टीम बाईमाणूस
- 'ईठा' चित्रपटाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी नावावरील आक्षेप मागे घेतला आहे.
- दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या स्पष्टीकरणानंतर कुटुंबीयांचे समाधान झाले असले, तरी चित्रपटात 'नारायणगाव'चा उल्लेख नसल्याची खंत कायम आहे.
- 'बाईमाणूस'ने सर्वप्रथम नारायणगावात पोहोचून या वादाचा सविस्तर पाठपुरावा केला होता. आता श्रद्धा कपूरसह 'ईठा'ची संपूर्ण टीम प्रदर्शनापूर्वी नारायणगावला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित 'ईठा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने विठाबाईंची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत, तिचा दमदार लूक आणि टीझरमधील प्रभावी अभिनय यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. प्रसूतीच्या वेदना सहन करून काही वेळातच पुन्हा रंगमंचावर उभे राहून लोककलेची सेवा करणाऱ्या विठाबाईंचा संघर्ष टीझरमधून प्रभावीपणे साकारण्यात आलाय.
मात्र, चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच 'ईठा' या नावावरून आणि 'मांग' 'नारायणगावकर' हे शब्द वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी या नावाला आक्षेप घेत चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. तसेच नारायणगावचा उल्लेख करण्यात यावा अशी भूमिकाही घेतली होती. या संपूर्ण घडामोडीची दखल घेत 'बाईमाणूस'ची टीम सर्वप्रथम नारायणगावात पोहोचली. आणि कुटुंबीयांची भूमिका, त्यामागील कारणे तसेच त्यांच्या भावना थेट प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्यानंतर अनेक माध्यमांनीही या विषयाचा पाठपुरावा केला आणि हा वाद राज्यभर चर्चेचा विषय ठरला.
यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधत 'ईठा' हे शीर्षक का ठेवण्यात आले, यामागील कारण स्पष्ट केले. ग्रामीण भागात विठाबाईंना पूर्वी 'ईठा' या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या याच लोकपरंपरेला अभिवादन म्हणून चित्रपटाला हे शीर्षक देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणानंतर कुटुंबीयांचे समाधान झाले आणि त्यांनी चित्रपटाच्या नावावरील आक्षेप मागे घेतला. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात आला.

'बाईमाणूस'शी बोलताना विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर म्हणाले,
"सुरुवातीला आम्ही चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली होती. मात्र, दिग्दर्शकांनी या नावामागील कारण समजावून सांगितल्यानंतर आमचा गैरसमज दूर झाला. ग्रामीण भागात विठाबाईंना 'ईठा' या नावाने ओळखले जात होते. त्यामुळे आता या शीर्षकाबाबत आम्हाला कोणतीही हरकत नाही."
मोहित यांनी पुढे सांगितले, "हा चित्रपट अतिशय सकारात्मक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तमाशा आणि लावणी या लोककलांचा सन्मान राखत त्यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे विठाबाईंचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास या चित्रपटाची मदत होईल."
याच पार्श्वभूमीवर २८ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी श्रद्धा कपूर आणि 'ईठा'ची संपूर्ण टीम नारायणगावला भेट देणार असल्याची माहिती मोहित नारायणगावकर यांनी दिली. या भेटीदरम्यान विठाबाईंच्या स्मृतींना अभिवादन, त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तसेच नारायणगावकरांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. याचवेळी मोहित नारायणगावकर यांनी चित्रपटाचा प्रीमियर नारायणगावमध्ये आयोजित करण्याची विनंती केली आहे. या मागणीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

मात्र, शीर्षकावरील वाद मिटला असला तरी विठाबाईंची ओळख 'विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर' अशी आहे. मात्र चित्रपटात 'नारायणगाव' या नावाचा समावेश कुठेच नाहीये.
"नारायणगाव'चा संदर्भ वगळणं ही सांस्कृतिक शोकांतिका" - डॉ. मिलिंद कसबे
दरम्यान, तमाशा अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी चित्रपटाचे स्वागत करतानाच 'नारायणगाव' या संदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. कसबे म्हणाले,
"तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं स्वागतच आहे. श्रद्धा कपूरसारखी अभिनेत्री त्यांची भूमिका साकारत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, या चित्रपटातून 'नारायणगाव'चा संदर्भ वगळला गेला, तर ती मोठी सांस्कृतिक शोकांतिका ठरेल."
ते पुढे म्हणाले, "शेकडो वर्षांपासून नारायणगावने तमाशाची परंपरा जपली आहे. याच गावात अनेक तमासगीर घडले. अशा गावाचा संदर्भ चरित्रपटातून वगळला गेला, तर पुढील पिढीला तमाशाचा गौरवशाली इतिहास कसा सांगायचा? गेली अनेक वर्षे प्रत्येक तमासगीर आपल्या नावापुढे गावाची ओळख अभिमानाने लावत आला आहे. विठाबाईंची ओळखही 'विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर' अशीच महाराष्ट्राच्या जनमानसात रुजली आहे. आज त्या हयात असत्या, तर त्यांनी 'नारायणगावकर' ही ओळख पुसू दिली नसती. तसेच त्यांचे वडील भाऊ मांग नारायणगावकर यांनीही आपल्या समाजाची आणि गावाची ओळख मिटू दिली नसती," असेही ते म्हणाले.
व्यावसायिक माध्यमांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, "वास्तव व्यक्तिमत्त्वावर चित्रपट तयार करताना इतिहास, सामाजिक संदर्भ आणि सांस्कृतिक ओळख यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. अन्यथा भविष्यातील सांस्कृतिक इतिहास अनेक गैरसमजांनी भरलेला असेल."
ते पुढे म्हणाले, "आज तांत्रिक किंवा कायदेशीर कारणांमुळे चित्रपटात 'नारायणगाव' किंवा 'मांग' समाजाचा संदर्भ टाळला जाऊ शकतो. मात्र, लोककलेच्या इतिहासातून, तमाशाच्या परंपरेतून किंवा मराठी माणसाच्या मनातून हे संदर्भ कुणालाही पुसता येणार नाहीत."
अशातच, 'ईठा' च्या शीर्षकावरील वाद जरी संपला असला, तरी 'नारायणगाव'च्या उल्लेखाचा मुद्दा अद्याप कायम असल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या संदर्भात आणखी काही निर्णय होतो का, याकडे तमाशाप्रेमी आणि विठाबाईंचे चाहते लक्ष ठेवून आहेत.





