कलेचा संबंध हा जरी बहुतांश वेळेस पांडित्याशी जोडला जात असला, तरीही तिचा उगम हा सामान्यांमध्येच असतो. उदा: हिंदुस्थानी संगीतातील प्रचलित मांड रागाचे उगम हे राजस्थानी लोकसंगीतात आहे. वृंदावनी सारंग या रागाचा उगम उत्तर प्रदेशातील लोकगीतांमध्ये आहे, असं म्हणतात. इतकंच काय, तर शास्त्रीय संगीतातील रचनादेखील लोकभाषेत आहेत. परंतु बहुजनांमध्ये जन्मलेल्या या ‘शास्त्रीय’ कला एका विशिष्ट वर्गापर्यंत, जातीपर्यंत मर्यादित राहतात का? तसे असल्यास त्याचे कारण काय? आणि हे जर खरं असेल तर आपण ते मान्य करून या कला सर्वसामान्यांसाठी खुल्या करणार आहोत का? जन-सामान्यांसाठी कला खुल्या करणे म्हणजे नक्की काय? तर, त्यांना सुद्धा ‘आपण याचा आस्वाद घेऊ शकतो’ याची खात्री पटवून देणे. प्रस्थापित वर्ग हे करायला तयार आहे का? आणि असं करताना जर ती कला वेगळ्या ढंगाने प्रस्तुत झाली तर वर्षानुवर्षे तिच्यावर मक्तेदारी असलेल्या समूहाला, जातीला किंवा वर्गाला ते मान्य होईल का? दाक्षिणात्य गायक-संगीतकार टी.एम. कृष्णा हा सवाल करतात…
कर्नाटक संगीत हे हिंदू आणि ब्राह्मणी संस्कृती आणि जीवनपद्धतीपुरते एका वर्तुळापुरते मर्यादित वा जखडलेले राहिले आहे. कोणताही संगीत-वर्ग पाहिला, तरी त्यात ठराविक कपडे घालण्यापासून ते भिंतीवरच्या देव-देवींच्या फोटोपर्यंत सारे काही उच्चवर्णीय, ब्राह्मणी वातावरण असते. शिवाय, संगीतातील रचनाकार यांच्याबद्दल दैवी कथा सांगितल्या जातात आणि ते कधीच चुकू शकत नाहीत, आणि चुकलेच तर तो दैवी खेळ होता, असं सतत ठसवले जाते. हे सारे होत असताना कला नेमकी मागे पडते, आणि तिचा या सगळ्याशी काहीही संबंध नसतो…. मॅगासेसे पुरस्कार विजेते गायक टी एम कृष्णा कर्नाटक संगीतावर असलेल्या जातीय वर्चस्ववादाच्या अशा चिंधड्या उडवतात.
कला कितीही श्रेष्ठ असली तरीही, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, जात, धर्म हे बाह्य घटक तिला चौकटबद्ध करत आले आहेत. तिच्यातल्या फुलण्याच्या, बहरण्याच्या क्षमतांना आडकाठी आणत आले आहेत. या कुंठितावस्थेचे अचूक निदान करत शास्त्रीय संगीताला अभिजनांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी दाक्षिणात्य गायक-संगीतकार टी.एम. कृष्णा यांनी कधीच जाहीर बंड पुकारले आहे. या बंडामागचे त्यांचे विचार, त्यांचे उद्देश, त्यांची कळकळ, त्यांचे सुधारणेमागचे आग्रह कर्नाटक संगीतालाच नव्हे तर समग्र लोकाभिमुख कलांना नवतेच्या प्रांगणात घेऊन जाणारे आहेत… आणि म्हणूनच सुरांचा बंडखोर सुधारक असलेल्या प्रसिद्ध शास्त्रीय गायक टी एम कृष्णा यांना प्रचंड विरोध व्हायला सुरूवात होतो.

टी एम कृष्णा यांना ‘कर्नाटक संगीताचा ऑस्कर’ देण्यास का होतोय विरोध?
