गत आठवडा हा आपल्याकडे शिंगल्स अवेअरनेस वीक म्हणून साजरा झाला. आता हे ‘शिंगल्स’ म्हणजे काय आणि त्याचा कसला आलाय आठवडा हे पटकन सर्वसामान्यांच्या लक्षात येणार नाही. पण तुम्हाला जर हे सांगितलं की हा गत आठवडा ‘नागीण’ या आजारासंदर्भात होता तर तुम्हाला पटकन कळेल. शिंगल्स म्हणजेच आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत नागीण… आता नागीणीचा विषय निघालाच आहे तर तुमच्या डोक्यात ‘नागिणीने विळखा मारला की, माणूस मेलाच म्हणून समजा’ हा विचार पटकन आलाच म्हणून समजा… इतकी या नागीणीची भिती आहे. नागीण या आजाराच्या नावानेच माणूस घाबरतो व पूर्वापार चालत आलेल्या नागिणीबद्दलच्या सांगो वांगी अंधश्रद्धांमुळे तर तो आणखी धास्तावून जातो…
नागीण (shingles) हा VARICELLA ZOSTER VIRUS या विषाणूमुळे होणारा त्वचेचा विकार आहे. या आजारामध्ये त्वचेवर ठणकणाऱ्या पाणी भरलेले फोड येतात. आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी कांजिण्यांचा आजार झालेला असतो. या आजाराचे विषाणू आपल्या मज्जारज्जूमध्ये जाऊन शांतपणे निष्क्रिय अवस्थेत लपलेले असतात. असे ते कित्येक वर्षे राहतात व त्यानंतर हेच विषाणू आपल्या शरीरातील मज्जारज्जूकडून निघणाऱ्या नसेमार्फत बाहेर येतात. या आजारामुळे ती नस तर दुखतेच पण ती ज्या त्वचेवर संवेदना पोहोचवते तिथेही पाणी भरून फोड येतात. या आजाराला नागीण असे म्हटले जाते.

नागीण कोणाला होऊ शकतो?
लहानपणी ज्यांना कांजिण्या होऊन गेल्या आहेत त्यापैकी कोणालाही नागीण होऊ शकते, अगदी लहान मुलांनादेखील. पण शक्यतो नागीण ही पन्नास वर्षाच्या वरील लोकांना होते. तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, उदाहरणार्थ- कर्करोगाचे रुग्ण, रक्ताचा कर्करोग, एचआयव्ही व ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी राहण्यासाठी उपचार चालू आहेत (उदाहरणार्थ स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा अवयवरोपण तसेच कर्करोग झालेल्या व्यक्तींना सुरू असलेली औषधे) अशा व्यक्तींनाही नागीण होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणूनच 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांचा शिंगल्स संदर्भात मुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. या आजाराबाबत लोकांमध्ये फारशी जागरुकता नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. शिंगल्स आजार होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये याबद्दलच्या जागरूकतेचा अभाव दखल घेण्याजोगा असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने निधी पुरवून जगभरात करवून घेतलेल्या सर्वेक्षणातील ताजी आकडेवारी आज प्रसिद्ध केली. शिंगल्स होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये याबद्दलच्या जागरूकतेचा अभाव दखल घेण्याजोगा असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. ह्या सर्वेक्षणात 12 देशांतील 3,500 हून अधिक 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.
अहवालाचे निष्कर्ष काय आहेत?
- भारतात झालेल्या सर्वेक्षणात सहभागी प्रौढांपैकी 83.5 टक्के शिंगल्सचा धोका गांभीर्याने घेत नसल्याचा ग्लोबल जीएसके सर्वेक्षणाचा निष्कर्ष
- जगभरातील 3 पैकी एका व्यक्तीला आयुष्यभरात कधी तरी शिंगल्सचा (नागिणीसारखा आजार) त्रास होतो
- शिंगल्सच्या वेदना साधारणपणे दुखणे, जळजळ, टोचल्यासारखा आणि धक्का बसल्यासारख्या असतात असे वर्णन केले जाते
- भारतातील निम्म्याहून अधिक लोकांच्या शिंगल्स हा आजार फारसा धोकादायक नाही.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यापैकी लक्षणीय प्रमाणातील व्यक्तींना शिंगल्स होण्याचा धोका समजत नसल्याचे सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. 86 टक्के उत्तरदात्यांनी हा धोका फारसा गांभीर्याने घेतला नाही. भारतात इंग्रजी भाषिक उत्तरदात्यांपैकी 81 टक्के लोकांना तर हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी 86 टक्के लोकांना शिंगल्सचा धोका फारसा वाटत नसल्याचे सांगितले. 100 पैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधीतरी शिंगल्स होण्याचा धोका आहे असे जगभरात सुमारे एक चतुर्थांश व्यक्तींना (26 टक्के) वाटते. एक पंचमांश लोकांना (17 टक्के) हा धोका 1000 मध्ये एकाला आहे असे वाटते, तर सुमारे निम्म्या जणांना (49 टक्के) शिंगल्स होण्याची शक्यताच नाही असे वाटते. भारतात इंग्रजी भाषिक उत्तरदात्यांपैकी 22 टक्क्यांच्या मते 1000 पैकी एका व्यक्तीला शिंगल्स होण्याचा धोका असतो. हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी 18 टक्क्यांच्या मते 1000 पैकी एका प्रौढाला शिंगल्स होण्याचा धोका असतो.

नागीणची लक्षणे?
काही जणांना, विशेषता वृद्धांना नागीण येण्याच्या दोन-तीन दिवस आधीच तो भाग दुखायला लागतो, तर इतरांना फोड येणे आणि तो भाग दुखणे हे एकदमच चालू होतं. नस ज्या भागात संवेदना पोहोचवते त्या भागात पाणी भरून छोटे मोठे फोड येतात. तरुणांना कमी दुखतं, पण वय जर पन्नासहून अधिक असेल तर मात्र दुखणे जास्त असते. नसेला जंतुसंसर्ग झाल्यामुळे दुखणं हे टोचल्यासारखे किंवा कापल्यासारखे वाटणे, अधूनमधून असह्य वेग येणे, तर कधी कधी सतत दुखत राहणे अशा प्रकारचे असते. काहींना तर रात्र रात्र झोप लागत नाही. अंगावर कपडा सहन होत नाही. कधी कधी त्या ठिकाणी खाज येते. मुंग्या आल्यासारखे वाटते.
अंधश्रद्धा कोणती?
काही वेळा फोड येण्यापूर्वी नसेचे दुखणे सुरु होते . त्यामुळे Heart attack , appendix किंवा किडनीचा रोग समजून रुग्णास भरती केले जाते. पण नंतर पाणी भरून फोड आल्यावर हा तसला काही आजार नाही हे लक्षात येते. मज्जारज्जूकडून निघालेली नस ही उजव्या किंवा डाव्या बाजूला जात असल्यामुळे नागीणीचे फोड हे फक्त एकाच बाजूने येतात. नागीण दोन्ही बाजूंनी मिळते व ते घातक असते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. नागीण सुरू झाल्यापासून साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये फोडांमधील पाणी सुकत जाते व तिथे खपली धरते . दुखणेही हळूहळू कमी होत जाते आणि महिन्याभरात थांबते. नागीण बरी झाल्यानंतरही दीड महिन्याच्याही नंतर दुखणे तसेच चालू राहिले तर त्याला नागीणी नंतरचे नसचे दुखणे किंवा Post Herpetic Neuralgia असे म्हटले जाते. असे दुखणे साधारण सहा महिने ते वर्ष किंवा दोन वर्ष देखील चालू राहू शकते.






