शंतनू खुजे
- अलीकडेच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले.
- याचाच निषेध म्हणून अभिजीत दिपकेे याने तरुणांचा संताप व्यक्त करण्यासाठी १६ मे २०२६ रोजी 'कॉकरोच जनता पार्टी'ची ऑनलाइन घोषणा केली.
- बघताबघता एका उपहासात्मक मीम पेजच्या स्वरूपात सुरू झालेल्या या प्रयोगाने काही तासांतच एका राजकीय चळवळीचे रूप धारण केलंय. खाते उघडल्याच्या अवघ्या ४ दिवसात ह्यांचे तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोवर्स झालेत.
सध्या समाज माध्यमांवर एका नावाची खूप चर्चा सुरु आहे, ते म्हणजे 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी). इंस्टाग्रामवर तर ह्या पार्टीची वेगळीच भुरळ आहे. खाते उघडल्याच्या अवघ्या ४ दिवसात ह्यांचे तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोवर्स झालेत आणि यांच्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ते देशातील ‘जेन-झी’ ची. सर्वांना भुरळ घालणाऱ्या या सीजेपीचा संस्थापक आहे, अभिजित दिपकेे… जो सध्या अमेरिकेतल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं उच्च शिक्षण घेतोय. पण असं अचानक इंटरनेटचा आधार घेत अभिजीत ह्याने ही 'कॉकरोच जनता पार्टी का सुरु केली असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर याला पार्श्वभूमी आहे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्याची…
अलीकडेच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘’काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. नंतर मग हेच तरुण माध्यमं, समाजमाध्यमं आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात. समाजात अनेक परजीवी वावरत असून ते सतत व्यवस्थेला टार्गेट करत असतात.’’
याचाच निषेध म्हणून अभिजीत दिपकेेने तरुणांचा संताप व्यक्त करण्यासाठी १६ मे २०२६ रोजी 'कॉकरोच जनता पार्टी'ची ऑनलाइन घोषणा केली. समाजमाध्यमांवर नुसतीच टीका करण्याऐवजी, या अपमानास्पद झुरळ या शब्दालाच अभिजितने आपले हत्यार बनवले. एका उपहासात्मक मीम पेजच्या स्वरूपात सुरू झालेल्या या प्रयोगाने काही तासांतच एका राजकीय चळवळीचे रूप धारण केलंय.
'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजित दिपके आहे तरी कोण…?
अभिजीत दिपकेे हा मूळचा हिंगोलीचा असल्याचं सांगितलं जातंय. तो एक राजकीय रणनीतीकार आणि डिजिटल मीडिया कॅम्पेनर आहे. पत्रकारितेचे आणि पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेतलेल्या अभिजीतने, तळागाळातील तरुणांचे प्रश्न, व्यवस्थेचा नाकर्तेपणा आणि बेरोजगारीसारखे गंभीर मुद्दे मांडण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' या उपहासात्मक राजकीय चळवळीची स्थापना केली. पारंपारिक राजकारणाला फाटा देत, त्याने डिजिटल प्लॅटफॉर्म्स, मीम कल्चर आणि उपहासात्मक कंटेंटचा अत्यंत अचूक वापर करून ही चळवळ उभी केली आहे.

त्याने त्याचे पदवीचे शिक्षण पुण्यातून पत्रकारितेत पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. तिथे सध्या तो बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतोय. २०२० ते २०२३ या काळात तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया आणि आयटी सेलसोबत जोडलेला होता. २०२० च्या दिल्ली निवडणुकीत आपच्या बाजूने सोशल मीडियावर जे मीम्स आणि डिजिटल कॅम्पेन चालवले गेले, त्यामागे अभिजीतचा मोठा वाटा होता. तर जून २०२१ ते मे २०२४ पर्यंत दिल्ली शिक्षण विभागाचा कम्युनिकेशन्स ॲडव्हायझर म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली.