प्रसिद्ध कर्नाटक संगीतकार टीएम कृष्णा यांना 2024 सालासाठीचा ‘संगीता कलानिधी पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराला कर्नाटक संगीताचा ऑस्कर म्हणतात. ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ मिळणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. नामांकित मद्रास म्युझिक अकादमीने दिलेला पुरस्कार मिळाल्यानंतर टी एम कृष्णा खूप खूश दिसत असतानाच कर्नाटकातील अनेक शास्त्रीय संगीतकारांनी मद्रास म्युझिक अकादमीच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.
टीएम कृष्णा हे केवळ संगीतकार म्हणून प्रसिद्ध नाहीत तर ते त्यांच्या डाव्या विचारसरणीसाठीही ओळखले जातात. समाजात प्रचलित असलेल्या जाती आधारित विषमतेबद्दलही ते आवाज उठवत आहेत. टीएम कृष्णा पेरियार यांचा गौरव करतात असे म्हटले जाते. कर्नाटकातील काही संगीतकारांना त्यांची ही विचारधारा अजिबात आवडत नाही. श्री कृष्ण मोहन आणि राम कुमार मोहन ही जोडी कर्नाटक संगीत विश्वात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे चाहते त्यांना ‘त्रिचूर ब्रदर्स’ म्हणूनही ओळखतात. ‘त्रिचूर ब्रदर्स’ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टीएम कृष्णा यांना ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ देण्याच्या निषेधार्थ लिहिले आहे, ‘आम्ही डिसेंबरमध्ये होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणार नाही आणि त्याचे कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे.’
प्रसिद्ध संगीतकार रजनी आणि गायत्री यांनीही टीएम कृष्णाला ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ देण्यास विरोध केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर निषेध व्यक्त केला आणि लिहिले, ‘टीएम कृष्णाला ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ देणे हा महान संगीतकार एमएस सुब्बुलक्ष्मी यांचा अपमान आहे.’ टीएम कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 98 व्या वार्षिक परिषदेत आम्ही सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक संगीत विश्वातून इतका प्रखर विरोध होत असतानाही मद्रास म्युझिक अकादमी मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. आपल्या प्रसिद्धी पत्रकात संस्थेने संगीतकार रजनी आणि गायत्री यांना चांगलेच सुनावले आहे. इतक्या महान गायकबदल्लचे तुमचे विधान हे अवास्तव आणि निंदनीय असल्याचे संस्थेने म्हटले आहे. कृष्णा यांनी संगीत विश्वाची प्रदीर्घ सेवा केल्यामुळेच इतक्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे, आम्हाला इतर गोष्टींबद्दल काहीही घेणेदेणे नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पिसाळलेल्या सनातन व्यवस्थेचे चावे
टी एम कृष्णा यांनी लिहिलेल्या Reshaping Art या इंग्रजी पुस्तकाचे जेष्ठ संपादक शेखर देशमुख यांनी “कलेची पुनर्घडण” या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक बाजारात सध्या उपलब्ध आहे. टी एम कृष्णा यांना पुरस्कार देण्यावरून जे वादळ सुरु झालं आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना शेखर देशमुख म्हणतात, थोडंसं उपहासात्मक बोलायचं झाल्यास ‘इट वॉज ओव्हरड्यु’. इथली ब्राम्हणवादी व्यवस्था टी. एम कृष्णा यांच्या संदर्भाने दबा धरून बसली होती. इतका काळ त्यांच्या हाताला फारसे काही लागले नव्हते. आताही काही लागले आहे अशातला भाग नाही. पण संघ भाजप च्या दक्षिण चढाई च्या योजनेनुसार लोकसभा निवडणुकीची वेळ साधून टी.एम कृष्ण यांना लक्ष करण्यात आले आहे. इतर भारतात हिंदू मते जातील या भीतीने तयारी होत असतांना दक्षिणेत विशेषतः तामिळनाडूत जीलके सारखे पक्ष संघ-भाजपच्या हिंदुत्वविरोधात खमकेपणाने उभे आहेत. रंजनी आणि गायत्री या दोन कर्नाटक संगीतातल्या गायिकांनी टी.एम कृष्णा यांना मद्रास म्युझिक अकॅडमीने जाहीर केलेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याची ही पार्श्वभूमी आहे.
