सध्या प्रचंड गाजत असलेल्या दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘अमरसिंग चमकीला’ चित्रपटाच्या कथेत, गाण्यांमध्ये आणि तमाशा-लावणीमध्ये काय साम्य आहे…? किंबहुना ऐंशीच्या दशकात पंजाबी संगीतावर राज्य करणाऱ्या चमकीला नावाच्या गायकाच्या गाण्यांतील आशयामध्ये आणि पेशवाई काळापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या लावणीत काही साम्य आढळतं का…? याचे उत्तर कदाचित ‘होय’ असू शकेल. चमकीलाच्या गाण्यांवर जसा अश्लीलतेचा शिक्का मारण्यात आला तसाच शिक्का लावणी-तमाशावर मारण्यात आला. पंजाबमधील राजकीय-सामाजिक आणि अभिजन वर्गाने जशी चमकीलाच्या गाण्यांना नाकं मुरडून त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न आपल्याकडे राजकीय आणि अभिदन वर्गाने लावणी-तमाशाच्या बाबतीत केला होता… आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या दलित समाजातून पुढे आलेल्या चमकीलाच्या गाण्यांना विरोध करण्यामागे जातीय मानसिकता होती, तिच जातीय मानसिकता लावणी-तमाशाला इथल्या मुठभर अभिजनांनी विरोधासाठी वापरली होती… कारण तमाशा-लावणी हीदेखील दलितांची, बहुजनांची कला होती…
‘अमरसिंग चमकीला’ चित्रपटात एक संवाद आहे. पंजाबी गाणी गाऊन यशाच्या शिखरावर पोहचलेल्या चमकीलाची मुलाखत घेण्यासाठी दिल्ली शहरातून एक आघाडाची पत्रकार त्याच्या रेकॉर्डिंग स्टुडियोत आलेली असते. चमकीला हा अश्लील गाणी गाऊन समाजात घाण पसरवतोय असा या महिला पत्रकाराचा आरोप असतो आणि या आरोपावर स्पष्टीकरण देताना चमकीला म्हणतो,’’
क्यूं कि दुनिया मे जादा तर छोटे लोग है, मेरे जैसे…
आप जैसे कम है ।
और छोटे लोगो को ही पसंद आता है, क्यों की वो यही सब देख रहे होते है…
इसलिए मेरे गाने चलते है ।
इसलिये आप आये हो इंटरव्यू लेने, मै अगर आप जैसा होता तो थोडी आती आप ?

ऐंशीच्या दशकात अश्लील गाणी सादर करणारा अमरसिंग चमकीला हा पंजाबच्या तळागाळातील लोकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. दलित समाजाच्या चमकीलाने अगदी लहानपणापासून समाजातील तळातील जग पाहिलं आणि तेच गाण्यात मांडलं. ही अश्लील, चावट गाणी ऐकत मनोरंजन करून घेणं, दोन घटका नाचणं, दारू पित ही गाणी ऐकणं ही पंजाबच्या तळागाळातील लोकांची संस्कृती होती. चमकीलाने याच संस्कृतीला अगदी उघडपणे समाजासमोर आणले.
तमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा समृद्ध प्रकार. पांढरपेशी समाजाला जरी तमाशा हा खेडवळांचा भडक शृंगार वाटत असला तरी तमाशाची ज्याला खरी जाण आहे तो या गोष्टीशी सहमत होणार नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तमाशातील अश्लीलतेचं कारण देत तमाशाबंदीचीही मागणी करण्यात येत होती. मुंबई राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी 1948 साली तमाशावर बंदी घातली गेली. या निर्णयाला महाराष्ट्रातून त्यातल्यात्यात ग्रामीण भागातून जोरदार विरोध झाला. बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनीही जोरदार प्रयत्न केले. शेवटी जनमताच्या रेट्यापुढं सरकारला झुकावं लागलंच. या खास मराठी लोकनाट्यातील गोडवा व सामर्थ्य लक्षात घेऊन 1948 मध्ये शासनाने एक ‘तमाशा सुधार समिती’ नेमली व तिच्या द्वारे मग तमाशातील अश्लील प्रकारांना आळा घालून त्यात सुधारणा घडवून आणण्याचं म्हणजेच तमाशाला सेन्सॉर करायचं ठरवलं. मग या समितीनं काही सूचना दिल्या. तमाशातील नटनटींना जाहिरातीसाठी तंबूबाहेर बसविण्यात येऊ नये, तमाशात अश्लील पदं व संवाद नसावेत आणि दौलतज्यादा करताना कोणीही नर्तकीच्या अंगाला स्पर्श करू नये अशा सूचना देण्यात आली होती.
