‘’दिल्लीच्या ‘पॉकेट 12 जसोला’ सोसायटीत एक अफवा पसरते की जर शबनम खान सोसायटीच्या रहिवासी कल्याण संघाची (रेसिडेंशियल वेलफेयर असोसिएशन किंवा आरडब्लूए) अध्यक्ष झाली तर गेट 2 जवळचं मंदिर ती उध्वस्त करेल आणि मशिद बांधेल.’’
खान त्यांच्या घरी ‘दी प्रिंट’ सोबत बोलताना सांगतात, “तुमचा विश्वास बसू शकतो की लोकांच्या मनात किती द्वेष भरला आहे? ते आरडब्लूएच्या निवडणूकाही राज्याच्या किंवा देशाच्या निवडणूकीप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरण करून लढत आहेत.” मागील वर्षी झालेल्या निवडणूकीत बहुसंख्यांक हिंदूंच्या या विषारी प्रचारामुळे त्यांचा पराभव झाला. “प्रचारात आमचा विरोधी पक्ष या निवडणूकीला भारत पाकिस्तानचा सामना म्हणत होता. म्हणजे माझ्या पक्षाला मतदान करणं याचा अर्थ पाकिस्तानला समर्थन देण्यासारखं होणार होतं.” पण त्यांचे प्रतिस्पर्धी वकील रवींद्र शर्मा हे आरोप फेटाळतात.
भारतात हिंदुत्ववादी राजकारणाच्या उदयासोबतच, मुस्लिमांना हिंदू बहुसंख्य भागात घर घेण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत एक शांत आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष पूर्वी घेट्टो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम वस्त्यांपूरताच मर्यादित होता. रेसिडेंट वेलफेअर एसोसिएशन मध्ये हिंदूंचं बहुमत असतं. सोसायट्यांमध्ये शांतता कायम राहावी म्हणून त्यांची निर्मिती झाली आहे आणि कोणी कुठं राहावं याचा ते निर्णय करतात. त्यांच्या मॉरल पोलिसिंगमुळे त्यांना शहरी खाप पंचायतही म्हटलं जाऊ शकतं. यांच्या व्हॉट्सएप ग्रुप्सवर मुस्लिम द्वेष चोविस तास वाहत असतो आणि त्यांच्या सोसायटीत मुस्लिमांना प्रवेश मिळणं कठीण असतं. पण याची भीति किंवा लाज वाटण्याऐवजी ते आता उघडपणे आपला मुस्लिमद्वेष मिरवत आहेत.

शिमल्याचे माजी उप-महापौर आणि शहरी विकास मुद्दयांचे तज्ञ टिकेंदर पवार सांगतात, “आरडब्लूएची रचना लोकशाही संस्था म्हणून करण्यात आली होती. पण त्याच आता दहशतवादी शेजार समित्यांमध्ये बदलल्या आहेत. आपल्या सोसायटीवर त्यांची कडक पकड असते. तिथं मुस्लिम किंवा दलितांना जागा मिळत नाही. शहरातील सारे आर्थिक व्यवहार हिंदूंच्या ताब्यात राहावेत यासाठीही ते प्रयत्न करत आहेत.”
मागील वर्षी उत्तर-पूर्व दिल्लीच्या ब्रह्मपूरी भागात एका बॅनरद्वारे घोषणा करण्यात आली होती की, हिंदुंना मुस्लिम व्यक्तींना घर विकण्याची परवानगी नाही आणि कोणी असं केलं तर त्यांना आरडब्लूए कॉलोनी रजिस्ट्रेशनसाठी मदत करणार नाही. जयपूरच्या नंदपुरी भागातही असेच पोस्टर लागले ज्यात मुस्लिमांना घरं विकण्याची किंवा भाड्याने देण्याची मनाई करण्यात आली होती. कानपूरची महापौर प्रमिला पांडेनं मुस्लिम आणि हिंदूंना एकमेकांना घर विकण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणण्याची मागणी केली आहे. गाजियाबादच्या ट्रान्स-हिंडन परिसरातील फेडरेशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स एसोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुमार सांगतात की, “इथं मुस्लिम अपार्टमेंट मालकांची संख्या फारच कमी आहे. फारतर एक टक्का असतील. बहुतांश आरडब्लूए मुस्लिमांना फ्लॅट विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी तयार नाहीत. मी याच्या विरोधात आहे हे अनेकांना आवडत नाही. ते खासगीत मला सांगतात की आपण मुस्लिमांसोबत भेदभाव करत नाही त्यामुळे त्यांची संख्या वाढत चालली आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”
व्हॉट्सएप ग्रुपवर ईद सोडून सर्व सणांच्या शुभेच्छा
