घटना चार वर्षांपूर्वीची आहे… प. बंगाल येथील बांकुरा, जंगल महाल येथे राहणारी रचना हंसदा ही आदिवासी विद्यार्थिनी मधुमेहामुळे गंभीर आजारी होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रचना हंसदाला उपचाराचे आश्वासन दिले होते. रचना गंभीर मधुमेहाने त्रस्त आहे. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे उपचारासाठी मदत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.
‘माझ्या राज्यात केंद्रीय मंत्री अमित शहा कशी काय मदत घोषित करू शकतात’ या रागाने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लगेचच शासकीय यंत्रणेला कामाला लावले आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना राज्य सरकारने हंसदाचा पूर्ण वैद्यकीय खर्च करावा असे आदेश दिले.

हंसदाच्या कुटुंबाने त्यामुळे सुटकेचा श्वास सोडला होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही आपल्या लेकीच्या उपचाराचा खर्च करण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांना आता इकडे-तिकडे हेलपाटे मारावे लागणार नव्हते. रचनाचे वडील बिभीषण हंसदा आणि आई मोनिका हे दोघेही बांकुरा जिल्ह्यातील छोतुर्डी गावात वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होते.
आज या घटनेला चार वर्ष उलटून गेली, परंतू धक्कादायक बाब ही आहे की हंसदाच्या कुटुंबाच्या साऱ्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. आजही हंसदा ही आदिवासी विद्यार्थिनी तेव्हा ज्या अवस्थेत होती त्याच आजारी अवस्थेत अद्याप कायम आहे. चार वर्षांनंतरही रचना वाट बघतेय की दिल्लीतील एम्समध्ये कधी तिच्यावर उपचार होतील.
अतिशय हताश झालेल्या रचनाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी आता सरकारी मदतीची आशा सोडली असून त्यांच्या मुलीच्या उपचाराची व्यवस्था इथेच बांकुरा येथेच करावी लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या दोन्ही किडन्या गंभीरपणे निकामी झाल्यामुळे ते देखील आजारी असतात. आजारपणामुळे बिभीषण हंसदा काम करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना मिळणारी थोडीफार कमाईही आता बंद झालीये. कमालीची निराशा आणि नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या या कुटुंबाची सध्या कोणीही काळजी घेत नाही.
अमित शहा हंसदाच्या झोपडीत जेवले आणि फोटो शेअर केले…
कोलकात्यापासून सुमारे 180 किमी अंतरावर आणि बांकुरा जिल्हा मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर छोतुर्डी हे एक गाव आहे आणि या गावात हंसदा कुटुंब गोवंडीचे काम करतात. रचनाचे वडील बिभीषण हंसदा हे तसे गावातले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व… घरी त्यांची वृद्ध आई फुलमोनी, पत्नी मोनिका, मुलगी रचना आणि मुलगा असा परिवार. वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.

