आज मासिक पाळी स्वच्छता दिवस… याच विषयाला धरून गडचिरोली जिल्ह्यातील या काही घटना अगदी अलीकडेच घडलेल्या…
मासिक पाळी आली म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिताटोलाचे हरिदास कुमरे यांनी आपल्या पत्नीला कुर्माघरात जाण्यापासून मनाई केली, पण त्याच गावातील इतर महिलांनी या गोष्टीला विरोध केला. इतर आदिवासी महिलांचं म्हणणं होतं की त्यांनी जे सहन केलं, तेच आजच्या मुलींनीही सहन करावं. त्यामुळे हरिदास यांना समाजाच्या दबावाखाली आपल्या पत्नीला कुर्माघरात पाठवावं लागलं. समाजातून बेदखल होण्याच्या भीतीमुळे आणि सामाजिक बहिष्काराच्या धाकामुळे ते या प्रथेला बळी पडले.
“माझ्या घरापासून कुर्माघर दूर आहे, मासिक पाळी आल्यानंतर घरातून कुर्माघरात जाताना जंगलातून जावं लागतं. पावसाच्या दिवसात तर दिवा घेऊन जावं लागतं. तो अंधार जीवघेणा असतो. कुर्माघरातील एका कोपऱ्यात बसून गुपचूप पांघरुण घेऊन बसायचं. मला जो त्रास झाला, तो आता मला आठवायचा पण नाहीये. मी माझ्या मुलीला कधीच तिथे पाठवणार नाही. आमच्या लोकांना हे का समजत नाही की, आम्ही कुर्माघरात जातो, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाळतो, पण ते जेव्हा घरातून बाहेर पडून बाजारात, बसमधून प्रवास करतात, तेव्हा एखाद्या पाळी आलेल्या स्त्रीचा चुकून स्पर्श झाला तर मग देव का त्यांना शिक्षा करत नाही? फक्त घरातल्या महिलेचा स्पर्श झाला ती दिसली तरच संकट येतं का?” गडचिरोलीतील सीताटोला मधील पल्लवी कुमरे असा थेट प्रश्न समाजाला विचारते आणि कुणाकडेच त्याचं उत्तर नसतं.

2024 मध्ये देश किती समोर चालला आहे याचा गवगवा आपण करत असलो, प्रगतशील समाजाकडे वाटचाल करत असलो तरी आजही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जश्यास तसाच आहे. महिला सक्षम झाली कितीही मोठ्या पदावर गेली. तरीही ‘ती’ खेडेगाव असो नाहीतर शहर आजही दुय्यम स्थनावर आहे. त्यातही मासिक पाळीत तिला होणारा त्रास याकडे कोणीही लक्ष देत नाही. शहरी भागांमध्ये यावर आता कुठे बोलले जात आहे. पण भारतातील आदिवासी भागाला आजही मासिक पाळीतील कुप्रथांनी वेढलेले आहे.
आदिवासी बहुल जिल्हा, नक्षलग्रस्त भाग, नैसर्गिक साधन संपत्ती आणि खदानीचा खजिना अशी ओळख गडचिरोली जिल्ह्याची आहे. एकूण 76% घनदाट वनांनी व्यापलेला हा जिल्हा, ज्यात 38% लोकसंख्या ही एकट्या आदिवासी समुदायाची आहे. देशात एकूण 75 पेक्षा अधिक जमाती आहेत, त्यात महाराष्ट्रात कोलाम, कातकरी, आणि माडिया या तीन आदिम जमाती आहेत. माडिया ही आदिम जमात देशात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, कोरची, आणि धानोराच्या भागात वास्तव्यास आहेत. गडचिरोलीची अशी ओळख असली तरी, यामध्ये गडचिरोलीतील आदिवासी महिलांच्या आरोग्याविषयी कुठे ही बोललं जात नाही.
आदिवासी भागात आजही कायम असलेली कुर्माघर प्रथा
गडचिरोलीत माडिया जमातीमधील प्रथा आणि परंपरा आजही कायम आहेत. हा भाग प्रामुख्याने आदिवासी बहुल असल्याकारणाने निसर्गाला पुजणाऱ्या परंपरा इथे आजही कायम आहेत. काही परंपरा ह्या अंधश्रद्धेला दुजोरा देणाऱ्या देखील आहेत. त्यामधीलच एक म्हणजे ‘कुर्माघर प्रथा.’ कुर्माघराच्या प्रथेबाबत बाहेरच्या जगाला माहिती नाही असं नाही, बऱ्याच गोष्टी माहित आहेत आणि त्यावर बऱ्याच संस्थांनी काम करायला सुरुवात देखील केलीये. मासिक पाळीच्या काळात महिलांना होणारा त्रास, त्यांच्या आरोग्याच्या समस्या, आणि स्वच्छतेची गरज या सगळ्यांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. मासिक पाळीच्या काळात महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यांना योग्य स्वच्छता साधनं, सॅनिटरी पॅड्स, आणि मानसिक आधार मिळायला हवा. नेमक्या याच गोष्टींवर फारशी जनजागृती गडचिरोलीमध्ये होताना दिसत नाही.