सदाशिव पेठेतली माणसं तमाशाला नाक मुरडणारच – डॉ. मिलिंद कसबे
‘चमकीला’च्या याच ‘तथाकथित’ अश्लील गाण्यांचा आधार घेऊन ‘बाईमाणूस’ने तमाशा आणि लावणी कलेतल्या दिग्गज अभ्यासकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. लोककलेचे अभ्यासक आणि तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या नारायणगाव येथे प्राध्यापक म्हणून कायर्रत असलेले डॉ. मिलिंद कसबे म्हणतात की, गावंढळ कशाला म्हणायचं? अश्लील कशाला म्हणायचं? ग्रामीण कशाला म्हणायचं? याच्या ज्या काही व्याख्या आहेत ते इथल्या वरच्या वर्गातल्या लोकांनी ठरवून टाकल्या आहेत. जे ग्रामीण भागात राहतात जे अशिक्षित आहेत, ते गावंढळ आहेत. ही जी सांस्कृतिक मक्तेदारी होती किंवा सांस्कृतिक वर्चस्वाचा जो सगळा भाग होता, हा सगळा इथल्या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेने ‘सेट’ केलेला होता. शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच. कोणतीही भाषा ही शुद्ध नसतेच ती अशुद्धच असते. त्यामुळे ग्रामीण माणसाचं, दलित माणसाचं, अशिक्षित माणसाचं जे अभिव्यक्त होणं आहे ते त्याच्या जगण्याशी जोडलेलं आहे. त्याला अशुद्धतेचा किंवा अश्लीलतेचा शिक्का मारणं फारसं संयुक्तिक नाहीये. तमाशामध्ये जी अश्लीलता आली ती विनोदाच्या रूपाने आली, काही शब्दप्रयोगाच्या रूपाने आली, लावणीच्या रूपाने ती अश्लीलता आली.

ती अश्लीलता त्या लोकांचं अस्सल जगणं होतं, अस्सल भाषा होती, त्या लोकांची अभिव्यक्ती होती. ही काही सदाशिव पेठेतली अभिव्यक्ती नव्हती. त्यामुळे सदाशिव पेठेतली माणसं तमाशाला नाक मुरडतीलच कारण तो कधी त्यांच्या जगण्याचा आणि जाणिवेचा भाग नव्हताच. त्या वेदना कधी त्यांच्या वाटेला आलेल्याच नव्हत्या. राहिला प्रश्न तमाशातले विनोद आणि तमाशातली लावणी तर तमाशाची भाषा ही अश्लीलच आहे, एकूणच तमाशा अश्लील आहे असं म्हणणं फारसं संयुक्तिक नव्हतं. ते इथल्या वैदिक, ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग होता. तमाशामध्ये जे विनोद आले, जी अश्लीलता आली, जे उघडं नागडं जगणं आलंय. तो त्या माणसांचा जगण्याचाच भाग होता.
तमाशा आणि लावणीवर अनेक अंगानी लेखन करणारे मिलिंद कसबे यांनी पुढे सांगितले की, तमाशाचा नायक कोण? तमाशा सादर कोण करतं? तमाशात वावरणारे कलावंत कोण आहेत? तर ही सगळी दलित उपेक्षित आणि अठरा पगड जातीतली लोकं आहेत. तमाशा ही अशी एक कला आहे, जी सगळ्या जातीधर्माचे कलावंत आपल्या पोटात घेऊन चाललेली आहे. तमाशामध्ये सगळ्याच जातीचे लोकं आहेत. ब्राम्हण आणि मराठा जात ही नगण्य आहे. ब्राम्हण घराण्याची स्त्री तमाशात कधी आलीच नाही. ह्या दोन जाती सोडल्या तर तमाशामध्ये महार, मांग, चांभार, कोल्हाटी, पारधी, गोंधळी हा जो बारा बलुतेदार समाज आहे तो सगळा तमाशात आहे. तमाशात ब्राह्मणेत्तर स्पृश्य आणि ब्राम्हण समाज नाहीये,जो जातीव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत वरच्या मजल्यावर राहत होता. तमाशा ही दलित उपेक्षितांनी जोपासलेली कला आहे आणि त्यांनीच विकसित केलेली कला आहे. त्यांच्याच उदरनिर्वाहासाठी विकसित केलेली कला आहे. आपल्याकडे दुर्देवाने ज्या पैसे मिळवणाऱ्या कला आहेत, ज्याला आपण अभिजात कला असे म्हणतो म्हणजेच चित्रपट, नाटक, या सर्व कला ब्राम्हणांनी आपल्या हातात ठेवल्या आणि ज्या भीक मागायला लावणाऱ्या कला आहे तमाशा पासून ते गोंधळ, भारूड या सगळ्या लोककला अठरा-पगड जातीत वाटून दिल्या आणि धर्माला जोडल्या गेल्या. हे एक प्रकारचं सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारणच होतं.

