सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत, लिंग समानतेशी संबंधीत कामांमध्ये सहसा स्त्रिया आणि मुलींचाच समावेश जास्त असतो. यात बदल झाला तो नव्वदच्या दशकात जेव्हा काही स्वयंसेवी संस्थांनी या कामात पुरुष आणि मुलांचाही समावेश करणं सुरू केलं. यातील सुरूवातीचा एक मुद्दा होता कुटुंब नियोजन आणि प्रजनन आरोग्याचा, ज्यात मुलांना, पुरुषांना कंडोम वापरण्यास सांगितलं जायचं आणि त्यांच्या गरोदर बायकांना आरोग्य केंद्रात तपासनीसाठी घेऊन जायला प्रोत्साहीत केलं जायचं. लैंगिक संवेदीकरण कार्यशाळेचा उद्देश होता की पुरुषांना गरोदर बायकांच्या प्रजनन आरोग्याविषयी जागृत करणं. नंतर यात स्त्रियांवर होणारे अत्याचार, हिंसाचार, यांना थोपवण्यासाठीचे कार्यक्रम व समुपदेशनही आलं. वर्ष 2000 पर्यंत ‘मेन एंगेज’ सारखे गट दक्षिण आशियात सक्रिय झाले तसेच राष्ट्रीय पातळीवर ‘फोरम टु एंगेज मेन (एफईएम)’ या गटाचाही उदय झाला. अगदी अलिकडेच यात तरुण मुलं आणि पुरुषांमध्ये ‘पुरुषत्वा’वर काम करणं सुरू झालंय. हिंसाचाराला लैंगिकतेपासून वेगळं करत अधिक व्यापक दृष्टीकोन यात ठेवण्यात आला आहे. स्त्रीवादी चळवळीमध्ये पुरुषांची भूमिका नक्की काय आहे यावर विकास क्षेत्रांत काम करणारे तज्ञ लोक विचार करत होते आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही. फार काळ पुरुषांना एका ठराविक साच्यातच बघण्यात येत होतं जो दारू पित होता, जुगार खेळत होता, बायकोला मारत होता, मुलांवर ओरडत होता. हे होऊ नये म्हणून त्याचं समुपदेशन केलं जायचं.
नव्वदच्या दशकात हा विचार पुढे आला की स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरुषांचाही यात समावेश करण्यात यायला हवा. आम्ही यात काम करणाऱ्या काही प्रशिक्षकांना प्रश्न विचारले जे मुलांसाठी पुरुषांसाठी पुरुषत्वासंबंधी चर्चा करत होते. त्यांना कोणत्या अडचणी येतात? त्यांच्या अनुभवांतून ते पुरुषत्वाविषयी काय शिकत आहेत? पुरुष आणि पुरुषत्वासाठी काम करण्यासाठी स्त्रीवादी शिक्षण पद्धती स्वतःमध्ये काय बदल घडवून आणत आहे? जेव्हा तुम्ही मुलांसोबत पुरुषांसोबत बोलता तेव्हा लैंगिकता यौनिकतेविषयी तुम्हाला जे सांगायचं आहे त्याऐवजी इतर काही शिकवता का, तुम्ही स्वतः काही यातून शिकता का? आम्ही 11 जनांशी चर्चा केली ज्यांत प्रवर्तक, प्रशिक्षक, चित्रपट निर्माता, विचारवंतांचा समावेश होता. आजच्या नव्या काळात जिथे बायका बदलत आहेत तिथे पुरुष स्वतःला कसं बघतात हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की लैंगिकतेवर काम करणं किती अवघड आहे, अडचणीचं आहे, यात किती वेगवेगळे पैलू आहेत आणि स्वतः तुम्ही पुरुष असता तेव्हा काय घडत जातं.