'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना कशासाठी…
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी व्यवस्थेवर टीका करणाऱ्या काही तरुणांच्या संदर्भात कॉकरोच आणि परजीवी असे शब्द वापरल्याचा वाद निर्माण झाला होता. मग याच शब्दांचा आधार घेत, जर प्रस्थापित व्यवस्था तरुणांना कीटकच समजत असेल, तर त्याच स्वरूपात आपला आवाज उठवण्याचा निर्णय अभिजीत दिपकेे याने घेतला. वरकरणी ही एक मस्करी वाटत असली, तरी या स्थापनेमागे देशातील वाढती बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि तरुणांच्या खऱ्या प्रश्नांना डावलून होणारे राजकारण याबद्दलचा तीव्र संताप दडलेला असल्याचं अभिजित म्हणतो.
लाईव्हमिंटला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्याने या चळवळीच्या यशाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला की,
"कॉकरोच जनता पार्टी हा खरं तर एक विनोद म्हणून सुरू करण्यात आला होता. पण त्याला एवढा मोठा आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळेल, याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. असे दिसते की आपल्या देशातील तरुण याच्याशी स्वतःला पूर्णपणे जोडून घेत आहेत.".
या प्रतिसादामागील सामाजिक कारण स्पष्ट करताना तो पुढे म्हणाला,
"या प्रतिसादावरून आपल्याकडे हा स्पष्ट पुरावा आहे की, देशातील तरुण अतिशय निराश आणि संतप्त आहेत, कारण त्यांना भारतीय राजकारणात कोणतेही स्थान नाही. प्रस्थापित पक्षांपैकी कोणीही त्यांची पर्वा करत नाही. सरन्यायाधीशांचे विधान हे केवळ एक निमित्त होते, खरी खदखद त्याआधीपासूनच होती.".
सीजेपीची अधिकृत वेबसाईट आणि जाहीरनामा…
अभिजीत डीपकेने केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून न थांबता, या उपहासात्मक चळवळीला एका राजकीय पक्षाचे संस्थात्मक रूप देण्यासाठी https://cockroachjantaparty.org/ नावाची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे. वेबसाईटच्या मुख्य पानावर पक्षाचे वर्णन अत्यंत आकर्षक शब्दांत करण्यात आले आहे. पक्षाने स्वतःसाठी "धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी"हे चार शब्दांचे अधिकृत ब्रीदवाक्य स्वीकारले आहे. याशिवाय, वेबसाईटवर काही घोषणा देखील आहेत.

- "तरुणांसाठी, तरुणांद्वारे आणि तरुणांचा राजकीय मंच"
- "आळशी, बेरोजगार आणि सातत्याने बरोबर असलेल्यांचा राजकीय पक्ष. जिथे वायफाय चालते, तिथे आमचे मुख्यालय आहे."
- "ज्या लोकांना मोजायला ही व्यवस्था विसरली, अशा लोकांसाठीचा हा राजकीय पक्ष आहे. त्यांनी आम्हाला पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही परत आलो आहोत."
- "आम्ही इथे आणखी एक 'पीएम केअर्स' निधी उभारण्यासाठी, करदात्यांच्या पैशावर दावोसला सुट्ट्या घालवण्यासाठी, किंवा भ्रष्टाचाराला 'स्ट्रॅटेजिक स्पेंडिंग' म्हणून नव्याने ब्रँड करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथे फक्त एक विचारण्यासाठी आलो आहोत, मोठ्या आवाजात, वारंवार आणि लेखी स्वरूपात, की आमचा पैसा कुठे गेला?"...
कॉकरोच जनता पार्टीचा पाच कलमी जाहीरनामा…
कॉकरोच जनता पार्टीने देशातील ज्वलंत मुद्दे आणि न्यायव्यवस्थेपासून ते मीडियापर्यंतच्या पारदर्शकतेवर भाष्य करणारा एक थेट पाच कलमी जाहीरनामा मांडला आहे.
- कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा दिली जाणार नाही, जेणेकरून न्यायव्यवस्थेची निष्पक्षता अबाधित राहील.