5 नोव्हेंबर 2020 रोजी एका राजकीय कार्यक्रमादरम्यान हंसदा यांचे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे इतर नेते – कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय, दिलीप घोष आणि राहुल सिन्हा यांनी केले होते. या सर्व नेत्यांना हंसदा यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि ती सगळी व्यवस्था स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केली होती.
आदिवासी रीतिरिवाजानुसार, 5 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी, गावकऱ्यांनी पारंपारिक विधींनी शाह आणि त्यांच्या पथकाचे स्वागत केले. ज्यात शंख फुंकणे आणि संथाली नाचणे यांचा समावेश होता. हंसदा यांचे घर संथाल चित्रांनी सजवण्यात आले होते आणि भिंतींवर संथाली, हिंदी आणि बंगाली भाषेत स्वागत संदेश लिहिला होता. तसेच, त्या कार्यक्रमापूर्वी प्रशासनाने त्यांचे निवासस्थान स्वच्छ केले होते. अमित शहा आणि इतर नेत्यांच्या दुपारच्या जेवणाला मुख्य प्रवाहातील मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्यापक कव्हरेज मिळाले. भाजपच्या नेत्यांनी सुवासिक भात, डाळ, रोटी, तळलेले करवंद, खसखस पेस्टमध्ये शिजवलेले बटाटे आणि मिठाई यासह बंगाली शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.
आदरातिथ्याने प्रभावित होऊन शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृतज्ञता व्यक्त केली ‘त्यांचे प्रेम आणि आदरातिथ्य शब्दात व्यक्त करता येत नाही.” जाण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हंसदा यांच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना ‘आम्ही पुन्हा भेटू’ असे आश्वासन दिले.
त्याचवेळी हंसदा यांनी आपल्या मुलीच्या आजाराबद्दल अमित शहा यांना माहिती दिली आणि आर्थिक मदतीची विनंती केली. शहा यांनीही तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. काही दिवसांनी शाह यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की, हंसदा यांची मुलगी रचना हिच्यावर एम्स, दिल्ली येथे उपचार केले जातील.
या घोषणेनंतर, 25 नोव्हेंबर 2020 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांकुरा येथील रवींद्र भवन येथे प्रशासकीय बैठक बोलावली आणि रचनाच्या उपचाराची जबाबदारी जिल्हा प्रशासनाला घेण्याचे निर्देश दिले.

हंसदा म्हणाले, “जेव्हा मी माझ्या आजारी मुलीसोबत दिल्लीला गेलो होतो, तेव्हा मला अमित शहांना भेटण्याची संधी तर मिळाली नाहीच परंतू दुर्दैवाने माझ्या मुलीला एम्समध्ये उपचारही मिळाले नाहीत. तिथे तिच्यावर उपचार झाले असते तर बरे झाले असते.”
दुसरीकडे बांकुरा जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामल सरेन यांनी सांगितले की, ते रचनाला नियमितपणे इन्सुलिन देतात. परंतु हंसदा यांनी त्यांचा दावा फेटाळून लावतात आणि सांगतात की, सुरुवातीला राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इन्सुलिन पुरवले. परंतु नंतर औषधाचा तुटवडा सांगून नियमितपणे औषधाचा पुरवठा करण्यात ते अपयशी ठरले.
बांकुरा शारदामोनी महाविद्यालयातील पदवीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी रचना सध्या बांकुरा येथे उपचार घेत आहे. पण तिच्या रक्तातील साखरेची पातळी सतत चढ-उतार होत असते. त्यामुळे रचनाच्या वडिलांनी आपल्या मुलीवर चांगले उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली.
बिभीषण हंसदा आता त्यांचे दिवस कसे घालवत आहेत?
हंसदा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “ गेल्या सहा महिन्यांपासून मी किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. माझ्या दोन्ही मूत्रपिंडांना गंभीर नुकसान झाले आहे. मी विविध वैद्यकीय चाचण्या आणि माझा स्वत:चा औषधांवर खूप पैसा खर्च होतोय. दर महिन्याला फक्त औषधांवर 10,000 रुपये खर्च होतात.

या आजारपणामुळे हंसदा काम करू शकत नाहीत आणि त्यांची पत्नी मजूर म्हणून काम करत आहे. हंसदा जड अंतःकरणाने म्हणतात, “आम्ही अत्यंत गरिबीत जगत आहोत. आम्ही आमच्या पाळीव शेळ्या विकून आणि नातेवाईकांच्या मदतीवर जगत आहोत.
हंसदा यांच्या कुटुंबाची दुर्दशा सांगताना ग्रामपंचायतीच्या सदस्या अनिमा मल म्हणाल्या की, अमित शाह यांनी हंसदा यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली होती, त्या पाठोपाठ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र यापैकी कोणीही आपली जबाबदारी पार पाडली नाही. बऱ्याच दिवसांपासून पंचायतीत कोणतेही काम होत नसल्याने हंसदा व त्यांचे कुटुंब गरिबीत जीवन जगत आहे.