बरं कार्यक्रमावर बहिष्कार घालून त्या थांबल्या नाहीत, तर कृष्णा संस्कृती-परंपरा कश्या नसाव्यात हे पेरियार यांच्या बहुजनवादी विचारांची बाजू घेताना त्यागराजसारख्या परंपरावादी कलावंताचा कसा अपमान करताहेत अशी आवईदेखील उठवली आहे. हे डिझाइन पुरेसं स्पष्ट आहे, रंजनी आणि गायत्री यांच्या आडून पिसाळलेली सनातन व्यवस्था आणि या व्यवस्थेचे आजचे राजकीय वारसदार आपला डाव साधू पाहताहेत.

एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की, टी.एम कृष्णा हा परंपरेला शरण गेलेला, संस्कृतीचे आंधळेपणाने गोडवे गाणारा सत्ताप्रेमी गायक नाहीये तर, टी.एम कृष्णा हा बहुजनकेंद्री कलांना केंद्रस्थानी आणणारा, बंदिस्त, घराण्याच्या हुकूमशाहीत अडकलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताला बहुजनकेंद्री लोककला- लोकसंगीताशी जोडणारा जनविचारक प्रयोगशील कलावंत आहे. ज्याने, मागासजातीतल्या मृदंगनिर्मिती करणाऱ्या कलावंताचे जगणे जगासमोर आणले आहे. ज्याने आपली शास्त्रीय संगीत कला चेन्नईच्या समुद्रकिनारी बसलेल्या कोळ्यांच्या वस्तीत नेली आहे. ज्याने जोगप्पांना आपल्या सोबत घेऊन कला सादर केली आहे, ज्याने जातीकप्रथे विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे, ज्याने केंद्रातल्या हुकूमशाही विरोधात उभे ठाकणाऱ्यांची सोबत केली आहे. ज्याने शाहिनबाग आंदोलनात आपली कला सादर केली आहे. ज्याने मुंबईतल्या अफगाण चर्चमध्ये, ज्यूंच्या सिनेगॉगमध्ये, चेन्नईच्या रेल्वे स्टेशनात, सिटिबसमध्ये शास्त्रीय संगीत सादर केले आहे.
आजच्या संघ-भाजप-मोदी-शहांच्या सनातनी व्यवस्थेच्या नजरेत असा माणूस देशद्रोही परंपराद्रोही आहे. त्याला धडा शिकवण्याच्या गेमप्लॅन मधून चेन्नईची घटना घडली आहे.
टी.एम कृष्ण सारखे कलावंत भारताच्या संकल्परचना चित्रात एकतेचे-विविधतेचे रंग भरू पाहताहेत, जर पुरुषसत्ताक सनातनी व्यवस्थेचा एजंट असलेल्या रंजनी-गायत्री या गायिका भारताच्या संकल्पना चित्राचा विचार करू पाहताहेत.
कोण आहे हा ‘सुरांचा बंडखोर नायक’ टी एम कृष्णा?
संगीत अभ्यासक आशय गुणे म्हणतात की, एरवी, आपल्याला दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत, अर्थात कर्नाटक संगीताबद्दल खूप कमी माहिती असते. हिंदुस्थानी संगीत ऐकणाऱ्या उत्तरेकडच्या श्रोत्यांना दाक्षिणात्य संगीतकार हे हिंदुस्थानी संगीतकारांबरोबरच्या जुगलबंदीमुळे किंवा इथे आयोजित होणाऱ्या संगीत महोत्सवात एखादा तास ‘तिथल्या कलाकारांना पण संधी’ अशाच स्वरुपात माहिती असतात. वास्तविक भाषा, ताल, रचना, वाद्य आणि एकूण मांडणीचा विचार केला तर दाक्षिणात्य संगीत पसंतीस पडायला थोडा अवधी लागतो. त्यातून ते संगीत धीम्या गतीचे आहे, त्यात बढत कमी असते, सतत देवाची स्तुती असणाऱ्याच रचना त्यात असतात हे गैरसमज पसरवले जातात. अशा वेळेस टी. एम कृष्णा हा आजच्या कळातला बहुदा एकमेव असा कलाकार आहे, जो हे गैरसमज तर दूर करतोच आहे, पण दाक्षिणात्य संगीताच्या पारंपरिक रसिकांच्या वर्तुळाबाहेर जाऊन इतर भाषक रसिकांना देखील आपल्याकडे, आणि आपण सादर करत असलेल्या संगीताकडे आकर्षित करतो आहे.
