अर्वाचीन काळापासून जो देश एका ‘शेंदूर’ लावलेल्या दगडाच्या आधारावर जगत होता. अनेक दिव्य करण्याची हिम्मत दाखवत होता, त्याच देशात विशेषतः अपरांत, परशुराम भूमीत पोर्तुगीजांनी 1541 साली मूर्तीपूजा बंदीचा कायदा केला आणि खर्या अर्थाने इथल्या सनातन वैदिक संस्कृतीला ग्रहण लागलं. इंग्रजांच्या काळात त्याची ठळक आठवण झाली.
लोकांना कुठल्या ना कुठल्या सशक्त कारणाने एकत्र गाठायला हवं, ह्या एका गरजेनं टिळकांनी देव्हार्यातला ‘सोहळ्यातला’ गणपती घराबाहेरच्या मांडवात आणला. आज शतकोत्तरातला सार्वजनिक गणेशोत्सव खरंच त्याची गरज उरली का? असा जाहीरपणे सवाल विचारला जाऊ लागला आहे. अर्थात हा सवाल कोणी परधर्मीय नव्हे तर हिंदू मराठी भाषिकांमध्येच विशेषतः बुद्धीजीवी वर्तुळात, सेलिब्रिटींच्या वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे हा प्रश्न विचारून लोकांना एकत्र आणण्यासाठी आता खरंच सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज शिल्लक आहे का? ही चर्चा छेडली आहे. वरवर पाहता क्षणभर नकोशी वाटली तरी या चर्चेचं आत्मचिंतन करण्याची देखील हीच वेळ आहे. आजवर गणेशोत्सवाचा विद्रूप झालेला चेहरा पाहता हे सत्य नाकारण्याचेही कारण नाही.
गणपतीच्या आरासातील लव्हेंडर सारखं फुल देखील चीनमधून येतं…
देव भोळ्या मराठी माणसाला याचे उत्तर देणे जरा अवघड आहे. फक्त मराठी माणूसच नव्हे तर अवघी हिंदवी संस्कृती सनातन म्हणा वैदिक म्हणा, अगदी आदी काळापासून देव भोळी आहे. ईश्वर या तीन अक्षरांच्या आसपास तिची बैठक आहे आणि जगण्याच्या अनेक पद्धतींमध्ये तेच अधिष्ठान आहे. मात्र अति झालं आणि हसू आलं अशा एका ओळीमध्ये खरंच गणेशोत्सवाची गरज संपली का?, या भल्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आहे, अनेक गोष्टींचं उत्सवांमध्ये बाजारीकरण आणि अति झालं. ते आवरतं घेण्याऐवजी सुसाट वेगाने वाढत जाते.

प्रामाणिकपणे त्याची वाच्यता करणारे शत्रूस्थानी धरण्यात आले आणि तिथूनच उत्सवांमध्ये विकृतीचा निषेध करण्याची एक बुद्धिजीवी साखळी फार ताकदीने अधोरेखित होऊ लागली. लोकं आता या अतिरेका विषयी आणि उत्सवातील मूठभर शौकिनांच्या करमणुकीवर बोलू लागले. उत्सवामुळे एक उद्योग साखळी चालते, अनेकांना रोजगार मिळतो असं काल-परवापर्यंत बोललं जायचं. त्यावर बऱ्याच गोष्टी खपवल्या जायच्या. पण आता भारतातले सगळेच्या सगळे उत्सव प्रोफेशनल मार्केटिंग कंपनीच्या आहारी आहेत. त्यात भारत कोसो मैल दूर आहे.
गणपतीच्या आरासातील लव्हेंडर सारखं फुल देखील चीनमधून येतं. अख्खा प्लास्टिकचा बाजार, शोभेच्या मकरांपासून साऱ्या गोष्टी स्थानिक कारागीर बनवत नाहीत. त्या रेडिमेड कंपन्या पुरवतात. घरातल्या नैवेद्याचा मोदक देखील आता नाक्यावरच्या दुकानातून घरी येतो. मात्र केवळ वर्गण्या आणि मूठभर हौशी लोकांच्या अति उत्साहामुळे उत्सवातला गोंगाट मात्र वाढला आहे. त्याचे दृश्य परिणाम थेट दिसू लागले आहेत.
