रडण्याचा आवाज, जळणारी प्रेतं, आणि माणसाच्या आयुष्याचा शेवट जिथे असतो ती म्हणजे स्मशानभूमी. पण, याच स्मशानभूमीत आज चक्क मंडप सजला होता, वऱ्हाडी मंडळी नटून थटून आली होती, लेकीच्या संसारासाठी बापाने दिलेली शिदोरी ठेवण्यात आली होती, नवरदेव नवरी देखील त्यांच्या नवीन आयुष्याची सुरवात करण्यासाठी तयार झाले. आता कोणत्याही क्षणी अक्षता पडणार तितक्यात काही सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांचे दामिनी पथक स्मशानात पोहोचलं आणि हा विवाह रोखण्यात आला. हा एक बालविवाह होता आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच थांबला.


ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील कैलास नगर स्मशानभूमीतील. या स्मशानभूमीतच गायकवाड कुटुंब जवळपास 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे. या कुटुंबामधील अजय (नाव बदलले आहे) या मुलाचं लग्न स्नेहा (नाव बदलले आहे) या मुलीशी होणार होतं. स्नेहा ही बीड मधील एका ऊसतोड मजुराची मुलगी आहे. बीड मधली स्नेहा छत्रपती संभाजीनगरची आज सून होणार होती. पण ती अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळताच लग्नस्थळी दामिनी पथक आणि जिन्सी पोलीस स्टेशन चे PSI डोंबाळे दाखल झाले. वधू-वराच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन, त्यांचं समुपदेशन करून तेथील लग्न थांबवण्यात आलं.
या घटनेबद्दल ‘बाईमाणूस‘शी बोलतांना महिला हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे यांनी सांगितले की, “शहरात पेट्रोलिंग करत असतांना जिन्सी पोलीस स्टेशन मधून PSI डोंबाळे यांचा कॉल आला की, कैलास नगर स्मशानभूमीत एक बालविवाह होत आहे, अशी गोपनीय माहिती असून तो बालविवाह थांबवायचा आहे. ही माहिती मिळताच अनिता खरे, सिंधू गाडेकर आणि प्रियांका भिवसने आम्ही घटनासस्थळी तात्काळ गेलो. त्याठिकाणी गेल्यावर समशानभूमीत मंडप टाकलेला होता, नवरदेव नवरी देखील होते, ४०० ते ५०० वऱ्हाडी मंडळी होते. वधू- वराच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांना नवऱ्या मुलाचे आणि नवरी मुलीचे आधारकार्ड दाखवायला सांगितले आणि कागदपत्रांवरून मुलीचे वय कमी होते असे निदर्शनास आले. समुपदेशन करून तो बालविवाह रोखण्यात आला.”
मुलगी अल्पवयीन असतांना लग्न का लावता असा प्रश्न पोलिसांनी मुलीच्या वडिलांना केल्यावर “मी एक ऊसतोड मजूर आहे. वयात आलेल्या मुलीला एकटं सोडून कामावर जात येत नाही आणि माझ्या एकट्याच्या मजुरीत घर ही चालत नाही. आणि जवान पोरीला सोबत नेता ही येत नाही. कायद्याचं ज्ञान आम्हा अडाण्यांना कुठं? म्हणून असा वयाचा कायदा असतो हे पण माहिती नव्हतं” अशी खंत नवऱ्या मुलीच्या बापाने पोलिसांकडे व्यक्त केली.

PSI रावसाहेब काकड यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आणि बालविकास कल्याण यांच्यामार्फत औरंगाबाद जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांच्याकडे एक पत्र आले. छत्रपती संभाजीनगर शहरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे आणि तो रोखण्यात यावा असे पत्र जिन्सी पोलीस स्टेशन ला मिळाले. घटनास्थळी गेल्यावर शांततेत तेथील परिस्तिथी हाताळण्यात आली. मुलीच्या आई वडिलांनी कायद्याचा मान राखत लग्न थांबवलं. आणि मुलगी अठरा वर्षांची झाल्यावरच लग्न करू असा पोलिसांना शब्द दिला.
हे लग्न तर थांबलं. दामिनी पथकाला पुन्हा एकदा बालविवाह रोखण्यात यश मिळालं. आलेली वऱ्हाडी मंडळी लग्न न लावता परत गेली. पण इथे ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या सुरक्षेच्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलीच्या बापाला मिळालंच नाही.