शबनम खान त्यांच्या एका शेजाऱ्याची रेकॉर्डेड कॉल चालवतात ज्यांनी व्हॉट्सएप ग्रुपवर त्यांना शिव्या घातल्या होत्या. “मला माफ करा. मला तुम्हाला हे म्हणायचं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवा. मी इस्लामोफोबिक नाहीये.” आरडब्लूएमध्ये किती भयंकर गोष्टी घडतात त्याचं हे एक उदाहरण आहे. त्या सांगतात की ‘मुल्ली’ शब्दांचा उपयोग आता सर्रासपणे केला जातोय. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरच त्यांच्या शेजाऱ्यानं माफी मागितली. आरडब्लूएचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा मात्र अशा गोष्टी घडल्याचं नाकारतात. ते म्हणतात की, “मी निवडणूकीच्या आठवड्याभरापूर्वी प्रचारात उतरलो होतो. मला अशा कोणत्याही मेसेजची किंवा अफवेची माहिती नाही.” खान म्हणतात की मुस्लिमविरोधी चॅटींगमुळे त्यांना असे व्हॉट्सएप ग्रुप वारंवार सोडावे लागले आहेत. ज्यांचा उपयोग आता फारसा होत नाही. पण एखाद्याच्या द्वेषाला उत्त्तर देणं म्हणजे आणखी हल्ल्यांना आमंत्रण देण्यासारखंच असतं. त्यापेक्षा ग्रुप सोडलेला चांगला असं त्या म्हणतात.
पॉकेट 12 जसोला, ओखला विहारजवळ आहे आणि तिथं मिश्रवस्ती आहे. साठ टक्के हिंदू आणि बाकी इतर समाजाचे. 2020 च्या दंग्यानंतर हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही इथून स्थलांतर केलं. सीलमपूर आरडब्लूएचे अध्यक्ष देवराज शर्मा म्हणतात की, “आमच्या गल्लीत अनेक मुसलमान फ्लॅट विकत घेत आहेत. ते कोणत्याही सार्वजनिक कार्यात सहभागी होत नाही. पण 22 जानेवारीनंतर त्यांचा व्यवहार नम्र झाला आहे. आम्ही राम मंदिराचे झेंडे लावले होते त्यामुळे मुसलमान शांत राहिले. त्यांच्या वागणूकीतही बदल जाणवत आहे.” हिजाब आणि नमाजविषयीचा विखारी प्रचार आरडब्लूए पर्यंतही पोहोचत आहे. मुस्लिम रहिवासी स्वतःच ग्रुपमधून बाहेर पडतात किंवा फार कमी एक्टीविटी दाखवतात. नोएडातील एक मुस्लिम फ्लॅटधारक सांगतात की त्यांच्या सोसायटीत सर्व सण साजरे केले जातात, ईद सोडून. “व्हॉट्सएप ग्रुपवर सर्व सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात पण ईदच्या नाही. ही एक लहानशी गोष्ट असले पण मला ती खटकते. कोणी आजवर मला इफ्तार पार्टीसाठी बोलावलं नाही. असं काही आहे हे कोणाला लक्षातच ठेवायचं नाही.” या छोट्या छोट्या गोष्टी वाढू शकतात. जाहिरातीच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या एका हिंदू रहिवाशानं सांगितलं की टोपी किंवा बुरखा घालणाऱ्या लोकांना घरी बोलावणं आता सहज राहिलेलं नाही. ते म्हणतात, “कोणी असं करू नको असं म्हटलं नाही. पण तुम्हाला वातावरण कसं आहे हे जाणवतं. लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करताच शेवटी.”

मुसलमान सध्या ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा अवस्थेत
मुसलमान सध्या ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा अवस्थेत आहेत. हिंदूंना आपली घरं त्यांना विकायची नाहीत, भाड्यानंही द्यायची नाहीत. काही ठिकाणी उघडपणे हे केलं जातंय. मुस्लिमांनी मुस्लिम बहुल भागातच राहावं म्हणून सांगितलं जातं. जानेवारीत मुंबईतील मीरा रोड येथील दंग्यानंतर प्रभावशाली जोडी अभी आणि नियू यांनी एक्सवर एक निरर्थक पोस्ट टाकून सोशल मीडियावर हंगामा केला होता. त्यांनी लिहिलं की, भारतात एखाद्या विशिष्ट धर्मासाठी एखादी विशिष्ट जागा ठरवली जाऊ शकत नाही. यावर अनेकांनी लिहिलं की घरांबाबत भेदभाव केला जातो त्यामुळे मुसलमानांना काही भागात एकत्र राहण्यासाठी लाचार केलं जातंय.
