जिम कॉर्बेट आपल्यातून जाऊन आज 79 वर्षे झाली आहेत. ज्याला कोणाला जंगल, वाघ, वन्यजीव, शिकार यांपैकी कुठल्याही एका विषयाबद्दल थोडीफार माहिती असेल त्याला जिम कॉर्बेट माहीत नसेल, असं शक्य नाही. एडवर्ड जेम्स कॉर्बेट हा त्याच्या आई-वडिलांच्या 13 अपत्यांतील एक; पण त्याने सगळ्या भावंडांत बरेच नाव कमावले आणि आज इतक्या वर्षांनंतरही त्याची प्रकर्षाने आठवण येत राहण्याचे कारण म्हणजे त्याने वन्यप्राणी आणि भारतीय जंगलांवर केलेले अफाट प्रेम आणि सध्याची बदललेली परिस्थिती.

जिम कॉर्बेटने स्थापन केलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय वन्यप्राणी उद्यानाला आज जवळपास 88 वर्षे पूर्ण झाली आहे. जिम कॉर्बेट ही काही साधासुधी व्यक्ती नव्हती. भारतीय नसूनही त्याने भारताच्या विविध भागांत आणि मुख्यत: हिमालयाच्या पायथ्याशी (आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात) बरेच काम केले. म्हणूनच तो व्यक्ती कमी आणि एक संस्था जास्त होता. नैनितालमध्ये जन्मलेला हा इंग्रज, ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये कर्नल या हुद्द्यावर होता; पण तो नावाजला गेला त्याच्या वन्यजीव-प्रेमासाठी आणि त्यासाठी केलेल्या कामासाठी.
कॉर्बेट शिकारी होता की संरक्षणवादी, तो वाघाची शिकार का करायचा, त्याने किती वाघ मारले आदींबद्दलच्या अनेक कथा, दंतकथा वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या वेळी सांगितल्या गेल्या आहेत. याचे कारण जिम कॉर्बेटचे जीवन प्रचंड घटनापूर्ण आणि गतिमान होते आणि त्यामुळेच तो आज हयात नसतानाही भारतभर बऱ्यापैकी ओळखला जातो. त्या काळात (1875- 1955) या गोऱ्या साहेबाला जंगलातील गोरगरीब लोक संतदेखील मानायला लागले होते. कारण तो त्यांचे वाघांपासून रक्षण करत असे. याच कारणामुळे आज कॉर्बेटचे महत्त्व आहे. त्याने वाघ आणि बिबटे मारले खरे; पण ते माणसांवर का आक्रमण करतात आणि का खाऊन टाकतात, याच्या सखोल अभ्यासाद्वारे अप्रतिम वर्णन करून हे सांगण्याचा प्रयत्न केला की, वाघ हा कधीही मानवजातीचा शत्रू नव्हता.

आज देशातील वेगवेगळ्या प्रांतांतून बिबट्याने हल्ला करून माणसांना जखमी केल्याच्या बातम्या रोज येत असतात, तर दुसरीकडे कुठे तरी वाघ (रॉयल बेंगॉल टायगर) मनुष्यावर आक्रमण करतो, त्याला घायाळ करतो किंवा चक्क मारून टाकतो, हेही ऐकायला मिळते. अशा घटना आजपासून 100 वर्षे आधीही होत होत्या. तेव्हाच कॉर्बेटने गोळ्या घालून वाघांना, बिबट्यांना ठार केले होते. आज जेव्हा मुंबई किंवा साता-यात किंवा पुण्यालगत एखादा बिबट्या शहरात येतो आणि त्याच्यावर गोळी चालवायची किंवा त्याला जेरबंद करून पिंज-यात अडकवून एखाद्या प्राणिसंग्रहालयामध्ये टाकायचे तर त्यावरून प्रचंड वादंग होतात. त्याचे कारण आहे, नवे सरकारी नियम आणि कायदे.
अलीकडेच महाराष्ट्रातील छोट्या शहरात थरारक घटना घडली होती. शहराच्या मध्यवस्तीत घुसलेल्या एका बिबट्याने हादरवून सोडले होते. एक-दोन नाही, तर सहा जणांना जबर जखमी केले. पोलिसांना शेवटी गोळ्या घालून त्याला ठार मारावे लागले. नाशिकमध्येही भरवस्तीत एक बिबट्या काही वर्षांपूर्वी धुमाकूळ घालून गेला होता. मध्य प्रदेशच्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानालगत एका मोठ्या वाघाने एका मनुष्यावर हल्ला केला, तर त्याला लगेच बेशुद्ध करून भोपाळच्या वनविहार या राष्ट्रीय उद्यानात हलविण्यात आले. पण आता वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे वाघ, बिबट्या किंवा असे अन्य प्राणी मारण्यावर बंदी आली आहे. कॉर्बेटच्या काळात असे कायदे नव्हते.

