भारतीय राजकारणाला दलित समाजाच्या नेत्यांची मोठी परंपरा लाभली आहे. हे सगळे नेते तळागळातून संघर्ष करून आणि विशेषत: विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आहेत. स्वत:चे अस्तित्व निर्माण करून लोकांशी असलेला संपर्क ही त्यांची जमेची बाजू असते आणि म्हणूनच प्रचंड मोठा लोकांचा पाठिंबा या दलित नेत्यांना मिळत असतो. अशा नेत्यांमागे कोणीही गॉडफादर नसतो, तेच स्वत:चे गॉडफादर असतात. याच परंपरेतून गेल्या काही वर्षांपासून भारताच्या दलित राजकारणात एक चेहरा सातत्याने राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत आहे तो म्हणजे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण…
उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचे नेते आणि आझाद समाज पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर यांचा 1 लाख 51 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव केला. यंदा नगीना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेमध्ये आला होता. भारतीय जनता पक्षाने तीनवेळा आमदार झालेल्या ओम कुमार यांना तिकीट दिले होते. तर समाजवादी पक्षाने माजी न्यायाधीश मनोज कुमार यांना तर बसपाने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिले होते. परंतू प्रमुख लढत चंद्रशेखर आणि ओम कुमार यांच्यातच झाली. चंद्रशेखर यांना एकूण 5,12,552 मते मिळाली. 3,61,079 लोकांनी भाजपच्या ओम कुमार यांना तर 1,02,374 लोकांनी समाजवादी पक्षाच्या मनोज कुमार यांना मतदान केले. बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र पाल सिंह 13,272 मतांसह चौथ्या स्थानावर राहिले.
उत्तरप्रदेशमध्ये एकीकडे मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचा सुपडा साफ होताना दिसत असतानाच चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीने पाय रोवायला सुरूवात केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणूकीत चंद्रशेखर यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मात्र उत्तरप्रदेशमधील सामाजिक परिर्वतनासाठी त्यांनी वारंवार आवाज उठवला असल्यामुळे ते दलित समाजामध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते.

चंद्रशेखर आझाद यांचे सबंध आयुष्य नाट्यपूर्ण आणि कमालीचे संघर्षमय राहिलेले आहे. गेल्याच वर्षी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी झाडलेली गोळी त्याच्या कमरेला स्पर्श करून बाहेर निघाली. या घटनेमुळे देशभरातील दलित समाजामध्ये संताप पसरला होता आणि त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांची लोकप्रियता आणखी वाढली.. कोण आहेत हे चंद्रशेखर आझाद…? आपल्या नावापुढे हा इसम ‘रावण’ असे का लावतो..? त्यांनी स्थापन केलेल्या भीम आर्मीचे नेमके काम काय आहे…?
द ग्रेट चमार, भीम आर्मी घडकौली…
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश मधील सहारनपूर जिल्ह्यातील घडकौली गावात लावलेल्या फलकावरून वातावरण तापलं. फलक होता भीम आर्मी आणि या संघटनेचा. द ग्रेट चमार, भीम आर्मी घडकौली या आशयाचा हा फलक पाहून गावातील सवर्ण अर्थातच ठाकूर आणि दलित यांच्यात वाद सुरू झाला. इथूनच भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अर्थातच शोषित आणि दलित समाजाचा चेहरा म्हणून समोर आला. आज या नावासमोर मोठं वलय निर्माण झालेल आहे. त्यांच्या नावापासून ते थेट पिळदार मिशीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या समर्थक आणि विरोधकांत सुद्धा चर्चा होते.
3 डिसेंबर 1996 साली उत्तर प्रदेश मधील सहारनपूर जिल्ह्यातील घडकौली या छोट्याशा गावात चंद्रशेखरचा जन्म झाला. वडील शाळेत मुख्याधापक म्हणून कार्यरत असल्यामुळे घरात एक सुसंस्कृत वातावरण सुरुवातीपासूनच होते. चंद्रशेखरने जन्मापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गावात त्यांच्या समाजाला मिळणारी हीन वागणूक पाहिली होती. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेस असणाऱ्या साहरणपूर गावात जवळपास 22% दलित लोकसंख्या आहे. गावातील ठाकूर म्हणजे सवर्ण आणि दलित यांच्यातील वाद नेहमीचाच. पाणी पिण्यापासून ते महाविद्यालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी दलिताना हीन वागणूक. यातूनच चंद्रशेखरमध्ये एक नेतृत्व उदयास येऊ लागले आणि त्यासाठी वडिलांचा भक्कम पाठिंबा त्याला मिळत होता.

