चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट… देशभरातल्या सगळ्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्रामुळे प्रत्येक भारतीयाचे मन हेलावून गेले होते. तो फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. लष्कराच्या शवपेटीत शहीद मेजर अनुज सूद यांचे पार्थिव होते आणि मेजर अनुजची पत्नी आकृती सूद त्या शवपेटीला अक्षरश: कवटाळून बसलेली छायाचित्रात दिसत होती. शुन्यात खोलवर गेलेली नजर आणि निर्विकार चेहरा… आकृती सूदचे ते छायाचित्र काळीज पिळवटून टाकणारे होते. सोशल मीडियावर या वीरपत्नीसाठी लोकांचे अश्रू थांबत नव्हते… 2020 मध्ये घडलेल्या या घटनेला आज चार वर्ष झाली… आज आकृती सूदची एक वेगळी लढाई सुरू आहे, सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे या वीरपत्नीच्या डोळ्यात एकाचवेळी संताप आणि अश्रू दिसतात, मात्र तिचे दुर्दैव असे की ना सरकार ना देशवासीय, कुणालाच तिच्याशी काही घेणेदेणे उरलेले नाही. हुतात्मा मेजर अनुज सूद यांच्या वीरमरणानंतर गेल्या चार वर्षांत असे काय घडले की आकृती सूदच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा आल्या… वाचा एका वीरपत्नीची कैफियत…

मेजर अनुज हे 21 राष्ट्रीय रायफल्सचे जवान होते. मेजर अनुज यांचे वडीलही लष्करी सेवेत ब्रिगेडियर पदावर कार्यरत होते. त्यांच्या मातोश्री सुमन सूद या सरकारी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मेजर अनुज सूद यांची मोठी बहीण ऑस्ट्रेलियामध्ये राहते, तर धाकटी बहीणदेखील सैन्यात तैनात आहे. हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे राहणाऱ्या आकृती यांच्याशी मेजर अनुज सूद विवाहबद्ध झाले होते. आकृती सूद सध्या पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात.
ओलिसांची तर सुटका केली, पण वीरमरण पत्कारून…
2 मे 2020 रोजी ती दुर्दैवी घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन चॉजिमुला’ही मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहीमेचे नेतृत्व मेजर अनुज सूद यांच्याकडे होते. त्यावेळी दहशतवाद्यांचा सामना करताना ओलीस ठेवलेल्या नागरिकांची तर सुटका झाली परंतू मेजर अनुज यांना वीरमरण आले. त्यावेळी ते फक्त 30 वर्षांचे होते. त्याच्यासोबतच तीन जवान देखील शहीद झाले होते.
वीरपत्नीचे भविष्य अडकले सरकारी लालफितीमध्ये…
शहीद झाल्यानंतर सैनिकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून भत्ता मिळत असतो. परंतू महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या पत्नी आकृती सूद यांना हा भत्ता नाकारला. सूद हे मूळचे महाराष्ट्रातील नाहीत. या कारणास्तव त्यांचे कुटुबीय सरकारमान्य भत्ते मिळण्यास अपात्र असल्याचे सांगून राज्य सरकारने सूद कुटुंबीयांची मागणी अमान्य केली होती. सूद यांच्या कुटुंबीयांनी त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनुज यांच्या इच्छेनुसार त्यांचे कुटुंब मागील 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील पुण्यात वास्तव्यास आहे. सूद हे शौर्यचक्र वीर असल्याने त्यांची वीरपत्नी आणि कुटुंबीय सरकारी भत्त्यासह विविध सरकारी योजना मिळण्यास पात्र ठरते. मात्र, सूद हे मूळचे महाराष्ट्राचे नसून येथे स्थलांतरित झाले आहेत. या कारणास्तव त्यांचे कुटुबीय भत्ते मिळण्यास अपात्र असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

राज्य सरकारविरुद्ध न्ययायालयाचे ताशेरे
राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मेजर अनुज सूद यांच्या विधवा पत्नीच्या अर्जाबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच निर्णय घ्यायला हवा होता, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. त्याचबरोबर सध्या लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सूरू असल्याने निर्णय घेऊ शकत नसल्याच्या सरकारी प्रशासनाच्या भूमिकेशीही उच्च न्यायालयाने असहमती दर्शवली. शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना सैनिक भत्ता तसेच इतर लाभ देताना आचारसंहिता, निवडणुकीचे कारण देऊन चालणार नाही. न्यायालयाचे निर्णय हे सर्वोच्च असतात. त्यामुळे तातडीने कार्यवाही करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
तिच्या धाडसाला कडक सलाम…
21 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवेत असणाऱ्या मेजर अनुज सूद यांना 2021 साली मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या वीरपत्नीने आकृती सूदने हा पुरस्कार स्वीकारला होता. वीरमरण आलेल्या मेजरच्या पत्नीनं आपलं दु:ख मनात कसं दाबून ठेवलं होतं हे पाहताना त्यावेळी तिच्या धाडसाला नकळत सर्वांनी कडक सलाम ठोकला. देशाप्रती प्राण पणाला लावणाऱ्या या योद्ध्याची वीरगाथा ज्यावेळी राष्ट्रपती भवनात सांगितली जात होती, तेव्हा त्यांची पत्नी आकृती यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान दिसत होता. अभिमानासोबतच त्यांच्या मनातील दु:ख डोळ्यांतून व्यक्त होत होतं. त्यांनी कसेबसे अश्रू रोखून धरले होते. सूद यांच्या पत्नीची परिस्थितीपुढे ओढावलेली हतबलता सर्वांच्या मनाच कालवाकाव करुन गेली. ऐन तारुण्यात संसार सुरु झालेला असतानाच पतीची साथ अर्ध्यावर सुटणं, त्यातही देशासाठी त्यानं प्राण त्यागणं हे सारंकाही शब्दांत व्यक्त करणं कठीण. पण, मेजर सूद यांच्या पत्नीनं धीरानं परिस्थितीचा सामना करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

ब्रिगेडिअर वडील म्हणतात, माझ्या मुलाचा मला अभिमान
मेजर अनुजचे वडील ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) सीके सूद आजही आपल्या मुलाच्या पराक्रमाबद्दल अभिमानाने बोलतात. ते म्हणतात की, शहीद झालेल्या या मुलाचा मला अभिमान आहे. अनुज तीन दिवस म्हणजे 1 मेपासून ऑपरेशनवर होता. आमचे शेवटचे संभाषण व्हॉट्सअॅपवर झाले होते. तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो. तो नेहमीच धाडसी होता आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सर्वात पुढे होता. त्याच्याबरोबर शहीद झालेले सर्व जवान खूप शूर होते. अशा शूर सैनिकांना भारतरत्न नाही पण किमान त्यांना अशोक चक्र मिळायला हवे. जेव्हा आपण कोरोना योद्धांविषयी बोलत आहोत, तेव्हा असे खरे योद्धा आपल्या छातीत बुलेट घेत आहेत. त्याची आई आणि पत्नीला अजूनही अनूज शहीद झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.





