‘देश का गर्व चुनाव का पर्व’ असे म्हणत निवडणूक आयोगाने जेव्हापासून लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले तेव्हापासून देशभर सर्वत्र या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. अठराव्या लोकसभेसाठी एकीकडे सत्ताधारी एनडीए व दुसरीकडे इंडिया आघाडी अशा दोन्ही गटांत चुरस निर्माण झालेली आहे. अशातच प्रचाराला सुरूवात झालेली आहे. या सगळ्या प्रचाराच्या राड्यात सर्वच पक्षांमध्ये जणू एक स्पर्धाच सुरू झालेली दिसते. ती म्हणजे महिलांच्या संबंधित अवमानकारक वक्तव्ये करण्याची स्पर्धा. या स्पर्धेतील खेळाडू आहेत भारतीय समाजाचे प्रतिबिंब असलेली राजकारणी मंडळी. त्यातही पुरूष व महिला असा भेद नाही. महिला उमेदवारांसंबंधी हीन दर्जाची वक्तव्ये करण्यात महिला राजकारणी देखील तसूभरही कमी नाहीत. याचा पुढे आढावा घेऊच पण त्याआधी महिलांच्या कल्याणासाठी सर्वपक्षीय जाहीरनामे काय सांगत आहेत ते पाहू…

पक्षांच्या जाहीरनाम्यात ‘नारी शक्ती’, पण प्रत्यक्षात प्रचारात…?
देशातील प्रामुख्याने दोन मोठ्या पक्षांचा विचार करता, त्यातील पहिल्या पक्षाने म्हणजेच भाजपने संकल्प पत्र या नावाने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यानुसार, 3 कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी टुरिझम या क्षेत्राकडे वळवणार अशी घोषणा केलेली आहे. तसेच महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार अशीही घोषणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर, माझी तिसरी टर्म नारी शक्तीसाठी नवीन अध्याय असेल अशी घोषणा केलेली आहे. दुसरीकडे काँग्रेसने संकल्प पत्र या नावाने घोषित केलेल्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना घोषित केलेली आहे. गरीब परिवारातील महिलांना प्रत्येक वर्षी एक लाख रुपये देण्याची घोषणा यात करण्यात आली आहे.आता या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, एकीकडे आदर्शवादी तत्व वगैरे अनुसरून आम्ही महिलां प्रती किती संवेदनशील आहे हे दाखवायचे आणि दुसरीकडे प्रचार करताना मात्र असभ्यतेचे दर्शन घडवायचे. भारतात अन्य निवडणुकांत बहुतांशवेळा अभिनेत्री टार्गेट असतात. ‘हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बांधू’ असे आश्वासन देणारे गुलाबराव पाटील त्यापैकीच एक, पण आता अभिनेत्रीच जर उमेदवार असतील तर आणखी चेव विकृत मानसिकतेच्या लोकांना येणार यात नवल नाही.
‘हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बांधू’
सद्यस्थितीत कोणतीही महिला नेता यापासून वाचू शकलेली नाही. इंदिरा गांधी, मायावती, सोनिया गांधी, राबडी देवी, स्मृती इराणी, जया प्रदा, प्रियंका गांधी-सगळ्यांना अशा स्वरुपाच्या बोलण्याचा, टीकेचा सामना करावा लागला आहे. महिलांना उद्देशून केली जाणारी शेरेबाजी जात आणि वर्गही आहे. म्हणूनच वाळीत टाकण्यात आलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना लांच्छनास्पद आरोप-प्रत्यारोपांना सामोरं जावं लागतं. त्यांची जात, मागासलेपण, कमी शिक्षण, रंगरूप या सगळ्यावरून टीका केली जाते. याची काही उदाहरणं अगदी अलीकडची आहेत.

‘मंडीत सध्याचा दर काय आहे हे कोणी सांगू शकेल का?’
लोकसभेच्या प्रचारातील अशा वक्तव्यांना सुरुवात झाली ती म्हणजे, कंगना राणावतला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केल्यानंतर. कंगनाला जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर अत्यंत अर्वाच्च भाषेत पोस्ट केली. याचा सगळीकडून निषेध झाल्यावर त्यांनी ते अकाऊंट हॅक करून या पोस्ट झाल्याचे सांगितले. त्यात कितपत तथ्य हे अजून समोर आले नाही पण सुरूवात मात्र इथूनच झाली. त्यानंतर भाजपच्या दिलीप घोष या उमेदवाराने ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध अर्वाच्च भाषा वापरली. या दोघांना निवडणूक आयोगाने समज दिली मात्र त्यांची महिलांकडे पाहण्याची मानसिकता यातून उघड झाली. महिलांविषयी घाणेरड्या भाषेत वक्तव्ये एवढ्यावरच थांबली तर आपण भारतीय ते कसले? राजकोट या लोकसभा मतदारसंघातील पुरुषोत्तम रूपाला या भाजप उमेदवाराने राजपूत समाजाच्या महिलांविरोधी अवमानकारक वक्तव्य केले. राजपूत शासकांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले होते.त्यातूनच त्यांनी इंग्रजांशी आपल्या मुलींशी लग्न लावले होते.अशा अर्थाचे विधान करून एखाद्या समाजातील महिलांना कमी लेखण्याचा प्रकार रूपाला यांनी केला. त्याविरोधात राजपूत समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.अशी आणखी काही वक्तव्ये कर्नाटकातून देखील झाली. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मी हेब्बाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात प्रचार करताना संजय पाटील या भाजपच्या पदाधिकाऱ्याने एक वक्तव्य केले. संजय पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागात भाजपला मिळणारा पाठिंबा पाहून अक्काची झोप उडाली आहे. आता आक्काला (लक्ष्मी हेब्बाळकर) झोप यायची असेल तर झोपेची गोळी घ्यायला पाहिजे किंवा एक पेग जास्त घ्यायला पाहिजे.”

सासरी गेल्यानंतर लेकीने माहेरी जास्त लुडबुड करायची नसते…!
एकीकडे नारी शक्ती वंदन कायदा आणून महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे महिला उमेदवाराच्या खाजगी आयुष्यावर अपमानकारक बोलायचे हा विरोधाभास बरा नव्हे. कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ग्रामीण भागातील महिलांना अनुसरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँगेसने जाहीरनाम्यात महिलांना दिलेल्या आश्वासनामुळे महिला वेगळ्या मार्गाला लागतील अशा आशयाचे विधान केले. यातून वर्चस्ववादी पुरूषी मानसिकता दिसून येते.
देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून ही विधाने येत असताना ‘महाराष्ट्र आधार या भारताचा’ कसा मागे राहू शकेल? पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या म्हणजेच रूपाली चाकणकर यांच्या मते, सासरी गेल्यानंतर लेकीने माहेरी जास्त लुडबुड करायची नसते…! आता अशा विचारांची माणसं आपल्याकडे महत्वाच्या संवैधानिक पदावर आहेत याहून विरोधाभास तो कुठला? आपल्याकडे स्त्रीच्या महतीचे वर्णन बऱ्याच साहित्यातून करण्यात आले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: यासारखे श्लोक म्हणत, ऐकत पिढ्यानपिढ्या सरल्या मात्र स्त्रीच्या अवनत स्थितीत फारसा फरक पडला नाही हे राजकीय प्रचारातील वरील उदाहरणांवरून दिसून येते.






