संजना खंडारे
कला आणि व्यापारउदीम या दोन गोष्टींनी माणसं जवळ येतात. त्यात अडथळा आला की, माणसं दुरावतात, दुखावतात, प्रसंगी एकमेकांचे मुडदेही पाडतात. पण हे काही आताच उमगलेलं वैश्विक सत्य नाही, हा मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा प्रारंभापासूनचा राजमार्ग आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायालय काय म्हणते बघा…
‘‘देशभक्त असण्यासाठी शेजारच्या पाकिस्तानमधील किंवा इतर कोणत्याही देशांमधील व्यक्तींबाबत वैमनस्यपूर्ण भावना मनात बाळगण्याची गरज नाही… जो चांगल्या मनाचा माणूस आहे तो देशात व सीमेपलीकडेही शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे आपल्या देशात स्वागतच करेल. कारण कला, क्रीडा, संस्कृती, संगीत, नृत्य अशा विविध गोष्टी राष्ट्रीयत्व, संस्कृती व देशांच्या मर्यादांच्या पलीकडच्या असतात. त्यामुळे देशादेशांत शांतता, एकता, सौहार्दतेचे वातावरण प्रस्थापित होते.’’
दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने इतक्या स्पष्ट शब्दांत कानउघडणी केल्यानंतरही भारतात अधूनमधून पाकिस्तानी कलाकारांवर असलेल्या बंदीचा वाद उफाळून येतच असतो… यावेळी हा वाद उद्भवलाय पाकिस्तानी सुपरस्टार फवाद खान यांच्या आगामी चित्रपटामुळे
अभिनेता फवाद खानचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट 9 मे रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. फवादच्या या चित्रपटाची पहिली झलक समोर आली असून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय. मात्र, नेहमीप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे.
‘सडलेले आंबे’ बाहेर पडतात. “मनसैनिकांना (मनसे कार्यकर्त्यांना) ते कचऱ्याच्या डब्यात फेकण्याचे काम करावे लागेल आणि आम्ही ते करत राहू,” असं मनसेच्या सिनेमा शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले. हे सगळं फक्त तो अभिनेता पाकिस्तानी आहे म्हणून... तो जर भारतीय असता तर त्याच्या चित्रपटाला त्याच्या अभिनयाला विरोध न करता उलट स्वागत केलं असतं, असेही खोपकर म्हणतात.
हा विरोध नेमका कशासाठी? या सगळ्याला काय पार्श्वभूमी आहे? भारतामध्ये या आधीही पाकिस्तानी अभिनेत्याच्या/ अभिनेत्रीच्या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता का? पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट बघितले जातात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘बाईमाणूस’च्या या लेखामध्ये मिळतील..
कोण आहे फवाद खान? नऊ वर्ष बॉलिवूड मधून त्याने पाय का काढला होता?...
फवाद खान हा एक पाकिस्तानी अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक, गीतकार आणि गायक आहे. फवादच्या 'जिंदगी गुलजार है' आणि 'हमसफर' सारख्या पाकिस्तानी ड्रामा सीरिजचे चाहते जगभरात आहेत. भारतातही या सीरिजचा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग आहे. याशिवाय त्याने 'खुबसूरत', 'ए दिल है मुश्कील' आणि 'कपूर अँड सन्स'सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आल्याने, तो कोणत्याही सिनेमामध्ये दिसून आला नाही.
2016 ला उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आल्याने करण जोहर निर्मित कॅटरिना कैफसोबतच्या चित्रपटाचे शूटिंगही फवाद खानला मध्येच थांबवावे लागले, हा सिनेमा अखेर पूर्ण झालाच नाही. आता फवाद खान वाणी कपूरसह 'अबीर गुलाल' या सिनेमात झळकणार आहे.
|
हे लेख पण वाचा : १) बाकी सगळं ठीक आहे, पण हिरामंडीची तवायफ ‘वेश्या’ कशी झाली हे भन्साळी का सांगत नाहीत…? |
काय म्हणाले मनसेचे अमेय खोपकर..?
मनसेच्या सिनेमा शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून त्यात त्यांनी म्हटले आहे, "पाकिस्तानी कलाकारांसह चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाहीत, असे पक्षाने अनेक वेळा सांगितले असले तरी काही ‘सडलेले आंबे’ बाहेर पडतात. मनसैनिकांना (मनसे कार्यकर्त्यांना) ते कचऱ्याच्या डब्यात फेकण्याचे काम करावे लागेल आणि आम्ही ते करत राहू. आम्ही ‘अबीर गुलाल’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना खूश करायचे आहे ते करू शकतात, पण त्यांना आमच्याशी सामना करावा लागेल."
"निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हाच आम्हाला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती मिळाली. परंतु आम्ही हे स्पष्ट करत आहोत की आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही कारण त्यात पाकिस्तानी कलाकार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अशा चित्रपटांना राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. आम्ही चित्रपटाबद्दल अधिक माहिती जमा करत आहोत आणि लवकरच संपूर्ण निवेदन जारी करू, असे खोपकर म्हणतात.
यापूर्वी देखील फवाद खानच्या सिनेमाला मनसेने विरोध केला होता. 2014 मध्ये ‘खूबसूरत’ या पहिल्या हिंदी चित्रपटात फवादने काम केलं होतं. यानंतर तो आलिया भट्टच्या ‘कपूर अँड सन्स’ आणि अनुष्का-रणबीरसह ‘ए दिल हैं मुश्किल’मध्ये झळकला होता. आता जवळपास ८ ते ९ वर्षांनी फवाद कमबॅक करत आहे. याआधी त्याच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या सिनेमावरून देखील वाद झाला होता.
सुप्रीम कोर्टाचा होकार आहे तर तुम्ही का नकार देत आहेत...
पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दीड वर्षांआधीच फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला इतका संकुचित विचार करू नका, असे सांगितले होते. . 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर 7 वर्षांची बंदी घातली होती, जी आता 2023 मध्ये संपली आहे.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदौस पी. पुनीवाला यांच्या खंडपीठाने फेटाळताना "देशभक्त होण्यासाठी शेजारील देशातील लोकांचा द्वेष करणे योग्य नाही, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. देशभक्त असणे म्हणजे आपल्या देशाला समर्पित असणे. नृत्य, कला, संगीत, संस्कृती, शांतता, सौहार्द आणि देशात आणि सीमेपलीकडे शांतता वाढवणाऱ्या उपक्रमांचे स्वागत करा." असे म्हटले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईत मनसे कडून फवाद खानला आणि त्याच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाला विरोध होत आहे.
'तीन खान'ने रचला कट...
पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खानने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करू देण्यासाठी कट रचल्याचा आरोप वर्षभरापूर्वी केला होता. आपल्या एका पोस्टमध्ये नादिया म्हणते की, "भारतीय लोकांचं पाकिस्तानी कलाकारांवर खरंच प्रेम आहे. ते तिथे किती लोकप्रिय आहेत याची आपल्याला कल्पना नाही. आमचे कलाकार खूप मेहनती आहेत. त्यांचं काम जगभरात पाहिलं जावं असं त्यांना वाटतं. भारतात पाकिस्तानी कलाकारांचे खूप चाहते आहेत, त्यामुळेच तिन्ही खान असुरक्षित आहेत. कारण त्यांच्याकडे या वयाचे चांगले स्टार्स नाहीत."
भारत पाकिस्तान वादाची काय कारणे आहेत?
भारत आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद, काश्मीर यासारख्या मुद्दयांमुळे दीर्घकालीन गुंतागुंतीचे संबंध आहेत. सीमापार दहशतवादामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत पाकिस्तान वाद इतिहास संघर्ष, प्रादेशिक वाद आणि राजकीय तणावांच्या मालिकेने भरलेला आहे. फाळणीपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत.
- जानेवारी 2016 मध्ये भारतातील पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी ताणले गेले.
- 14 फेब्रुवारी 2019 ला काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 हून अधिक भारतीय निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ला जबाबदार धरले.
- 27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर हवाई हल्ले करून भारतीय लढाऊ विमान पाडले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला.
- 28 फेब्रुवारी 2019 ला हवाई चकमकीत विमान पाडल्यानंतर ताब्यात घेतलेला भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तानने सोडले.
- भारताने आपल्या संविधानातील कलम 370 रद्द केले, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरला विशेष स्वायतता मिळाली आणि हा प्रदेश पूर्णपणे भारतीय संघराज्यात समाकलित झाला. पाकिस्तानने भारताच्या या कृतीचा निषेध केला.
जेव्हा वाजपेयींनी नवाज शरीफांशी बोलण्यासाठी दिलीप कुमार यांना फोन दिला…
पाकिस्तानमध्ये बॉलीवूड किती लोकप्रिय आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. आजपर्यंत पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी बॉलीवूड सिनेमाच्या प्रदर्शनाची सर्व प्रकारे मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न केले, पण ते सर्व प्रयत्न पाण्यात गेले. पाकिस्तानी जनमानसात भारतीय अभिनेते, अभिनेत्री यांची लोकप्रियता खोलवर रुजलेली आहे व ती आजही कायम आहे. दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान हे भारतीय अभिनेते पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पाकिस्तानी नेतेही याला अपवाद नाहीत. त्यांनाही बॉलीवूडबद्दल प्रचंड आकर्षण आहे.