अर्थात ही चर्चा देखील आजची नाही. या चर्चेने देखील तीन दशकापेक्षा जास्त काळ पार केलाय. जोवर या उत्सवात ईश्वराचं अधिष्ठान होतं तोवर गोंगाटाचंही काही वाटत नव्हतं. मात्र शहरी भागातला गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आता नकोसा वाटू लागला आहे. अगोदरच गर्दीच्या भाराने जर्जर झालेली शहरं उत्सवातल्या अडथळ्यांच्या शर्यतीने रडकुंडीला येतात.
एवढं करून या उत्सवाबरोबर नागरिकांची जी थेट नाल जोडलेली होती ती तुटूनही आता अर्धशतक ओलांडून गेलं आहे. जिथे घरगुती घरातल्या गणपतीत कुटुंबाचा पायपोस शिल्लक राहिलेला नाही तिथं सार्वजनिक, अतिसार्वजनिक आणि महासार्वजनिक उत्सवांचं काय घेऊन बसला आहात, तिथं धंदा करणारे आणि उत्सवाचा ब्रँड खिशात टाकणारी एक भलतीच संस्कृती दिवसेंदिवस फोफावत आहे. बाप्पांच्या नावावर हे सारे गुमान सहन करावे हा त्या मागचा एक गर्भित दंडक आहे आणि तो दंडक आता जुगारण्यापर्यंत भूमिका पोहोचल्या आहेत.
या देशात आजही जो जे वांच्छील तोते लाहो या पलीकडे धमक जात नाही. अप्रिय निर्णय घेताना भल्याभल्यांच्या जीव्हा अडखळतात, मात्र अप्रिय निर्णय हे अनेकदा सुदृढ, सुरक्षित भविष्यासाठी घ्यावेच लागतात. 135 वर्षांपूर्वी दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर महर्षी धोंडो केशव कर्वे सारख्या सर्वसामान्य भिक्षुक ब्राह्मणानं कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला.
फॅमिली प्लॅनिंगची एक किंवा दोन मुले पुरे आणि लैंगिक शिक्षणाच्या चळवळीची भाषा केली. त्यांच्या घरादारावर दगड पडले, शेण सरडा झाला. मात्र आज सव्वाशे वर्षानंतर भारतासमोर लोकसंख्या हा एकच अस्तित्वाचा प्रश्न शिल्लक उरला आहे. उत्सवांचेही तेच आहे आज वर पाहता देव, धर्म आणि भावना यांसाठी ते वावगे वाटले तरी आता सार्वजनिक गणेशोत्सवाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरंच गरज उरली आहे का, याची चर्चा जाहीरपणे व्हायला हवी एवढं नक्की!
याचा इतिहासही फार खोलवर दूरपर्यंत जाणारा आहे. 1893 साली प्रथम पुण्यात दोन ठिकाणी आणि मुंबईत तीन ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तोवर शेकडो वर्ष देव्हाऱ्यातला सोवळ्यातला गणपती होताच, मात्र या देवतेच हिंदू संस्कृतीवर असलेलं गारुड, असीम श्रद्धा, आपलेपणा याचा अचूक अंदाज घेत मोठ्या हिकमतीने टिळकांनी राष्ट्रभावना वाढवण्यासाठी, विविध विचारांच्या प्रचारासाठी, इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणात लोक संघटित करण्यासाठी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
मुंबईनंतर तो ठाणे, अमरावती, वर्धा, नागपूर अगदी गोव्यापासून दमण पर्यंत हा हा म्हणता पसरला. नंतरच्या वीस वर्षात खऱ्या अर्थाने 18 कलांचा एक गुच्छ म्हणून गणेशोत्सव गल्लीबोळात नावाजला. या उत्सवाने अनेक कलावंत जसे बलुतेदार तसे कारागीर दिले. विषय आणि विचारांची पेरणी केली. इंग्रजांविरुद्धचा सगळ्यात मोठा संघटित संघर्ष आणि लोकांच्या एकत्रित येण्याची प्रक्रिया याच काळात झाली.

मात्र हे सत्व स्वातंत्र्यानंतर इतक्या वेगाने लयाला जाईल असे वाटले नव्हते. अर्थात त्यामागे कोणी परकीय शक्ती नव्हे तर आपल्याच सुपीक मेंदूतील अति आणि अतिशयोक्ती या दोन विकृती आहेत.
