4 सप्टेंबर 1987 रोजी वर्तमानपत्रात एक बातमी झळकली, ती वाचून देशभरातील सर्व लोकांना धक्का बसला. राजस्थानातील जयपूरजवळच्या दिवराला गावात 18 वर्षांची रूपकंवर नामक तरुणी नवऱ्याच्या चितेवर सती गेली होती… आता तब्बल 37 वर्षांनंतर या जुन्या सती प्रकरणात जयपूरच्या विशेष न्यायालयाने आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रूप कंवर यांचा मृत्यू हे देशातील शेवटचे सती प्रकरण म्हणून ओळखले जाते. रूप कंवर यांच्या मृत्यूला सती प्रथा म्हणून गौरवण्यात आले. रुप कंवर यांच्या मृत्यूनंतर देशात सती प्रथेशी संबंधित कायदा करण्यात आला आणि अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात आली.
37 वर्षे जुन्या सती प्रकरणात जयपूरच्या विशेष न्यायालयाने आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. स्थानिक पोलिसांनी रूप कंवर सती प्रकरणी काही लोकांवर खटला दाखल केला होता. या प्रकरणात आतापर्यंत 25 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यात भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री राजेंद्र राठोड यांच्या नावाचा समावेश आहे.
सती प्रतिबंधक विशेष न्यायालयाने जयपूरने हा निकाल दिला. आरोपीच्या वतीने वकील अमनचैन सिंग शेखावत यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायालयाने महेंद्र सिंह, दशरथ सिंह, श्रवण सिंह यांच्यासह आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील अमन चैन सिंह शेखावत सांगतात की, ज्यांना निर्दोष सोडण्यात आलं ते घटनेच्या वेळी 12-15 ते 17-18 वर्षांचे शालेय विद्यार्थी होते. त्यांनी सती प्रथेला वाव दिला किंवा उदात्तीकरण केलं असे कोणतेही पुरावे नाहीत. 31 जानेवारी 2004 ला याच न्यायालयाने भाजप नेते राजेंद्र सिंह राठौड, काँग्रेस नेते प्रताप सिंह खाचरियावास आणि रूपकंवरचा भाऊ गोपा सिंह राठौड यांच्यासह 25 लोकांना सोडून देण्यात आलं होतं.
या निर्णयाचा 14 महिला संघटनांनी,विरोध केला आहे. जयपूर न्यायालयाचा हा निर्णय सतीच्या प्रथेला प्रोत्साहन देणारा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून संघटनेने या निर्णयाला आव्हान दिले जावे अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्याकडे केली आहे.
१८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा झाल्यावर अशा अमानुष प्रथांना आळा बसू लागला. ही प्रथा बंद झाली, अशा भ्रमात असतानाच दिवराला येथील या बातमीने चांगलाच हादरा दिला, परंतु आणखी हादरा म्हणजे स्वातंत्र्यानंतर राजस्थानात अचानक सतीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली होती. रूपकंवर ही अडतिसावी सती होती. यापूर्वीच्या सर्व सतींची माहिती, त्यापैकी किती जणी स्वत:हून सती गेल्या आणि किती जणींना चितेवर जबरदस्ती ढकलण्यात आलं याचा अभ्यास काही स्त्री कार्यकर्त्यांनी केला आहे.
आजही अनेक ठिकाणी सती मंदिरे आहेत. तिथे शेकडो यात्री नियमितपणे जातात. मोठमोठाले मेळे होतात. प्रसादाची दुकाने लागतात. नारळ चढवले जातात. कपडे अर्पण केले जातात. चितेचा अग्नी चिरकाल, कायमचा प्रज्वलित ठेवला जातो.
‘बचाव बचाव’ म्हणून ओरडत होती रूप कंवर…
रूप कंवर 10 वीपर्यंत शिकलेली होती. तिचे सासरे सुमेर सिंह एका शाळेत शिक्षक होते. तिचं लग्न आठ महिन्यांपूर्वी झालं तरी ती लग्नानंतर फक्त वीस दिवस सासरी राहिली होती. एक दिवस तिच्या नवऱ्याच्या पोटात दुखू लागलं आणि दुसऱ्या दिवशी तो इस्पितळात मरण पावला. पहिला रिपोर्ट असं सांगतो की तिने थोडा वेळ शोक केला, मग ती शांत झाली आणि तिने सासऱ्यांसमोर सती जाण्याची आपली इच्छा सांगितली.