जेएनयूच्या प्राध्यापिका गजाला जमील सांगतात की, “घर देण्यातील भेदभावामुळे श्रीमंत मुसलमानांवर जास्त प्रभाव पडत आहे. मुस्लिम इलाके एरव्ही घाणेरडे, गुन्हेगारीची केंद्रं म्हणून ओळखली जातात. त्यामुळे संपन्न मुस्लिम लोक इथं राहायला तयार नसतात. याला घेट्टो म्हणून ओळखलं जातं जे त्यांना अपमानास्पद वाटतं. त्यापासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आणि साधनं आहेत. त्यांच्या अडचणी त्या सोशल मीडियावरही सांगू शकतात. त्यामुळे त्यांचा दृष्टीकोन चांगल्या पद्धतीने समजला जाऊ शकतो. पण हिंदू बहुसंख्य भागात राहणाऱ्या मुस्लिमांना स्वतःवर सेल्फसेंसरशिप लादावी लागते. आपली सांस्कृतिक ओळख ते पूर्णपणे व उघडपणे दाखवू शकत नाही. लहान लहान गोष्टीही तुम्हाला त्रस्त करू शकतात आणि मोठ्या हिंसाचाराच्या गोष्टी घडल्या की त्याचा प्रभाव अधिकच वाढतो. तुमचे शेजारी तुमचे मित्र आहेत की शत्रू आहेत यावर याची तीव्रता कमीजास्त होते.”
पण असेही लोक आहेत जे या सेंसरशिपला मानत नाही आणि त्याची किंमतही चुकवतात. त्यांतून सामाजिक तिरस्कारालाही ते पात्र होतात. इशरत रिजवी यापैकी एक आहेत. इशरत या इंदिरापूरमच्या क्षीप्रा सन सिटी येथील ख्यातनाम ट्यूशन टिचर म्हणून ओळखल्या जायच्या. 20 वर्षांपासून त्या तिथं राहत होत्या. पण मागील काही वर्षांपासून त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली आहे. त्या हिजाब घालणाऱ्या सडेतोड वृत्तीच्या मुस्लिम महिला आहेत ज्या सोशल मीडियात मुस्लिम विरोधी द्वेषाला उत्तर देत असतात. त्यांचे शेजारी आता त्यांच्यासोबत संबंध ठेवू इच्छित नाहीत. देशातील वातावरण जसं बदलत गेलं तसे रिजवींचे शेजारीही बदलत गेले. रिजवी म्हणतात, “मी एक संपन्न सामाजिक आयुष्य जगत होते. लोक नेहमी माझ्याकडे चहा-नाश्त्यासाठी यायचे. मलाही बोलावलं जायचं. आता ते मला कुठेही भेटले तरीही दुर्लक्ष करतात. किराना घेताना आम्ही भेटलो तर औपचारीकता म्हणून हाय-हलो करून निघून जातात.” एक काळ होता जेव्हा ते आणि त्यांचे पती सण, उत्सव, स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घ्यायचे. पण मुस्लिमांविषयी व्हॉट्सएप ग्रुपवर विखार पसरू लागला तसं त्यांचं हे सामाजिक होणं कमी होऊ लागलं. रिजवी म्हणतात, “मी गप्प बसणाऱ्यातली बाई नाही. जेव्हा लोक मुसलमानांविषयी द्वेष किंवा खोट्या बातम्या पसरवतात, जसं त्यांनी कोरोनामध्ये तबलिघींच्या विरोधात केलं होतं, मी चुप नाही राहू शकत. अनेक मुसलमान त्यांचा सूड उगवला जाईल म्हणून गप्प बसतात.” एक ‘खामोश मुसलमान’ नसल्यामुळे लोक रिजवींपासून दूर गेले आहेत. त्या फेसबुकवर सक्रीय आहेत आणि अजूनही आपल्या हक्कांसाठी लिहीत आहेत. व्हॉट्सएपचे काही ग्रुप त्यांनी स्वतः सोडले काही ठिकाणी बोलाचाली झाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं.