वाय. पी. फाउंडेशनचे पूर्व डायरेक्टर मानक मटियानी यांनी म्हटलं की, “पुरुषांना वेगळं न करता लिंगभावावविषयी त्यांच्यासोबत कसं बोलायचं आणि त्याचवेळी हेही लक्षात ठेवायचं की त्यांचे विशेषाधिकार अधिक दृढ होणार नाहीत ही अवघड गोष्ट आहे. स्त्रिया-मुलींसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम हे त्यांना सशक्त करणारे, स्वतःविषयी आत्मविश्वास वाढवणारे, सकारात्मक पद्धतीचे असतात आणि त्यांनाही ते आवडतात. मुलांना मात्र हेच कार्यक्रम त्यांना शिक्षा ठोठावली आहे असे वाटतात. त्यात नकारात्मकता असते. मुलांना वाटतं की त्यांना कैदेत ठेवलं गेलंय आणि आता ते किती चुकीचे वागत आहेत याविषयी त्यांना उपदेश करण्यात येईल. मग अशा कार्यक्रमांत मुलांना उत्साह का वाटेल?” मुंबई स्थित मेन अगेंस्ट वायलेंस एंड एब्यूज़ (मावा) चे सचिव आणि मुख्य कर्ताधर्ता हरीश सदानी विचारतात की, “सर्वांत मोठा प्रश्न हा आहे की या (लिंग समानतेविषयी शिकून) मला काय मिळेल? कारण पुरुषांना त्यांचे विशेषाधिकार सोडायला सांगणं सोपं नाही. मी हे सारे विशेषाधिकार, जे मी वर्षानूवर्षं वापरत आलोय, ते सोडले तर त्याबदल्यात मला काय मिळेल हा सर्वांचा प्रश्न असतो. मला यातून कोणता वैयक्तिक फायदा होणार आहे?”
सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टिस (सीएचएसजे)चे प्रबंध संरक्षक अभिजीत दास, ज्यांनी पुरुषत्वाच्या क्षेत्रात मागील तीन दशकं सार्वजनिक आरोग्याद्वारे झालेल्या हस्तक्षेपांचा अनुभव आहे. ते सांगतात, पुरुषत्वाची पाठराखण करणाऱ्यासमोर लैंगिक समानता हा एकमेव उद्देश असू शकत नाही. ते पुढे सांगतात की, “अनेक कार्यक्रमांत स्त्रियांच्या परिघीकरणाची चर्चा होते, किंवा त्यांच्या उपेक्षेवर लक्ष केंद्रीत केलं जातं. पण पुरुषांच्या बाबतीत नेहमी असं समजलं जातं की ते त्यांच्या विशेषाधिकारांसोबतच येतील. यावर आधारीत कार्यक्रम हे अनेकदा गरीबीशी संबंधीत कार्यक्रम वाटतात कारण ते ग्रामीण भागातील मागास, वंचित समाजातील पुरुषांसाठीच केलेले असतात. या पुरुषांकडे पुरुषत्वाचे विशेषाधिकार असतात पण इतर संपन्न वर्गातील पुरुषांच्या तुलनेत त्यांचा सामाजिक-आर्थिक दर्जा हा खालचा असतो. त्यामुळे हे विशेषाधिकार त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात ज्यात त्यांचं स्वतंत्र अस्तित्वही निगडीत असतं.” ते म्हणतात, “फक्त पुरुषत्वाच्या बाबतीतच नाही तर कोणत्याही प्रकारच्या समानतेच्या कामात आपले विशेषाधिकार समजणं गरजेचं असतं कारण केवळ समानता ही एखाद्या समुहाचं एकमात्र हित असू शकत नाही.

इतिहासातही केवळ पराधीन समुहांनीच समानतेचा मुद्दा उचलून धरला आहे. पण समानता जर अशा पराधीन समुहांची सामाजिक आकांक्षा असेल तर मग समानता प्रत्यक्षात असते कुठे?” त्यामुळे या लोकांना जर त्यांची सत्ता, जी पुरुषत्वातून दिसून येते, ती सोडायला सांगितली तर ते या कार्यक्रमात भाग घ्यायलाच तयार नसतात. मानक सांगतात त्याप्रमाणे, पितृसत्ताक पुरुषत्वानुसार काम करताना अनेक फायदे मिळत असतात. मी त्या मुलांना पुरुषांना जाऊन कसं सांगू की पितृसत्ताक वर्चस्ववाद चुकीचा आहे आणि त्याचे फायदे घेणं बंद करा तुम्ही म्हणून?