व्यक्तिमत्व एखाद्या कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हला शोभणारे, स्वभाव विनम्र, प्रांजळ आणि सडेतोड असलेल्या कृष्णांची मैफल अनुभवणे हा एक प्रसन्न अनुभव असतो. या प्रसन्नतेचं कारण म्हणजे, त्यांचा व्यासपीठावरचा प्रभावी वावर. त्याचे चिंतनशील विचार आणि कधी उपरोधिक, कधी टोकदार तर कधी आग्रही बोलणे. या माणसाला सतत नवे आणि काहीतरी सुंदर श्रोत्यांपुढ्यात मांडायचे असते. समोर बसलेल्या रसिकांशी पोटतिडिकीने संवाद साधायचा असतो. एरवी, कलाकाराचा स्वभाव हा त्याच्या सादरीकरणात दिसतो, तसंच कृष्णा यांचेदेखील आहे. सुरुवातीचा स्पष्ट, स्वच्छ आणि कणखर सूर हा त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची खात्री पटवून देतो. प्रत्येक आवर्तनात आपल्या साथीदारांची वाजवी स्तुती करणं, त्यांची समयोचित दखल घेणं, आपण जे गात आहोत आणि ते जे वाजवत आहेत, हे सतत रसिकांना समजावणं यात त्यांचा सर्वांना सामावून घेण्याचा स्वभाव दिसतो. त्यांच्या देहबोलीत अधून-मधून अस्वस्थता देखील जाणवते, जी कलाकारांमध्ये ‘आपल्याला खूप काही सांगायचे आहे’ या उद्देशामुळे निर्माण होते. मात्र अजून एक देखणा गुण त्यांच्याकडे आहे, आणि तो म्हणजे टायमिंग. क्षणाचे अचूकभान. दोन रचनांमधले अमूक सेकंदांचे अंतर, तालबद्ध रचना कधी सुरु करायची, हे सारे त्यांना इतके छान अवगत आहे, की रसिकांना त्यांचे गाणे भावतेच भावते. याच अचूक टायमिंगची प्रचिती ते इतर विषयांवर बोलतात, तेव्हा सुद्धा आपल्याला येते. त्यांची सामाजिक, राजकीय विचारांवर मतं प्रदर्शित होत असतात, पण त्या साऱ्याचा गाभा आपल्याला हा त्यांच्या संगीतात सापडतो.
मच्छिमारांच्या वस्तीत जाऊन कर्नाटकी संगीत सादर करणारा अवलिया
काही वर्षांपूर्वी कृष्णा यांनी असे जाहीर केले होते, की ते दर महिन्याला एक कर्नाटक रचना सादर करतील ज्यात ‘येशू’ आणि ‘अल्ला’ यांचे उल्लेख असतील. कर्नाटक संगीत हे हिंदूंचे आहे, आणि हिंदू संगीतकारांनी ख्रिस्ती सभांमध्ये, आणि इतर धर्माच्या लोकांसाठी गायचे नाही, अशा हिंदुत्ववादी संघटनांच्या फतव्याच्या विरोधात कृष्णा यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र कर्नाटक संगीतातील हा समृद्ध बहुलवाद समोर आणल्यामुळे सनातनी हिंदूंना राग आला आणि कृष्णा यांचे देशातले आणि विदेशातले कार्यक्रम त्यांनी बंद पाडले.