महाविद्यालयात अंकित कुमार नावाच्या एका तरुणाला पुढच्या बाकावर बसण्यावरून सवर्णांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि याच व्यवस्थेला चंद्रशेखरने विरोध केला आणि याच पार्श्वभूमीवर 2013 साली भीम आर्मी तथा भारत एकता मिशनची स्थापना झाली. आज पर्यंत दलित अत्याचार आणि तत्सम घटनांवर दलित संघटना ज्या मार्गाने लढत होत्या त्यापेक्षा भीम आर्मी वेगळ्या पद्धतीने काम करते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणाऱ्या चंद्रशेखर यांनी शिका आणि संघटित व्हा सोबत स्वाभिमानाने जगा हा नारा जोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या तत्वावर तयार झालेल्या या भीम आर्मीचे उद्दिष्ट होते अधिकारांपासून वंचित असलेल्यांना न्याय मिळवून देणे. चंद्रशेखर यांच्याबाबतीतली आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात कायम संविधानाची एक प्रत असते, जेणेकरून त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की हा देश संविधानावर चालतो आणि त्याचे पालन सगळ्यांनी केलेच पाहिजे.
चंद्रशेखर आझाद नव्हे तर ‘चंद्रशेखर आझाद रावण’
चंद्रशेखर यांनी पुढे आपल्या नावासमोर “रावण” हे नाव जोडून घेतलं. पुस्तकांमधून चंद्रशेखरला रावणाची ओळख झाली आणि आजवर रंगवलेली रावमाची दुष्ट प्रतिमा त्याच्या मनातून निघून गेली. त्यांच्या मते रावण हा सर्वश्रेष्ठ होता, तो कसाही असला तरी स्वत:ची नैतिकता सोडणारा नव्हता. त्याने सीतामातेला हातही लावला नाही, आपल्या प्रजेला कधी त्रास दिला नाही. जे चुकीचे आहे त्याला कायम विरोध करत राहिला. तो अत्यंत बुद्धिमान होता, आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचारासाठी रावणाने संघर्ष केला. या सर्व गोष्टी चंद्रशेखरच्या मनावर खोलवर रुजल्या आणि त्यानेसुद्धा रावणाचा आदर्श घेऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आणि वेळ पडली तर रावणासारखा लढा द्यायचा असे ठरवले आणि तेव्हापासून चंद्रशेखर आझाद हा ‘चंद्रशेखर आझाद रावण’ झाला.

आता रावण नको तर चुलबुल पांडे म्हणा
मात्र काही कालावधीनंतर रावण हे नाव वापरण्यास चंद्रशेखर यांनीच मज्जाव केला. रावणऐवजी चुलबुल पांडे या नावाचा वापर करावा असे त्यांनी स्पष्ट केले.आपल्याला अपमानित करण्यासाठीच भाजपाकडून रावण नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे, त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी मतदारांमध्ये रामाचे पाठीराखे आणि रावणाचे पाठीराखे असे म्हणत फूट पाडू नये. माझा कुणीही रावण म्हणून उल्लेख करू नये, मला जर रावण म्हणाल तर कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा चंद्रशेखर यांनी दिला आहे.
चंद्रशेखर आजाद म्हणतात की, ‘जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण मला ‘रावण’ नावाने ओळखायला लागले. मीडियासह काही लोकांनी मला ‘रावण’ नावाने संबोधण्यास सुरुवात केली आहे. मला हे नाव नकोय. सगळीकडे ‘रावण’ नावाची चर्चा आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा फायदा घेऊ शकतात. मतदरांना राजकीय पक्ष राम आणि ‘रावण’ यांच्यामध्ये एकाची निवड करण्यास सांगू शकतात.’
कांशीराम यांच्या विचारसरणीचा प्रभाव
चंद्रशेखर पासून चंद्ररशेखर आझाद उर्फ रावण हा प्रवास करताना कांशीराम यांच्या विचारांवर प्रेरित होऊन काम केल्याचं ते सांगतात. माझा लढा हा सर्वांसाठी नसून दलित आणि शोषितांसाठी असल्याचं ते स्पष्ट सांगतात आणि याच कारणामुळे उच्चवर्णीय लोकांसोबत काम करणाऱ्या मायावतींना स्वीकारत नाहीत. चंद्रशेखर यांच्या भीम आर्मीच्या माध्यमातून उत्तरप्रदेश वेगवेगळ्या भागांत एकूण 350 शाळा चालवल्या जातात ज्या पूर्णतः मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांना विचारल्या नंतर ते हिसेंच समर्थन करत नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या हाथरसमध्ये घडलेल्या प्रकरणात त्यांनी पीडितेच्या कुटूंबियांना स्वतःच्या घरी घेऊन जाण्यासाठी न्यायालयात मागणी केली आहे.

2017 मध्ये आपल्या गावाबाहेर चंद्रशेखरने ‘द ग्रेट चमार’- ‘डॉ. भीमराव आंबेडकर ग्राम’ असा फलक लावला आणि गावात जोरदार राडा झाला. गावातल्या तथाकथित उच्चवर्णीय ठाकूरांना चंद्रशेखरची ही कृती आवडली नाही आणि गावात संघर्ष सुरू झाला. राष्ट्रीय स्तरापर्यंत ही बातमी पोहचली, चंद्रशेखरला याप्रकरणी अटकही झाली परंतू रातोरात चंद्रशेखर आझाद रावण हे नाव देशपातळीवर पोहचले.
2019 मध्ये पूर्णवेळ राजकारणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली, 2020 मध्ये CAA विरोधातील आंदोलनात भीम आर्मी त्वेषाने सहभागी झाली, या सगळ्या घटनांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होऊ लागली आणि चंद्रशेखरची प्रसिद्धीही तितक्याच वेगाने वाढू लागली. आझाद समाज पार्टी या नावाने चंद्रशेखर यांनी त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला असून आता लोकसभेत त्यांचा करिष्मा पाहायला मिळणार आहे.






