- साक्षी मेहरा
शेतातील मोकळ्या ताज्या हवेत निवांत बसलेल्या रामबाईंनी कधी कल्पना केली नव्हती की, त्या आपल्या आयुष्याच्या शतकानंतर विश्वविक्रम मोडतील आणि ‘उडनपरी’ म्हणून ओळखल्या जातील. त्यांच्या नावावर 200 हून जास्त पदकं आहेत. त्यांची पणती जेनीथ देखील आपल्या पहिल्या सोलो उड्डाणासाठी सध्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेत आहे.
हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यातील झोजू कला गावातील एकाच कुटुंबातील चार पिढ्यांमधील बायका खेळात पुढे आहेत. त्यांच्या घरातील खोल्या पदकं आणि प्रमाणपत्रं यांनी भरलेली आहेत. सांगवान यांचं कुटुंब या गावाची शान आहे. 107 वर्षाच्या रामबाईने अनेक आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पदकं मिळवली… रामबाईच्या मुलीने संतराबाईनेदेखील आईच्या पावलांवर पाऊल ठेवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
संतराबाईची कन्या शर्मिला ही दिल्ली परिवहन खात्यामध्ये बसचालक आहे आणि आता रामबाईची पणती म्हणजे शर्मिलाची मलगी जेनिथचे पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. एकाच कुटंबातील चार पिढ्यांची ही उदाहरणं खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आहे.

(रामबाई)
“2023 मध्ये जेव्हा मी माझ्या पणजीला सांगितलं की मी पायलट होऊन विमान उडवणार आहे तर ती खूप आनंदी झाली. ज्या विमानात बसून ती खेळांच्या स्पर्धेला जायची तसंच एक विमान मी आता उडवणार आहे ही गोष्ट तिला भारी वाटली,” 22 वर्षांची जेनीथ गहलावत सांगते.
108 वर्षांच्या रामबाईंना आता फारसं काही समजत नाही, पण त्यांच्या प्रेरणेतूनच हे सारं घडलं आहे. जेनीथची आई, 42 वर्षीय शर्मिला सांगवान या दिल्ली परिवहन निगमच्या बसचालक आहेत. त्यांनीच जेनीथला लहान वयापासूनच गाड्या चालवायला शिकवलं. आता ती विमान चालवायला शिकवत आहे. जेनीथ 18 वर्षांची होती तेव्हा रामबाई नॅशनल मास्टर्स एथलेटीक्स चँपियनशीपमध्ये धावल्या होत्या. वयाच्या 104 व्या वर्षी त्यांना धावायचा छंद लागला.
2021 मध्ये शर्मिला यांनी आपली आई संतराबाई, आजी रामबाई तसेच अन्य पाच कुटुंबातील सदस्यांना स्पर्धेत भाग घेऊन दिला. 64 वर्षीय संतराबाई या कधी खेळाडू नव्हत्या. 2021 मध्ये त्यांनी पहिल्यांदा धावायला सुरूवात केली, पदक जिंकलं आणि त्यानंतर त्या धावत राहिल्या. “माझ्यात एक उर्जा होती. मी जेव्हा पहिल्यांदा धावले तेव्हा मन आनंदानं भरून आलं. माझ्यात इतकी शक्ती असेल असं मला वाटलं नव्हतं. मी कशाचीच चिंता केली नाही आणि मनसोक्त धावले,” संतराबाई सांगतात.
जेव्हा जेनीथ पहिल्यांदाच एकट्यानं विमान उडवणार होती तेव्हा ती अजिबात घाबरली नव्हती. तिचे प्रशिक्षक तिला घाबरायला सांगत होते. ते आता तिला ‘शेरनी’ म्हणून बोलावतात. जेनीथला आपली ही शक्ती आईकडून मिळाली आहे. 17 वर्षांपूर्वी शर्मिलाचे पति एका कार अपघातात मारले गेले.

(जेनीथ)
जेनिथ तेव्हा पाच वर्षांची होती आणि जस्मिन त्यांच्या पोटात होती. जेनीथ सांगते, “ट्रेनिंग कँपमध्ये सर्व आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाची गोष्ट करत होते तेव्हा मला वडिलांची आठवण आली. पण घरी माझ्या आईने नेहमीच आम्हाला कशाची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे आईच मला वडिलांच्या जागी आहे.” आपल्याला पायलट व्हायचं आहे असं जेनीथने जेव्हा सांगितलं तेव्हा शर्मिलांनी तिला प्रोत्साहन दिलं.
जेनीथला मे किंवा जून 2025 मध्ये पायलट लायसेंस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नारनौल येथील फ्लाईट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेऊन तिला व्यावसायिक पायलट लायसेंससाठी 200 घंटे विमान चालवण्याचा अनुभव मिळवावा लागेल. शर्मिलांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि आपल्या मुलीच्या आनंदासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि तिला हवेत उडता यावं म्हणून त्यांना यात आनंद आहे. त्या आपल्या मुलींसोबत दिल्लीत राहतात तर संतराबाई गावात राहतात.
जेनीथला वाटतं की तिच्या या यशात रामबाई यांचा आशीर्वाद आहे. शर्मिला यांनी आपल्या आजीला धावायला शिकवलं होतं. त्या रेड बूल पितात, हरियाणवी गाण्यांवर नाचतात, गावातील लोक त्यांचा सन्मान करतात. त्यांचा आत्मविश्वास अभंग आहे. पारंपरिक हरियाणवी समाजात त्या मोकळेपणानं हसतात आणि कोणाची चिंता न करता मनसोक्त गातात.

