दसरा आला की मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील अनेक गावात रावणाच्या पूजनाचे कार्यक्रम होतात, अशा बातम्या अलीकडे प्रसिद्ध होत असतात. एरवी 'रावणदहन' हेच परंपरेने आपल्याला माहित. परंतु रावणपूजन हे त्याहून अतिप्राचीन परंपरा आहे, हे आपल्याला माहीतच नसते.
खरेच रावण कोण होता? तो राक्षस होता का? मग राक्षस कोण होते ? त्याला खरेच दहा तोंडे होती का? त्याचा यज्ञ-यागाला विरोध होता का? विरोध होता तर का होता? रावण इतिहासात खरोखरच होऊन गेला का? मग त्याची लंका आता कुठे आहे? असे असंख्य प्रश्न जिज्ञासूंच्या मनात उपस्थित होतात आणि या प्रश्नांची असंख्य उत्तरे अभ्यासक देतात.
ज्यांना रावण दुष्ट होता आणि राम नामक मर्यादा पुरुषोत्तम वीराने त्याचा वध केला, असे वाटते त्यांना अशा प्रकारचे प्रश्नही पडत नाही आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचाही प्रश्न निर्माण होत नाही. पण नागपुरात एक नाना ढाकुलकर नावाचे लेखक होते. त्यांना असे प्रश्न सतावत होते. ते मध्यप्रदेशात नोकरीला होते. ते 1955 च्या सुमारास रावणभाटा नावाच्या खेड्यात यात्रा पहावयास गेले. त्यांना महादेवाच्या मूर्तीसमोर मैदानात रावणाची भव्य मूर्ती दिसली. तेथे जमलेले आदिवासी स्त्री पुरुष महादेवाची पूजा करून रावणाभोवती फेर धरून धुंदपणे नाचत होते. स्तुतीगान करीत होते.

आदिवासी संस्कृतीत रावणाचे काय स्थान आहे?
त्याक्षणी त्यांच्या काळजात रावणाचा एक 'नायक' म्हणून जन्म झाला. पुढे त्यांनी शोध घेतला. लक्षात आले की, दक्षिण भारतात रावणाची अनेक मंदिरे आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील कोरकू मेघनाथ व रावण यांची पूजा करतात. रावण किती सुंदर, पराक्रमी होता, तो शिवभक्त असून मोठा संगीतकार होता. अशा त्याच्या गुणांचे वर्णन करणाऱ्या कोरकुंच्या लोकगीतांचे संपादन सरोजिनी बाबर यांनी केले आहे.
गोंडखोंड या आदिम जमाती स्वतःला पौलत्स्य रावणाचे वंशज मानतात. रावण त्यांचा धर्मगुरू होता. ते आजही शिवपूजक आहेत, असे ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ या पुस्तकात व्यंकटेश आत्राम सांगतात. गोंड लोक कोणत्याही महत्त्वाच्या स्थानाचा उल्लेख ‘लक्का’ असा करतात. याचेच रूपांतर ‘लंका’ असे रामायणात झाले असावे, असे इतिहासकार मानतात. नाना ढाकुलकर यांनी पुढे ‘रक्षेंद्र’ कादंबरीची निर्मिती केली. ती अर्थातच दुर्लक्षित राहिली.
पण खरेच रावण कोण होता? हे प्रश्न कायम राहिलेच.
1949 मध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डाॅ. वि. भि. कोलते यांनी एक खळबळजनक निबंध लिहिला होता, ‘महात्मा रावण’! डाॅ. कोलते यांच्या मते राम-रावण संघर्ष म्हणजे आर्य आणि दंडकारण्यातील आदिवासी यांच्यातील संघर्ष होय. ते लिहितात, दंडकारण्यावर त्यावेळी वस्तुतः रावणीचेच राज्य होते. हा भाग अनार्यांच्या मालकीचा होता आणि रामाच्या रूपाने आर्यांचे त्यावर पद्धतशीर आक्रमण सुरू होते.
किंबहुना, रामायण म्हणजे दक्षिण हिंदुस्थानातील अनार्यांवर आक्रमण करून, त्यांच्यावर विजय मिळवून, आर्यांचा यशाचा झेंडा लंकेत फडकवणाऱ्या आर्यांच्या पराक्रमाचा इतिहास होय! विवाहपूर्वी, राम-लक्ष्मणांनी विश्वामित्राबरोबर! राहून अनार्य राक्षसांचा नाश केला आणि विवाहानंतर वनवासाच्या निमित्ताने दंडकारण्यात शिरून राक्षसांचा फडशा पाडीत पाडीत लंकेपर्यंत आर्याचा ध्वज फडकवत नेला. ऐतिहासिक दृष्टीने रामाच्या आयुष्यातील याच महत्त्वाच्या घटना आहेत. इतिहास संशोधकांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे.’

