लोकसभा निवडणूकीत मध्यप्रदेश 29/0, दिल्ली 7/0, हिमाचल प्रदेश 4/0, उत्तराखंड 5/0 आणि त्रिपुरा 2/0 हे आकडे समोर आले आणि भाजप कॅम्पमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. किंबहुना याच राज्यातील निर्विवाद वर्चस्वामुळे भाजपला 240 चा आकडा गाठता आला आणि सत्तास्थापनेच्या दिशेने त्यांची गाडी सुरू झाली. मात्र निर्विवाद वर्चस्वाच्या या सुखावणाऱ्या आकड्यांमध्ये जिथे आणखी एका राज्याचे आकडे असायला हवे होते त्या गुजरातने भाजपला धोका दिला. गुजरातचे चित्र 25/1 असे स्पष्ट झाले.
हा प्रश्न फक्त एका जागेचा नसून भाजपच्या निर्विवाद वर्चस्वाच्या स्वप्नांचा आहे. आपल्याच होम ग्राऊंडमध्ये असा कोण ‘माय का लाल’ जन्माला आला ज्याने आमचे संपूर्ण विजयाचे स्वप्न उद्धवस्त केले असा सवाल भाजपच्या गोटातून विचारला जात आहे. तर गुजरातची ही एकमेव जागा भाजपकडून खेचून घेणारी व्यक्ती म्हणजे गेनीबेन ठाकोर…
गेनीबेन ठाकोर यांच्यामुळेच तब्बल दहा वर्षानंतर लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला गुजरातमध्ये खाते उघडता आले आहे. गुजरात्या बनासकांठा लोकसभा मतदारसंघात गेनीबेन यांनी भाजपच्या डॉ. रेखाबेन चौधरी यांचा तब्बल 31 हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. गेनीबेन यांच्या या विजयामुळे भाजपचे ‘क्लीन स्विप’चे स्वप्न अपूर्ण राहिले. काँग्रेस पक्ष या विजयामुळे खुश झाला आहे याचे कारण म्हणजे एकतर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैदानातील विजय आहे आणि दुसरे कारण म्हणजे गेनीबेन यांच्या रुपाने गुजरातमध्ये काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे. याघडीला गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे शक्तीसिंह गोहिल हे फक्त एकमेव खासदार असून तेदेखील राज्यसभेचे खासदार आहेत. त्याची खासदारकीची कारकिर्द लवकरच संपणार असून गुजरात विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेस गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक लढवू शकत नाही. अशा परिस्थितीत गेनीबेन ठाकोर यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या आशा जिवंत राहिलेल्या आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणूकीत भाजपने 26 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा त्यांना हॅटट्रिक साधता आली नाही.

गेनीबेन ठाकोर या बनासकांठा मतदारसंघातील वाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्या कायम चर्चेत असतात. गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे असं वक्तव्य गेनीबेनने केले होते. गेनीबेन ठाकोर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, यामध्ये बोलताना त्यांनी, ‘बलात्कारातील आरोपींना पोलिसांकडे सोपवण्याऐवजी जिवंत जाळलं पाहिजे’ असे म्हटले होते. वाद वाढू लागल्यानंतर महिला आमदाराने बलात्काराच्या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड संताप असून आपण फक्त त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो असं म्हटलं होतं.
स्वरक्षणासाठी जर हिंदू संघटना गुजरातच्या महिलांना बंदूक चालवण्याचा आणि त्रिशुल वाटण्याचा कार्यक्रम करत असतील तर मी देखील गुजरातच्या युवतींना चाकूसारखे हत्यार द्यायला तयार आहे, ज्याने त्या स्वत:चे रक्षण करू शकतील, अशा वक्तव्यानेदेखील गेनीबेन प्रकाशझोतात आल्या होत्या.

गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 6.5 टक्के लोकसंख्या क्षत्रियांची आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे राजकोट येथील उमेदवार व केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी क्षत्रिय समुदायाबद्दल केलेल्या एका वक्तव्याने गुजरातमधील संपूर्ण क्षत्रिय समाज संतापला होता. क्षत्रिय समुदायाने रूपाला आणि भाजपाविरोधात राज्यभर निदर्शने केली. क्षत्रिय समुदाय इतका तापला होता की, त्यांनी भाजपाच्या प्रचारसभांमध्येदेखील व्यत्यय आणला आणि भाजपावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
भाजपाने हे प्रकरण शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या प्रकरणानंतर. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना अशी भीती होती की, जर क्षत्रियांनी आपला राग मतदानावर काढला, तर भाजपा किमान पाच जागांवरील आघाडी गमावेल. गुजरात राज्य विधानसभेतील सर्वांत कमी संख्या असलेला काँग्रेसने यावेळी 23 संसदीय जागा लढवल्या. भाजपाच्या विरोधात क्षत्रिय समाजाच्या नाराजीचा कुठे न कुठे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता होती.. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी अहमदाबाद पूर्वेतील लढतीतून अचानक माघार घेत भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसलाही नाराजीचा सामना करावा लागला. मात्र तरीही गुजरातमध्ये काँग्रेस गेनीबेन ठाकोर शिवाय कुठलाही चमत्कार करू शकला नाही.






