भारतातल्या मुख्य शहरांचे सोडून द्या परंतू अगदी तालुक्याच्या ठिकाणीही फेरफटका मारला की कुठल्यातरी मुख्य चौकात I Love Nandurbar, I Love Gadchiroli असे भलेमोठे होर्डिंग्ज तुमचे लक्ष वेधून घेत असतात. अतिशय बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की, या होर्डिंग्जचा आकार, त्याचा रंग आणि त्याचा फॉन्ट हे प्रत्येक शहरात सारखचं दिसून येतं… कुठून सुरू झाला हा I Heart xxx चा ट्रेंड आणि प्रत्येक ठिकाणी यात साम्य का दिसून येतं…?
‘I Heart xxx’ या मोहिमेची जनक आहे मेरी वेल्स लॉरेल्स नावाची अमेरिकन महिला…
70 च्या दशकात न्यूयॉर्क शहर पूर्ण रसातळाला गेलं होतं. शहराचं मॅनेजमेंट पूर्णपणे अयशस्वी ठरलं होतं. घाण, सतत होणाऱ्या मारामाऱ्या, स्टॉक एक्सचेंजला भाव न उरणं. ह्याने पर्यटक संख्या घटली होती. त्यावेळी तयार केलेलं हे कँपेन म्हणजे ‘I ❤️ NewYork’. इथलं ब्रॉडवे, मिक्स कल्चर, स्ट्रीट शॉपिंग ह्या सगळ्याला सोबत घेत मेरी वेल्स लॉरेल्स हे कॅम्पेन तयार केलं.

ह्या मेरी वेल्सची आता आठवण यायचं कारण म्हणजे गेल्याच आठवड्यात तिचा झालेला मृत्यू आणि पुढच्या आठवड्यात येणारा 96 वा वाढदिवस. तिच्यावर एवढं व्यक्तिविशेष लिहिण्याचं कारण म्हणजे 60 आणि 70 च्या दशकात तिने केलेले जाहिरातींचे कँपेन्स. त्या काळात जाहिरात क्षेत्रात एक स्त्री म्हणून तिने स्वतःचं उभं केलेलं अस्तित्व, असं मी म्हणू शकलो असतो पण इथे उलट म्हणावं लागेल की जाहिरात क्षेत्राला तिने एक सुंदर फेमिनिनिटी दिली. म्हणजे तिचाच एक किस्सा ह्याचं उत्तम उदाहरण आहे.
ती एका नवख्या एअरलाईनसाठी जाहिरातीचं काम करणार होती. पण त्या आधी तिने एयरपोर्ट, फ्लाईट्सचा छान अभ्यास केला. तिने जे बदललं त्याने फ्लाईट्सचं पूर्ण क्षेत्रच बदललं. तिने कँपेन तयार करण्याआधी काही अगदी बेसिक प्रश्न विचारले. सगळ्या फ्लाईट्स स्टीलच्याच का असतात किंवा एयरपोर्टवर टाइल्स का असतात? प्रत्येकाचं उत्तर युटिलिटी हेच होतं. पण तिने त्यापलीकडे विचार करत सर्वात पहिलं सजेशन दिलं. फ्लाईट्सना रंग लावा. 5 रंगातल्या फ्लाईट्स, त्यामध्ये त्याचा रंगाचे कपडे घातलेल्या हवाई सुंदऱ्या. मुळात तोवर फ्लाईट्स मधील मुलींना स्टीवर्डेस म्हटलं जायचं, त्याचं तिने एयर होस्टेस केलं.
एअरपोर्टस वरती ब्रॅनिफ (तिची क्लाइंट एअरलाईन) चा भाग वेगवेगळ्या रंगांनी सजवला. एयर होस्टेसेसना वेगवेगळे हेयर डूज दिले. आता हे एवढे एस्थेटिक पुरुषांना सुचले असते का प्रश्नच आहे. जोवर ह्याची जाहिरात पुरुष करायचे तोवर त्यांनी जाहिरातीत फक्त बायका असाव्यात, त्या सुंदर असाव्यात, त्यांचे पाय उघडे असावेत असल्या सजेशन दिल्या होत्या. पण मेरी वेल्स त्यांच्याही पुढे गेली. तिने एयरलाइन क्षेत्रच मुळातून बदललं आणि कँपेनला नाव दिलं “The end of Plain Plane”
मेरी वेल्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची सीईओ म्हणून नाव मिळवणारी पहिली स्त्री होती.

तिचाच अजून एक किस्सा म्हणजे, अल्का सेल्ट्झर ह्या acidity च्या गोळीचा. ही कंपनी आधीच प्रसिद्ध होती, विक्री देखील भरपूर होती. सगळे हीच गोळी घ्यायचे. मग आता ह्यांचा सेल कसा वाढवायचा ह्या प्रश्नावर तिने एक ओळ लिहिली ती म्हणजे “प्लॉप प्लॉप फिज फिज” (मराठीत डूबूक डुबूक, फस फस) थोडक्यात दोन गोळ्या पाण्यात पडल्याचा आवाज आणि दोनदा फसफसल्याचा. ही सायकॉलॉजिकली प्रत्येकाच्या एवढं आत रुजवलं गेलं की दोन गोळ्या घ्यायची लोकांना सवयच लागली आणि कंपनीचा सेल प्रचंड वाढला.
तर अशा ह्या मेरी बाईंचे अजून खूप किस्से सांगता येतील. एका ठिकाणी स्त्री असल्याकारणाने प्रमोशन नाकारलं म्हणून तिने स्वतःची एजन्सी चालू केली आणि ती मोठी करुन दाखवली वगैरे. तिचे असे अनेक किस्से जाहिरात क्षेत्रात चर्चिले जातात. पण सीईओ होऊनही स्वतःच्या लिहिण्यात खंड पडू न देणं, 60 व्या वर्षी रिटायर होऊन पुढची 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात असूनही शांत जीवन जगणं ह्या मला व्यक्तिशः वाखाणण्याजोग्या वाटलेल्या गोष्टी. मॅड मेन सीरिज मधील पेगी ओल्सन हे पात्र तिच्यावर बेतलेलं आहे असंही म्हटलं जातं.






