पुण्याचे शहरीकरण ही तशी अलीकडचीच गोष्ट. 1961 च्या पानशेतच्या पुरानंतर पुणे जरा विस्तारायला लागले. पुण्याच्या सीमाभागांवर औद्योगिक कारखाने निर्माण व्हायला लागले, तशा रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागली. कारखान्यांप्रमाणेच पोस्ट, बँक, एलआयसीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्त्रिया कामे करू लागल्या. नवरा- बायको दोघांच्या कमावतेपणामुळे मध्यमवर्गाचा विस्तार झाला.
वाडा संस्कृतीकडून फ्लॅट संस्कृतीकडे झपाट्याने वाटचाल झाली. विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली - स्थिरावली. पण नोकरी करून बाई कमवायला लागली म्हणून तिची घरातली जबाबदारी मात्र अजिबात कमी झाली नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत घरकामात पुरुषांचा अजिबात सहभाग नसल्यामुळे घर-कुटुंब, मुलांचे संगोपन, वृद्धांची देखभाल या प्रामुख्याने तिच्याच जबाबदाऱ्या मानल्या गेल्या.
घरकामाला बाई ठेवणे हे तिच्या दृष्टीने कमीपणाचे मानले गेले. आपल्या घरातले काम आपण करत नाही याचा एक अपराधीपणा तिच्या मनात निर्माण झाला. किंवा हेतुपुरस्सर तसा निर्माण केला गेला. पण काही काळानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की धुण्याभांड्याला बाई असणे हे सुखवस्तुपणाचे लक्षण मानले जाऊ लागले आणि कामाच्या बाईला मान्यता मिळाली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)
दुसऱ्या बाजूला पुण्याच्याच आजूबाजूच्या भागात दुष्काळ, धरणे आणि इतर प्रकल्पांमुळे झालेले विस्थापन आणि रोजगाराच्या आशेने जगण्यासाठी माणसांचे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर व्हायला लागले. पुरुषांनी काही बारीकसारीक व्यवसाय सुरु केले किंवा लहान-मोठी नोकरी पत्करली. बायका अशिक्षित आणि शेतीकामाशिवाय कुठलेच विशेष कौशल्य नसलेल्या, त्यामुळे त्यांनी धुण्याभांड्यांची कामे मोलाने करायला सुरुवात केली.
एकट्या, विधवा, परित्यक्ता यांना तर तेवढाच एक आधार होता. नोकरी करणाऱ्या स्त्रिया तसेच घरकामाच्या तोच तोच पणाला कंटाळलेल्या गृहिणी आणि मोलकरणी यांना एकमेकींच्या गरजा भागवण्याची संधी प्राप्त झाली. मोलकरणींनी मालकिणींच्या गरजा भागवल्या खऱ्या, पण उलटे मात्र झाले नाही.
हा साधारण 70-75 चा काळ… या मोलकरणींची परिस्थिती त्यावेळी खूप वाईट होती. मूर्तिमंत दारिद्र्य म्हणजे काय हे त्यांच्याकडे नुसते बघूनच समजायचे. दंड घातलेली जोडाची-ठिगळं लावलेली लुगडी, फाटके कपडे. त्यांच्या अपार कष्टाला-श्रमाला कुठलीही प्रतिष्ठा नव्हती. जितके जास्त श्रम तितका हीन दर्जा अशी आपली संस्कृती! अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना मिळत असे. त्यांचे कष्ट, त्यांचा वेळ आणि त्यांचे वेतन यात कुठलाच ताळमेळ नव्हता. त्यावेळी जातीपातीचेही खूप प्रस्थ होते.
सवर्णांच्या बायकांना मोलाने काम करायची वेळ आली तर त्या चोरून लपून करायच्या. ब्राह्मण बायका फक्त स्वयंपाकाची काम करायच्या. अस्पृश्यताही पाळली जायची. मोलकरणींना स्वयंपाकघरात - प्रवेश निषिद्ध. तिने घासलेली भांडी पाणी टाकून मगच - वापरली जायची. मोलकरणींकडे माणूस म्हणून बघितलेच जायचे नाही. या पार्श्वभूमीवर मालकीण-मोलकरीण या दोन्ही स्त्रियांच्याच संबंधांचा विचार करताना त्यातली गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते.
