‘’फक्त 99 रुपयांत मिळवा बलात्काराचे 820 पेक्षा अधिक व्हिडियो…’’ अशा जाहिरातींवर विश्वास ठेवणं कठीण आहे परंतू हे खरं आहे… अनेकांच्या मोबाईलवर अशाप्रकारचे मेसेज फ्लॅश झाल्याचे पुरावे आहेत आणि हा आपल्या समाजाचा एक विकृत चेहरा आहे जो अगदी निर्लज्जपणे या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यास उत्सुक असतो…
गेल्या महिन्यात कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण चर्चेत होते. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरातून आजही लोकं रस्त्यावर उतरत आहेत. ‘रिक्लेम द नाईट’ या घोषणेसह रात्रीच्या अंधारात हजारो मशाली आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात अनेकांचे चेहरे उजळून निघत आहेत. मात्र याच प्रकाशाच्या मागे भारतीय समाज व्यवस्थेचा एक काळाकुट्ट चेहरा पाहायला मिळतोय.
‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या या संदर्भातील अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जेव्हा जेव्हा या देशात बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा त्या बलात्कारांचे व्हिडियो पाहण्यासाठी गुगलवर, पॉर्न साईटवर सर्च करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते, तर दुसऱ्या बाजूला अनेक पॉर्न साईट्स असे बलात्काराचे व्हिडियो उपलब्ध करून देतातच शिवाय ‘’फक्त 99 रुपयांत मिळवा बलात्काराचे 820 पेक्षा अधिक व्हिडियो…’’ अशा जाहिरातीही करतात.
कोलकाता बलात्काराची घटना घडल्यानंतर साहजिकच ‘गुगल सर्च’ वर या प्रकरणाची अधिक माहिती मिळविण्यासाठी हा विषय सर्च इंजिनमध्ये ट्रेंडिगला होता. मात्र याच्या बरोबरीने ‘ऑनलाईन सर्च’शी संबंधित आणखी एक नकारात्मक पैलूही समोर आला आहे. बलात्काराच्या व्हिडियो संबंधी काही ‘कीवर्ड्स’ टाकले जातात.
कोलकाता बलात्कार प्रकरण घडल्यानंतर गुगल ट्रेंडच्या डेटानुसार अनेकांनी 'rg kar viral video', 'dr ****** ****** video', और 'dr ******* ****** video real' असे कीवर्ड्स टाकून बलात्काराचे व्हिडियो शोधण्याचे प्रयत्न केल्याचे आढळले आहे.
हा ट्रेंड फक्त कोलकातापुरताच नसून जेव्हा कधी बलात्कार किंवा लैंगिक शोषणाची प्रकरणे घडतात तेव्हा हा ट्रेंड वाढायला लागतोय यापूर्वी जनता दल सेक्लुलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी केलेले लैंगिक शोषणाचे प्रकरण असो किंवा मणिपूरमध्ये एका महिलेची काढलेली नग्न धिंड असो, प्रत्येकवेळी गुगल सर्चवर असे व्हिडियो शोधण्याचे हजारोंच्या संख्येने प्रयत्न झाले आहेत. prajwal revanna video' आणि 'prajwal revanna video download किंवा 'Manipur women video आणि 'Manipur women parade video download' असे किवर्ड्स आढळले आहेत.

बलात्कारांच्या व्हिडियोचे मोठे मार्केट
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणी सांगितले की, "बलात्काराच्या व्हिडिओंची भारतात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण फक्त हिमनगाचे एक टोक पाहात आहोत. या धंद्यात मागणी आणि पुरवठा अशी एक मोठी साखळी कार्यरत आहे. मागणीत प्रचंड वाढ होत असल्याने अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असे व्हिडियो पुरवले जात आहेत आणि व्हिडियो मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळेच मागणी वाढली आहे.