कृष्णा असंही म्हणतात की, प्रचलित व्यासपीठाव्यतिरिक्त इतर जागा शोधल्या गेल्या पाहिजेत. या जागा (spaces) अशा हव्यात की, तिथे असलेल्या स्थानिक जनतेबरोबर कलाकारांचा कलेमार्फत संवाद स्थापन होऊ शकेल. या प्रयोगाचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा आणि सहकाऱ्यांचे चार वर्षांपासून सुरु असलेले उरुर ओल्कोट कुप्पम (Urur-Olcott Kuppam Vizha) चेन्नईत बेसंत नगर भागातली ही एक मच्छिमार लोकांची आणि आसपासच्या प्रदेशांतून आलेल्या स्थलांतरित कामगारांची वस्ती आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात इथे फेस्टिवल भरतो. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून कृष्णा यांनी मागच्या वर्षी चेन्नईतल्या एका चालत्या सिटी बस मध्ये उपशास्त्रीय गायन केले होते. त्याचा एक छोटा व्हिडियो यु-ट्यूब बघायला मिळतो. तशाच प्रकारे चेन्नईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकावर भरतनाट्यम नृत्यही सादर केले गेले. या साऱ्याचा उद्देश अभिजनांपुरती मर्यादित राहिलेल्या गायन-नृत्यादी कला सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा, म्हणजेच कलेच्या लोकशाहीकरणाला बळ देण्याचा आहे. कृष्णा यांना हा महोत्सवाचे आयोजन करण्यात नित्यानंद जयरामन यांची साथ लाभली आहे, जे स्वतः पर्यावरण संवर्धन क्षेत्रात महत्वाचे काम करतात. या प्रयोगामुळे दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत जे बहुतांश प्रमाणात ब्राह्मण समाजापुरते मर्यादित राहिले होते, ते आता इतर जातीच्या किंवा इतर पार्श्वभूमी असलेल्या लोकांसमोरसुद्धा सादर होईल, त्या समाजालादेखील त्याचा अनुभव घेता येईल असे कृष्णा यांना वाटते. अर्थातच या प्रयोगाला ‘कलेचे लोकशाहीकरण’ देखील म्हणता येईल. त्या अर्थाने कृष्णा चौकटबद्ध, नि परंपराशरण कलेच्या मर्यादा विस्तारून त्यास मोकळा अवकाश, मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे म्हणणे,जेव्हा माणसाची जाणीवपूर्वक कृती कलेचा परिघ ढवळून काढते, सीमारेषा ओलांडते, कृत्रिम सजावटी मोडून टाकते, त्याक्षणी खऱ्या अर्थाने कला साध्य झालेली असते.
अशा वेळेस कला क्षेत्रातील प्रस्थापित वर्ग नाराज होणे, ही तर अपेक्षित गोष्ट आहे. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचा एक स्वभाव आहे, आणि तो वर्षानुवर्षे एका विशिष्ट प्रकारच्या जागेत, व्यासपीठावर विकसित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जर हे संगीत एका वेगळ्या व्यासपीठावर सादर केले, तर त्याचा स्वभाव बदलेल का? त्याचे सादरीकरण बदलेल का? स्वरांना विशिष्ट ठेहराव देऊन गायन-वादनाची अपेक्षा करणारे हे संगीत एका चालत्या बसमध्ये सादर होत राहिले, तर ते या अपेक्षेला न्याय देऊ शकेल का? हे आणि असे अनेक प्रश्न प्रस्थापित वर्गाला पडू शकतात. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही, की संगीत हे वर्षानुवर्षे एका जाती अथवा वर्गापर्यंतच मर्यादित राहावं. पारंपरिक सभांच्या व्यतिरिक्त वेगळ्या व्यासपीठावरसुद्धा ते पोहोचायला हवं, हाच कृष्णा यांचा प्राधान्याने आग्रह राहिला आहे. हे करताना कृष्णा यांनी पारंपरिक शास्त्रीय गायनाची मैफल सोडलेली नाही. त्यागराजा, मुत्थुस्वामी दीक्षितार आणि श्यामा शास्त्री यांच्या सारख्या दाक्षिणात्य रचनाकारांना ते अजिबात बाजूला सारत नाहीत. उलट, इतर समुदायातील श्रोत्यांनासुद्धा सुद्धा या तीन श्रेष्ठ रचनाकारांच्या रचना ऐकायला मिळाव्यात, त्यांना शास्त्रीय संगीत अनुभवता यावं यासाठी, कृष्णा प्रयत्नशील राहिले आहेत. याच्या मुळाशी त्यांचा लोकशाही मूल्यांवरचा ठाम विश्वास हे एक महत्वाचे कारण आहे. त्यांच्या मते, लोकशाही आणि कला ही माणसाने आत्मशोधासाठी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. लोकशाही आणि कला आपल्याला याची सतत जाणीव करुन देत असते की, आपल्या प्रत्येकात एक सुष्ट माणूस दडलेला आहे.
