त्यांनी यापूर्वी 1988 मध्ये व्ही.पी. सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती… त्यानंतर त्यांनी 1989 साली थेट राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली…आता 2024 मध्ये ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यानंतर आणि यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होणार असल्याची खात्री असतानाही ते मोदींविरुद्ध लढण्यास सज्ज झाले आहेत. बरं हे सगळे उपद्व्याप ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात असेही नाही… मग हा माणूस काय सिद्ध करू पाहतोय…? या माणसाची कहाणी जितकी इंटरेस्टिंग आहे तितकीच ती बोचरी देखील आहे… या माणसाची कहाणी इथल्या व्यवस्थेची चिरफाड करणारी आहे… या माणसाची कहाणी लाल फितीत अडकलेल्या सामान्य माणसाची आहे… अन् या माणसाची कहाणी तो स्वत: जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठीची आहे…आणि म्हणूनच ते म्हणतात की, पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवून मी माझ्या लढ्याला एक दिशा देण्याचं काम करणार आहे.

‘आता तुम्ही मला मृत घोषित केलेच आहे, तर मग माझं नाव ‘स्वर्गीय लाल बिहारी’
स्वर्गीय लाल बिहारी असं या व्यक्तीचं नाव… तुम्ही म्हणाल, स्वर्गीय झालायं तर आता वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक कशी काय लढवतोय…? काय स्वर्गातून थेट निवडणूक लढवतोय की काय…? पण लाल बिहारीची कहाणी याच ‘स्वर्गीय’ शब्दापासून सुरू होते… कारण जवळपास 20 वर्षे या लाल बिहारीला जिवंत असूनही सरकारी व्यवस्थेने मृत म्हणून घोषित केले होते. ‘आता तुम्ही मला मृत म्हणून घोषित केलेच आहे, तर मग मी माझं नाव ‘स्वर्गीय लाल बिहारी’ असचं लिहायला सुरूवात करतो अशी भीष्मप्रतिज्ञा दोन दशकांपूर्वी लाल बिहारींनी घेतली होती तेव्हापासून साऱ्या पंचक्रोशीत ते याच नावाने ओळखलेही जातात आणि ते स्वत: देखील सगळीकडे हेच नाव वापरतात.
उत्तर प्रदेशच्या आजमगढ जिल्ह्यातील मुबारकपूर मध्ये असलेल्या अमीलो गावात 1972 साली एक विचित्र घटना घडली. हे तेच अमीलो गाव जिथे लाल बिहारींचा जन्म झाला. प्रचंड गरिबी असल्याने वयाच्या सातव्या वर्षापासूनच ते साडी बनवणाऱ्या कारागिरांसोबत काम शिकू लागले, त्यामुळे शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत. ते जेव्हा 20 वर्षाचे झाले तेव्हा हाच कपड्यांचा व्यवसाय सुरू करणायेच ठरवले, मात्र त्यासाठी त्यांना बँकेचे कर्ज हवे होते. कर्ज तेव्हाच मिळेल जेव्हा एखादी मालमत्ता गहाण ठेवली जाईल, असे बँकेने लाल बिहारीला सांगितले.म्हणून मग लाल बिहारी पोहचले आजमगड जिल्हा मुख्यालयातील महसूल कार्यालयात जिथे त्यांना वडिलोंपार्जित जमिनीचा त्यांच्या वाट्याला येणाऱ्या हिश्शाची कागदपत्रे घ्यायची होती. सरकारी कार्यालयात लाल बिहारींना जमिनीचे कागदपत्र तर मिळालीच शिवाय आणखी एक कागददेखील मिळाला… लाल बिहारीच्या मृत्यूचा दाखला…!
