पॅरिस ऑलिम्पिक हे ऐतिहासिक असं आहे याला कारण म्हणजे ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच ५० % महिला खेळाडूंचा सहभाग आहे असा गवगवा करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपलीच पाठ थोपटून घेतली. महिला खेळाडूंना अनुकूल असे धोरण व पुढील ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक महिला खेळाडू सहभागी व्हावेत म्हणून आम्ही काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचाही गवगवा करण्यात आला. परंतु एक ऑगस्टला पॅरिसमध्ये जी घटना घडली त्याने मात्र पॅरिसच्या महिला खेळाडू स्नेही धोरणावर प्रश्न उपस्थित होतो…
नेमकं काय घडलं?
त्याचं झालं असं की, बॉक्सिंगमधील 66 किलो वजनी गटातील एक सामना अल्जेरियाच्या इमेन खलिफ व इटलीच्या अँजेला कॅरिनी या दोघींत (?) खेळवला गेला. सामना चालला केवळ 46 सेकंद. अँजेला कॅरिनीने तिच्या प्रशिक्षकांसोबत चर्चा करून सामना अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण म्हणजे इमेन खलिफ या प्रतिस्पर्धी खेळाडूने या 46 सेकंदात २ पंच अँजेलाच्या चेहऱ्यावर मारले. हे पंच इतके जोरदार होते की, त्यामुळे तिच्या नाकातून रक्त येवू लागले.अखेर तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या मते तिने आजवर खेळलेल्या सामन्यांत असा पंच अनुभवला नव्हता.

तिचं म्हणणं खरं देखील आहे. कारण इमेन खलिफ हा खेळाडू मागच्याच वर्षी झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये लिंगचाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे तिथून त्याची हकालपट्टी केली होती. इमेन हा लिंग शस्त्रक्रिया करून महिला झालेला आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या लिंगचाचणीत त्याच्या नमुन्यांमध्ये XY क्रोमोझोम आढळले होते. त्यामुळे इमेन सहित तैवानच्या लिन यु चिंग या दोघा बॉक्सर्सना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता. XY क्रोमोझोम हे पुरुषांच्या डीएनएचे घटक असतात तर XX क्रोमोझोम हे महिलांच्या डीएनएचे घटक असतात.
मात्र या महिलास्नेही म्हणवल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने केलेल्या चाचण्या ग्राह्य धरल्या नाहीत. त्यामुळे इमेन सहित तैवानच्या बॉक्सरलाही पात्र ठरवले. याच निर्णयामुळे महिलांपेक्षा जास्त ताकदीचे खेळाडू पॅरिसमध्ये सहभागी झाले आहेत.
अँजेलाला याच निर्णयाचा फटका बसला आणि ऑलिम्पिक पदकाच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा लॉरीएल हब्बार्ड या पारलिंगी खेळाडूने सहभाग नोंदवला होता. मात्र या ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली नाही.
आणखी एक खेळाडू म्हणजे अमेरिकेची निक्की हिल्टझ. 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती सहभागी होत आहे. या बॉक्सिंगरिंग घटनेमुळे पारलिंगी खेळाडूंच्या सहभागाचा मुद्दा चर्चेला आला आहे.

भारतात मागच्या वर्षी मणिपूर राज्यातील फुटबॉल खेळणाऱ्या पारलिंगी खेळाडूंनी एकत्र येत टीम बनवली. मात्र त्यांना प्रतिस्पर्धी टीम मिळत नव्हती. ही बातमी देखील त्यावेळी खूप गाजली. त्यामुळे महिला गटात असे खेळाडू सहभागी झाले तर त्याचा त्यांना फायदा होतो हे लक्षात घेता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रतेचे निकष बदलण्यात आल्याचे व ते निकष आणखी कडक केल्याचे स्पष्टीकरण ऑलिम्पिक समितीने दिले आहे.
असे असताना बॉक्सिंगमध्ये हे दोन खेळाडू पात्र ठरण्याचे कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळालेली नाही. ती मान्यता असोसिएशनमधील आर्थिक बेबनाव व प्रशासनातील अनागोंदी यांमुळे मान्यता रद्द केली गेली. मात्र याचा जबर फटका अँजेलाला बसला आहे. या निर्णयावर सर्वत्र टीका होत असून सोशल मीडियावर अनेक दिग्गज व्यक्त होत आहेत.
ॲथलेटिक्स मधील 'Difference of Sexual Development ' या प्रकारात ॲथलेटिक्स संघटनांनी काही नियम बनवले आहेत. त्यानुसार खेळाडूच्या रक्तातील टेस्टस्टरोनची पातळी 2.5 नॅनो मोल प्रति लिटर एवढी असणे अपेक्षित आहे. याआधीच्या नियमात हे प्रमाण पाच असे होते. या नियमांना अनुरूप व्यवस्था असल्याचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती देत असली तरीही बूँद से गयी वो हौद से नहीं आती हेच खरे.