- जर कोणत्याही राज्यातील (सत्ताधारी किंवा विरोधी) निवडणुकांमध्ये मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तर मतदान हिरावून घेण्याच्या या बेकायदेशीर कृत्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांना UAPA अंतर्गत अटक केली जाईल.
- राजकारणात महिलांना केवळ ३३% नाही, तर मंत्रिमंडळातील पदांमध्ये थेट ५०% आरक्षण दिले जाईल.

- उद्योगपतींच्या (जसे की अदानी आणि अंबानी) मालकीच्या सर्व मीडिया कंपन्यांचे परवाने रद्द करून खऱ्या अर्थाने स्वतंत्र मीडियाला प्रोत्साहन दिले जाईल, तसेच 'गोदी मीडिया'तील अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी होईल.
- पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदारावर निवडणूक लढवण्यावर आणि पुढील २० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद भूषवण्यावर पूर्णपणे बंदी घातली जाईल.
पार्टीचे सदस्यत्व आणि उपहासात्मक पात्रता निकष
कॉकरोच जनता पार्टीने आपल्या सदस्यत्वासाठी अत्यंत अनोखे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना टोमणा मारणारे उपहासात्मक पात्रता निकष निश्चित केले आहेत.
- तुम्ही बेरोजगार असायला हवेत.
- तुमच्या अंगी आळशीपणा ठासून भरलेला असावा.
- तुम्ही कायमस्वरूपी ऑनलाइन असायला हवे.
- व्यवस्थेबद्दलचा राग व्यावसायिक पद्धतीने सोशल मीडियावर व्यक्त करता येणे गरजेचे आहे.
या निकषांमागील मुख्य हेतू हा आहे की, ज्या तरुणांना व्यवस्थेने आळशी आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणारे असे हिणवले आहे, त्याच तरुणांना संघटित करून त्यांचा हाच आळस आणि राग व्यवस्थेविरोधातील मोठे हत्यार बनवणे. हे निकष म्हणजे जे तरुण सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतात त्यांना कामधंदा नसलेले ठरवणाऱ्या प्रस्थापित मानसिकतेवर केलेली खोचक टीका आहे.
इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टी सुसाट
सुरुवातीला केवळ एक इंटरनेटवरील विनोद वाटणाऱ्या या चळवळीने अवघ्या काही तासांत प्रचंड वेग घेतला. ‘एक्स’या प्लॅटफॉर्मवर पक्षाला काही तासांत ३७,००० हून अधिक लोकांनी फॉलो केले, तर आता हा आकडा एका लाखाच्या पार गेलाय. तर इंस्टाग्रामवर हा वेगाने वाढतोय, तिथे आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी ह्या पार्टीला फॉलो केलंय. लोक या पक्षाच्या नावाने रील्स बनवत आहेत, जोक्स करत आहेत आणि मीम्स शेअर करत आहेत.या चळवळीच्या नावाने रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्यामुळे कॉकरोच जनता पार्टीची लोकप्रियता वाढत चालली आहे.

एकीकडे समाजमाध्यमांवर कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक झपाट्याने वाढत असतांनाच दुसरीकडे मात्र त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सला हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अकाउंटचा ताबा मिळविण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न केला जातोय. ज्यामध्ये विविध प्रकारच्या लिंक्स देखील पाठवल्या जात असल्याची माहिती अभिजितने दिली आहे.
आम आदमी पार्टीची छुपी मोहीम असल्याचा आरोप
सीजेपीची लोकप्रियता वाढत असतांनाच अभिजीत डीपके यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आला. टीकाकारांच्या मते, तो कोणताही तटस्थ किंवा सामान्य विद्यार्थी नसून, आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया वॉर रूमचा एक महत्त्वाचा आणि प्रशिक्षित भाग राहिलेला आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी ही तरुणांची नैसर्गिक आणि उत्स्फूर्त चळवळ नसून, विरोधी पक्षांनी विशेषतः आप आणि काँग्रेसन, भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारविरुद्ध पद्धतशीरपणे चालवलेली एक राजकीय प्रचार मोहीम आहे, असा थेट आरोप करण्यात आला आहे.
