मार्च-एप्रिल दरम्यान शालेय परीक्षा संपल्या… 1 मे ला गुणपत्रिका मुलांच्या हातात आली. महत्वाचं म्हणजे यावेळेस गुणपत्रिकेवर फक्त मुलांचे ‘एकूण गुण’चं नव्हते तर त्या गुणपत्रिकेवर चाइल्ड हेल्पलाइन नंबरदेखील होता.
निकाल लागले, सुट्ट्या पडल्या… आता पावसाळा सुरू झाला की नवा वर्ग, नवा अभ्यास आणि जुन्याच मित्र मैत्रिणींसोबत दंगामस्ती… सुट्ट्या पडल्यानंतर शाळेतला जवळपास प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी याच विचारात सुट्ट्यांची मजा घेत होते.

याच दरम्यान छ. संभाजीनगर येथील शाळेतल्या मुलींच्या कानावर एक बातमी पडली. मैत्रिणींशी गप्पा मारताना ती धक्कादायक बातमी यापैकी काहींना कळली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याच काही वर्गमैत्रिणींचा बालविवाह अक्षय तृतियेच्यादिवशी होणार असल्याचे त्यांना समजले. बालविवाहाचे दुष्परिणाम काय असतात याची त्यांना फारशी कल्पना नसली तरी त्यांना हे माहिती होतं की जर आमच्या मैत्रिणीचं लग्न झालं तर शाळा सुरु झाल्यावर आमच्या मैत्रीणी आमच्यापासून दुरावतील आणि बालविवाह करणं हे चुकीचं असतं हे देखील त्या मुला-मुलींना माहिती होतं.
आपण काय करू शकतो याचा विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गुणपत्रिकेवर चाइल्ड हेल्पलाइन नंबर आहे. या नंबरचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरवले आणि मुलांनी त्या नंबरवर कॉल केला. झालं, सरकारी यंत्रणा लगेचच कामाला लागली आणि अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगरमधील अक्षयतृतीयेला होणारे 12 बालविवाह रोखण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री, कन्नड या ठिकाणी वर्गमैत्रिणींनी दिलेल्या माहितीमुळे चाइल्ड हेल्पलाइन व महिला बालविकास यांच्या सहकार्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे जिल्ह्यातील 14 ते 17 वयोगटातील 12 जणींचे बालविवाह थांबवण्यात यश आल्याचे युनिसेफचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण साळुंके यांनी सांगितले. पालकांना समज देऊन कबुलीनामा लिहून घेण्यात आला आहे.

बालविवाह रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती
राज्यातील बालविवाह रोखण्याकरता शिक्षण विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, सकाळच्या प्रार्थनेत बालविवाह विरुद्धची शपथ घेणे; शाळांमध्ये वक्तृत्त्व, निबंध, पोस्टर बनवणे स्पर्धा राबवणे आदी पावले उचलली गेली आहेत.
भारतात जवळपास 23 कोटींहून जास्त बालवधू
संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या युनिसेफने 2021 मध्ये आपल्या ‘ग्लोबल प्रोग्राम टू एंड चाइल्ड मॅरेज’ या रिपोर्ट मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक बालविवाह केले जातात. आज घडीला भारतात जवळपास 23 कोटींहून जास्त बालवधू आहेत. दुसरीकडे भारतात दरवर्षी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 15 लाख मुलींची लग्न होतात.

बालविवाहाची कारणे काय?
अनेक जिल्ह्यांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर होते. पती आणि पत्नी घराबाहेर पडल्यास मुलांची आबाळ होते. कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्यास उदरनिर्वाहासाठी ओढाताण होते. आदिवासी भागात वेगळे प्रश्न आहेत. तेथे रोजगाराच्या साधनांअभावी दारिद्र्यातून अल्पवयीन मुलींचे विवाह उरकून टाकण्यावर भर दिला जातो. काही भागात रूढी, परंपरा यांचा पगडा आहे. अनेक खेड्यांमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर पुढे शाळा नाही. पुढे शिकण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. तेथे पाठवायला पालक तयार नसतात. मग शाळा संपते आणि अल्पवयीन वयातच मुलीचे लग्न करून दिले जाते.






