माणसाच्या भावभावना, श्रद्धा, समजुती, रूढी अपरंपार आहेत. त्यांना सीमा नाही. यथा देहे तथा देवे या नात्याने मानवी मनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी देवाशीपण जोडल्या जातात. माणूस आणि देव कुणी निराळे नसून एकसारखेच आहेत असे समजून विविध सुंदर आणि काहीशा चमत्कारिक परंपरा दिसून येतात. छत्तीसगड राज्यात अशीच एक आगळीवेगळी प्रथा पाळली जाते. या राज्यात बस्तर जिल्ह्यात चक्क देवतांना कोर्टात खेचले जाते आणि न्यायनिवाडा केला जातो. मात्र हे न्यायालय माणसांचे नसून देवाचेच असते. इथे न्यायाधीशपदी विराजमान असते ‘भंगाराम’ नावाची देवी.

निसर्गाची भरपूर उधळण असलेल्या बस्तर जिल्ह्यात केशकाल घाटाच्या माथ्यावर वसली आहे ही भंगाराम देवी. ह्या देवीचे कार्यक्षेत्र आजूबाजूच्या 240 गावांपर्यंत विखुरलेले आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला इथे देवीची जत्रा भरते. ‘भादो जातरा’ असं याचं नाव. याच जत्रेत देवीचे न्यायालय भरते. या जत्रेत, 240 हून अधिक गावांतले आदिवासी समुदाय त्यांच्या त्यांच्या देवांना सोबत घेऊन भंगारामदेवीच्या पायापाशी आणतात. आपल्या या ग्रामदेवतांच्या तक्रारीही आदिवासी बांधव सोबत घेऊन आलेले असतात. ही दैवते जर पूर, रोगराई, तसेच गावकऱ्यांच्या अडीअडचणीच्या वेळी गावकऱ्यांना साथ देत नसतील तर त्यांची तक्रार इथे भंगाराम देवीकडे केली जाते. ग्रामदैवतांची प्रतीके ही मुखवटे, तरंग, काठ्या अशा स्वरुपात इथे आणली जातात.
देवांचे प्रतिनिधी म्हणून पुजारी, मांझी, मुखिया, गायता अशी मंडळी येतात. त्यांच्या अंगात ग्रामदेवतेचा संचार होतो. गावकरी भंगाराम देवीपुढे तक्रारी सांगतात. भंगाराम देवी या सगळ्ळ्याची शहानिशा करते आणि देवतांच्या कामात कुचराई झाल्याचे सिद्ध झाले तर देवांना 6 महिन्यांचा कारावास ते अगदी मृत्युदंडापर्यंतची शिक्षा दिली जाते.

देवांनी त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत आणि त्यांचं निराकरण केलेलं नाही असं आढळलं तर दैवी शक्तीच्या परीक्षेत नापास झालेल्या देवांचं देवत्व हिरावून घेतलं जातं. ते लाकडाचे आणि दगडाचे निव्वळ पुतळे ठरतात. मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर देवतांची आणलेली प्रतीके भंगाराम देवीच्या समोरच्या मोठ्या कुंडात टाकून दिली जातात. कारावास असेल तर गावातल्या देवळातून तेवढ्या काळापुरती देवतेची मूर्ती काढून बाहेर ठेवली जाते. त्या सहा महिन्यात देवतेची पूजा-अर्चा-नैवेद्य सगळं बंद! देवत्व हरण झालेल्या त्या मूर्ती वाऱ्याचा, पावसाचा, थंडीचा आणि सूर्याच्या प्रखर उन्हाचा तडाखा सहन करत इथेतिथे पडून राहतात. त्यातले काही देव कागदाच्या कपट्यासारखे झुडुपांमध्ये अडकलेले सापडतात. काही दगड गोट्यात जुन्या झाडांच्या बुंध्यांना टेकलेले आढळतात.
या जत्रेत दिवसभर देवांवरच्या आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू असते. देवी-देवतांविरुद्ध केल्या जाणाऱ्या तक्रारी या प्रामुख्याने नवस न पाळल्याच्या असतात. याशिवाय पीक खराब आलं, जनावरांना कोणताही रोग झाला, गावात कोणताही रोग पसरला अशा स्वरुपाच्या असतात.
कारावासाचा काळ पूर्ण झाला की देवता पुजाऱ्याच्या स्वप्नात येतात आणि माफी मागून पुन्हा देवळात प्रस्थापित करण्याची विनंती करतात. त्यांची मग पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे सगळे अत्यंत अजब असे प्रकरण आहे. पण दरवर्षी नित्यनेमाने इथे हे न्यायालय भरवले जाते. भंगाराम देवीचा आदेश 55 गावातील ग्रामदेवतांना शिरसावंद्य असतो.