बलात्काराचे व्हिडिओ विकणे नवीन नाही, पण इंटरनेटच्या आगमनाने ते सोपे झाले आहे. यापूर्वी हे व्हिडिओ सीडी आणि पेन ड्राइव्हद्वारे शेअर केले जात होते, परंतु आता ते विकणारे एनक्रिप्टेड ॲप्स वापरत आहेत. हे व्हिडिओ आता टेलिग्राम सारख्या ॲप्सवर सहज उपलब्ध आहेत आणि क्रेडिट कार्ड, पेपल आणि UPI सारख्या ऑनलाइन पद्धतींद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. एकदा का असे व्हिडियो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आले की त्याला रोखणे कठीण होऊन जाते.
टेलीग्राम अशा व्हिडियोसाठी अधिक जबाबदार
अहवालानुसार टेलिग्रामवर अशाप्रकारचे व्हिडियो अधिक विकले जातात आणि शेअर केले जातात. बलात्काराचे व्हिडियो, चाईल्ड पॉर्नोग्राफी, ड्रग तस्करी आणि अशा अनेक अवैध गोष्टींना टेलिग्राम प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. टेलिग्रामचे सीइओ पावेल डुरावला झालेल्या अटकेमागे हे एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.
‘इंडिया टूडे’ने टेलिग्रामवर असलेल्या हजारो सदस्यांमधून अशा चार ग्रुप्सचा शोध लावला जे कोलकाता बलात्कार-खुन प्रकरणातील पिडीतेचे नाव आणि फोटोंचा वापर करत होते. तब्बल 3300 सदस्यांची संख्या असलेल्या टेलिग्रामच्या या ग्रुपमध्ये एका सदस्याने असे लिहिले होते की, मेसेज डिलीट होण्यापूर्वी सगळ्यांनी बघून घ्या की काय घडलं होतं त्या दिवशी डॉ.****** सोबत?’’
टेलिग्रामवर असा आणखी एक ग्रुप आहे ज्याचे नाव ‘dr ******* *******cctv video’ असे होते. या ग्रुपमध्ये एका विक्रेत्याने 'रेप', 'चाइल्ड पोर्न', 'एनिम पोर्न', 'Force सेक्स', 'यंग गर्ल' अशी भरगच्च यादी टाकली असून प्रत्येक कॅटेगरीचा दर निश्चित केला आहे.

12 पैश्यांमध्ये विकली जातेय बलात्काराची एक क्लिप
‘इंडिया टूडे’ने या प्रकरणी डॉरिमॉन नावाच्या एका विक्रेत्याशी संपर्क साधला. विक्रेत्याने सांगितले की, त्याच्याकडे अवघ्या 99 रुपयांत 820 पेक्षा अधिक बलात्काराचे व्हिडियो आहेत. याचे गणित लक्षात घेतले तर असे दिसून येते की जवळपास एका व्हिडियोसाठी ग्राहकाला फक्त 12 पैसे खर्च करावे लागतात. डॉरिमॉनने आर्थिक व्यवहारासाठी Paytm QR-कोड देखील शेअर केला आहे.
जेव्हा त्याला विचारले की हे व्हिडियो तु कसे मिळवले तेव्हा डॉरिमॉनने सांगितले,’’ मी वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून हे व्हिडियो विकत घेतले आहेत. असे विक्रेते फक्त भारतात कार्यरत नसून टेलिग्रामवर भारतात घडलेल्या बलात्काराचे आणि लहान मुलांवरच्या लैंगिक शोषणाचे व्हिडियो विकणारे जगभरात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. 'Cpmega' नावाच्या एका विक्रेत्याने माहिती दिली की, त्याच्याकडे 20 डॉलरच्या बदल्यात (1700 रुपये) 50 बलात्काराचे व्हिडियो आहेत आणि ग्राहक क्रेडिट कार्डद्वारा पैसे भरू शकतात.
बलात्काराचे व्हिडियो कसे शेअर होतात?