ह्या आरोपांवर स्पष्टीकरण देतांना अभिजीतने स्पष्ट केले की तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्याच्यावर एज्युकेशन लोन आहे आणि करिअर सुरक्षित करण्यासाठी त्याला शिक्षण घेणे गरजेचे आहे. तो पदवी मिळवण्यासाठी अमेरिकेत गेला आहे, कारण नोकरी आणि पैशांशिवाय पूर्णवेळ राजकारण करणे त्याला सध्या शक्य नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो भारतात परतेल.
काही लोकांचा आरोप आहे की, ही मोहीम अण्णा हजारे आंदोलन किंवा शेतकरी आंदोलनासारखीच असून यातून केवळ देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावर तो म्हणाला की, देशात जेव्हा जेव्हा लोक स्वतःचा आवाज उठवतात, तेव्हा सरकार त्याला एखाद्या छुप्या शक्तींशी जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न करते. आपली चळवळ पूर्णपणे शांततापूर्ण असून आपण भारताचे संविधान आणि लोकशाही मानणारे आहोत. संविधानाच्या चौकटीत राहूनच आपण आपला लढा लढणार आहोत.
विरोधी पक्षांतील नेत्यांचा जाहीर पाठिंबा…
या चळवळीचे सर्वांत मोठे यश म्हणजे तिला केवळ तरुणांचाच नव्हे, तर विरोधी पक्षनेत्यांचा, शिक्षणतज्ज्ञांचा, वकिलांचा आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांनी एक्सवर या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मोईत्रा यांनी सीजेपीची पोस्ट रिपोस्ट करत लिहिले की, "मी आधीच एका अँटी-नॅशनल पार्टीची सदस्य असली तरी मला कॉकरोच जनता पार्टीमध्ये सामील व्हायला आवडेल." यावर सीजेपीच्या अधिकृत हँडलवरून त्यांना उत्तर देण्यात आले की, "महुआ मोईत्रा, तुम्ही लोकशाहीला आवश्यक असलेल्या खऱ्या योद्ध्या आहात. सीजेपी मध्ये तुमचे स्वागत आहे.".
खासदार कीर्ती आझाद यांनी विचारले की, या पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? यावर पक्षाने अत्यंत मिश्किल आणि लोकप्रिय उत्तर दिले: "१९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणे ही पुरेशी पात्रता आहे."
जेव्हा अभिजीतला विचारण्यात आले की काही लोकांच्या मते या चळवळीला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे, तेव्हा तो अत्यंत स्पष्टपणे म्हणाला की, "आम्ही कोणत्याही लोकांना आम्हाला पाठिंबा देऊ नका असे सांगू शकत नाही. हे एक पूर्णपणे खुले व्यासपीठ आहे. कोणालाही येऊन आमच्यात सामील होण्याची मुभा आहे."
कॉकरोच जनता पार्टीचे भविष्य…
पण या चळवळीबाबत आता अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरुवातीचा विनोद आता खूप पुढे गेला आहे हे तो मान्य करतो. तो सध्या अमेरिकेतून हा पक्ष चालवत असला तरी, लवकरच तो भारतात परतणार आहे. ज्या हजारो तरुणांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांची मी फसवणूक करू शकत नाही. मी लवकरच भारतात येईन आणि या ऑनलाइन मोहिमेचे एका प्रत्यक्ष भौतिक चळवळीत किंवा खऱ्या राजकीय प्रवाहात रूपांतर कसे करता येईल, यावर काम करणार आहे. तरुणांना अधिकाधिक संख्येत सहभागी करून घेण्यासाठी एक व्हर्च्युअल कन्व्हेन्शन' आयोजित करणार असल्याचं अभिजितने सांगितलंय.