दरवर्षी भरणाऱ्या या भंगाराम देवीच्या जत्रेत महिलांना मात्र प्रवेश नसतो. त्यांना सहभागी होण्यास पूर्ण बंदी असून देवीचा नैवैद्यही महिला खाऊ शकत नाहीत. याचे कारण सांगताना बस्तरचे आदिवासी म्हणतात की, स्त्रिया सौम्य स्वभावाच्या असतात, त्यामुळे त्याची उपस्थिती देवांविरुद्धच्या सुनावणीवर विपरित परिणाम करू शकते.
असं म्हणतात की, देवीने बस्तरच्या राजाला स्वप्नात दृष्टान्त देवून सांगितले की मला तुझ्या राज्यात यायचं आहे, तेव्हा राजा मंत्र्यांसह, प्रजाजनांसह बस्तरहून देवीच्या स्वागतासाठी आला असता केशकल येथे मोठे वादळ आलं आणि देवी प्रथम पुरुषाच्या वेषात घोड्यावर स्वार होऊन आली. जेव्हा लोकांनी तिला नमन केलं तेव्हा ती स्त्री वेशात बदलली.
येथील पुजारी सरजू राम गौर सांगतात की, याआधी सलग सहा शनिवारी भंगारम देवीची पूजा केली जाते. या महिन्यात भेट देणाऱ्या देवतांचे परंपरेनुसार स्वागत करून त्यांना त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेनुसार स्थान दिले जाते. त्यांच्यासोबत पुजारी, गायता, सिरहा, गावप्रमुख मांझी, मुखिया आणि पटेल हे प्रतिनिधी म्हणून येतात. पूजेनंतर वर्षभर प्रत्येक गावात सुख, शांती, निरोगी जीवन, चांगले उत्पन्न आणि कोणत्याही प्रकारच्या दैवी आपत्तीपासून प्रत्येक जीवाचे रक्षण होण्यासाठी प्रार्थना केली जाते. या ठिकाणी जे काही साहित्य नैवेद्य म्हणून आणले जाते, ते प्राणी असेल तर गावातील लोक प्रसाद म्हणून स्वीकारतात आणि इतर वस्तू येथेच सोडून देतात. येथून एखादी वस्तु परत नेल्यास गावावर संकट कोसळेल असा समज आहे.

मानवी जीवनात भावभावना आणि श्रद्धा किती खोलवर रुजलेल्या आहेत त्याचे हे प्रतीकच म्हणावे लागेल. संकटकाळी जितक्या अगतिकतेने देवाकडे पाहिले जाते, तितक्याच कठोरपणे त्याने काम केले नाही तर त्याची तक्रारसुद्धा केली जाते. अतिशय आगळीवेगळी ही ‘भादो जातरा’ आणि तितकेच वेगळे इथले न्यायालय. समजा लोकांची तक्रार चुकीची आहे असे समजले तर भंगाराम देवी त्या देवतेला पुन्हा वाजत-गाजत गावात नेण्याचा आदेश देते. तो आदेशसुद्धा मनोमन पाळला जातो. माणसाच्या श्रद्धा, भावभावना, परंपरा यांचे उत्कट दर्शन बस्तर मधल्या केशकाल इथे बघायला मिळते. अजब छत्तीसगडची ही अजून एक अजब कहाणी !!