‘रक्षेंद्र’ कादंबरीत रावणावर सखोल संशोधन
नाना ढाकुलकरांच्या ‘रक्षेंद्र’ या कादंबरीची सुरवातच रावण-लक्ष्मण संवादाने होते. युद्धानंतर रावण मरणासन्न स्थित पडलेला असतो. राम लक्ष्मणाला आदेश देतो की, सकल विश्वातील समग्र ज्ञान एकत्रित करून जी गुटिका तयार होईल, तशी गुटिका रावणाने सेवन केली होती. रावण वेदवेदांगांचा आणि शास्त्रांचा परकांड ज्ञाता होता. तू लगेच रावणाकडे जाऊन ते ज्ञान आत्मसात करून घे कारण रावणाच्या मृत्यूबरोबर त्या ज्ञानाचाही आता अस्त होणार आहे. लक्ष्मण रावणाजवळ जाऊन विनंती करतो.
रावण लक्ष्मणाला त्याच्या आयुष्यातील घटनांची उदाहरणे देत राजनीती, अर्थनीती, धर्मनीती आणि मनुष्यनीती सांगतो. पण रावण हेही सांगतो की, जीवनाचे परम ज्ञान प्राप्त केल्या नंतरही माणसाला जाणवत राहते की, त्याच्या पुढयात अद्यापही केवळ निस्सीम अज्ञानच पडले आहे. आपल्याला जे माहीत असते, त्यापेक्षाही जे माहीत नसते, ते अति-विशाल, अफाट असते.’’
नाना ढाकुलकरांना मूळ वाल्मीकी रामायणातील रावण ‘दुष्ट राक्षस’ वाटत नाही. तुलसीदासाने रावणाला आक्राळ-विक्राळ व दैत्य स्वरूपात रेखाटले आहे. बहुसंख्य लोकांना हाच रावण माहीत आहे. वाल्मिकीने कुठेही रावणास नरमांसभक्षक म्हटले नाही. ते कथा-किर्तन करणाऱ्यांनी रंगवले आहे. ढाकुलकर म्हणतात, ‘भारतातील रामकथा, पुराणकथा, लोकसाहित्य, इतिहास, उत्खनन व मानववंश शास्त्रातील संशोधनांचा मेळ घालून मी रक्षेंद्रमधील रावण उभा केला आहे. ज्यांना वाल्मीकी रामायण सत्य वाटत असेल, त्यांना ही कादंबरी विविध धर्मग्रंथातील पुराणकथांवर आधारित नवी मिथ्यकथा मानावी.’
महात्मा रावणाला नायकत्व देऊन ‘रक्षेंद्र’ कादंबरीत त्याच्या भोवतालचे अनार्य जीवन अत्यंत कल्पकतेने पण, वस्तुनिष्ठपणे चित्रित करणाऱ्या ढाकुलकरांनी राम-रावण संघर्षाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर झालेल्या संशोधनाचा पिच्छा पुरवला आहे. त्यांच्यावर प्रभाव असलेले एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे, थोर तेलगू लेखक दिवंगत नार्ला वेकटेश्वर राव यांचे प्रसिद्ध ‘सीता जोस्यम’ (सीतेचे भाकीत) हे नाटक. या बावन्न पानी नाटकाला नार्ला यांनी 129 पानांची दीर्घ प्रस्तावना आहे. 1981 साली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला होता; पण, तो त्यांनी स्वीकारला नाही कारण, अकादमीच्याच ‘इंडियन लिटरेचर’ या मासिकात त्यांच्यावर टीका झाली होती.

राम-रावण संघर्ष म्हणजे आर्य आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष?
‘राक्षस कोण होते?’ या प्रश्नाचा शोध घेताना नार्ला व्यंकटेश राव असा सिद्धांत मांडतात की, भारतीय संस्कृती ही आर्यांची देणगी आहे, हा अपसमज आहे. हा देश ऋग्वेदकाळापूर्वी किती समृद्ध होता, याचा पुरावा म्हणजे हरप्पा संस्कृतीचे सापडलेले अवशेष. ही संस्कृती केवळ सिंधू खोऱ्यायातच नांदत होती, असे नव्हे तर ती एका बाजूला जम्मूपर्यंत, दुसऱ्या बाजूस गुजरातपर्यंत व तिसऱ्या बाजूस हरियाणा- राजस्थानपर्यंत आणि अहमदनगरच्या गोदावरीपर्यंत पसरलेली होती. हरप्पा संस्कृती निर्माण करणारेही आर्यच होते, हे खरे नाही. कारण तेथे सापडलेल्या नाण्यांपैकी एकावरही इंद्र किंवा अग्निवरूणाचे ठसे नाहीत.
