आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये अगदी अलीकडेच राजकारणात प्रवेश केलेल्या बासुरी स्वराज यांना स्थान देण्यात आले आहे. बांसुरी स्वराज म्हणजे प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर भारतीय राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या… नवी दिल्ली मतदारसंघातून बांसुरी स्वराज यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
बांसुरी स्वराज यांनी गेल्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली युनिटच्या लीगल सेलच्या सह-संयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आता जाणून घेऊ बांसुरीबद्दल…
13 जुलै 1973 रोजी सुषमा स्वराज यांचा विवाह स्वराज कौशल यांच्यासोबत झाला. स्वराज हे सर्वोच्च न्यायालयात त्यांचे सहकारी आणि अधिवक्ता होते. बांसुरी ही या दोघांची एकुलती एक कन्या. बासुरी स्वराज यांना कायदे क्षेत्रातला 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून त्या सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. 2007 मध्ये बासुरी यांनी दिल्लीच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवण्यासाठी लंडनमधल्या बीपीपी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. लॉमध्ये बॅरिस्टर म्हणून पात्र ठरल्यावर त्यांना लंडनमधल्या इनर टेम्पलमधून बारमध्ये पाचारण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट, रिअल इस्टेट, टॅक्सेस, आंतरराष्ट्रीय व्यवसाय लवाद आणि अनेक गुन्हेगारी खटले हाताळले आहेत. त्या खासगी प्रॅक्टिस करतात. तसंच त्यांची हरियाणा राज्याच्या अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बांसुरी स्वराज यांची कारकीर्द
- 2007मध्ये बार काऊंसिल ऑफ दिल्लीमध्ये नोंदणी
- 16 वर्षांपासून वकिली व्यवसायात सक्रीय
- फौजदारी प्रकरणे हाताळतात
- वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी
- लंडनच्या लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास
- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण
- रियल इस्टेट, टॅक्स, आंतरराष्ट्रीय वाणिज्य धोरणांचे खटले लढले
- हरियाणाच्या महाधिवक्ता होत्या

ललित मोदी प्रकरण
आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतरही त्या चर्चेत आल्या होत्या. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर विरोधी पक्षांनी त्यावेळी हितसंबंधाचा आरोप केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज त्यावेळी ललित मोदींची वकील होती. ललित मोदीच्या लीगल टीममध्ये बांसुरीची महत्त्वाची भूमिका होती. सुषमा स्वराज यांनी देखील हे मान्य केले होते. ललित मोदींच्या पासपोर्ट प्रकरणात त्यांच्या लीगल टीममध्ये बांसुरीचा समावेश होता. दिल्ली हायकोर्टात एप्रिल 2012 ते ऑगस्ट 2014 दरम्यान हे प्रकरण सुरु होते. त्यांनी मोदींचा त्यांचा पासपोर्ट मिळावा यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. बांसुरी यांनी मोदीच्या वकील म्हणून सात वेळा कोर्टात युक्तीवाद केला आहे. 2013 मध्ये पाच वेळा आणि 2014 मध्ये दोन वेळा त्यांनी कोर्टात त्यांची बाजु मांडली.
सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. मोदी सरकारमध्ये देखील त्यांना मोठी जबाबदारी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना परराष्ट्र मंत्री केल्यानंतर त्यांनी या पदावर असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याता पूरेपूर प्रयत्न केला. अडचणीत असलेल्या लोकांना तात्काळ मदत करणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्या आघाडीवर होत्या. लोकं फक्त एक ट्विट करायचे आहे सुषमा स्वराज तात्काळ त्यावर ॲक्शन घेत असत. प्रकृती अस्वस्थ असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपद घेतलं नव्हतं. पण तरी देखील त्या पक्षात ॲक्टीव्ह होत्या. सुषमा स्वराज या त्यांच्या प्रभावी भाषणामुळे ओळखल्या जात असतं. त्यांनी आपल्या भाषणातून अनेकवेळा विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या भाषणाची चर्चा नेहमीच देशभरात व्हायची.

सुषमा स्वराज यांच्या मुलीला आता भाजपकडून जबाबदारी देण्यात आल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कोणी याला घराणेशाही म्हणत आहे. कोणी त्यांना आपल्या आईप्रमाणेच काम करण्यासाठी सल्ला देत आहे. कोणी या निर्णयाचं स्वागत करत आहे. तर काही लोकं यावर टीका देखील करत आहेत. सुषमा स्वराज यांची जागा भरुन काढणं शक्य नसलं तरी त्यांच्या सारख्या नेत्यांची देशाला गरज असल्याचं अनेक जण म्हणत आहेत.