बलात्काराच्या व्हिडियोचे कसे आणि कशासाठी चित्रिकरण होते? हे व्हिडियो कसे व्हायरल होतात? डॉरिमॉनसारख्या ऑनलाईन विक्रेत्याकडे ते कसे पोहचतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली. ते म्हणतात की, हल्ली बलात्काराच्या तक्रारीमध्ये एक गोष्ट सातत्याने आढळून येते की दोषी व्यक्तीने ती घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. असे व्हिडिओ पिडीतेला धमकवण्यासाठी, पैसे मागण्यासाठी आणि तोंड बंद ठेवण्यासाठी शुट केले जातात.
एकदा का हे व्हिडियो ‘लिक’ झाले की त्याला रोखता येत नाही. सुरुवातीला जवळच्या व्यक्तींमध्ये असे व्हिडियो शेअर केले जातात आणि मग काही तासांतच हे व्हिडियो व्हायरल होतात आणि तिथून मग बाजारात उपलब्ध होतात. अनेकदा पिडीतेच्या जवळच्या नातेवाईकांकडूनही असे व्हिडियो शेअर केले जातात.

बलात्काराचे व्हिडियो का बघितले जातात?
असे व्हिडिओ पाहण्यामागे अनेक कारणे असतात. दिल्लीस्थित मानसोपचारतज्ज्ञ स्नेहा शर्मा म्हणतात, "कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या लोकांना असे व्हिडीओ पाहण्यास प्रवृत्त करणारे कोणतेही विशेष स्वरूप नाही. हे लोक आपल्यापैकीच असतात. पण यासाठी सामाजिक व्यवस्था जबाबदार आहे." स्नेहा शर्मा ज्या सामाजिक व्यवस्थेचा उल्लेख करत आहेत त्यामध्ये लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि तरुणांसोबत सेक्सबद्दल बोलण्याची बंदी यांचा समावेश आहे. बऱ्याच लोकांसाठी पोर्नोग्राफी आणि अगदी बलात्काराचे व्हिडिओ ही लैंगिकतेची पहिली ओळख असते.
हे कसे थांबवता येईल?
भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 294 अंतर्गत अशा व्हिडिओंची विक्री किंवा खरेदी करण्यास मनाई आहे. या अंतर्गत या व्हिडिओंच्या विक्रीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पण टेलिग्रामवर हे व्हिडिओ विकणाऱ्या लोकांचा स्रोत शोधणे कठीण आहे. सायबर क्राईमच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मेटाच्या धोरणामुळे, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर असे व्हिडिओ प्रसारित करणे शक्य नाही.
सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम या दोन्ही एन्क्रिप्टेड ॲप्सवर शेअर केले जातात. इंटरनेटवर उपलब्ध असे सर्व व्हिडीओ वास्तविक घटनांचेच आहेत, असे आवश्यक नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या मते काही व्हिडिओ अभिनयाचेही असू शकतात. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी, आम्हाला असे व्हिडिओ तयार करण्यासाठी डीपफेकचा वापर केला जात आहे की नाही हे देखील तपासावे लागेल.

मात्र, पोलिस अधिकारी आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इंटरनेटवर फिरणारे बहुतांश बलात्काराचे व्हिडीओ खरेच आहेत, जर सगळेच नाहीत, तर बहुतांश व्हिडीओ खऱ्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते असेही सुचवतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या क्लिप काढण्यात प्रभावी ठरू शकतात.
यूपी सायबर क्राइम विभागाचे माजी एसपी त्रिवेणी सिंह म्हणतात, "होय, बलात्काराचे व्हिडीओ फिरत आहेत. लहान मुलांची पोर्नोग्राफी देखील प्रसारित केली जात असे, पण अशी सामग्री काढून टाकण्यासाठी एक फिल्टर तयार करण्यात आला होता. त्याला एआयने मदत केली होती. चाईल्ड पोर्नोग्राफी शोधण्यासाठी याचा वापर केला जात होता. बलात्काराच्या व्हिडिओंवरही असेच फिल्टर बनवले जाऊ शकते. सरकारने बलात्काराच्या व्हिडिओंविरोधात राष्ट्रीय फिल्टर देखील तयार केला पाहिजे. यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवरील प्रसाराची समस्या दूर होईल.