‘अरे पण कसं शक्य आहे, मी तुमच्यासमोर इथं जिवंत उभा आहे की’
‘अरे पण कसं शक्य आहे, मी तुमच्यासमोर इथं जिवंत उभा आहे की’ लाल बिहारी विनवण्या करायला लागला पण सरकारी यंत्रणा काही हलली नाही. आमच्याकडे तुम्ही मृत झाल्याची नोंद आहे, त्यामुळे तुमची जमीन अधिकृतपणे तुमच्या काकांच्या नावावर करण्यात आली आहे, या उत्तरावर सरकारी बाबू ठाम होते. आजपर्यंत लाल बिहारींना हे माहित नाही की ती चुक सरकारी क्लार्कची होती की काकांनी लबाडी करून सगळी जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली आहे ते.

लाल बिहारी आणि त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आघात झाला होता, उपासमारीची वेळ आली, परंतू ते हार मानणारे नव्हते. फार लवकरच त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासारख्या आणखी हजारो जिवंत माणसांचा कागदोपत्री मृत्यू झालाय. लाल बिहारी यांनी स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी यंत्रणेविरोधात आपला संघर्ष सुरु केला. त्यांनी मग ‘उत्तर प्रदेश मृतक संघ’ स्थापन केला. मालमत्तेच्या लालसेमुळे ज्या लोकांचा कागदोपत्री मृत्यू झाला आहे, अशी माणसं लाल बिहारी यांना जोडली गेली. आज संपूर्ण भारतातले जवळपास 20000 माणसं या संघाशी जोडली गेली आहेत. ही सगळी माणसं निरक्षर, गरीब आहेत जे आजही आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
जिवंत आहे हे दाखवण्यासाठी काय नाही केले…
संघ तर स्थापन केला होता. परंतु अजूनही लाल बिहारी यांचं अस्तित्व मान्य केलं नव्हतं. त्यामुळे लाल बिहारी यांनी विविध उपाय केले. या माणसाने स्वतःची अंत्ययात्रा काढली. ‘मी मेलो आहे तर माझ्या विधवा पत्नीला अनुदान द्या’,अशी मागणी केली. 1980 साली त्यांनी स्वत:च्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द जोडला. स्वतःचं नामकरण लाल बिहारी मृतक असं केलं. कोणत्या कागदपत्रांवर सही करायची झाली तर ‘स्वर्गीय लाल बिहारी’ अशी ते सही करायचे. एकूणच यंत्रणेला जाग येण्यासाठी लाल बिहारी छोटे छोटे प्रयत्न करत होते. लाल बिहारींनी आणखी एक मोठी मजल मारली. सरकारला जाग यावी आणि मी जिवंत आहे हे कळावं म्हणून, त्यांनी 1988 मध्ये व्ही.पी. सिंह यांच्याविरोधात तर 1989 साली थेट राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तो मुद्दा वेगळा.
या सगळ्या प्रकारामुळे मीडियामध्ये स्वगीय लाल बिहारी सतत चमकत राहिले परंतू न्याय मिळण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. एकदा तर त्यांनी आपल्या काकाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा केल्यामुळे अटक होईल आणि किमान त्यामुळे तरी सिद्ध होईल की लाल बिहारी जिवंत आहे. कारण मृत व्यक्तींना पोलीस अटक करत नाहीत, असा त्यांचा प्लान होता. पोलिसांना लाल बिहारींच्या या प्लानचा सुगावा लागला आणि त्यांनी या घटनेत लक्षच घातले नाही.

अखेर लाल बिहारी जिवंत झाले…
स्वर्गीय लाल बिहारी आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी एकदोन नव्हे तर तब्बल 19 वर्षे लढले. कोर्टात प्रत्येक सुनावणीच्यावेळी ‘स्वर्गीय लाल बिहारी मृतक हाजिर हो’ असं संबोधलं जायचं. अखेर 1994 साली ते पुन्हा जिवंत झाले… अर्थात कागदोपत्री! आझमगढच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि सरकारी चुक त्यांच्या लक्षात आली. कोर्टाच्या आदेशानंतर तहसीलदार कार्यालयाने कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केली आणि लाल बिहारी जिवंत आहेत हे मान्य केलं.
