‘आदिवासी हाच खरा जंगलाचा रक्षक आहे’ हे 99 टक्के सत्य आहे. जंगलासोबत आदिवासींचे नाते आई-मुलाचे आहे, आई ज्याप्रमाणे मुलाचे पालन पोषण करते त्याच प्रमाणे जंगल आदिवासींचे पालन पोषण करते. उळट नागर समाजामुळेच जंगलाचे नुकसान होत आहे हेदेखील 99 टक्के सत्य आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की शंभर टक्के का नाही, उरलेला 1 टक्का आदिवासींच्या समाजाच्या वाट्याला का येत नाही. याचे उत्तर एप्रिल-मे महिन्यात आहे… याचे उत्तर तीव्र उन्हाळ्यात आहे… याचे उत्तर जंगलाचा हा रक्षक याच कालावधीत ‘भक्षक’ का बनतो यात आहे आणि याचे उत्तर देशभरात मोठ्या प्रमाणात सध्या सुरू असलेल्या जंगलाला लागलेल्या वणव्यांमध्ये आहे.
आदिवासींचे जगणे पूर्णपणे जंगलावर अवलंबून असते. दुर्गम आदिवासी भागातील गावांच्या अत्याश्यक गरजा जंगलातून भागवल्या जातात. आदिवासी संस्कृती, त्यांचे सामुहिक जीवन जंगलाशिवाय पूर्ण होत नाही. आदिवासींच्या प्रत्येक प्रथा परंपरा जंगलाशी निगडीत असतात. जंगल हे त्यांच्या उपजीविकेचे साधन असले तरीही जंगलातील संसाधने मिळेल तशी ओरबाडणे, त्यांचा अपव्यय करणे, लोभासाठी ती नष्ट करणे ही वृत्ती आदिवासींमध्ये दिसून येत नाही. जल जंगल जमीन टिकली तर आपली संस्कृती टिकेल तरच आपण टिकू या भावनेतून जल जंगल जमिनीचे संवर्धन करण्याचे नियम आदिवासींच्या संस्कृतीमध्ये प्रथा परंपरामध्ये गुंफलेले आढळतात.

आदिवासी आणि जंगल यांचे हे नाते इतके घट्ट असतानाही मग जंगलाला आगी का लागतात याची जेव्हा कारणे शोधली जातात तेव्हा त्या प्रमुख कारणांमध्ये एक कारण आदिवासी समाज असल्याचे दिसून येते. अंधश्रद्धेतून पुढे आलेल्या आदिवासी समाजाच्या चालीरिती आणि जंगलाला लागणारे वणवे यांच्यात संबंध असल्याचे दिसून येते. तो कसा हेच आपण या लेखातून पाहणार आहोत…
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये गेल्या चार दिवसांपासून लागलेली आग सातत्याने वाढत आहे. नयनरम्य दृश्य आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध असलेला नैनितालचा डोंगराळ भाग आपत्तीचा सामना करीत आहे. आगीचा विळखा वाढत असल्याने अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन धोक्यात आणले आहे. जंगलाला लागलेल्या आगीची ही घटना फक्त नैनितालपुरती नाहीये तर यंदाही वाढत्या उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्रपुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात या वर्षी जंगलात 24 हजार 592 इतके वणवे लागले, असं राज्याची वनविभागाची आकडेवारी सांगते. जंगलात असलेली कोरडी पाने आणि इतर ज्वलनशील पदार्थ तीव्र उष्णतेमुळे पेट घेतात. शेतीतील बदल आणि अनियंत्रित जमीन वापराच्या पद्धतींमुळे बहुतेक आग मानवनिर्मित असल्याचे मानले जाते. वनविभागाने जंगलातील आगीसाठी चार प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे सांगितले. स्थानिकांकडून जाणीवपूर्वक लावलेली आग, निष्काळजीपणा, शेतीशी संबंधित कामे आणि नैसर्गिक कारणे जबाबदार असल्याचं वनविभागाने म्हटलं आहे.
एकीकडे वन वणव्यांचा काळ, मोह फुले वेचण्याचा हंगाम आणि तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतात. मोह फुल वेचण्याच्या काळात आणि तेंदुपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असतात.

महुआ पानांना किड लागू नये म्हणून…
महुआ म्हणजो मोहाचे झाड हे आदिवासींच्या उत्पनाचे सगळ्यात प्रमुख साधन…
आदिवासींचा उदरनिर्वाह याच महुआवर अवलंबून असतो. मोह’ हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून, साठवून ठेवली जातात. जेव्हा रोख पैशांची गरज असेल, तेव्हा ती बाजारात विकतात. फाल्गुन चैत्रातल्या वसंतात, या मोहाला कोंब फुटतो. फाल्गुनमध्ये सारी पानं गाळून पडतात. काही दिवसांतच फांद्यांच्या देठांतून कळ्यांचे झुंबरच्या झुंबर लटकू लागतात. त्यात हळूहळू मोहाची फुले फुलू लागतात. साधारण मार्चचा शेवटचा आठवडा ते मेचा पहिला आठवडा मोहाची फुलं गळत राहतात. म्हणूनच महुआच्या झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आदिवासी त्या झाडाखाली आग लावतात. आदिवासी फक्त झाडांखालची जमीन साफ करण्यासाठी आणि महुआला कीटकांपासून वाचवण्यासाठी शेकोटी पेटवतात. त्यामुळे लोकांना महुआची फुले गोळा करणे सोपे जाते.

