राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही शासकीय सेवेत सामावून घेतले जात नसल्याबद्दल महाराष्ट्रातील काही खेळाडूंनी बंडाचे निशाण फडकवले असून त्यात ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत, दत्तू भोकनाळसह सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. सरकारने जुन्या ठरावानुसार नोकरीची मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही आमची पदके परत करू असा इशारा या खेळाडूंनी राज्य सरकारला दिला आहे.
जुन्या सरकारी ठरावानुसार राज्य सरकारने नोकरीची मागणी पूर्ण न केल्यास ‘ऑलिम्पियन रोव्हर’ दत्तू बबन भोकनळसह महाराष्ट्रातील खेळाडूंनी त्यांची पदके परत करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दत्तू भोकनाळसह अर्जुन पुरस्कार विजेती आणि ऑलिम्पियन कविता राऊत, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सायली केरीपाळे (कबड्डी), आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती स्नेहल शिंदे (कबड्डी), आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता रिशांक देवाडिगा (कबड्डी) आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता गिरीश एरनाक (कबड्डी) यांनी हा इशारा दिला आहे. तसेच आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

राज्याच्या क्रीडापटूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, या खेळाडूंनी म्हटले आहे की, “सर्व प्रशासनाने हे लक्षात घ्यावे की आमची मागणी मान्य न झाल्यास, आम्ही सर्व खेळाडू विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपोषण करणार आहोत.” तसंच आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहोत आणि आमच्यापैकी अनेकांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई खेळ 2018 मध्ये आम्ही भारतासाठी पदके जिंकली आहेत. आम्ही सर्वजण ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलो आहोत आणि सात वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही सरकारने आमची निराशा केली आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंतर्फे जिंकलेले सर्व पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) आणि क्रीडा मंत्री (संजय बनसोडे) यांच्याकडे सुपूर्द केले जातील. आम्ही सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहोत, याची सर्व जबाबदारी राज्य सरकार आणि क्रीडा विभागाची असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
आमच्यासोबत भेदभाव का?
2017 पासून आम्ही सरकारकडे नोकऱ्यांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र, आजपर्यंत सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारची नियुक्ती दिली नाही. सरकारकडून खेळाडूंशी भेदभाव केला जात असल्याचंही निदर्शनास आल्याचे पत्रात म्हटलंय. ललिता बाबर, राहुल आवारे, विजय चौधरी, वीरधवल खाडे, नरसिंग यादव, सुनील साळुंखे, अमित निंबाळकर, लतिका माने, ओंकार ओतारी, पूजा घाटकर नितीन मदने यांना त्यांच्या इच्छेनुसार आणि जुन्या जीआरनुसार नोकरी देण्यात आली. आम्ही ऑलिम्पिक खेळाडू आहोत आणि मग आमच्याशी भेदभाव केला जात आहे का? आम्हालाही जुन्या जीआरप्रमाणे अधिवेशनापूर्वी नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

नोकरीसाठी वणवण फिरतेय ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करुन महाराष्ट्रासह नाशिकचे नाव उंचावणाऱ्या धावपटू कविता राऊतला गेल्या सात वर्षांपासून शासकीय नोकरीसाठी वणवण फिरावं लागत आहे. कविता राऊत यांना सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाते. 2012 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने 2020 साली तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन क्लास 1 च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली होती. नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा सारख्या आदिवासी भागातून आलेल्या कविता राऊतने विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राज्य व देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ‘आशियायी क्रीडा स्पर्धा’, ‘राष्ट्रकुल’ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदके पटकाविली आहेत. ‘रिओ ऑलिम्पिक’च्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत तिने पुरस्कार पटकाविले होते. सन् 2014 पासून शासकीय सेवेतील वर्ग 1 च्या पदाची नोकरी मिळावी, यासाठी कविताने वारंवार अर्ज केले आहेत. मात्र यास सात वर्षांचा कालावधी उलटूनही वर्ग 1 च्या पदापासून राऊत वंचित आहेत. राऊत यांच्यानंतर आलेल्या अनेक खेळाडूंना शासकीय सेवेत संधी मिळाली आहे. मात्र सर्व निकष व पात्रता मिळवूनसुद्धा ही संधी त्यांना अद्यापही मिळू न शकल्याची खंत क्रीडाप्रेमींमध्ये आहे.
कोण आहे दत्तू भोकनळ?
दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता.दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचा आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे. दत्तूने 2014 मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. मग 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोइंगमध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकवून दिले आहेत. 2017 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तर 2020 मध्ये दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.