बऱ्याच वेळा मालकीण ही बाहेर नोकरी करणारी एक कामगारच असते आणि कामगार म्हणून स्वतःचे हक्क संप करून पदरात पाडून घेण्याचे भान तिला असते, पण घरातल्या मोलकरणीला मात्र ती कामगार मानायला तयार नसते. त्यामुळे बायकांचे घरकामाचे श्रम अदृश्यच राहतात. कुटुंबातील स्त्रिया जेव्हा मोलकरणींकडून कामं करुन घेतात तेव्हाच या कामाचे 'मोल' त्यांना समजते.
पण आता त्या मालकिणीच्या भूमिकेत आल्यावर भांडवलदार वर्गाप्रमाणेच मोलकरणींच्या श्रमांकडे दुर्लक्ष करतात. परिणामतः स्त्रियांच्या घरकामाचे मोल वाढण्याची एक शक्यता नाहीशी होते आणि घरकामाचे श्रम अदृश्यच राहतात. या अदृश्य श्रमांना दृश्यरुप देण्याचे खूप महत्त्वाचे काम केले ते पुणे शहरीतील मोलकरीण संघटनेने...
कोण आहेत मेधा थत्ते, ज्यांनी या मोलकरणींना आवाज मिळवून दिला?
पुणे शहरात लाखोंच्यावर महिला घरकाम करतात. घरोघरी काम करून तुटपुंज्या कमाईवर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात, परिस्थितीशी दोन हात करतात. पण त्यांची सर्वच बाजूने अवहेलना होते. त्यांच्या हक्कासाठी आणि त्याच जीवनमान उंचावण्यासाठी गेली चाळीस वर्षांपासून मेधा थत्ते या काम करत आहेत.

(पुणे शहर मोलकरीण संघटनेच कार्यालय)
घरकामगार महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन असो वा मालकांचाअरेरावीपणा असो, त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम मेधा ताई अनेक वर्षांपासून करत आल्या आहेत. घरकाम करणाऱ्या महिला शक्यतो वस्त्यांमध्ये राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते.
त्यात मुलांचं शिक्षण असो घरातला घरखर्च असो, तो भागविण्यासाठी दिवसभरात जेवढ्या घराचं काम मिळेल तिथे त्या काम करतात.त्यांची परिस्थिती सुधारावी आणि त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी मेधा थत्ते झटत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो घरकामगार महिलांना न्याय मिळवून दिला आहे.
मेधा थत्ते मूळच्या जालन्याच्या… आई- वडील दोघेही डॉक्टर. मेधाताईंनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1984 साली नोकरीसाठी त्या पुण्यात आल्या. पुणे शहरात त्यांना वस्त्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम मिळाले. हे काम करत असताना त्यांना कष्टकरी लोकांचं जगणं आणि त्यांच्या समस्या जवळून पाहता आल्या. तेव्हा पुण्यामध्ये मोलकरीण संघटना सुरु होऊन चार वर्ष झाली होती. सर्वेक्षणाचे काम करतानाच मेधाताई या संघटनेच्या संपर्कात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी मोलकरीण संघटनेचे पूर्णवेळ काम करायचे ठरवले.
पुण्यातील डेक्कन ,जनता वसाहत ,वडारवाडी ,बावधन अप्पर,बाणेर,आकुर्डी, निगडी या भागात मेधाताईंनी मोलकरीण संघटनेचा विस्तार केला. या भागामध्ये महिलांची महिन्यातून एकदा मिटिंग घ्यायला सुरुवात केली. महिलांना मीटिंगमध्ये काय बोलायचं हा प्रश्न असायचा. मेधाताईनी न बोलणाऱ्या महिलांना बोलतं केलं.
