निसर्गाच्या असमतोलामुळे आज देशातील अनेक राज्यं दुष्काळाने होरपळत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या हवामान खात्याच्या अहवालाला अनेक वेळा पाऊस हुलकावणी देतो. बऱ्याचवेळा दमदार पाऊस, अतिवृष्टीचा अंदाज सांगणाऱ्या हवामान तज्ज्ञांना हा पाऊस अक्षरश: कधीकधी तोंडघशी पाडत थेंबभरही बरसत नाही. डिजीटल युगात ही परिस्थिती आहे. पण, बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळमध्ये सुमारे 350 वर्षांपूर्वीपासून पीकपाण्याचा अंदाज वर्तवण्याची परंपरा आहे. तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर त्यांनी वर्तवलेली पीक, पाणी, राजकीय आणि आर्थिक भाकितं बहुतांश वेळा खरी ठरली आहेत.
आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर भेंडवळची घट मांडणी आज होणार आहे. या मांडणीचे अंदाज उद्या सकाळी म्हणजे, 11 मे रोजी सूर्योदयावेळी जाहीर केले जातील. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाऊस, पीक परिस्थिती, हवामान या सोबत या मांडणीत देशातील राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि सामाजिक परिस्थितीचा वेध घेणारी भेंडवळची घटमांडणी केली जाते. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सूर्योदयावेळी या घट मांडणीचे अंदाज जाहीर केले जातात.

घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड
आज सायंकाळी सूर्यस्तावेळी ही घट मांडणी केली जाणार असल्याने आज मराठवाडा, खान्देश, विदर्भातून हजारो शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामी येतात. शिवाय अनेकांची या परंपरेवर विश्वास आहे. असे असतांना या पद्धतीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत इशारा दिला आहे. ही घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे. परिणामी शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन बुलढाण्याच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. तसेच, यावेळी कुठले राजकीय भाकीत केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणते. हे भाकीत केवळ एक थोतांड आहे. संभाव्यतेच्या नियमावर बाकी कोणीही चुकला किंवा न शिकलेला व्यक्तीदेखील परिस्थितीजन्य तार्किक विचार करून एकंदरीत पर्जन्यमानाचा, हवामानाचा, पर्यावरणाचा, शासकीय कार्यालयात वर्तवलेल्या अंदाजाचा अभ्यास करून असे भाकित वर्तवले जाऊ शकतो.
आजही हजारो शेतकऱ्यांची यावर निष्ठा
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा काठावर आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले भेंडवळ हे छोटेसे गाव. असे म्हटले जाते की, गावातील व्रतस्थ चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. जंगलात तपश्चर्या करून त्यांनी नीलावती विद्या प्राप्त केली. त्या माध्यमातून ते पशूपक्ष्यांशी संवाद साधायचे. महाराजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गावाच्या पारावर आणि अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या शेतात घटमांडणी करून पीक-पाण्याविषयी अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली..
या अंदाजावरूनच पंचक्रोशीतील शेतकरी खरीप आणि रबी पिकांचे नियोजन करतात. चंद्रभान महाराजांचा हा वसा आज त्यांची तेरावी पिढी सांभाळत आहे. रामदास महाराज यांनी हा वारसा अनेक वर्षे चालविला. गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनात पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर पाटील यांनी घटमांडणीचे अंदाज मांडले होते. रामदास महाराजांचे निधन झाले. यंदा ही मुख्य जबाबदारी पुंजाजी महाराजांवर आली होती. या मांडणीसाठी पुंजाजी महाराजांचे एक महिना पूर्वीपासून व्रतस्थ जीवन सुरू झाले. या काळात त्यांचा जंगलात अज्ञातस्थळी वास असतो. भेंडवळमधील वाघ परिवार वंशपरंपरेने हा वारसा अव्याहतपणो चालवत असून याच आधारावर शेतकरी मानसिक आधार शोधत आपापल्या पिकांचे नियोजन करीत असतात.