तमाशा अश्लील वाटत असेल तर त्यांनी किर्तनाला जावं – डॉ. प्रकाश खांडगे
तमाशा कलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांचे या विषयानरचे मत महत्वपूर्ण आहे. ‘बाईमाणूस’शी बोलताना ते म्हणाले की, साहित्य आणि एकूणच कला प्रकारामध्ये श्लील आणि अश्लील हे तपासण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो किंवा त्याच्यावर चर्चा होते ती चर्चा अगदी उत्तर पेशवाईच्या काळात आणि त्यानंतर शाहिरांच्या वांड्मयावरही झालेली आहे. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातलं शील आणि अश्लील नेमकं कसं ओळखायचं, तर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी अप्रस्तुत असली तर ती गोष्ट अश्लील होते. जी गोष्ट प्रसंगानुरूप, समयानुरूप असली तर तिला अश्लील संबोधण्यात येत नाही. तो त्या संपूर्ण कला प्रकाराचा एक अपरिहार्य भाग बनते. तमाशाबद्दलही आपल्या समाजात असा समज आहे की तमाशा हा अश्लील असतो. जर तमाशा अश्लील असतो आणि तमाशा जर श्लील झाला तर तमाशाने करायचं काय? तमाशाचे कर्तव्यच मुळात मनोरंजन, मनोविनोद, चावटपणा असे आहे. तमाशा काही किर्तन नाही होऊ शकत. जर तमाशा अश्लील वाटत असेल तर त्यांनी किर्तनाला जावं. जी शिष्ट माणसं तमाशाला अश्लील म्हणतात तीच माणसं कालिदासाच्या मेघदूत मधील किंवा शकुंतला मधील वर्णन मोठ्या आवडीने वाचतात. श्लील आणि अश्लील यांच्या कल्पना या विशिष्ट समाजनिष्ठ असतात. विशिष्ट व्यक्तीनिष्ठ असतात आणि त्या क्लुप्त्या नेमक्या कोणी लावायच्या हा वादाचा विषय आहे. तमाशामध्ये सगळेच अश्लील असतं असंही काही नाही. तमाशामध्ये सोंगाड्या एक वाक्य म्हणतो की, गहू पेरले तर गहूच उगवतात ना.. आता हे काय अश्लील थोडी आहे? तमाशात एक जण म्हणतो की, काय बाई मूत्र घडवल्या, तर ती म्हणते मूत्र नाही मुर्त्या बोल… आता हे काही अश्लील आहे का? याचाच अर्थ श्लील आणि अश्लील हे विशिष्ट समाजाने लादलेल्या गोष्टी आहेत. समाजातलं श्लील आणि अश्लील त्याच्यातल्या तपशीलावर अवलंबून नसून तर त्या कलाकृतीमध्ये एखादा विनोद व्यक्तीनिष्ठ ,प्रसंगनिष्ठ अथवा शब्दनिष्ठ असतो. त्या विनोदाच्या पातळीला अश्लील समजण्यात अर्थ नाही. एखादी गोष्ट अश्लील तेव्हा होते जेव्हा ती अप्रस्तुत असताना मुद्दामून चावटपणा म्हणून वापरली जाते. तर त्यावेळी तिला अश्लील म्हणता येईल.
