तुम्हाला मंडपम किंवा अल्थारा असे एक उंच व्यासपीठ मिळेल, जेथे भक्त प्रार्थना आणि ध्यान करतात. दगडी मंडपावरही भाविक उभे राहून प्रार्थना करू शकतात. अशा या दुर्योधन मंदिरात भक्त दुर्योधनाला रेशमी वस्त्र, ताडीची दारू किंवा मदिरा, मांसाहारी नैवेद्य व इतर वस्तू अर्पण करतात. यावरून असे दिसून येते की, त्याच्या सत्कृत्याचे स्थानिक लोक पिढ्यान्पिढ्या आभार मानत आहेत.
लोक या दंतकथा सांगतात. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावरून वाचकांच्या एक गोष्ट लक्षात येईल की, वाईट विचाराचा असला तरी राजघराण्यातील व्यक्तीला प्रजा किती पूजनीय मानते. त्याने केलेले गुन्हे माफ करून त्याने केलेली मदत लक्षात ठेवून त्याची पूजा केली जाते. पांडव द्रौपदीबाबत चुकले, पण सकारात्मक विचार करणाऱया मुरली मनोहर कृष्णाचे भक्त होते. त्यामुळे पूर्वीही ते आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत. केरळला आलात तर या मंदिरास नक्की भेट द्या.