तेंदूपत्ता मोठ्या आकाराचा यावा म्हणून…
दुसरीकडे तेंदूपत्ता संकलन हा आदिवासी भागातील सर्वात मोठा रोजगार आहे. दरवर्षी या हंगामादरम्यान मोठ्या आकारीची तेंदूपाने मिळवण्यासाठी जंगलांना विनाकारण आग लावण्यात येते. तेंदूपत्ता ज्या भागात आहे त्या भागातही काही आदिवासी जंगलातून तेंदूपत्ता उपटतात आणि नवीन पाने उगवण्यासाठी या झाडांनाही आग लावली जाते. ती लहान झाडे पूर्णपणे जळून जातात, त्यानंतर त्यातून नवीन कोंब निघतात. पूर्वी आदिवासींनी लावलेल्या या आगीमुळे जंगलाचे फारसे नुकसान होत नव्हते. परंतु, वातावरणातील बदल आणि हवामानातील बदलामुळे लहान-लहान आगी मोठ्या होऊन आता जंगलांचे नुकसान होत आहे. जंगल वणव्यांच्या संदर्भात समाजातील अनेक घटकांमध्ये गैरसमज आहे. जंगलांना आग लागली तर तेंदूपत्याचे उत्पन्न वाढेल, तेंदुपत्ता संकलन जास्त होईल शिवाय तेंदूच्या पानांची गुणवत्ता वाढेल असा काही लोकांचा समज आहे.

चारा जास्त उगवेल म्हणून…
गावातील गुराखी सुद्धा गुरांसाठी चारा जास्त उगवेल या गैरसमजुतीतून गवताला आग लावतात. यामुळे जंगलात आगी पसरतात. पण संशोधनाने हे सिद्ध केले आहे की हे सर्व खोटे आहे. उन्हाळ्यात डोंगरांच्या ठिकाणी असलेला पालापाचोळा आणि गवताला बहुतांशवेळा पेटविले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील डोंगरही वणव्यामुळे होरपळतात. ग्रामीण भागात आजही डोंगरांवर वणवे लावले जातात. गवत चांगले येते, या गैरसमजुतीने नेहमी डोंगरात वणवा पेटतो. त्यातून निसर्ग व प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. यासाठी जनजागृती आणि प्रबोधनाची गरज आहे. तसेच, ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक गैरसमज जोपासले जातात. त्यातील वणवा लावणे हा एक गैरसमज आहे. गायरानातील सुके गवत जाळले, तर पुढील पावसाळ्यात अधिक जोमाने ते उगवून येते, अशी लोकांची चुकीची धारणा आहे. त्यामुळे गावानजीक डोंगर उतारावरील सुके गवत, पालापाचोळ्यास आग लावण्याचे प्रकार स्थानिकांकडून घडतात या प्रकरणी अपेक्षित जनजागृतीचा परिणाम होत नसल्याने डोंगरांची होरपळ तसेच गायरानातील सुके गवत पेटविणे सुरूच आहे.
असे लागतात कृत्रिम वणवे…
जंगलात कृत्रिम वणवे लावण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. वणवा लावणारा व्यक्ती जंगलात एखाद्या वृक्षाखाली वाळलेली पाने गोळा करतो. त्यावर रॉकेल अथवा इतर ज्वलनशील पदार्थ टाकतो. पण, तो लगेच पाने पेटवत नाही. त्याऐवजी एक पेटलेली अगरबत्ती लावून ठेवतो. ती अगरबत्ती टोकापासून हळूहळू जळत खाली येते. तिचा पानाला स्पर्श होताच पाने पेट घेतात आणि वणवा लागतो. पण, अगरबत्ती हळूहळू पेटत असल्याने वणवा लावणारा तेथून पसार झालेला असतो. त्यामुळेच वणवा लावणारे वनविभागाच्या हाती सहसा लागत नाहीत. त्यामुळे वणवा नैसर्गिक आहे की, मानवी याचा उलगडा होत नाही. या घटना केवळ भारतातच होतात असे नाही, तर ब्राझीलमध्ये मानवी वणवे सर्वाधिक लावण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्रातील जंगले ही कोरडी पानझडी जंगले आहेत. जानेवारीपासून आपल्याकडे पानगळतीला प्रारंभ होतो. ही पानगळती आणि वाढलेले गवत वनातील वणव्यांना पोषक ठरते. वणव्यांचा कालावधी नोव्हेंबर ते मे मास असा असला, तरी शिमग्याच्या (होळीच्या) नंतर हे प्रकार अधिक वाढतात. आपण आपल्या घराला, इमारतीला, आस्थापनाला आग लागली, तर किंचाळतो, विव्हळतो, हतबल होतो. मग माळरानावर, डोंगरात वणवा पेटतो, तेव्हा तेथील सजिवांनी आक्रोश कसा करायचा ? त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत का पोचत नसावा ? वणवा लावणारी प्रवृत्ती परदेशातून येत नाही, तर ती आपल्यातच आहे. आदिवासी समाजाच्या गैरसमजूती, जंगलमाफियांसह गुरांसाठी अधिक चार्याची उगवण व्हावी, काटेकुटे जळून जावेत, शेतीत राख येऊन उपन्न वाढावे, ससे पकडण्यासाठी, शिकारीस साहाय्य, सागवान तस्करी, भूमी जाळण्याची पद्धत, कोळसा बनवणार्या टोळ्या, शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ व्हावा, अशा एक ना अनेक गैरसमजूती या प्रवृतीमागे आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच; पण कार्बन डायऑक्साईड वातावरणात वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. आपल्या समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रांत अनास्था आहे, असे म्हटले जाते. ही अनास्था काही प्रमाणात असते, तर काही प्रमाणात नसते. ती न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत रहाण्याची आवश्यकता आहे. वणव्याचे चक्र असेच चालू राहिले, तर भविष्यात त्याचेही दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.






