कोमल ठोंबरे
- वयाच्या ४० व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती आलेल्या महिलांना हृदयरोगाचा धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो.
- भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय ४७ ते ४८ वर्षे आहे, जे पाश्चिमात्य देशांपेक्षा कमी आहे.
- भारतात ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, सततचा शारीरिक थकवा आणि आरोग्यसुविधांचा अभाव यामुळे हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.
वयाच्या ४० व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. हा अभ्यास जगप्रसिद्ध ‘जामा कॉर्डिओलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून या विषयावर आजवर झालेला हा सर्वात व्यापक अभ्यास आहे.
१०,०३६ महिलांच्या दशकांपर्यंतच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करताना संशोधकांना १,०००हून अधिक हृदयविकाराच्या घटना आढळल्या, ज्यात घातक आणि बिनघातक दोन्ही प्रकारच्या हार्टअटॅकचा समावेश होता.
संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे, स्पष्ट निरीक्षण
रजोनिवृत्तीनंतर शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक (हार्मोन) कमी होते. हे इस्ट्रोजेन हृदयाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, रक्तवाहिन्या लवचिक राखणे आणि जळजळ (इन्फ्लेमेशन) कमी करते. वयाच्या चाळीशीआधीच हे इस्ट्रोजेन कमी झाले, तर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (‘प्लेक’) जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते, रक्तदाब वाढतो आणि चयापचय बिघडते. धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जोखीम घटकांशी जुळवून घेतल्यानंतरही हा धोका ४१ टक्के जास्त कायम राहतो, हे या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे आणि स्पष्ट निरीक्षण आहे.

भारतीय महिलांमध्ये ४७ ते ४८ वर्षे वयात रजोनिवृत्ती
साधारणपणे अमेरिकेत वयाच्या ५१व्या वर्षी रजोनिवृत्ती होते. ४० ते ४५ वयात झाली तर ‘अर्ली मेनोपॉज’, तर ४० वर्षांपूर्वी झाली तर ‘प्रिमॅच्युअर मेनोपॉज’ असे म्हटले जाते. भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय ४७ ते ४८ वर्षे आहे, जे पाश्चिमात्य देशांपेक्षा कमी आहे.
ग्रामीण भागात अकाली रजोनिवृत्तीचे प्रमाण जास्त
अकाली रजोनिवृत्तीची कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली तरी अनुवांशिकता, धूम्रपान, स्थूलपणा आणि दीर्घकालीन मानसिक ताण (क्रॉनिक स्ट्रेस) यांचा त्यात मोठा वाटा असतो. भारतात ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, सततचा शारीरिक थकवा आणि आरोग्यसुविधांचा अभाव यामुळे हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.
अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. प्रिया फ्रीनी यांनी सांगितले की, “४० वर्षांपूर्वी रजोनिवृत्ती आली तर, ती केवळ स्त्रीरोगविषयक बाब नसून हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्याचा एक महत्त्वाचा इशारा आहे. असे झाल्यावर लगेच रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तशर्करा, वजन आणि झोपेची तपासणी व्हायला हवी.” महिलांनी डॉक्टरांकडे आपल्या रजोनिवृत्तीची माहिती स्वतःहून द्यावी आणि हृदयरोग प्रतिबंधाचे नियोजन सुरू करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ महाराष्ट्रात सुरू
राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे, तसेच रजोनिवृत्ती कालावधीत महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व संप्रेरक (हार्मोन्स) बदलांवर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन मिळावे यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्राने देशात प्रथमच शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करून राष्ट्रीय पातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे.
रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक संवेदनशील व महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात महिलांमध्ये संप्रेरकांमध्ये बदल, हाडांचे विकार, झोपेच्या तक्रारी, हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. मात्र महिलांच्या या महत्त्वाच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ही बाब लक्षात घेत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्रा’मध्ये महिलांना एकाच ठिकाणी सर्वांगीण उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, संप्रेरक तपासण्या, हाडे व हृदय आरोग्य मूल्यांकन, तसेच आवश्यक उपचार, औषधोपचार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शनाचा समावेश आहे.
