2024 च्या लोकसभा निवडणुकीचे सगळे निकाल हाती आले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 293 जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया ब्लॉकला (INDIA BLOC) 233 जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 797 महिला रिंगणात उतरल्या होत्या मात्र त्यापैकी फक्त 75 महिलांनी निवडणूक जिंकली आहे. दुसरीकडे आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे ती म्हणजे देशातील 8 राज्यांमधून एकही महिला उमेदवार निवडणूक जिंकू शकलेली नाही. केरळ, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीममधून एकही महिला उमेदवार संसदेत निवडून आलेली नाही.
या निवडणुकीत एकूण 8,360 उमेदवारांनी भाग घेतला, त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या 797 होती. यामध्ये अनेक दिग्गज महिला नेत्यांचाही समावेश आहे. 2014 मध्ये 62 महिला खासदार संसदेत पोहोचल्या होत्या, तर 2019 मध्ये त्यांची संख्या 78 होती. 2019 मध्ये एकूण पुरुष उमेदवारांची संख्या 7334 होती तर महिला उमेदवारांची संख्या 715 होती.

2019 च्या लोकसभेमध्ये 78 महिला खासदारांची निवड झाली होती. त्यामुळे आधीच्या लोकसभेशी तुलना करता, महिला खासदारांची संख्या चारने घटली आहे. 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 22 महिला खासदारांची निवड झाली होती. त्या तुलनेत ही संख्या वधारली असली तरीही भारतासारख्या लोकशाही देशामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण इतके कमी असणे प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून चिंताजनक मानले जाते. कारण- एकूण 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या 74 म्हणजे 13.63 टक्के होते. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते लक्षात घेता, आताची महिला सदस्यसंख्या निश्चितच फार कमी आहे.
महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचे विधायेक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या विधेयकाची अद्याप अमलबजावणी बाकी आहे. भाजपने सर्वाधिक महिलांना यावेळी संधी दिली. भाजपतर्फे 69 महिला निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्या खालोखाल कॉँग्रसने 41 महिलांना संधी दिली होती. भाजपच्या 30, कॉँग्रेसच्या 14 तर तृणमूल कॉँग्रेसच्या 11 महिला निवडून आल्या असून समाजवादी पक्षाच्या चार, द्रमूकच्या तीन, संयुक्त जनता दलाच्या आणि एलजेपी (आर) या पक्षांच्या प्रत्येकी दोन महिला उमेदवार विजयी झाल्या.

निवडल्या गेलेल्या 74 महिला खासदारांपैकी 43 सदस्य पहिल्यांदाच संसदेत जाणार आहेत. त्यापैकी राजदच्या मिसा भारती या आधी राज्यसभेच्या सदस्य होत्या. यावेळी पहिल्यांदाच संसदेत येणाऱ्या एकूण सदस्यांच्या टक्केवारीपेक्षा (52 टक्के) पहिल्यांदाच संसदेत येणाऱ्या महिलांची टक्केवारी (59) अधिक आहे. संसदेतील सदस्यांच्या वयाची सरासरी काढली असता, ती 53 वर्षे निघते. तर, एकूण महिला सदस्यांच्या वयाच्या सरासरी काढली असता, ती 50 वर्षे निघते. एकूण महिला सदस्यांपैकी 78 टक्के महिलांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
तृणमूल कॉँग्रेसने कायमच महिला उमेदवारांना इतर पक्षांच्या तुलनेत नेहमीच अधिक संधी दिली आहे. संसदेत यंदा ममता दिदींच्या 11 महिला शिलेदार असणार आहेत, यापैकी एक अंगणवाडी सेविका, दोन डॉक्टर, चार अभिनेत्री, एक इनव्हेस्टमेंट बँकर आणि तीन पूर्णवेळ राजकारण अशा महिलांचा समावेश आहे.