साहजिकच, संगीतकलेच्या लोकशाहीकरणात कृष्णा यांनी पुढाकार घेणे स्वाभाविक आहे. लोकशाहीमध्ये अनुस्यूत समतेच्या मू्ल्यावर श्रद्धा असल्यामुळेच त्यांना संगीत प्रकारात निर्माण केलेल्या श्रेणीदेखील मान्य नाहीत. शास्त्रीय संगीत हे अव्वल दर्जाचे संगीत आणि इतर प्रकार दुय्यम असा एक समज रूढ आहे. पण कृष्णा हा रुढ समज जबाबदारीने नाकारतात. वर उल्लेख केलेल्या महोत्सवात त्यामुळेच इतर कलाप्रकारांना स्थान मिळते आहे. तामिळ संस्कृतीत ‘गान’ नावाचा एक लोक-गानप्रकार आहे, जो केवळ अंत्यविधीच्या वेळेस गायला जातो. ते गायन करणाऱ्या विजी या गायकाचा – जे चेन्नईत आता एक प्रसिद्ध नाव बनले आहे – कार्यक्रम कृष्णा यांच्या पुढाकाराने शहराच्या ‘राग सुधा हॉल’मध्ये आयोजित केला गेला, जिथे केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफली होतात. ही म्हटली तर मोठीच क्रांतिकारी घटना आहे.
एका शास्त्रीय गायकाने जोगप्पांच्या संगीताची दखल घेतली
आपण जरी अमुक एका प्रकाराला शास्त्रीय दर्जा देत असू आणि दुसऱ्या एका प्रकाराला लोकसंगीत म्हणत असू, तरीही सादरीकरणाच्या पातळीवर ते एक आहेत, हा संदेश कृष्णा या निमित्ताने देत आहेत. विजी यांच्याप्रमाणेच कर्नाटकात राहणाऱ्या जोगप्पा या तृतीयपंथी समुदायाचा कार्यक्रमही त्याच दिवशी सादर झाला. खरं तर जोगप्पा यांच्याबरोबर कृष्णा यांचा सह-गायनाचा कार्यक्रम, हा देखील एक पारंपरिक चौकटी उद्ध्वस्त करणारा महत्वाचा प्रयोग आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात जोगप्पा समुदाय राहतो. हा समूह येलम्मा नावाच्या देवीची भक्ती करतो. त्यांची बहुतांश गाणी ही याच देवीला उद्देशून असतात. या समूहाचे काही नियम कडक आहेत. सर्वांना ते पाळावेच लागतात. अशा प्रसंगी टी. एम कृष्णा यांचा संगीताला सर्वसमावेशक करण्याचा आणि समाजात तृतीयपंथींविषयी निर्माण झालेली तेढ आणि संशय कमी करण्याचा प्रयत्न हा एक मैलाचा दगड ठरतो आहे.