तमाशा हा अश्लील नसून अध्यात्मिक होता – डॉ. गणेश चंदनशिवे
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांना मात्र हा मुद्दा मान्य नाही. ते म्हणतात की, तमाशा हा अश्लील नसून अध्यात्मिक होता. आख्यानक लावणी तमाशामधून रात्र भर गायली जायची. लावणीतून अध्यात्म दाखवलं जायचं. पेशवाईच्या कालखंडामध्ये म्हणजेच बाजीरावांच्या कालखंडामध्ये शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर, शाहीर अनंत फंदी, शाहीर परसराम या कीर्तनकारांनी पेशवाई मध्ये लावणीला शृंगारिक बाज चढवला. पेशवाई मध्ये तमाशा होता पण त्यावेळी त्यामध्ये पूर्ण घटक नव्हते. नंतर गावकुसाबाहेर अस्पृश्य समाजाची लोकं तमाशा आणि लावणी करायला लागली. तमाशामध्ये गण आहे, गवळण आहे, तक्रार आहे, विनवणी आहे, कृष्णाच्या ओळखीची गवळण आहे, बतावणी मधून त्या त्या काळातल्या समस्येवरती मार्मिक भाष्य केलं जायचं. तमाशा मध्ये जसजशी स्थित्यंतरे आली तसतसे अलीकडच्या काळात लोकांचा तमाशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बनला जो अत्यंत चुकीचा आहे. तमाशा कधीही अश्लील नव्हता, लावणी कधीही अश्लील नव्हती. पारंपरिक लावणी कलाकार डोक्यावर पदर घेऊनच लावणी करतात. लावणी अश्लील आहे, हा समज लोकांचा दूर होणं गरजेचं आहे. तमाशाप्रधान चित्रपटातून लावणीकलाकार दाखवले गेले, ज्यामध्ये एक तमासगिरीण बाई माणसाला तिच्या जाळ्यात ओढते आणि त्याचे पैसे घेऊन गायब होते. असं जर वास्तवात असतं तर आज प्रत्येक तमाशा कलाकारांचे किंवा लावणी कलाकाराचे पेट्रोलपंप असते, मोठमोठ्या व्हॅनिटी व्हॅन असत्या. पण तसं काहीच चित्र वास्तवात नाहीये. कारण ही ग्रामीणजनांच्या निखळ रंजनासाठी उदयाला आलेली लोककला आहे. या कलांनी लोकांचं प्रबोधन केलं, समाजाला शिक्षण दिलं, समाजाचं लोकप्रबोधन केलं, लोकांना त्यातून लोकबोध झाला.

ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक मुकुंद कुळे म्हणतात की, वास्तविक लोककला म्हणजे खरं तर प्रयोगात्म लोककला या बव्हंशी मोकळ्याढाकळ्या आणि सैल असतात. विशेषतः ज्यांचं प्रयोजन प्रामुख्याने मनोरंजन आहे, अशा लावणी, भारूड, दशावतार यांसारख्या लोककला. या लोककलांत मोकळेपणा असतो किंवा त्या त्या वेळी सादरीकरणात तो मोकळेपणा, सैलसरपणा आणला जातो. कारण या लोककला परस्परपूरक आणि परस्परसंवादी असतात. या कला सादर करताना एक प्रकारे प्रेक्षकांनाही त्यात सामावून घेतलं जातं. म्हणजे प्रेक्षकांचा आनंद, त्यांचा भावनावेग, त्यांचे चित्कार हेही कळत नकळत त्या कलेचा किंवा सादरीकरणाचा भाग बनून जातात आणि मग परस्परांना प्रोत्साहन देताना कधी कधी कलावंत आणि प्रेक्षक आपली मर्यादा सोडतात. लोककला या प्राकृतिकदृष्टया मुक्त नि मोकळ्या असल्यामुळे क्वचित कधी त्यांचा बाज चावटपणाकडे झुकतो खरा, पण तो चावटपणा सूचक असतो, थेट नसतो. हा सूचकपणाच लोककलांचा आत्मा आहे! मात्र सूचकपणाची ही मर्यादा ओलांडल्यामुळेच गौतमी पाटीलच्या अदा आज अश्लील ठरल्या आहेत आणि महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेली लावणी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. वास्तविक कुठलीही कला ही मूलतः श्लील वा अश्लील असत नाही. ती कला कधी, कोणापुढे आणि कशासाठी सादर होते, त्यावर अनेकदा कुठल्याही कलेचं स्वरूप ठरत असतं. लावणी या लोककलेचं प्रयोजनच मुळी मनोरंजन हे असल्यामुळे लोकानुनय हा या लोककलेचा अविभाज्य भाग बनला आहे. या लोकानुनयामुळेच लावणी कला पूर्वी आणि आजही अश्लीलतेकडे झुकलेली आहे.