वर्गण्यांच्या भडीमारात लाखो करोडोंच्या पैशांच्या राशीत लोकप्रिय गणपती उत्सव कार्पोरेट झाला आणि एकदा कार्पोरेट झाला की मग सत्व, पूजा, नैतिकता, आचरण, पावित्र्य या सगळ्या गोष्टी बाष्कळ बडबड ठरतात. त्याचे पडसाद गल्लीबोळातल्या प्रत्येक गणेशोत्सवात उमटताना गेली 50 वर्ष महाराष्ट्र पाहतोय.
उत्सवांमधला गोंगाट, अचकट विचकट सादरीकरण, मुर्तींची बेसुमार उंची त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, धार्मिकतेचा ऱ्हास आणि केवळ गोंगाट आणि गोंगाट यातच उत्सव गुरफटत गेला. कुणी कुणाला सांगायची सोय नाही, सरकार पोलीस साऱ्यांचेच काम वाढले. मुठभर लोकांची गंमत झाली मात्र सर्वाधिक लोकांना त्याचा मनस्तापच सहन करावा लागतो.
आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आता खरंच प्रामाणिकपणे या गोष्टीवर मतमतांतरण होण गरजेच आहे, की टिळकांनी ज्या गोष्टीसाठी समाज संघटित करण्यासाठी जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, गणेशोत्सवाचे मेळे निर्माण केले ती गरज तेवढ्या प्रमाणात आता शिल्लक आहे का?
आता एक कुटुंब, एक बिल्डिंग, एक गल्ली आणि दहा गणपती
एक गाव एक गणपती, एक नगर एक गणपती या कल्पनांचा काही धुरीणांनी आग्रह धरला खरा, पण आता एक कुटुंब, एक बिल्डिंग, एक गल्ली आणि दहा गणपती इथपर्यंतचा स्वैराचार सुरू आहे. तो आटोक्यात आणणं देखील कठीण जात आहे. यातून काही वावगं घडलं तर त्याचे पडसाद देखील धार्मिक या नावाने प्रचंड तापतात. ज्या गणेशोत्सवात जागरणाच्या ऐवजी जुगारांचे डाव रंगतात आणि त्यासाठी अनेक मंडळ गणेशोत्सवाची धावपळ करतात अशा उत्सवांना काय म्हणावं.
गणेशोत्सव कालही होता, अगदी कदंब, शिलाहार काळात त्याची प्रचंड मोठी श्रीमंती होती. राष्ट्र चेतनेसाठी टिळकांनी तो सार्वजनिक केला. अनंत चतुर्थी पर्यंत अकरा दिवसाचा गणपती ही देखील टिळकांचीच देण. त्यांना त्यावेळी सोवळ्यातला गणपती मंडपात आणताना मोठा संघर्ष करावा लागला. विरोध झाला त्यात बाहेरच्यांपेक्षा घरचेच आघाडीवरती होते.
आज हिंदुस्तानी भाऊ नावाचा माणूस सोशल मीडियावर एक एसएमएस टाकतो आणि ठाण्या, पुणे, मुंबईतली हजारोंच्या संख्येतली तरणी मुलं विद्यार्थी मुंबईत येतात. सरकार, पोलीस सगळ्या यंत्रणांना त्याची खबर पण लागत नाही. एका मोठ्या दंगलीपर्यंत वातावरण स्फोटक होतं, इतकी किमया आता स्वस्तपणे संघटित होण्यासाठी उपलब्ध आहे. राजकारण आहे, समाजकारण आहे, जाहिरात आहे, करमणूक आहे, हजारो शास्त्र आणि पद्धती संघटित होण्यासाठी नव्या जमान्यात अस्तित्वात आल्या आहेत.
त्यांचा बाजार टीपेला गेला आहे, अशा काळात उत्सवांचे पावित्र्य हरवून उत्सवांचा गोंगाट वाढवत राहण्यापेक्षा तो आता आटोक्यात आणण्यासाठी हिंदू धर्मातल्याच मान्यवरांनी धर्माच्या आणि देवांच्या ठेकेदारांनी स्वतःहून पुढे यायला हवे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची खरंच गरज उरली का ? या एका ओळीची प्रामाणिकपणे चर्चा करायला हवी.