वाघ आणि त्याच्याच कुळातील बिबट्या यांनी मनुष्यजातीवर हल्ले केले आणि म्हणून ‘मॅनईटर’ हे ‘दूषण’ या दोन्ही देखण्या जनावरांना लावण्यात आले. त्याच मॅनईटर्सना मारल्यामुळे जो जिम कॉर्बेट प्रसिद्धीच्या झोतात आला तो आजतागायत. तो स्वत: शिकारी होताच; पण त्याने लोकांना वाचविण्यासाठी मोठमोठाले 19 नरभक्षक वाघ आणि 14 बिबटे मारले होते. इतिहास सांगतो की, कॉर्बेट महाशयांनी 1500 च्या वर वाघांची शिकार केली; पण नंतर ते स्वत: वाघांच्या संरक्षणाची चिंता करू लागले होते. ज्या वाघांना कॉर्बेटने कायमचे झोपवले त्यातील चंपावत इथल्या जंगलातील एका वाघाने 436 लोकांचा जीव घेतला होता, असे स्वत: कॉर्बेटने लिहून ठेवले आहे.
कॉर्बेट फक्त एक शिकारी नव्हता, तर तो एक चांगला फोटोग्राफर आणि लेखकपण होता. त्याची गाजलेली पुस्तके ‘मॅनईटर्स ऑफ कुमाऊँ’, ‘जंगल लोअर’, ‘मॅनईटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’ ही आहेत. ती इतक्या वर्षांनी आजही प्रचंड संख्येने खपतात, वाचली जातात आणि त्यामुळे कॉर्बेट आजही लोकांचा कुतूहलाचा विषय असल्याचे दिसते. कॉर्बेटने असंख्य किस्से लिहून ठेवलेत. ते सगळे मॅनईटर्सचे जरी असले तरी त्या वेळची परिस्थिती अशी होती की ज्यामुळे वाघांनी शेतमजुराला किंवा लाकूडतोड्याला इजा पोहोचवून मारले तरीही वाघ हा शांत आणि निरुपद्रवीच मानला जात असे. त्याला कारणे होती. कॉर्बेटनेच जगाला सारखे सांगितले की, वाघ जखमी झाला असेल, वृद्ध झाला असेल किंवा त्याला डिवचण्यात आले असेल, तरच तो मनुष्यावर हल्ला करतो, एरवी तो शांतपणे आपल्याच नादात गुंग असतो. आपल्या स्वत:च्या जगात मस्त असतो.

हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट जंगलामध्ये जेव्हा लोकांना नैसर्गिक कारणांनी मृत्यू येत असे तेव्हा अनेकदा त्यांचे मृतदेह नदीत सोडून दिले जात असत किंवा आजारी माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या प्रेताचा कडेलोट केला जात असे. असे मृतदेह खाऊन वाघ आणि बिबटे माणसाच्या रक्ताचे भोक्ते झाले आणि त्यातून ‘मॅनईटर्स’ जन्माला आले. आता वाघ बव्हंशी संरक्षित वनांमध्येच (ताडोबा, कान्हा, सुंदरबन किंवा कॉर्बेट पार्क) पाहायला मिळतो. जिम कॉर्बेटने लिहिलेले किस्से आणि ख-याखु-या कथांचे संदर्भ आता पार बदलून गेले आहेत.
तरीही जेव्हा जेव्हा बिबट्या जंगलातून मनुष्यवस्तीत येतो आणि मनुष्यावर हल्ला करतो किंवा त्याच्यावर हल्ला होतो, तेव्हा जिम कॉर्बेटची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कॉर्बेटने लिहून ठेवलेय की, बिबट्या माणसाला नेहमीच घाबरतो. दिवसाढवळ्या सर्वत्र संचार करणे त्याला आवडत नाही. वाघ स्वभावाने ‘रॉयल’ असतो आणि दिवसाच्या प्रकाशात फिरायला त्याला आवडते. त्यांना जर व्यवस्थित आणि नैसर्गिक खाद्य जंगलात मिळाले तर ते मनुष्याला मारायच्या-खायच्या भानगडीत पडत नसतात.
आज माणसाची भूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि तो बेफाम जंगले तोडत निघाला आहे. वाघाच्या हक्काच्या राहायच्या जागी माणूस अविरत अतिक्रमण करतो आहे. या परिस्थितीत त्याचे खाद्य कमी होते आहे आणि तो ‘जंटलमन’ (कॉर्बेट वाघासाठी वापरत असलेले विशेषण) असुरक्षित होत चाललाय. कॉर्बेटच्या आठवणींच्या संदर्भाने वाघाची आजची केविलवाणी अवस्था निश्चितच विचार करण्यासारखी आहे. एकेकाळचा मॅनईटर त्याचे अस्तित्वच गमावू लागलाय. हे चित्र पालटले ते गेल्या काही दशकांतच- खरे पाहिले तर कॉर्बेट गेल्यानंतरच. वाघांची ही अवस्था बघून वाघांना आपल्या बंदुकीने अचूक टिपणारा कॉर्बेटदेखील निश्चितच गलबलून गेला असता. कारण त्याचे वाघावर अफाट प्रेम होते.