(शर्मिला)
त्यांच्या सुरूवातीच्या काळात त्या एकदा स्कुटर विकत घ्यायला शो-रुम मध्ये गेल्या होत्या. त्यांना तेव्हा स्कुटर चालवता येत नव्हती. शो-रुमच्या कर्मचाऱ्याने विचारलं की तुम्ही आता स्कुटर घरी कशी नेणार. तेव्हा त्यांनी म्हटलं की, “तुम्ही ही माझ्या घरी घेऊन चला. मी ती चालवायला नक्कीच शिकेन.” हाच आत्मविश्वास त्या इतरांमध्येही रुजवतात.
शंभर वर्षांच्या स्वर्गीय मन्न कौर ज्या खेळाडू होत्या, त्यांच्यापासून प्रेरणा घेत शर्मिला यांनी आपल्या कुटुंबाला स्वप्नं बघण्यास शिकवलं. त्यांना वाराणसी इथे धावायला पाठवलं, ज्यात रामबाईंनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. मी माझी आई आणि आजी यांनी यात्रेला जायचं आहे असं सांगून पाठवून द्यायची. तिथे मग स्पर्धेत भाग घ्यायला लावायची. पश्चिम बंगाल, नेपाळ, बँगलोर, केरळ इथे त्यांनी स्पर्धा गाजवल्यानंतर 2023 मध्ये त्या मलेशियाला गेल्या जिथे रामबाईंनी चार सुवर्ण पदकं आणि शर्मिला यांनी दोन रौप्य पदकं जिंकली. पण ही यात्रा त्यांच्यासाठी सोपी नव्हती. कमी वयात लग्न आणि बारावी परीक्षेच्या निकालाची वाट बघत असतानाच त्यांच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता.
त्यानंतर त्यांना मुलींच्या सुखासाठी स्वतः कामाच्या शोधात जावं लागलं. त्यांचे पति म्हणायचे की शर्मिलाने मोठ्या गाड्या चालवायला पाहिजेत. तेव्हा त्यांनी याला नकार दिला होता. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी ड्रायव्हिंग शिकणं सुरू केलं. 2024 मध्ये त्यांना डीटीसी कडून सर्वोत्तम चालकाचा पुरस्कारही मिळाला. मी न भिता गाडी चालवते असं त्या सांगतात आणि त्यांच्या प्रत्येक कामात हीच निर्भयता दिसून येते. त्या कधी माहेरी गेल्या नाही पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना नेहमीच पाठींबा दिला. त्यांचे वडील त्यांच्यासोबत नेहमीच असतात आणि आई देखील

(संतराबाई)
पण कुटुंबात सर्वच लोक सांगवान स्त्रियांच्या यशावर खूश नव्हते. स्त्रियांनी असं बाहेर जावं आणि खेळावं याला काहींचा विरोध होता. एकाने रामबाईंना धमकीही दिली की त्या जर पुन्हा घराबाहेर पडल्या तर त्यांना त्याचं मेलेलं तोंड बघावं लागेल म्हणून. पण रामबाईंना प्रसिद्धी मिळू लागली, पत्रकार, लोक त्यांना भेटायला येऊ लागले तसतसा हा विरोध कमी होत गेला. रामबाईंची तब्येत आता ठीक नसते. सर्वांना वाटतं की त्यांनी फक्त आराम करावा. पण शर्मिलांना वाटतं की त्यांनी पुन्हा धावलं पाहिजे.
त्यांच्या मुली आपल्या पायावर उभ्या राहिल्यानंतर त्या स्वतः मुलांना मोफत खेळ प्रशिक्षण देण्याच्या विचारात आहेत. त्या म्हणतात, “यश केवळ कोणा एकाचंच नसतं. संधी दिली तर कोणीही ते मिळवू शकतं. जेव्हा कोणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे गरजेचं होतं की तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध करावं आणि आपलं स्वप्न पूर्ण करावं.” जेनीथला आपल्या स्वप्नांच्या मागे उडताना बघून शर्मिला यांनाही आता विमान उडवण्याची प्रेरणा मिळाली आहे. मुली स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना आपलं हे स्वप्न पूर्ण करायचं आहे.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






