आता हे तुम्हाला सांगायला नको की रक्तगटाचे ‘ए’ ,’ ए बी’, ‘बी ‘आणि ‘ओ ‘असे चार प्रमुख गट असतात… त्यात आर (RH) म्हणजेच ऱ्हीसस या घटकामुळे निगेटीव्ह पॉझिटीव्ह असे दोन प्रकार पडले. म्हणजे ज्यामधे RH आहे ते सर्व आरएच पॉझिटीव्ह आणि ज्यात RH नाहीत ते आर एच निगेटीव्ह. त्यामुळे एकूण आठ रक्तगट झाले. काहींचा रक्तगट हा निगेटीव्ह असतो तर काहींचा रक्तगट पॉझीटीव्ह असतो. निगेटीव्ह रक्तगटाचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे निगेटीव्ह रक्तगटांना दुर्मिळ रक्तगट असे म्हणतात. पण तुम्हाला जर हे सांगण्यात आले की चार नव्हे तर रक्तगटाचे एकूण पाच प्रकार असतात तर…?
पडलात ना बुचकळ्यात…?
पण हे अगदी शंभर टक्के खरं आहे की ‘ए’ ,’ ए बी’, ‘बी ‘आणि ‘ओ’ या गटांशिवाय आणखी एक रक्तगट आहे आणि आपण आर याच अज्ञात रक्तगटाबद्दल जाणून घेणार आहोत.

या पाचव्या रक्तगटाचे नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप, ज्याला शास्त्रीय भाषेत Oh म्हणून ओळखले जाते. ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट दूर्मिळ असल्याचे आपण समजतो, परंतू ‘बॉम्बे रक्तगट’ हा जगभरात अत्यंत दूर्मिळ समजला जातो. दूर्मिळ म्हणजे किती तर महाराष्ट्र राज्यात या बॉम्बे रक्तगटाची फक्त 250 लोकं आहेत. हा रक्तगट जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.0004 टक्के लोकसंख्येमध्ये आढळतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दर दहा लाख लोकांच्या मागे बॉम्बे रक्तगटाचे केवळ 4 व्यक्ती आढळतील… म्हणजे बघा…
जगभरात दूर्मिळ समजल्या जाणाऱ्या ‘बॉम्बे’ या रक्तगटाचा दाता मिळणे अत्यंत अवघड ठरते. परंतू या रक्तगटाची व्यक्ती रुग्णालयामध्ये आल्यावर त्याला रक्त उपलब्ध करणे हे रुग्णालय आणि नातेवाईकांना अतिशय कठीण जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना बॉम्बे रक्तगट दात्यांची यादी संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत.
असा लागला ‘बॉम्बे’चा शोध
मुंबईत 1952 साली एक अपघात झाला. अपघातग्रस्त माणसाच्या हातातून रक्त वाहत होते. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याला अतिरिक्त रक्त देण्याची गरज होती. या व्यक्तीसाठी रक्तदात्याची व्यवस्था केली जात असतानाच दुसरा रुग्ण रुग्णालयात आला. तो ही अपघातात जखमी झाला होता, त्यालाही रक्त हवे होते. आता या दोन रुग्णांसाठी दात्यांचा शोध सुरू झाला. सुमारे 160 लोकांच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर एक व्यक्ती आढळून आली ज्याचे रक्त दोन्ही रुग्णांच्या रक्तगटाशी जुळले. ज्या व्यक्तीचे रक्त जुळले तो मुंबईचा रहिवासी होता. शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमधील डॉ. वाय. एम. भेंडे, सी. के. देशपांडे, एच. एम. भाटीया यांना या एका नवीन रक्तगटाचा शोध लागला. जो सामान्यपणे ओ गट वाटतो, मात्र ओ रक्तगटात ए व बी एन्टीजन नसतात मात्र त्यात H नावाचं अँटीजन असते, परंतु या संशोधकांना संशोधनादरम्यान असे आढळून आले की H नावाचे अँटीजन या ओ गटात आढळून आले नाही. त्यावर त्यांनी सखोल परीक्षण केले आणि त्यांनी हे संशोधन मांडले व त्याला जागतीक आरोग्य संघटना व शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाली. हा रक्तगट मुंबईमध्ये पहिल्यांदाच सापडून आला म्हणून याला “बॉम्बे ब्लड ग्रुप” असे नाव पडले. यालाच एचएच ग्रुप असेही नाव आहे.