‘जेंडर लॅब’चे सह-संस्थापक अक्षत सिंघल सांगतात, “पुरुष म्हणून आमच्यासाठी ही खूप सोपी व फायदेशीर गोष्ट आहे की आम्ही आहे त्याच साच्यात जगत राहू. कोणतेही प्रश्न न विचारता जगत राहणं आमच्यासाठी सोपं आहे कारण त्यात कोणत्याही समस्या येत नाहीत. कारण मी जेव्हा या मुलांना त्यांच्या विशेषाधिकाराविषयी प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना स्वतःवर काम करण्याची गोष्टही सांगावी लागते ज्याची एक किंमत चुकवावी लागते. स्वतःवर काम करणं सोपं नसतं. एका पातळीवर आल्यानंतर त्यांना सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतात ज्या त्यांना वारसाहक्काने मिळाल्या आहेत.” पण वर्तमानात जी व्यवस्था आहे ती मुलांसाठी, पुरुषांसाठी व्यवस्थितपणे काम करत आहे का? हरिश आपले शाळेचे दिवस आठवून सांगतात की, “मी तेव्हा एकटा आणि तणावात राहायचो नेहमी, कारण मी ‘नाजूक आणि मुलींसारखा असल्याने’ चेष्टा केली जायची, टोमणे मारले जायचे.” नियम-कानून यापासून फटकून वागणाऱ्या पुरुषांचं आपलं एकटेपण असतं तसंच अतिपुरुषी लोकांचंही एक एकटेपण असतं ज्यामुळे ते सुयोग्य नातेसंबंध करू शकत नाहीत, त्यात सहज असत नाहीत. एकीकडे स्त्रीवाद महिलांमध्ये समूहशक्ती, मैत्री, एकजूटीची भावना निर्माण करते, दुसरीकडे तो मुलांमध्ये एकटेपणा तयार करतो.

आम्हाला ज्यांनी मुलाखत दिली त्यांनीच ही गोष्ट सांगितली नाही तर, युवा संस्थेने देशातील 50 शहरांमध्ये 100 महाविद्यालयात केलेल्या सर्वेक्षणातूनही हीच गोष्ट स्पष्ट झाली. (याचे निष्कर्ष 2022 मध्ये मुंबई येथील रोहिणी निलेकनी, लोकोपकार – फिलॅन्थ्रोपीस संस्थेद्वारा आयोजीत ‘बिल्ड टुगेदर: जेंडर अँड मैस्क्युलिनिटीज़ सम्मेलन’त मांडण्यात आले होते.) युवा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक निखिल तनेजा सांगतात, असं का होतं की बहुतांश मुलांकडून मुलींसाठी व्यक्त केलेली जाणारी भावना ही प्रेमाचीच असते? कारण हीच भावना आहे जी व्यक्त करण्याची त्यांना परवानगी आहे. ते नेहमी प्रेम आणि प्रेमभंगाची गोष्ट करतात कारण आपली उदासी दाखवण्याचा हाच एक मार्ग त्यांना माहिती आहे. प्रेमभंग ही एक सामान्य घटना आहे ज्यावर पुरुषांचं एकमत होतं आणि एकजूटही.
ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञ आर. डब्ल्यू. कॉनेल यांच्या पुरुषवाद सिद्धांताने प्रेरीत होऊन मानक याची एक सैद्धांतीक व्याख्या करतात, “पुरुषत्वाला साधारणपणे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अथवा केंद्रस्थान समजलं जातं. प्रत्यक्षात त्यालाच सत्तेची अपेक्षा असते. तुमच्याकडून नेहमी अशी अपेक्षा केली जाते की तुम्ही नेहमी ताकदवान असावं, प्रत्यक्षात अनुभव असा नसतो.” पुरुषांचे सत्तेचे अनुभव व त्याच्या अपेक्षा यांच्यात खूप अंतर असतं. पुरुषांचे वेगवेगळे गट याचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेतात ज्याचा आधार असतो की ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या उतरंडीत त्यांचं स्थान कुठे आहे आणि त्यामुळेच पुरुषत्वाचे वैविध्यपूर्ण प्रकार तयार झालेले दिसतात. म्हणजेच पुरुषत्वाचं संकट तेव्हा उत्पन्न होतं जेव्हा पितृसत्ता सत्ता देण्याचं आपलं वचन पूर्ण करू शकत नाही. प्रशिक्षक, लिंगभाव आणि पुरुषत्वावरची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करतात उदा. यौनिक व प्रजनन आरोग्य, यौनिकता, रोमांस, आणि बऱ्याचदा पुरुषत्वाच्या प्रचलीत विचारांसह. मानक यांच्या कार्यशाळेची सुरूवात एका प्रश्नाने केली जाते, “कुल होण्याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे आणि तुम्ही स्वतःला एक कुल माणूस समजता का?” लिंगभाव अथवा पुरुषत्वाचा उल्लेखही न करता हा प्रश्न या मुलांमध्ये स्वतःच्या पुरुषत्वाविषयी एक संशय तयार करतो आणि त्यांचं स्वतःकडे लक्ष जातं.