हळूहळू महिला घरात आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबद्दल बोलू लागल्या, अन्यायाविरुद्ध बोलू लागल्या. अशा हजारो मिटिंग मेधाताईंनी घेतल्या. यामुळे महिला आपल्या हक्काबद्दल जागरूक झाल्या आणि मोकळ्यापणाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलू लागल्या. एकप्रकारे महिलांचा कोंडलेपणा कमी झाला.
मेधाताईंच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या टप्प्यात पगारवाढ, बोनस यासाठी मोलकरीणींची आंदोलने झाली. महिलांसाठी कामातून मिळणारा पगार गरजेचा होताच,पण त्यासोबत स्वाभिमानही महत्वाचा होता. घरकामाला जाणाऱ्या महिलांवर मालकांकडून चोरीचा आळ घेतला जायचा. महिलांना शारीरिक त्रास दिला जायचा. या सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय महिलांवर गुन्हा दाखल करू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडे सातत्याने मेधाताईंनी पाठपुरावा केला.
काही प्रकरणांमध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या मालकांना मोलकरणीची माफी मागायला लावली आहे. मेधाताईंनी याशिवाय मोलकरीणींना पेन्शन,ग्रॅज्युइटी आणि सरकारच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला आहे,पण त्याला अजूनही यश आलेलं नाही.
कष्टकरी महिलांचे असंख्य प्रश्न सोडविण्यासाठी मेधाताई आघाडीवर
घरेलू मोलकरीण महिलांवर नवऱ्यांकडून संशय घेतला जाणं, सासरच्या लोकांचा होणारा त्रास, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा छळ या सगळ्या समस्यांनी त्रस्त झालेल्या महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी हक्काचं ठिकाण असावं म्हणून 1985 साली 'श्रमिक महिला मोर्चाची 'स्थापना करण्यात आली. यामुळे महिलांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत मोकळ्यापणाने बोलण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ मिळाले.

(आंदोलन करतांना महिला आंदोलक)
आपल्यावर होणारा छळ,अत्याचार याबाबत बोलणाऱ्या महिलांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यानंतर अनेक गुन्ह्यांची पोलीस स्टेशनमध्ये नोंद होऊ लागले. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मेधाताई महिलांच्या घरांच्याशी बोलल्या, भांडल्या. बऱ्याच महिलांच्या मनात आत्महत्येचा विचार यायचा, पण ताईंनी त्यापासून परावृत्त केलं आहे.
ज्या महिलांना घरातून त्रास होत असेल किंवा त्यांना संसार टिकवणं शक्य होतं त्यांनी टिकवलं, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी नवऱ्यापासून वेगळं राहणं पसंद केलं आणि त्यांनी नवं आयुष्य सुरु केलं. पुण्यातील कष्टकरी महिलांचे असंख्य प्रश्न सोडविण्यासाठी मेधाताई आघाडीवर होत्या.
चंद्रभागा सपकाळ सांगतात,'आमचं आयुष्य भकास होतं, आयुष्यात बरं म्हणावं असं काहीच नव्हतं. मोलकरीण संघटनेमुळे आणि मेधाताईंमुळे आज आम्ही आमच्या समस्या आणि होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता संघटितपणे त्याविरुद्ध आवाज उठवतो. ताठ मानेने जगू शकतो. मेधाताईंनी आमच्या आत्मसन्मानाच्या लढाईत घेतलेले कष्ट कधीच विसरू शकत नाही. मागच्या 35 वर्षात संघटनेने जे दिलंय त्याचीच परतफेड आता आम्ही संघटनेच्या कामातून करतोय.'
या सगळ्या पार्श्वभूमीवर मेधा थत्ते सांगतात,'गेली 30-35 वर्षांपूर्वी कष्टकरी महिलांचे प्रश्न वेगळे होते. त्या प्रश्नांवर आम्ही काम केलं. काही प्रश्न सुटले. काही प्रश्न अजूनही तसेच आहेत. पण सध्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू लागल्या आहेत. महिला स्वावलंबी झाल्या. संघटित झाल्या. याचाच मला मोठा आनंद आहे.'