ही मांडणी होणार म्हणून कुठेही जाहिरात होत नाही, कोणी आमंत्रण देत नाही किंवा मांडणीचे निष्कर्ष सांगण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचे शुल्क उकळले जात नाही. हे सर्व खरे असले तरी मांडणीतून बाहेर आलेले निष्कर्ष हे हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र वा ज्योतिषशास्त्राच्या आधारावर काढले जात नाहीत. पण आजही हजारो शेतकरी निष्ठेने आणि मोठ्या विश्वासाने भेंडवळची घटमांडणी ऐकण्यासाठी केवळ जातच नाहीत, तर त्यावर अंमलबजावणीही करतात.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र चंद्रभान महाराजांच्या कुटुंबामध्ये अशी निलवंती किंवा कुठलीही आलोकिक शक्ती अतिंद्रिय शक्ती जर अस्तित्वात असेल तर यांनी ते सिद्ध करण्यासाठी आव्हान स्वीकारावे असे आवाहान केले आहे. दोन वर्षांपूर्वी तर समितीने 25 लाखांचे आव्हान दिले होते. असं म्हटलं जातं की तीनशे ते साडेतीनशे वर्षाची भाकित वर्तवण्याची परंपरा या घराला लाभलेली आहे. परंतु प्रत्यक्ष चौकशी केली असता यांच्याकडे तिनशे वर्षाचे कुठलेही पुरावे नाही.
गेल्या काही वर्षांपासून भाकितं चुकीची ठरताहेत…!
गेल्या वीस-पंचवीस वर्षातील भाकिते पूर्णपणे खरे ठरल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षाची भाकित तपासले असता असं म्हटलं होतं की, कपाशीचे पीक उत्तम येईल परंतु कपाशीचे पिक नाममात्र आले, हरभरा पीक साधारण सांगितले होते, परंतु सर्वत्र हरभरा पीक उत्कृष्ट आले. उडीद मुगाचे पीक साधारण राहील, परंतु उडीद मुगाचे पीक त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य होते. घटमांडणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवतात परंतु कपाशी नंतर सोयाबीनचा पेरा असतो तशी घटमांडणीमंध्ये सोयाबीनला थारा नाही. कारण सोयाबीनचे पीक हे या भागांमध्ये अलीकडे म्हणजे जवळ जवळ 30 वर्षापासून जास्त प्रमाणात घेतला जात आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या गटामध्ये कुरडई ,करंजी ,पुरी या सारख्या पदार्थांचा वापर करतात आणि यासारखे पदार्थ तिथे या साहित्य मध्ये मांडतात. वास्तविक हे पदार्थ तर महिलाच बनवतात परंतु याही घटमांडणी जेव्हा चालते त्या परंपरेमध्ये त्या कुठेही महिला समाविष्ट झालेली दिसून येत नाही. वास्तविक त्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही. हे घटमांडणी गावाबाहेर शेतामध्ये केल्या जाते.आणि आतापर्यंत तिथे कुठेच महिला उपस्थित दिसत नाही, म्हणजे तिथे स्री पुरुष असमानता आहे.अशा भाकितं वर विश्वास ठेवून जर बळीराजा आपल्या निर्णय घेत असेल तर “जग चालले पूर्वेकडे आणि आम्ही चाललो पश्चिमेकडे”अशी आपली दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.

अशी केली जाते घटमांडणी?
अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भेंडवळबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी करण्यात येते. सुमारे सात फुट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात येतो. यात घागर, मातीची चार ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेला करवा, पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी यासह 18 प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात येते.
घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात येतात. ही ठेवण्यात आलेली चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येतात. त्यावर पाण्याने भरलेला करवा अर्थात मातीचे भांडे ठेवण्यात येते. करव्यावर वडा, भजा, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी मांडतात. घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत मानले जाते तर मसूर शत्रूचे प्रतीक, करडी संरक्षण व्यवस्था; सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी- कुरडई चारा-पाण्याचे, करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे यात झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून वाघ कुटुंबातील सदस्य येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकित वर्तवितात.
असे असले तरी वऱ्हाडासोबत खान्देश, मध्य प्रदेशातील अनेक गावांतील शेतकरी अंदाज जाणून घेण्यासाठी आदल्या दिवशीच भेंडवळमध्ये पोहचतात. हजारो शेतकरी येत असल्याने ‘बिझनेस’च्या कायम संधी शोधणाऱ्या बी-बियाणे कंपन्यांची गेल्या काही वर्षांत चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. विविध वाणांची जाहिरात करण्यासाठी पहाटेच प्रचार साहित्य घेऊन कंपन्यांचे प्रतिनिधी भेंडवळमध्ये ठाण मांडतात.