त्याप्रमाणे तिला नवरीचा पोशाख चढवण्यात आला. चितेवर चढून तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. गायत्री मंत्र जपत जमलेल्या गर्दीला आशीर्वाद दिला व ती शांतपणे ज्वालांनी लपेटली गेली, असे सांगण्यात येत होते. आश्चर्य म्हणजे तिच्या वडिलांना मुलगी सती जाण्याची कल्पना दिली नव्हती.
‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट’ची शाखा विमेन्स मीडिया ग्रुपच्या तीन पत्रकार गीता शेषू, मीना मेनन आणि सुजाता आनंदन दिवरालाला पोहोचल्या त्या वेळी त्यांनी माहिती मिळवली की रूपकंवर सती जायला भाग पाडण्याची तयारी तिचा नवरा गेल्यापासूनच सुरू झाली होती. तिला ही गोष्ट कळताच ती पळाली आणि जवळपासच्या शेतात जाऊन लपली, पण लोकांनी तिला शोधून काढलं.
ओढत आणलं, जबरदस्तीने वधू वेष घालून सजवलं आणि तिला चितेवर ढकलण्यात आलं. ती जोरजोरात ओरडत होती आणि बाहेर यायला धडपडत होती, पण चारी बाजूला तलवारी घेऊन उभ्या असलेल्या युवकांनी तिचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. प्रत्यक्षदर्शी अनेकांनी पोलिसांसमोर नंतर सांगितलं की ती ‘बचाव बचाव’ म्हणून ओरडत होती. त्यांनी अशीही कबुली दिली की गर्दी आणि गुलाल उधळल्याने नीट दिसत नव्हतं, पण ‘वाचवा’ म्हणून ती हात उंचावून काही सांगत होती. त्याला गाववाल्यांनी ती आशीर्वाद देत होती असं समजून टाकलं.
सतीबंदी कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाला होता, पण भारतीय दंड संहितेत तो समाविष्ट झालेला नव्हता, त्यामुळे काय करावं हा पोलिसांपुढे पेच होता. स्थानीय प्रशासनाला सती योजनेची माहिती होती. पोलीस जीप थोडय़ा अंतरावर जाऊन तशीच परत आली होती. पुढे दोन आठवडे जनक्षोभाचा रेटा वाढूनही कोणालाही अटक झाली नाही आणि रूपकंवरला गुंगीची अनेक इंजेक्शनं देणारा डॉक्टरही गायब झाला.
सती प्रकरणानंतर ते गाव तीर्थक्षेत्र बनले
घटनेनंतर सात-आठ दिवसांतच देवराला एक तीर्थक्षेत्र बनलं. हजारो लोक तिथे भक्तिभावाने येऊ लागले. ट्रिक फोटोग्राफीने पतीचं डोकं मांडीवर घेऊन ज्वालात बसलेल्या रूपकंवरच्या हजारो फोटोंची विक्री झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि महिला बालविकासमंत्री राज्यमंत्री मार्गारेट अल्वा यांना देशभरातून हजारो तारा पाठवून हस्तक्षेप करण्याची आणि १६ सप्टेंबरला होणारा ‘चुनरी महोत्सव’ थांबवण्याची मागणी करण्यात आली.

14 सप्टेंबरला साडेतीनशे शहरी व ग्रामीण महिला पत्रकार, शिक्षक, महिला डॉक्टर यांनी एक मूक मोर्चा काढला. त्यांनी 16 सप्टेंबरचा सती महोत्सव थांबवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली, पण कोणीही त्यांची व्यक्तिश: भेट घेतली नाही. दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 16 सप्टेंबरला काही सार्वजनिक आयोजन होऊ न देण्याचा आदेश दिला. हा आदेश डावलून हजारो लोक दिवराला येथे चुनरी महोत्सवासाठी जमले.
राज्य सरकारने असहाय दर्शकाची भूमिका घेतली. इथे जत्रेसारखी खाण्या-पिण्याची दुकाने, निवासव्यवस्था, लाऊड स्पीकर, कंट्रोल टॉवर, पार्किंग अशी सगळी सतीचा व्यापार करणारी व्यवस्था होती. तीन आठवडय़ांत 50 लाख रुपये ट्रस्टजवळ जमा झाले. ते जप्त करण्याची स्त्री चळवळीची मागणी व्यर्थ ठरली.