मोलकरीण संघटनेचा इतिहास
महिला घरकामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारी मोलकरीण संघटना 1980 मध्ये स्थापन झाली. मोलकरणींची पुण्यातील ही पहिली संघटना होती. दीडशे महिलांनी पगारवाढीसाठी रस्त्यावरच ठिय्या मांडून केलेल्या संपामुळे संघटनेची स्थापना झाली. त्यावेळी पुणे शहरात काही भागात घरमालक पगार वाढवत नव्हते. पण महिलांकडे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.
मात्र काही महिलांनी धाडस करून काम बंद करून म्हात्रे पुलावर ठिय्या आंदोलन केलं. एका दिवसात हा संप मागेही घेतला. पण मोलकरीणींची संघटना असली पाहिजे असा विचार करून लीलाताई आणि अप्पासाहेब भोसले यांनी मोलकरीण संघटनेची स्थापना केली.
(मेधा थत्ते)
नावाप्रमाणेच ही संस्था महिला कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करते. एका व्यक्तीने घरातील महिला कामगाराला आजारपणातच कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर निघालेल्या उत्स्फूर्त आंदोलनाला शहरभरातील स्थानिक कामगारांनीही पाठिंबा दर्शविला. त्यातूनच या संस्थेच्या स्थापनेला बळ मिळाले. ही संस्था स्थापन झाली, तेव्हा शहरातील महिला घरकामगारांच्या हक्कांसाठी लढणारी ही एकमेव संस्था होती.
आता मात्र पुणे आणि मुंबईत महिलांच्या अनेक संघटना स्थापन झाल्या आहेत. 1980 च्या दशकात पुण्यात स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीची स्थापना झाली होती. पुढच्याच वर्षी 1981 मध्ये ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन असोसिएशन ही महिलांसाठी भारतभर काम करणारी संघटना स्थापन झाली. या वातावरणात मोलकरीण संघटनेलाही बळ मिळाले.
ही संघटना मुख्यत्वे स्थानिक कामगारांच्या कमिट्या तयार करून काम करते. घरकामगार महिलांची कुटुंबे, मुले, स्वच्छता याबाबत भेडसावणार्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम बनवले जाते. अवैध दारूची दुकाने आणि विक्रेते ही घरगुती कामगारांच्या झोपडपट्ट्यांमधली एक मुख्य समस्या होती. तिथे पुरुषांना दारू खरेदी करणे सोपे जायचे.
संघटनेने पोलिसांचा पाठिंबा घ्यायचे ठरवले. मात्र, त्यांना कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी एकतर उदासीन किंवा दारू विक्रेत्यांच्या बाजूने असल्याचे आढळले. अवैध दारू विक्रेत्यांना समजावण्याच्या काही प्राथमिक प्रयत्नांनंतर संघटनेच्या सदस्यांनीच थेट दारूच्या दुकानांची तोडफोड केली. या कामात या सदस्यांना घरकामगार महिलांच्या घरातील तरुणांचाही पाठिंबा मिळाला. अखेर पोलिसांना या आंदोलनकर्त्यांना थांबवण्यासाठी विनवणी करावी लागली.
महाराष्ट्र सरकारने 2008 मध्ये घरगुती कामगार अधिनियम मंजूर केल्यानंतर संघटनेने कायदेशीर कामावर लक्ष केंद्रित केले आहे. या संघटनेला आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागले, ती म्हणजे घरगुती हिंसाचार. 1986 च्या सुमारास श्रमिक महिला मोर्चा नावाचा एक गट स्थापन झाला होता.
देशांतर्गत हिंसाचाराविरोधात हा गट काम करीत होता. मोलकरीण संघटनेला घरकामगारांवर होणार्या बलात्काराची प्रकरणेही हाताळावी लागली आहेत. एकाच कुटुंबात वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या घरगुती कामगारांना वार्षिक बोनस व बक्षिसी मिळावी यासाठीही संघटनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत.