2003 मध्ये लाल बिहारी यांना IG नोबेल पिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या मृतक संघामध्ये 20 हजार लोकं सहभागी आहेत. लाल बिहारी यांच्या प्रयत्नांमुळे त्यापैकी 4 जणांना न्याय मिळाला आहे. आपली संपूर्ण व्यवस्था आतून किती पोखरली गेली आहे, हेच यावरून कळून येतं. मुळात लाल बिहारी यांनी आवाज उठवला नसता तर हा प्रश्न दुर्लक्षित राहिला असता.
लाल बिहारी मृतक यांच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेवर कागज नावाचा चित्रपटही आला होता. पंकज त्रिपाठी या कलाकाराने त्यात लाल बिहारी मृतक यांचं पात्र साकारलं होतं. लाल बिहारी म्हणतात, मी जिवंत असतानाही मला मृत घोषित करण्यात आलं. तहसीलदार कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्याशिवाय मी इतरही कार्यालयांचा दरवाजा न्याय मिळण्यासाठी ठोठावला. पण मला 19 वर्षे न्याय मिळाला नाही त्यामुळेच मी मृतक संघाची स्थापना केली. माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून मी हा संघ स्थापन केला. तसंच लाल बिहारी असंही म्हणाले की मला ठाऊक आहे मी ज्यांच्याविरोधात लढतो त्यांच्या विरोधात निवडून येत नाही. पण निवडणुकीच्या वेळी लोकांना समजतं की एका जिवंत माणसाला कसं मृत घोषित केलं गेलं. त्याला न्याय मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. आता हेच लाल बिहारी मृतक मोदींविरोधात लढणार आहेत.

युपीत हजारो गरिबांची जिवंतपणीच मृत्यू म्हणून नोंद
मृत घोषित केलेल्या लोकांच्या शेकडो प्रकरणांचे प्रतिनिधित्व करणारे वकील अनिल कुमार यांच्या म्हणण्यानुसार, एकट्या आझमगड जिल्ह्यात, लाल बिहारीसारख्या किमान शंभर लोकांना जमीन संपादन करण्याच्या उद्देशाने मृत घोषित करण्यात आले आहे. अनिल कुमार यांच्या मते, प्रत्येक केसची एक वेगळीच कहाणी आहे. अनेक वेळा विभागीय चुकीमुळे असे घडते. अनेकवेळा सरकारी कर्मचारी लाच घेऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र देतात. जेव्हा अशी प्रकरणे षडयंत्र आणि फसवणुकीमुळे घडतात तेव्हा न्याय मिळण्यास बराच विलंब होतो. एका प्रकरणाचे उदाहरण देताना अनिल कुमार म्हणाले की, एखादी व्यक्ती जिवंत असल्याचे सिद्ध होण्यासाठी सहा वर्षे लागली आणि जमीन हडप करण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्धचा निर्णय 25 वर्षे उलटल्यानंतरही प्रलंबीत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी झाली, तर फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. यामुळे इतर लोकांमध्येही भीती पसरेल.”
लाल बिहारींना मृत घोषित करून जवळपास 50 वर्षे होत आली. आता ते दरवर्षी त्यांचा दुसरा म्हणजे सरकारने जिवंत ठरवले त्या दिवसाचे औचित्य साधून वाढदिवस साजरा करतात. आजूबाजूच्या लोकांना घरी बोलावतात आणि एक मोठा केक कापतात. केक कापताना पाहुण्यांच्या लगेचच लक्षात येतं की, हा खरा केक नसून फक्त पुठ्ट्यांचा रिकामा बॉक्स आहे. लाल बिहारी म्हणतात,’ ही आपली सरकारी यंत्रणा आहे. आतून एकदम पोकळ… मी सेलिब्रेट करण्यासाठी केक नाही कापत तर आपण कशाप्रकारच्या समाजात राहतोय हे दाखवण्यासाठी असं करतो.’