गडचिरोलीतील महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुर्माघराच्या प्रथेविरोधात आवाज उठवावा यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी. मासिक पाळी स्वच्छता दिवस ही एक संधी आहे, ज्याद्वारे आपण महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देऊ शकतो. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून महिलांना योग्य आधार देणं आवश्यक आहे. गडचिरोलीतील महिलांना त्यांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा, सामाजिक संस्था, आणि सरकारी यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करायला हवं. महिलांच्या मासिक पाळीच्या काळात त्यांना आराम आणि स्वच्छता मिळवून देणं हे आपल्या सर्वांचा कर्तव्य आहे. समाजाने जुन्या रूढी आणि परंपरांच्या चौकटीतून बाहेर येऊन प्रगतीशील विचार स्वीकारणं गरजेचं आहे.
कुर्माघरात न गेल्यास देव कोपेल…
अंधश्रद्धा ही समाजाला खोलवर प्रभावित करणारी आणि अज्ञानावर आधारित अशी गोष्ट आहे जी अनेकदा लोकांच्या मनात भीती निर्माण करते. उदाहरणार्थ, काही लोकांचा असा समज असतो की मासिक पाळीत कुर्माघरात न गेल्यास देव कोपेल आणि त्यामुळे घरातील कोणीतरी मृत्यू पावेल, गावावर संकट येईल, रोगराई पसरेल आणि अनेक मृत्यू होतील. या प्रकारच्या अंधश्रद्धेचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो, कारण यामुळे लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. अशा अंधश्रद्धांच्या प्रभावाखाली लोक त्यांच्या सामान्य जीवनात अनेक अवैज्ञानिक आणि अविवेकी क्रिया करतात.
उदाहरणार्थ, माडिया समाजात महिलांनी पाळीत असताना पुरुषांना दिसू नये असा प्रयत्न असतो. त्यांना स्पर्श करणे तर खूप लांबची गोष्ट आहे. हा एक प्रकारचा स्त्रीविरोधी दृष्टिकोन आहे जो महिलांना दुय्यम मानतो आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालतो. महिलांना पाळीत असताना स्पर्श केल्यास काही अपशकुन होईल किंवा त्या व्यक्तीवर संकट येईल असा समज पसरवला जातो. अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा खोटेपणा लक्षात घेता, आवश्यक आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद अंगीकारावा. समाजात शिक्षण आणि जागरूकतेच्या माध्यमातून अशा अंधश्रद्धांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढील काही पावले आवश्यक आहेत: अशा प्रकारे, अंधश्रद्धा एक समाजाला पोखरणारी व आत्मनिर्भरतेला हरवणारी गोष्ट आहे. तिच्या निर्मूलनासाठी प्रत्येकाने जागरूक राहून व विवेकी विचार अंगिकारून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अंधश्रद्धांच्या विरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे, कारण हा लढा फक्त एकट्याचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे. एकत्र येऊन, अंधश्रद्धांचा पराभव करणारे आणि विज्ञानावर आधारित समाज घडवणारे आपणच आहोत.
कुर्माघरांबद्दल पुरुषांची मानसिकता अशी आहे की, महिलांनी कुर्माघरात जाणं आवश्यकच आहे असं त्यांना वाटतं. कारण त्यांना गावगाडा चालवायचा असतो. एखादी महिला जर कुर्माघरात गेली नाही तर समाज तिच्यावर बहिष्कार टाकतो आणि तिला दंडही ठोठावतो. आदिवासी समाजातील अनेक पारंपरिक विचारसरणी आणि प्रथा आजही त्या समाजावर परिणाम करत आहेत. पुरुष प्रधान समाजात महिलांनी ठराविक चौकटीत वागावं, ही अपेक्षा अनेक पिढ्यांपासून रुजलेली आहे. कुर्माघरात जाणं ही त्यातील एक महत्त्वाची प्रथा आहे. कुर्माघरात महिलांनी जाणं हे त्या समाजाच्या नियमांचं पालन करणं समजलं जातं. अशा प्रथा आणि नियमांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने येतात.