यासाठी गणेशोत्सव काल, आज आणि उद्या यांचे किंचित स्मरण केलं तरी अनेक प्रश्नांची उत्तरं आपसूक समोर येतील. कालचा घरगुती गणपती अख्या कुटुंबाचा, कुटुंब व्यवस्थेचा, सार्वजनिक कुटुंब संस्थेचा प्राणविसावा होता. गणपतीची प्रतीक्षा होती. अख्खं घरदार, खानदान गणेशोत्सवासाठी सिद्ध होत होतं.
घराची रंग रंगोटी, दुरुस्त्या, सारवणं, पै पाहुण्यांची आमंत्रणे, सजावट आणि त्यानिमित्ताने पाच ते सहा दिवस चालणारी एक अन्नसाखळी, विविध पद्धतीची पकवानं, बाया बापड्यांचा राबता, चिमुरड्यांची लगबग, माहेरवासणी, सासुरवासिनी, गडी माणूस आणि अवघा बारा बलूतेदारांचा, कारागिरांचा राबता म्हणजे गणेशोत्सव होता. आरत्या होत्या, पूजा, अनुष्ठानं होती. अख्खं घर मंदिरासारखं गजबजलेलं आणि पावित्र्याचा घमघमाट अनुभवणारं होतं. आता हा अनुभव पारखा होत चालला आहे.

घरातल्या मखरापासून नैवेद्याच्या मोदकापर्यंत सार सार नाक्यावरच्या दुकानातून येतं. कॉम्प्लेक्स मध्ये तर बंद फ्लॅटमध्ये काय आहे त्याची चर्चाही शून्य आहे. कॉम्प्लेक्स मधला सार्वजनिक गणपती देखील वर्गणी पुरता आहे. अनेक गणपतींना 11 दिवसात कॉम्प्लेक्स मधल्या पाचशे फ्लॅट पैकी 50 जण देखील दर्शनाला येत नाहीत. मग वर्गणीवाले मंडळ तरीही त्याची व्यवस्था लावतात. कारण तो आता नवीन कार्पोरेट फंडा झाला आहे.
अनेक मंडळातले गणपती अहोरात्र एकाकी भक्तांची वाट बघत बसलेले असतात. रात्री जुगारांचे डाव, बेवड्यांचा आजूबाजूचा संचार, नको नको तेवढे भांडण तंटे आणि फक्त विसर्जनाच्या मिरवणुकीतला गोंगाट यापलीकडे अगदीच क्वचित अपवादात्मक काही मंडळांचे सामाजिक आध्यात्मिक काम बघायला मिळतं. मध्यंतरीच्या स्पर्धेच्या देखाव्यांच्या काळात काही प्रबोधनांची घुसळून झाली खरी, मात्र ती सुद्धा आता नामशेष होत चालली आहे.
यावरून उद्याचा भविष्यातला गणेशोत्सव कसा असेल, तो कुणाच्या ताब्यात असेल, त्यातून स्थानिक कार्यकर्ता घडेल, कलावंत मिळतील, अनेक कलांची जोपासना होईल, काही सार्वजनिक मेसेज समाजामध्ये पोहोचेल, सेवाभाव जपला जाईल, एक मोठं सेवा कार्य उभं राहील याची काहीच शाश्वती आजच्या क्षणी दिसत नाही. आणि म्हणूनच खरंच आता इतका आटापिटा करून इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस महाखर्चिक होत झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव हवा आहे का ? का त्याला आता नीटनेटका आवर घालायला हवा, याचे उत्तरही शोधावं लागेल.
गणेशोत्सव आणि इतिहास
तसा गणेशोत्सव आणि इतिहास हिंदू धर्माचं अस्तित्व सनातन, पुरातन आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टींचा फार मोठा संबंध आहे. गणेशोत्सव पेशवाईत बहरला असला तरी तो इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकापासूनच नावारूपाला आला. इसवी सन दहा ते बारा या काळात शिलाहार कदबांपासून गणपतीची प्रतिष्ठा अतिशय उंचावलेली आहे. शिलाहार कट्टर शिवभक्त होते.
मात्र त्यांनी शिवपार्वती बरोबर गणपती सादर केला. प्रत्येक धार्मिक वास्तूच्या तो दरवाज्याच्या भालावर आला. घरात गणपती होताच त्याचा उत्सव वाढला. चौदाव्या शतकात भारतात एकाच वेळेस रोम, डच,पोर्तुगीज, इंग्रज अशा परकीय आक्रमांकाच्या टाचा लागल्या. त्यापूर्वी या देशाने फार मोठ्या प्रमाणात मोगलाई अनुभवली होती. बाबर ते औरंगजेब हिंदू द्वेष्टे, मूर्तीभंजक आणि धर्मद्वेष्टा इतिहास अनुभवला होता. यात कळस केला तो पोर्तुगीजांनी.
