‘झिंगाट’ व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर इतर राज्यातही धमाल जर कोणत्या गाण्याने केली असेल तर ते ‘शांताबाई’ या गाण्याने…. शांताबाई… या गाण्याने अनेकांना वेड लावलं. प्रत्येक कार्यक्रमात हे गाणं हवंच असतं. याच्या बीट्स आणि लिरिक्सने लोकांना वेड लावले. लोकसंगीताच बाज आणि मराठी रॅपचा स्वरूप असलेल्या या गाण्याने धुमाकूळ घातला. ‘शांताबाई’ हे गाणं ऐकलेलं नाही, असा माणूस मिळणं अवघड.
या गाण्यामुळे गायक संजय लोंढे रातोरात स्टार बनले. परंतू कोणालाही कल्पना नसेल हे गाणं वीस वर्षापूर्वी 8X10 च्या खोलीत रचलेले आहे. संजय लोंढे पुण्याच्या नानापेठ राजेवाडीत भाड्याच्या झोपडीत राहत होते. हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल याची कल्पनाही नसलेले लोंढे त्यांच्या मुलीसाठी प्राजक्तासाठी हे गाणं गुणगुणत असतं. त्यामुळे हे गाणं अस्तित्वात आलं. त्यांनी या गाण्याला आवाज दिला आणि ते इतंक गाजलं की कोणीही याची कल्पना केली नव्हती. ‘शांताबाई’ तुफान हीट झाल्यामुळे संजय लोंढे यांची गाडी रुळावर आली आणि त्यांना अनेक संधी मिळाल्या. संजयभाऊ यांनी गायलेली ‘देव धनगर वाड्यात घुसला, सुटला माझा पदर बाई, गिरणीवाले दादा ही गाणीदेखील लोकप्रिय झाली.
परंतू लॉकडाऊनमध्ये या गुणवान गायकाची गाडी रुळावरून जी घसरली ती आजतायगत सावरली नाही. ‘शांताबाई’ गाण्याला मिलियन्समध्ये व्हयुज मिळूनही संजय लोंढे यांच्यावर लक्ष्मी अद्याप रुसलेलीच आहे.
आज पन्नाशी ओलांडलेले संजय भाऊ पुण्यातील राजेवाडीत छोट्याश्या घरात राहतात. पत्नी, दोन मुली, एक मुलगा असं त्यांचं कुटूंब… संजयभाऊ यांचे वडील नगरमधल्या कर्जत तालुक्यातले. रोजगाराच्या शोधात ते पुण्यात आले. संजयभाऊ यांच्या वडिलांना टिम्बर मार्केटमध्ये लाकडं विकण्याचं काम मिळालं. टिम्बर मार्केटच्या जवळच असलेल्या राजेवाडी वस्तीमध्ये भाड्याने खोली घेऊन तिथेच राहिले. त्या खोलीतच संजयभाऊ यांचा जन्म झाला. लाकडं विकून पोट भरेल तेवढेच पैसे मिळत होते. पण दोघांचे तीन झाले होते. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमुळे संजयभाऊ यांना सातवीतच शाळा सोडावी लागली.

संजयभाऊ सांगतात, ‘गावाला शेती होती. उन्हाळाच्या सुट्टीत गावी गेल्यावर आजोबासोबत शेतात जात होतो. आजोबा नांगरणी करताना गाणी गायचे, त्यांच्या मागून मी पण गात होतो. तिथूनच मला गाण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या अठराव्या वर्षी कॅम्प परिसरातील एक कॅसेट्च्या दुकानात कामाला लागलो. हे काम मला आवडत होत. दुकानात भरपूर कॅसेट असायच्या. कॅसेटमधील गाणी ऐकत होतो. मला गाण्याचे गीतकार, संगीतकार तोंडपाठ झाले होते. कॅसेटवरची गाणी ऐकूनच गायला शिकलो. मी कोणते क्लास लावले ना कोणत्या गुरुपुढे बसलो. मोहम्मद रफी, वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप आणि गाण्याचे कॅसेटच दुकान यांनाच मी गुरु मानलं होत. ‘
संजयभाऊ यांनी तीन वर्ष कॅसेटच्या दुकानात काम केलं. काम करता करता गाण्याची संधी कुठे मिळते का? याचा शोध चालूच होता. अखेर एका ऑर्केस्टामध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. संजयभाऊ यांच्या गाण्याला प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली. त्या पहिल्या गाण्याला मिळालेला प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. संजयभाऊ यांनी स्वतःची गाणी रचू लागले. 1996 साली संजयभाऊ यांनी ‘देव धनगर वाड्यात घुसला’ हे पहिलं गाणं लिहिलं… पहिलंच गाणं गाजलं. या गाण्याने त्यांना एक ओळख मिळाली. संजयभाऊ अभिमानाने सांगतात ,’तो काळ असा होता की सर्वच लोकगीते मुंबईतून प्रसिद्ध होत होती. त्यावेळी ‘देव धनगर वाड्यात घुसला ‘ हे गाणं पुण्यातून प्रसिद्ध झालं.’
त्यानंतर संजयभाऊ यांनी ‘जेजुरी जाऊ पायी पायी, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, गिरणीवाले दादा यासारखी अनेक गाणी लिहिली. ‘शांताबाई’ या गाण्याने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. या गाण्यामुळे ‘ चला हवा येऊ द्या ‘ या टीव्हीवरच्या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना बोलविण्यात आलं. या गाण्यानेच त्यांना घराघरात पोहोचवलं.
संजयभाऊ यांनी आतापर्यंत अनेक भक्तिगीते, लोकगीते आणि निवडणूक प्रचाराची गाणी लिहिली आणि गायली गेली. स्वतः लिहिलेल्या अनेक गाण्यांना संगीत दिलं आहे. संजयभाऊ यांच्या गाण्यांना लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळूनही त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. आजही ते राजेवाडी वस्तीतील छोट्याश्या खोलीत राहतात. संजयभाऊ यांच्याकडे गाण्याच्या रियाजासाठी कोणतंही वाद्य नाही. घरातलं पातेलं वाजवून गाण्यांना चाली लावतात. पण हलाखीची परिस्थिती असली तरी त्यांनी गाण्याचा छंद सोडला नाही. गाणं लिहिणं, त्याला चाली शोधणं वेगवगेळ्या प्रकारची गाणी ऐकणं हे सोडलं नाही.
संजयभाऊ सांगतात, ‘मी परिस्थितीमुळे कमी शिकलो पण त्याचा मला कमीपणा वाटत नाही. मी गाणी लिहिण्यासाठी भरपूर वाचन केलं. भरपूर गाणी लिहिली, अजूनही लिहितो. मी लिहिलेली गाणी अनेक प्रसिद्ध गायकांनी गायली. मी लिहिलेली आणि गायलेली गाणी लोक गुणगुणतात हे माझ्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे. त्यामुळे मला भरपूर गाणी लिहायची आहे त्यासाठी संगीत द्यायचं आहे आणि गायचं आहे.
आजही संजयभाऊ यांची परिस्थिती फारशी सुधारली नाही. आजही ते आहे त्याच खोलीत राहतात.त्यांचं घर त्यांच्या गाण्यावरच चालतं. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवताना ओढाताण होते. परिस्थिती हलाखीची असली तरी त्यांच्या आवडीपासून दूर गेले नाहीत. ‘कलाकारांना समाजाकडून, सरकारकडून पाहिजे तेवढं पाठबळ मिळत नाही ही खंत संजयभाऊ व्यक्त करतात.






