निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद्व्याघ्रो वनं रक्षेद्वयं व्याघ्रं च पालयेत् ॥
महाभारतातील या ओळींचा अर्थ असा की, “एखाद्या ठिकाणी जंगल नसेल तर वाघ मरतील ; वाघ नसतील तर जंगल नष्ट होईल. म्हणून वाघ जंगलांचे संरक्षण करतो व जंगल वाघांचे.” वाघासारख्या देखण्या व रुबाबदार प्राण्याबद्दल थेट महाभारतातील संदर्भ देण्याचे कारण म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच केलेले विधान. गळ्यात अडकवलेल्या साखळीत त्यांनी चक्क वाघाचा दात लावलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तो दात त्यांनी शिकार केलेल्या वाघाचा आहे. वाघाची शिकार त्यांनी 1987 साली केली असे त्यांनी ज्या गर्वाने सांगितले त्यातून त्यांची एकूणच पर्यावरण, जैवविविधता यासंबंधी असलेली तळमळ लक्षात येते.
जंगलाच्या संबंधी असलेल्या नैसर्गिक परिसंस्थेतील अन्नसाखळीत वाघ हा सर्वोच्च स्थानी येतो. त्यामुळे संबंधित परिसंस्थेतील वाढ, बिघाड वाघांच्या संख्येवर ठरत असते. कथित मर्दुमकी गाजवण्यासाठी आपल्याकडे शिकारींची प्रथा अस्तित्वात होती व आजही छुप्या मार्गाने या प्राण्याची शिकार होत आहे. पण तो भाग वेगळा. या मर्दुमकी मधूनच माणसाला वाघाची उपमा देऊन अमुक पक्षाचा, शहराचा वाघ अशी संबोधने लावली जातात. हे आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे अधिकृत नसले तरी सगळीकडे वाघाचेच चित्र आहे. ते काही असो मुद्दा हा की, या वाघाच्या शिकारीची संख्या वाढत जाऊन त्यांची संख्या कमी झाली.
यासंबंधी सत्तरच्या दशकात तत्कालीन वन्यजीव तज्ञ कैलास सांखला यांनी काही महत्वाची निरीक्षणे मांडली. तत्कालीन संस्थानिकांचे विलासी जीवन आणि शिकार यांमुळे तोपर्यंत चित्ते भारतातून नामशेष झाले होते. वाघांची संख्या देखील झपाट्याने कमी होत आहे असे निरीक्षण संखला यांनी मांडले. सुदैवाने त्यावेळी पर्यावरण व एकूणच जैवविविधता याबद्दल आस्था असणाऱ्या इंदिरा गांधी प्रधानमंत्री पदावर होत्या. सांखला यांच्या अभ्यासाची दखल घेतली गेली. तोपर्यंत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वन्य प्राण्यांच्या शिकारीवर निर्बंध आणणारा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली अस्तित्वात आला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी 1 एप्रिल 1973 साली प्रोजेक्ट टायगर घोषित केला गेला आणि त्याची सूत्रे सांखला यांच्याकडे सोपविण्यात आली. आज या प्रकल्पामुळे, प्रयत्नपूर्वक वाघांची संख्या वाढून ती तीन हजारांच्या पार गेली आहे.

ही सर्व किमया त्याकाळच्या खऱ्या अर्थाने ‘वाघिणी’ असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे व वन विभागाने साधली. लोकप्रतिनिधी असे निसर्गपुजक संस्कृतीचे अनुकरण करणारे असले की असे साध्य होते. मग उपरोक्त आमदार किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणतात त्याप्रमाणे बुलढाण्याचा ढाण्या वाघ (?) संजय गायकवाड निसर्गपूजक नाहीत का? तर त्यांची म्हणा व एकूणच आपली भारतीय संस्कृती म्हणा ही निसर्गपूजकच आहे. पण तरीही त्यांच्याकडून ते म्हणतात त्याप्रमाणे असे शिकारीचे वर्तन घडले असेल तर त्यांना आपल्या मातीची संस्कृती समजली नाही. परिणामी त्यांची वाटचाल निसर्गपूजक ते निसर्गभक्षक अशी झालेली आहे. याच विधानात ते पुढे असेही म्हणाले की बिबट्या वगैरे तर मी असेच पळवून लावतो. आता असे असेल तर त्यांच्यापुढे एखादे रानडुक्कर, पिसाळलेले कुत्रे, गुलाल लावून गावात सोडलेला रेडा यांची काय बिशाद. चिंधड्या चिंधड्या उडवतील ते.
या विधानानंतर कमालीची आश्चर्यकारक व तितकीच सुखद वाटणारी बाब म्हणजे या वन विभागाने हा दात ताब्यात घेतला आहे. डेहराडून येथील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे व जर खरेच हा दात वाघाचाच निघाला तर कथित ढाण्या वाघाला पिंजऱ्याच्या आड म्हणजेच तुरुंगात जावे लागणार आहे. वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार अशा गुन्ह्यांसाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. मिरवण्याचा सोस मनुष्य अथवा अन्य प्राण्यांना इजा करणारा असेल व असे मिरवणारा जबाबदार पदावर असेल तर अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.तशी कारवाई सत्तेच्या आडून दाबली गेली तर उद्या उठून कुणीही नवसरंजामदार व्याघ्रांबराचे उपरणे घालून भर रस्त्यातून फिरू लागतील जसे सध्याच्या महाराष्ट्रात कोयता, पिस्तूल व अन्य हत्यारे घेऊन लोकप्रतिनिधी फिरत आहेत.