मात्र, द्रविड लोकांचा देवस्थानी असलेला शिव हा पशुपतिनाथ या रूपाने दिसतो. याचा अर्थ, हरप्पा संस्कृती ही आर्येतरच होती. हरप्पा किंवा जगातील कोणतीही प्राचीन संस्कृती कितीही समृद्ध होती, असे म्हटले तरी ती भौतिकदृष्ट्या आजच्या इतकी प्रगत व समृद्ध कधीच नव्हती. चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकेत अयोध्येचे किंवा लंकेचे जे राजवाडे रत्नजडित असल्याचे दाखवले जातात, ती केवळ कीर्तनकारी आहे. मूळ रामायणातच रामाच्या वनवासाची वार्ता एकून कौसल्या जेव्हा आपल्या वाड्यातील जमिनीवर दुःखाने लोळते तेव्हा राम प्रथम तिच्या अंगावरील धूळ झटकतो.

…म्हणूनच दहा तोंडाचा भयानक रावण उभा केला!
आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात निग्रो, निषाद, किरात आणि द्रविड या जाती होत्या. या सगळ्यांना आर्यांनी दासदस्यू म्हटले आहे. त्याचा अर्थ गुलाम आणि शुद्र, असा होतो. पुढे निग्रो हे आर्यांच्या आक्रमणापूर्वीच ते न्यूगिनी, फिलीपाईन्स, मलाया व अंदमानात गेले. आर्यांना भारतात पाय रोवण्यासाठी किरात व द्रविड यांच्यापेक्षा निषांदाबरोबर लढावे लागले. (निषाद म्हणजे आजचे छोटा नागपूर, बस्तर, ओरीसा, आंध्रात राहणारे मुंडा, गोंड, संताळ, कोरवा वगैरे) ज्यांचा वंशच्छेद करून त्यांचा प्रांत गिळंकृत करायचा आहे, त्यांच्या वंशाबद्दल समाजमनात तिरस्कार उत्पन्न करण्यासाठी आर्यांनी नीच मानव म्हणून अनार्यांची भरपूर निंदा केली, ज्याचे प्रतिबिंब आज पुराणातील कथा-कहाण्यात दिसते.
या निंदेतूनच नरभक्षण करणारे काल्पनिक राक्षस जन्माला आले. त्यातून दहा तोंडाचा भयानक रावण उभा केला गेला. आर्यांच्या आक्रमणामुळे पराभूत आदिम जमातींना पर्वतराजीत, अरण्यात आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे त्यांना आपल्या प्रगत विद्यांचाही विसर पडत गेला.
राम हा ऋषींच्या संरक्षणाच्या निमित्ताने दंडकारण्यातील मूळ रहिवाशांचा संहार करतो, तो राक्षस नसतोच. ‘सीता जोस्यम’ या नाटकात सीता नाटकाच्या अखेरीस रामाला म्हणते, ‘या वनचरांशी आपले कोणतेही वैर नाही. ते आपल्या अध्यात व मध्यात नाहीत. त्यांनी आपल्याला किंचितही अपकार केलेला नाही. मग प्राण्यासारखी त्यांची ही हत्या तुम्ही का करता? ऋषी त्यांचे वर्णन राक्षस म्हणून करतात ते प्रथम मलाही खरेच वाटले; पण, पुढे जेव्हा इकडे अरण्यात प्रत्यक्ष पाहिले तेव्हा लक्षात आले की, या बिचाऱ्या वनवासीयांना पाप-पुण्य कशाची काही कल्पना नाही.
न्याय-अन्याय त्यांना काही कळत नाही. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे, एवढीच त्यांची साधी धारणा आहे. तुम्ही कृपा करून माझी विनंती ऐका. ऋषींच्या स्वार्थाकरता त्यांचा नाहक वध करू नका. मी एका सम्राटाची कन्या आहे. दुसऱ्या सम्राटाची सून आहे. भिक्षा मागणे हे माझ्या स्वभावात नाही. तरीही आता तुमच्या जवळ मी भिक्षा मागत आहे. या वनचरांना जीवदान द्या. त्यांच्या पत्न्यांना सौभाग्यदान द्या. मला मनःशांतीचे दान द्या.’
रावण कोण होता? या प्रश्नाची ही काही उत्तरे आहेत.
(साभार - प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक वॉलवरून)