ही राजपूत परंपरा आहे, म्हणत सतीचे समर्थन सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करत तिथे हजेरी लावली. यामागे अर्थात हिंदूंची मतं मिळवण्याचा कावा होता. सतीविरोधातले अभियान, राजपूतांच्या विरोधातच जणू चालले आहे असा मोहोल तयार करण्यात आला. बनारस आणि पुरीच्या मुख्य पुजाऱ्यांनी सतीला शास्त्राधार आहे, सतीला कायदेशीर मान्यता मिळावी, किंबहुना हा मुद्दा सरकारच्या अधिकारात नसून पुजाऱ्यांच्या अधिकारात आहे असे म्हटले. राजस्थानातल्या सती समर्थन सभेत महिला आंदोलक बाजारू आहेत, पाश्चात्त्य प्रभावाने त्या अंध झाल्या आहेत, त्यांची संस्कृतीवर श्रद्धा नाही, त्या चरित्रहीन आहेत, जयपूरच्या वातानुकूलित घरात बसून दारू पिणाऱ्या आहेत, असे अनेक आरोप केले गेले.
‘बायकांविरुद्ध बायका’
हे सर्व वाग्बाण सहन करीत महिलांनी खूपच धडाडीने हे अभियान चालवले. राजस्थानातील स्त्रियांनी तर खूपच आंदोलने केली, पण राष्ट्रीय स्तरावर सतीविरोधी संघर्षांत एकजूट दाखवून स्वायत्त संस्था व राजकीय पक्षाच्या स्त्रियांनी 6 ऑक्टोबरला देशभर मोर्चे काढले. जयपूरला भरलेल्या प्रचंड मोठय़ा सभेत राजस्थानातील 25 संस्था तर पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, अहमदाबाद येथून आलेल्या 31 संस्थांचा समावेश होता.

यात एका ग्रामीण स्त्रीने राज्य सरकारने योग्य ते पाऊल वेळेवर न उचलल्याने ही घटना घडल्याचे ठणकावून सांगितले. जातिधर्माच्या नावावर स्त्रीचे शोषण होता कामा नये, असे सांगून साहित्यिक लक्ष्मीकुमारी चुडावत म्हणाल्या की सती हा शब्द सन्मान आणि श्रद्धासूचक आहे, तो एका तरुणीला जबरदस्तीने जाळण्याच्या घटनेत वापरू नका. एका अपराधाला सती म्हणून धर्माशी जोडणे ही मानसिकता समस्याकारक आहे.
जयपूरच्या सभेला चार हजार स्त्रिया उपस्थित होत्या, तिथेच त्यानंतर पाच हजार स्त्रियांना आणून सती समर्थनाची सभा घेण्यात आली. या सभेत सर्वपक्षीय नेते आणि धार्मिक गुरू उपस्थित होते. ‘बायकांविरुद्ध बायका’ असं चित्र उभं केलं गेलं.
1988 मध्ये सती प्रथेविरुद्ध कायदा संमत
काही दिवसांतच राज्य सरकारने सतीविरोधी अध्यादेश लागू केला आणि सती निषेध कायदा झाल्याने सतीसमर्थकांचा आवाज बंद झाला. दिवरालात सती मंदिर झाले नाही. ३२ संबंधित लोकांना अटक झाली. या काळात महिलांनी अनेक पत्रके प्रसिद्ध केली, त्यातील एकात विचारलेले प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. स्त्रियांना सधवा किंवा विधवा अशा परस्परविरोधी भूमिकेत का अडकवता? स्त्रीची ओळख आहे तरी काय? गप्प बसून अन्याय सहन करणारी की सन्मानाने जगण्याचा हक्क मागणारी?
माणूस होण्याचा हक्क मागणारी? आपली स्वतंत्र ओळख समजण्याचा रस्ता फार अवघड आहे. या रस्त्यावर समाज सरळपणे बाईला का चालू देत नाही? समाजाच्या विरोधाला घाबरून विधवा आपल्या नशिबाला दोष देत त्याबरोबर येणारे अन्याय सहन करतात नाही तर आपले जीवन असहायपणे संपवून टाकतात. नऊ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आणि सर्व आरोपी सुटले! मात्र 1988 मध्ये सती प्रथेविरुद्ध कायदा संमत झाला.






