2023 ची घटना आहे… टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला हॉकी टीम उपान्त्य फेरीचा सामना खेळत होती. भारताच्या या टीममध्ये झारखंडची एक अशी आदिवासी खेळाडू मोठ्या त्वेषाने खेळत होती की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या, मात्र हा ऐतिहासिक क्षण झारखंडमधील तिच्या कुटुंबाला पाहता येत नव्हता, कारण तिच्या त्या गावातील पडक्या घरात साधा टीव्हीदेखील नव्हता. ही गोष्ट त्यावळेची झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समजली आणि त्यांनी तात्काळ त्या आदिवासी महिला हॉकीपटूच्या घरी 43 इंच स्मार्ट टीव्ही आणि सोबत इन्वर्टर लावण्याचे आदेश दिले.
आज झारखंडची तीच आदिवासी खेळाडू चक्क भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार झालीये आणि लवकरच बेल्जियम आणि इंग्लंड या देशांत ती 24 खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रचंड संघर्ष करून इथवर पोहचलेली ही आदिवासी खेळाडू आहे सलीमा टेटे… झारखंडमधील निक्की प्रधान, संगीता कुमारी आणि दीपिका सोरेंग या आणखी तीन आदिवासी खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश झाला असून त्यांची कहाणीही जवळपास सलीमा टेटेसारखीच आहे.
झारखंडच्या सिमडेजा जिल्ह्यात बडकी छापर नावाच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सलीमाची कारकीर्द जर कुणामुळे घडली असेल तर तिच्या आई आणि मोठ्या बहिणीमुळे. इतरांच्या घरात धुणी-भांडी करत आणि जेवण बनवत या दोघींनी सलीमाच्या कारकीर्दीत सिंहाचा वाटा उचलला. एका कच्च्या-पक्क्या घरात सलीमाचे वडील सुलक्षण टेटे हेदेखील स्थानिक स्तरावर हॉकी खेळायचे. त्यांच्या मुलीने म्हणजे सलीमाने जेव्हा गावातल्या मैदानात हॉकी खेळायला सुरूवात केली तेव्हा तिच्याकडे हॉकी स्टिकच नव्हती. ती बांबूच्या काठीने हॉकीचा सराव करायची. सलीमाचे हॉकीपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या बहिणीने अनिमाने बेंगलोरपासून सिमडेगार्पयंत अनेक ठिकाणी जाऊन लोकांची धुणी-भांडी केली आणि तेही स्वत:चे करियर बाजूला ठेवून… कारण स्वत: अनिमा ही उत्तम हॉकी खेळायची.
अनिमाने अक्षरश: आपल्या बहिणीसाठी सर्वस्वाचा त्याग केला. या दोघी बहिणी झारखंडच्या ज्युनियर महिला हॉकी संघात खेळायच्या. 2013 मध्ये सलीमाचा खेळ पाहून झारखंड सरकारने सिमडेगा जिल्ह्यात असलेल्या हॉकी सेंटरमध्ये सलीमाची निवड केली आणि तिथून सलीमाचा प्रवास अगोदर राज्य आणि मग राष्ट्रीय स्तरापर्यंत येऊन पोहचला. 2016 नंतर सलीमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरूवात केली जेव्हा तिची निवड राष्ट्रीय ज्युनियर हॉकी संघात झाली. टोकियो ऑलिम्पिक, विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलीमा टेटेने शानदार कामगिरी बजावली. टोकियो ऑलिम्पिकमधील तिच्या कामगिरीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिफ केली होती. गेल्या वर्षी आशियाई हॉकी फेडरेशनने सलीमाची ॲथलॅटिक ॲम्बेसेडर म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती केली तसेच तिला ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर’ म्हणून गौरवले देखील.
भारतीय महिला हॉकी संघात निवड झालेल्या झारखंडच्या निक्की प्रधानची कहाणीही फार वेगळी नाही. खुंटी गावात राहणाऱ्या निक्कीने 2003-04 पासूनच हॉकीपटू बनण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र एक हॉकी स्टिक विकत घेण्याइतकी ऐपत तिच्या कुटुंबाची नव्हती. निक्कीचे वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते. पगार फार नसल्यामुले निक्कीची आई इतरांच्या शेतात मजुरी करायची. तिवढाच घराला हातभार म्हणून निक्कीदेखील आईसोबत शेतमजुरी करायची आणि फावल्या वेळेत हॉकी खेळायची. बांबूची काठीला हॉकी स्टिक बनवून निक्कीचा सराव चालायचा. एकदा निक्कीच्या शाळेत काही आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आले होते आणि त्यांना बघूनच निक्कीने हॉकीपटू बनण्याचे निश्चित केले होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर 2006 मध्ये रांची येथील हॉकी प्रशिक्षण केंद्रात तिने प्रवेश मिळवला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
भारतीय महिला संघाची फॉरवर्ड हॉकीपटू दीपिका सिमडेगा जिल्ह्यातील सेमरटोली गावात राहते. दीपिका अगदी लहान असतानाच तिच्या वडिलांची हत्या झाली होती आणि तिच्या आईने वेठबिगारी करून आपल्या मुलीला वाढवले आणि दीपिकाचे हॉकीपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. संगीता कुमारी ही भारतीय महिला हॉकी संघात फॉरवर्ड खेळाडू आहे. झारखंडच्या संगीता कुमारीचे आई-वडील आजही शेती करून घर चालवतात.