पण ही केवळ व्हॉट्सएपची लढाई नाही…
पण ही केवळ व्हॉट्सएपची लढाई नाही. रिजवी म्हणतात की त्यांच्या आरडब्लूएने त्यांच्या अपार्टमेंट जवळची दर्ग्याची जमीन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या म्हणतात, “असं म्हणतात की क्षीप्रा सन सिटी एका कब्रस्तानच्या जागेवर आहे. जेव्हा बिल्डरने इथला दर्गा तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं दर्ग्याच्या आजूबाजूला तीन प्लॉट सोडले आणि तिथं मशिदीसाठी जागा बांधली. दरग्यात हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक जातात.” इथल्या संजय सिंह या नगरसेवकाने दर्ग्यापाशी कृष्ण वाटिका विकसीत करण्याचं ठरवलं आहे. त्याचा बोर्डही तिथं लागला आहे. रिजवी म्हणतात की “जे दर्ग्याची देखभाल करायचे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला.” आरडब्लूए कोषाध्यक्ष ललित पांडे म्हणतात की त्यांनी नाही तर गाजियाबाद विकास प्राधिकरणाने याचा निर्णय घेतला आहे. संजय सिंह म्हणतो की, “स्थानिकांनी दर्ग्याविषयी तक्रार केल्यानंतर जीडीएने असा निर्णय घेतला आहे. लोकांना काळजी होती. प्लॉटवर कचरा होता. दर्गा बघणाऱ्यांनी जागेवर कब्जा केला होता. लोकांना भिती होती की मुसलमान इथं नमाज करणं सुरू करतील. म्हणून जीडीएने हस्तक्षेप केला. इथं मंदिर नसेल. बागेच्या अवतीभवती फुलझाडांची रांग असेल फक्त.”

पण विभिन्न समुदायांसाठी एकत्र राहणं किती गरजेचं असतं, या प्रश्नाचं उत्तर जमील यांच्या कामात मिळतं. त्यातून एक नवा दृष्टिकोनही दिसून येतो. त्या म्हणतात की “केवळ एकत्र येणं हाच आपला उद्देश असायला नको. स्वतःची ओळख असलेले शेजारी नेहमीच वाईट नसतात आणि त्यांच्यामुळे उलट सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव येत असतो. समुहांना आपल्या जगण्यात सहजता यावी यासाठी सांस्कृतिक उत्सवांची गरज लागते. उदा. जीवनावश्यक खाण्या-पिण्यापर्यंत पोहोच, प्रार्थनास्थळांपर्यंत पोहोच. लोकांना वाटतं की यामुळे त्यांना एक चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. समस्या त्यांची नाही तर असमानता, लेबलिंग, शुद्धता आणि प्रदूषणाच्या विचारांची आहे. अल्पसंख्यक लोक किंवा दलितांना असंही वाटू शकतं की तथाकथित उच्च जातींच्या लोकांसोबत किंवा बहुसंख्यक लोकांसोबत राहिल्यामुळे त्यांची रोजच्या जगण्यातील भेदभावापासून सुटका होईल.”
मुसलमानांना त्यांच्या प्रवासातही अडचणींचा सामना करावा लागतो. एका मार्केटींग एजेंट सांगतो की, “मी कामासाठी रोज जामिया नगर पासून गुरूग्रामला जातो. कारण तिथं कोणीच मला राहायला जागा द्यायला तयार नव्हतं. आता मला रोज इतक्या लांब जावं लागतं, ज्यात बराच वेळ लागतो आणि त्याचा माझ्या जगण्यावरही प्रभाव पडतोय.” जमील असंही म्हणतात की “लोक जेव्हा त्यांच्या समुहासोबत राहतात तेव्हा त्यांच्या व्यवसायाच्या संधी वाढतात. एकाच भागात आपल्याच लोकांसोबत राहण्यामागे आर्थिक मुद्दाही असतो. कारण त्यात आर्थिक उलाढाल सहजपणे होते. पण धार्मिक भेदभावामुळे अशा जागा तोट्यात बदलू लागल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या बाजारांत आपलं काम आणि सेवा यांच्यावरून मोलभाव करण्याची लोकांची क्षमताही कमी होते.” पण इतक्या अडचणी येत असूनही रिजवी आणि खान पोलिसांकडे जायला उत्सुक नाहीत. खान म्हणतात, “माझा सर्वांत चांगला दोस्त एक हिंदू आहे. आम्ही हिंदू सण साजरे करतो. हे भेदभावाचं विष का व कुठून येतंय ते समजत नाही.” रिजवी थोड्या लोकांसोबत जगत आहेत पण आनंदाने. आपली मुस्लिमीयत लपवायला मात्र त्या तयार नाही.
अनुवाद – प्रतिक पुरी
(साभार – द प्रिंट)