असं काय आहे बॉम्बे रक्तगटात?
शरीरात रक्ताच्या निर्मितीसाठी ‘एच’ अँटिजेनची गरज असते. मात्र ‘बॉम्बे’ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये एच अँटिजेनचा अभाव असतो. त्यामुळे हा रक्तगट सर्वसाधारण चाचण्यांमधून ओळखता येत नाही. त्याचा समावेश ‘ओ’ रक्तगटामध्ये केला जातो. रक्तगट ओळखण्यासाठी त्याची चाचणी ही नोंदणीकृत रक्तपेढीमध्ये केल्यास त्याचे नेमके निदान होण्यास मदत होते. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त अन्य कोणत्याही रक्तगट असलेल्या व्यक्तीला चालू शकते परंतू इतर अन्य रक्तगट बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीला चालत नाही. तोच रक्तगट असायला हवा. हा रक्त गट close knit communities मध्ये जास्त पाहायला मिळतो. आई-वडील दोघांमध्ये Recessive Allele असल्यास हा रक्तगट तयार होतो. मुंबई अवघ्या 0.01 टक्के लोकसंख्येमध्ये हा रक्तगट आहे.
बॉम्बे आणि ओ रक्तगटामधील अत्यंत महत्त्वाचा फरक –
- बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये लाल रक्तपेशींवर एच प्रतिपिंडे नसतात. परंतु एच अँटीबॉडी असतात.
- तर ओ रक्तगटामध्ये एच प्रतिजैविक असतात परंतु त्यामध्ये एच अँटीबॉडी नसतात.
बॉम्बे रक्त समूह हा जगातील प्रत्येक दशलक्ष लोकांपैकी फक्त चार लोकांमध्ये आढळतो. - एच प्रतिजनांच्या अनुपस्थितीमुळे ते वरील चार रक्त गटांपेक्षा भिन्न आहे.
जीनोममध्ये एच जनुक नसल्यामुळे हे घडते. - बॉम्बे रक्तगट आणि ओ रक्तगटाची तुलना करताना, दोन्ही रक्त गटांमध्ये ए प्रतिजन आणि बी प्रतिजन नसतात. परंतु ओ रक्तगटामध्ये एच जनुक असते; म्हणून, एच प्रतिजन समाविष्टीत आहे.
- बॉम्बे रक्तगटामध्ये ए आणि बी अँटीजेन्स नसल्यामुळे हे चुकून ओ रक्तगट म्हणून समजले जाऊ शकते. म्हणूनच रक्त घेण्यापूर्वी योग्य रक्तगट तयार करणे आणि चाचण्या पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.
- विशेषत: एच रक्तगटाचे बाँम्बे रक्तगटापासून वेगळे करण्यासाठी एच अँन्टीजेनची तपासणी केली गेली पाहिजे. तसे न केल्यास रक्तसंक्रमणाच्यावेळी रुग्णामध्ये हेमोलिटिक रक्तसंक्रमण प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते.
- ज्या लोकांचा बॉम्बे रक्तगट आहे त्यांना फक्त त्याच बॉम्बे फेनोटाइपमधील रक्त द्यावे लागते. अन्य कोणत्याही गटाचे रक्त त्यांना चालत नाही.
- बाँम्बे ब्लड ग्रुप हा A neg/ B neg/ AB neg/ O neg या सर्व निगेटिव्ह दुर्मिळ गटांपेक्षाही अत्यंत दुर्मिळ आहे.

बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी थिंक फाऊंडेशन
थिंक फाऊंडेशनच्या विनय शेट्टी यांच्या माहितीनुसार सर्व भारतभर 350 लोक या गटाचे आहेत. तथापि यातील 30 जणच सक्रिय दाते आहेत. दुर्मिळतेची शक्यता लक्षात घेता बाँम्बे ब्लड ग्रुपच्या उपलब्धतेच्या अभावाने मृत्यूची शक्यता खूपच जास्त आहे, जर वेळेत रक्तदाता व रक्त उपलब्ध नाही झाले तर मृत्यू जवळजवळ शंभर टक्केच. सन 1917 ला श्रीलंकेतील कर्करुग्ण या रक्तगटाच्या अभावाने मृत्यूमुखी पडला. त्याला बॉम्बे ब्लडग्रुप तर हवा होताच शिवाय तो निगेटीव्ह हवा होता. या गटातही पॉझिटिव्ह निगेटीव्ह प्रकार आहे. विक्रम यादव यांनी भारतात एकूण 11 बॉम्बेब्लड ग्रुपच्या व्यक्ती असल्याचे सांगितले आणि पैकी महाराष्ट्रात एकही नाही अशी माहिती काही वर्षांपूर्वी दिली होती. ज्यावेळी पहिली निगेटीव्ह व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सापडलेली, तिच्यासाठी विक्रम यादव यांनी कोलकत्ता, कोईमत्तूर, चेन्नई व गुजरात येथील चार दात्यांचे नियोजन केले होते.
भारतात रक्तदान क्षेत्रात काम करणारे व विशेषतः बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी ज्या संस्था व व्यक्ती काम करतात त्यात महत्त्वाचे नाव ‘थिंक फाऊंडेशन’ हे आहे, आतापर्यंत अनेकांना हे रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे. रक्तदाता शोधणे रक्त गोळा करणे व ते योग्यवेळी योग्य प्रकारे लाभार्थीपर्यंत पोहचवायचे काम थिंक फाऊंडेशनने केले आहे.