तृतीयपंथींबद्दल आपल्या मनात काय भावना असतात? हिणकस विनोद, हेटाळणी आणि बहिष्कार याच्या शिवाय आपण कोणतीही वेगळी वागणूक या समुदायाला देत नाही. या पार्श्वभूमीवर एका शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कलाकाराने जोगप्पांच्या संगीताची दखल घेणं आणि सर्व सामाजिक बंधनं तोडून त्यांच्या बरोबर गायन करणे ही नक्कीच एक क्रांती आहे! या कार्यक्रमात व्यासपीठावर शास्त्रीय संगीतातील साथीची वाद्य तर असतातच, पण त्यांच्या जोडीला जोगप्पांची पारंपरिक लोक-वाद्येदेखील असतात. हा कार्यक्रम जुगलबंदी किंवा फ्युजन नाही, तर एकमेकांचे संगीत अनुभवून लोकांसमोर एक आगळी कलाकृती सादर करणे हा उद्देश आहे असं कृष्णा आवर्जून सांगतात. एक कलाकार म्हणून त्यांच्याभोवती निर्माण झालेलं वलय ते या प्रसंगात नकारतात. आपल्या गायनाने इतर कलाकार झाकोळले जाणार नाहीत, याची काळजी घेतात. प्रत्येक गण्यानंतर त्या रचनेची पार्श्वभूमी, इतिहास आणि त्याचे सांस्कृतिक महत्व श्रोत्यांसमोर मांडतात.
कृष्णा यांच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणिवांचे पैलू लोकांसमोर आले होते. तरीही कृष्णा यांची प्राथमिक ओळख एक कर्नाटक गायक -संगीतकार हीच आहे. त्याद्वारे सर्वसमावेशकता स्थापन करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पुढे कसा आणि किती प्रभावी ठरतो,याची सर्वांना उत्सुकता असणार आहे. कृष्णा यांना क्रांतिकारी म्हणा किंवा विद्रोही. मात्र, त्यांनी आपल्या सर्वांना थोडं थांबून विचार करायला भाग पाडलं आहे. हेच कृष्णा यांचं सर्वात मोठं योगदान आहे.
कृष्णा यांचे संगीताचे प्रयोग सुरु आहेत. मात्र, साधेपणा आणि सर्वांशी संवाद साधणे हे त्यांचे दोन गुण प्रत्येक मैफलीनंतर उठून दिसतात. मैफल झाली, की आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ते आस्थेने संवाद साधतात. कृष्णा यांना संस्कृतीत सामाजिक समावेशकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांबद्दल प्रतिष्ठित रेमोन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हे विनम्रपणे नमूद केले की, ही त्यांच्या कार्याची सुरुवात आहे आणि त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सरतेशेवटी, तामिळ रचनाकार गोपालकृष्ण भारती यांची रचना गाऊन त्यांनी आपले भाषण संपवले. ही रचना नंदनार नावाच्या दलित संतावर आधारलेली आहे. नंदनार हा शिवभक्त होता आणि त्याला मंदिरात प्रवेश करून शंकराचे स्तुती-गायन करायचे होते. मात्र दलितांना देवळात प्रवेश नव्हता. गाण्याच्या आधी केलेल्या निवेदनात कृष्णा म्हणाले, “आज दलित देवळात प्रवेश मागत नसून हक्क, संधी आणि सत्तेत सहभाग मागत आहेत. आजचे नंदनार आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहेत आणि संघटितसुद्धा आहेत. मात्र, तरीही आज जगभरात अनेक समुदाय असे आहेत ज्यांना अशा संधी नाकारल्या जात आहेत.’
वैश्विक व्यासपीठावर मानवी उत्थानाची कड घेणारे विचार मांडत आल्यामुळेच आज टी. एम. कृष्णा हे एका उंचीचे गायक आणि त्याहून मोठ्या उंचीचे चिंतनशील कलावंत म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. कलेच्या समृद्धी-संवर्धनाची, लोकशाही मूल्यांची निडरपणे पाठराखण करत आहेत. भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या पण संस्कृतीचा अर्थ न उमगलेल्या अमेरिकेतल्या तथाकथिक संस्कृतीरक्षकांच्या विध्वंसक उपद्व्यापामुळे ती उंची आणि ती प्रतिष्ठा जराही कमी होण्यातली नाही.