कुर्माघरात जाणं म्हणजेच विशेष प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक विधींसाठी महिलांनी एकांतवासात राहणं. हे सहसा मासिक पाळीच्या काळात किंवा प्रसूतीनंतर असतं. या काळात महिलांना इतरांपासून वेगळं राहावं लागतं, जेणेकरून त्यांच्यामुळे समाजात कोणतेही अशुभ परिणाम होणार नाहीत असा समज आहे. यामुळे त्या काळात महिलांच्या आरोग्याची, स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची पर्वा न करता केवळ पारंपरिक नियमांचं पालन होतं. एखादी महिला जर या प्रथेला नाकारत असेल, तर तिला समाजात खराब वागणूक दिली जाते. अशा परिस्थितीत, तिला बहिष्काराचाही सामना करावा लागतो. गावातील इतर लोक तिच्याशी संपर्क टाळतात, तिने जर या प्रथेला विरोध केला तर कुटुंबावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, समाजाच्या दृष्टीने महिलांना या नियमांचं पालन करणं अपरिहार्य ठरतं. समाजात महिलांनी स्वतंत्रपणे विचार करावा आणि वागावं, याची गरज आहे. परंतु, आजही त्यांना जुन्या प्रथांमध्ये अडकवून ठेवलं जातं. त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागतं. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या माध्यमातूनच महिलांना या बंधनांमधून मुक्त होता येईल.
या प्रकारच्या पारंपरिक विचारसरणीत बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करावं लागतं. शिक्षणामुळे महिलांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाचं महत्व ओळखून त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुरुष प्रधान मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याचा, अधिकारांचा आणि सन्मानाचा अनुभव देण्यासाठी समाजाने प्रगतीशील विचारसरणी अंगिकारणं ही काळाची गरज आहे.
या संदर्भात भामरागड सारख्या अतिशय दुर्गम भागातील महिला सरपंच भाग्यश्री लेखामी म्हणतात की, कुर्मा घरात महिलांनी कापड वापरणे ही एक जुनी प्रथा आहे. त्या कापडाचा वापर करून त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. हे कापड त्या लाजेमूळे अंधाऱ्या बंद खोलीत वाळवतात, ज्यामुळे त्या कापडावरचे किटाणू तसेच राहून जातात आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो. आजच्या काळात महिलांना पॅड वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे, जी कापडाच्या तुलनेत अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे. परंतु, आजही काही ठिकाणी महिलांना कुर्माघरात राहण्याची सक्ती केली जाते. त्यांना भीतीत आणि असुविधेत राहावं लागतं, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पाळीच्या काळात स्वच्छता न राखल्यास विविध संक्रमण आणि आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, महिलांनी पाळीच्या काळात स्वच्छ पाणी, साबण आणि सॅनिटरी पॅड्स यांचा वापर करणं आवश्यक आहे. पॅड्स वापरण्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो आणि स्वच्छता राखणं सुलभ होतं. कुर्मा घरात राहण्याची प्रथा बदलणं गरजेचं आहे. पण हे लवकर बदलणे शक्य होणार नाही. आमच्या भागात आम्ही महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत पॅड ची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. मासिकपाळी विषयीच्या स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम राबववल्यास बदल घडू शकेल.

कुर्माघरातील असुविधा
महिलांना मासिकपाळीच्या त्या चार दिवसांत खूप त्रास होतो. कुणाचं पोट दुखतं, उलट्या होतात, पाय दुखतात. या सगळ्यांतून महिलेला आराम मिळावा यासाठी ही प्रथा पाडली गेली असावी. आणि सोबतच, पूर्वी महिला पाळी दरम्यान काहीच वापरत नव्हत्या. कापड वगैरे काही नाही, त्यामुळे पाळीचे रक्त इतरत्र सांडू नये म्हणून तिला एका वेगळ्या खोलीत ठेवायची प्रथा सुरू झाली. पण पावसाळ्यात साप चावून मृत्यू झालेल्या, अस्वलाने हल्ला करून मृत्यू झालेल्या, आणि अतिवृष्टीमुळे कुर्माघर वाहून जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.महिलांचं रजोनिवृत्तीमध्ये जास्त रक्त जातं, तेव्हा त्या बंद खोलीत कोण लक्ष देणार? कोण तिला पाणी देणार? कोण तिचं मनोबल वाढवणार? जर ती रजोनिवृत्तीमुळे कुर्माघरात जाते, पण लवकर लग्न झाल्यामुळे तिच्या गर्भाशयाची पिशवी खराब होऊन खूप रक्त गेलं, आणि वेळेत उपचार न झाल्यामुळे कितीतरी महिला कुर्माघरातच दगावतात. तरीही ही प्रथा काही बंद होत नाही. कुर्माघरातील अस्वच्छता आणि बंद खोलीत राहणं महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना अधिक काळजी आणि उपचारांची गरज असते, पण कुर्माघरात त्यांना ती मदत मिळत नाही. या प्रथेमुळे अनेक महिलांचे जीव धोक्यात येतात.