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील विविध भागांतील महिलांनी या ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्रा’ला चांगला प्रतिसाद देत आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये या केंद्राला मोठ्या प्रमाणात महिलांनी पसंती दिली आहे. देशात प्रथमच राज्यस्तरावर अशा स्वरूपाचे ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले असून, अन्य राज्यांसाठीही हा उपक्रम मार्गदर्शक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हल्ली चाळीशीतच रजोनिवृत्ती येते…
हल्ली चाळीशीतच रजोनिवृत्ती येते. याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात. डॉक्टर सांगतात की, वयाच्या ४० वर्षापूर्वी स्त्रीच्या अंडाशयाचे कार्य थांबते तेव्हा त्याला अकाली रजोनिवृत्ती, प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात. वाढता ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यासारखे जीवनशैलीसंबंधीत घटक याच मोठी भूमिका बजावत आहेत. वेळीच लक्षणे ओळखणे आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करू शकते.
अकाली रजोनिवृत्ती, ज्याला प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात, हे तेव्हा होते जेव्हा अंडाशय रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक वयापेक्षा खूप लवकर स्त्रीबीज आणि हार्मोन्स तयार करणे थांबवते. रजोनिवृत्तीचे सरासरी वय सुमारे ४५ ते ५० वर्षे असले तरी, काही महिलांमध्ये ते खूप लवकर सुरू होते, कधीकधी त्यांच्या ३० च्या सुरुवातीच्या काळातही यास सुरुवात होऊ शकते असे अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमरजा परांजपे यांनी सांगितले.
जीवनशैलीतील बदल, अनुवंशिकता, स्वयंप्रतिकार रोग, केमोथेरपी सारख्या काही वैद्यकीय उपचार आणि गंभीर संसर्ग देखील लवकर रजोनिवृत्तीला कारणीभूत ठरू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि प्रजनन क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे. गेल्या २-३ महिन्यांत, मला भेटणाऱ्या १० पैकी २ महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा सामना करावा लागला आहे.

अनेक महिला या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना तात्पुरते शारीरीक बदल समजतात. ज्या महिला अकाली रजोनिवृत्तीचा सामना करतात त्यांना वंध्यत्व, ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग आणि नैराश्याचा धोका अधिक असतो. तरुण वयात इस्ट्रोजेनचे नुकसान हे हाडांच्या ताकदीवर, हृदयाच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावरही दीर्घकालीन परिणाम करते असेही डॉ परांजपे म्हणाल्या.
अकाली रजोनिवृत्तीची जोखीम कमी करण्यासाठी
अकाली रजोनिवृत्तीची जोखीम कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन तसेच निरोगी जीवनशैली बाळगणे गरजेचे आहे. अनियमित मासिक पाळीच्या समस्येबाबत स्त्रीरोग तपासणी आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
काही प्रकरणांमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याचे पर्याय महिलांना या स्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात. अकाली रजोनिवृत्तीची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे महिलांना त्यांचे प्रजनन आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकते असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोजतज्ज्ञ डॉ श्रेया शेळके यांनी सांगितले.
आमच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांमध्ये तिशी उलटल्यानंतर आणि चाळीशीच्या सुरुवातीलाच अकाली अंडाशय निकामी होत असल्याची समस्या आढळून येते, ज्यामुळे अकाली रजोनिवृत्तीची समस्या उद्भवते. गेल्या २ ते ३ महिन्यांत, ओपीडीमध्ये दाखल झालेल्या दहा पैकी एका महिलेला अकाली रजोनिवृत्ती झाल्याचे आढळून आले. हे केवळ महिलांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करत नाही तर हाडे कमकुवत करते, हृदयरोग आणि भावनिक आरोग्य समस्यांचा धोका देखील वाढवते.
अकाली रजोनिवृत्ती ही अनुवंशिकता, दीर्घकालीन ताण, धूम्रपान, मद्यपान, पुरक आहाराची कमतरता आणि स्वयंप्रतिकार स्थितींमुळे होऊ शकते. महिलांना यामुळे अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सोनवणे यांनी सांगितले.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी- या चार गोष्टी या धोक्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकतात. हे संशोधन म्हणजे भारतीय महिलांसाठीही एक स्पष्ट संकेत आहे- वय ४०च्या आधीच मासिक पाळी बंद होण्याकडे दुर्लक्ष नको, ते हृदयाने पाठवलेले पहिले पत्र असू शकते!