तब्बल 450 वर्ष पोर्तुगीज या देशात राहिले. त्यातला 50 टक्के काळ ते सत्तेत होते. ते इंग्रजांच्या अगोदर आले आणि इंग्रजांनंतर म्हणजे देश स्वातंत्र्यानंतरही 25 वर्षानंतर हुसकावल्यानंतर गेले. इंग्रजांविषयी हजारो लाखो चांगल्या गोष्टी खाणाखुणा, वस्तू, वास्तु, विचार सांगता येतात. पोर्तुगीजांविषयी मात्र फक्त द्वेष आणि छळ या पलीकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यांच्याएवढे जुलमी, विचारहीन, स्वार्थी राज्यकर्ते जगाने पाहिले नाहीत.

1000 वर्षाहूनही अधिक काळ कदंब, शिलाहार, सातवाहनांच्या काळात अगदी यादवांचा काळ गुण्या गोविंदाचा होता. त्यात ईश्वराचे अधिष्ठान केंद्रस्थानी होतं. पोर्तुगीजांनी मात्र तेच छिन्नविछिन्न केलं. सुरत ते कन्याकुमारी अवघ्या समुद्र किनारपट्टीवर त्यांचं शासन होतं. पॉण्डेचेरी त्रावणकोरांचं राज्य वरती दक्षिणेतली किनारपट्टी, कोकण किनारपट्टी ते सुरतेपर्यंत पोर्तुगीजांचा अंमल होता आणि हा सगळा पट्टा विशेषत: देवभोळा होता.
पोर्तुगीजांनी सर्वप्रथम देव तोडला. सन 1541 साली त्यांनी देव धर्मावरच बंदी आणली. मूर्ती पूजेवर बंदी आणली. अनेक मंदिरे तोडली. त्यांची ही टोळधाड, त्यांची ही जुलमाची छावणी तब्बल दोनशे वर्ष अव्याहतपणे सुरू होती. याच काळात रोजच्या वेदना सहन करत करत हळूहळू देव नाहीसा होऊ लागला. त्यातूनही देवभोळ्यांनी गणपतीची चित्रे पेटीतल्या आतल्या भागात चिटकवून त्याची गुपचूप पूजा करण्याची पद्धत सुरू झाली. प्रातःस्मरणी अगदी अर्ध्या रात्री ची पूजा अर्चा ब्रह्मप्रहाराच्या नावावर रुजली.
पुढे गणपती जाहीरपणे पुजता येत नव्हता त्याची जागा पानाफुलांच्या आकारांनी घेतली. त्याला पत्री पूजा म्हणत. नंतर अक्षता म्हणजे तांदूळ ही ब्रह्म वृंदानी सोय म्हणून रुजवली की तांदळाचा गणपती. देव तांदळातही आहे आणि पुढे सुपारीचा गणपती पूजला गेला तो आजतागायत. आजही मूर्ती नसेल तिथे सुपारीचा गणपती पुजला जातो. पेशवाईत गणपती वाढला असला तरी शिवकाळात छत्रपतींच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव होता असे अनेक दाखले आहेत.
संभाजी महाराजांनी सगळ्यात मोठे काम केलं असेल तर ते पोर्तुगीजांना वेसण घातले. नागोठण्यापासून फोंड्यापर्यंत गोव्यातले पोर्तुगीज फोडून काढले. त्यांच्या पुरता तो काळ हिंदूंना बराचसा सुरक्षेचा होता. ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू , वसई आणि खुद्द ठाणे शहरात पोर्तुगीजांनी धार्मिक छळ मोठा केला. बाराशे वर्ष जुनं कोपनिकेश्वराचं मंदिरही तुटलेल्या अवस्थेतच होतं.
वसई जिंकल्याचा फायदा घेत पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांनी गणेश भक्त गंगाजी नाईकांना सोबत घेऊन कौपिनेश्वराचा घाईघाईत जिर्णोद्धार केला. इतकी अटीतटीची परिस्थिती त्या काळात होती. मात्र तरीही गणेशोत्सव घराघरात वैभवाने नांदत होता.