मानक याला ‘स्व-प्रतिमेचा शोध’ असं नाव देतात, ज्यात बाहेर बघण्याऐवजी स्वतःकडे बघण्यासाठी उद्युक्त केलं जातं. ‘मर्दोंवाली बात’ या त्यांच्या कार्यक्रमात आलेल्या प्रतिक्रियेविषयी ते सांगतात, “आम्ही एका कॉलेजात एक पोस्टर लावलं होतं ज्यात सुपरमॅनचा फोटो होतो आणि खाली, पुरुषत्व काय असतं? असं लिहिलं होतं. त्या कार्यक्रमात अनेक मुलं आली कारण सर्वांनाच त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं होतं. त्यांना ते जाणून घ्यायचं होतं जेणेकरून ते नीट त्याचा उपयोग करू शकतील.”

शिक्षण आणि मनोरंजन या दोन्ही क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव असलेले निखिल यांना हे माहिती आहे की हास्याच्या माध्यमातून लोकांना सहजपणे निःशस्त्र करता येतं. “मी एका गोष्टीपासून सुरूवात करतो आणि त्यांनाही त्यात ओढून घेतो म्हणजे त्यांना वाटणार नाही की हा माणूस फक्त त्यांना उपदेश करण्यासाठी, पकवण्यासाठी आला आहे किंवा आव्हान द्यायला आला आहे. जेव्हा ते गोष्टीत रमू लागतात तेव्हा मी त्यांच्यासमोर एक असहज गोष्ट मांडतो, उदा. पॅनिक एटॅकची एखादी गोष्ट. जर मुलांनी तुमच्याशी मोकळेपणानं बोलावं अशी तुमची इच्छा आहे तर तुम्हाला त्यांचा आदर राखता यायला हवा तेव्हाच ते त्यांच्या अडचणींविषयी बोलू लागतील. माझा विश्वास आहे की गोष्टी तुम्हाला गोष्टींकडे नेतील आणि अडचणी असहजता, अडचणी असहजतेकडे नेतील.” 2021 मध्ये डॉ. केतकी चौखानी यांनी मुंबईतील मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय विषमलैंगिक मुलांविषयी एक शोध अभ्यास केला ज्यात त्यांना त्यांच्या किशोरवयीन प्रेमाविषयी विचारण्यात आलं तसंच याविषयी त्यांना कुठून माहिती मिळाली त्याविषयीही.
या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली की या मुलांमध्ये अनिश्चितता, स्वतःविषयी निर्णय न करता येणं, प्रेमातील अपयश बहुतेकांसाठी सामान्य गोष्टी होत्या. यात हिंसाचार कमीच होता मग ते नातं कितीही संवेदनशील का असेना. यात हिंसक पुरुष हा विचारच बदललेला होता. “मला हे लक्षात आलं की त्यांच्यात एकाचवेळी भीति आणि काळजी घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. आमच्या कार्यक्रमात हिंसाचार हाच सुरूवातीचा बिंदू असतो, त्याऐवजी असुरक्षेचा विचार केला तर काय? हिंसेऐवजी असुरक्षा, अनिश्चितता, वैफल्य, संकोच या गोष्टींचा समावेश केला तर लैंगिक संबंधांचं रुप कसं असेल?” या अभ्यासातून डॉ. केतकी यांच्या असंही लक्षात आलं की हा अभ्यास हळूहळू एका थेरपीचं रुप धारण करत होता. “त्यांना वाटत होतं की मी एक मानसोपचारतज्ञ आहे आणि ते या गोष्टीकडे एक थेरपी म्हणूनच बघत होते. यामुळे त्यांना त्यांच्या वयात येणाच्या काळातील अनुभवांविषयी, नैराश्याविषयी मुक्तपणे बोलण्यास मदत झाली, ज्याकडे एरव्ही पुरुषत्वाच्या नावाखाली दुर्लक्ष केलं जात असतं.” अशा पद्धतीने या प्रशिक्षकांनी त्यांच्यासमोर आलेल्या सुरूवातीच्या संकटावर उपाय शोधून काढला. मुलांसोबत कसं बोलायचं याची एक निश्चित पद्धती त्यातून तयार झाली. यातून या मुलांना त्यांनी विश्वास दिला की त्यांच्या गोष्टीही ऐकल्या जातील आणि त्यांना कोणत्याही पूर्वग्रहातून बघण्यात येणार नाही.
अनुवाद – प्रतिक पुरी