चित्रपट समीक्षक आणि आघाडीचे सिने ब्लॉगर अमोल उदगीरकर यांनी यासंदर्भात कारगिल युद्धादरम्यानचा एका किस्सा सांगितला. ते म्हणतात, भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये बॉलीवूडचे महत्त्व ज्या मोजक्या भारतीय नेत्यांना माहीत आहे, त्यापैकी एक म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. वाजपेयी स्वतः चित्रपट रसिक आणि कवी असल्यामुळे त्यांना हे महत्त्व लक्षात येते.
पाकिस्तानशी संबंध सुधारावेत, म्हणून वाजपेयींनी स्वत:हून प्रयत्न केले. अमृतसर-लाहोर बसला हिरवा झेंडा दाखवून ते भारतीय शिष्टमंडळासोबत बसने गेले. या शिष्टमंडळात त्यांनी आवर्जून प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांना समवेत नेले. देव आनंद यांचा जन्म पाकिस्तानमध्ये असणाऱ्या नारोवल जिल्ह्यात झाला. त्यांना आपल्या जन्मभूमीबद्दल जिव्हाळा होताच. शिवाय ते त्या वेळचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे चाहतेही होते.
हे सर्व लक्षात घेऊन वाजपेयींनी देव आनंद यांना बरोबर नेले. इतकेच नव्हे, तर कारगील युद्ध उद्भवल्यानंतर त्यांना बॉलीवूडच्या मार्फत पाकिस्तानी नेत्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी त्यांच्या ‘नायदर अ हॉक, नॉर अ डव’ या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. कसुरी यांना ही माहिती पाकिस्तानच्या प्रशासनातील एक ज्येष्ठ अधिकारी सईद मेहदी यांच्याकडून कळली.
कारगीलमध्ये पाकिस्तान सैन्याने घुसखोरी केल्याची आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले शिखर पाकिस्तानने घेतल्याची बातमी कळताच वाजपेयी उद्विग्न झाले. आपण उभय देशांदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे एवढे प्रयत्न करत असताना पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसला, अशी वाजपेयींची भावना झाली. या उद्विग्न मन:स्थितीत त्यांनी नवाझ शरीफ यांना फोन केला.
जेव्हा वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला, तेव्हा सईद मेहदी त्यांच्या समोरच बसले होते. फोनवर वाजपेयींनी पाकिस्तानच्या विश्वासघातकी कृत्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान असलेल्या नवाझ शरीफ यांना अंधारात ठेवून ही घुसखोरी केली असल्याने शरीफ यांनाही धक्का बसला होता. हे संभाषण सुरू असताना वाजपेयींनी विनंती केली की, मी एका व्यक्तीकडे फोन देत आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला.
समोरून जो आवाज आला तो एकून शरीफ यांना दुसरा धक्का बसला. फोनवर त्यांचे लाडके अभिनेते दिलीप कुमार होते. दिलीप कुमार म्हणाले, ‘मियां साहेब, हे तुम्ही काय करत आहात? आम्ही तर तुम्हाला शांतता प्रक्रियेचे समर्थक समजतो? तुम्ही जे काही करत आहात त्याचे गंभीर परिणाम भारतीय मुसलमानांवर होतील. तरी तुम्ही लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणा.’
बॉलिवूड हे सॉफ्ट टार्गेट
भारत-पाकिस्तान संबंध आणि बॉलीवूड यांच्यातल्या संबंधाला अजून एक कंगोरा आहे, तो दोन्ही बाजूच्या कट्टरतावाद्यांचा. बॉलीवूड हे सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे ते दोन्ही बाजूच्या कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असते. बॉलीवूड चित्रपटांची प्रचंड लोकप्रियता पाकिस्तानी राष्ट्रवाद्यांना पाहवत नाही. शिवाय भारतातील शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हे मुस्लिम नट पाकिस्तानमध्ये मोठे सुपरस्टार आहेत, हेही त्यांना रुचत नाही.
ही खान मंडळी धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक भारताचे प्रतीक आहे, असं त्यांना वाटतं. शिवाय हे मुस्लिम नट हिंदू मुलींशी लग्न करतात आणि आपल्या मुलांवर हिंदू संस्कार करतात, शिवाय पडद्यावर हिंदू पात्र साकारतात. त्यामुळे ही मंडळी धर्मबाह्य काम करतात, असा आरोप हे कट्ट्ररतावादी करत असतात. शाहरुख खानने मध्यंतरी सहिष्णूतेवर एक भाष्य केलं, तेव्हा बराच वाद झाला.
सोशल मीडियात शाहरुख खानवर अतिशय जहरी टीका केली गेली. त्याच्या देशप्रेमावर संशय घेण्यात आला. हे वातावरण हाफिज सईदसारख्या कुख्यात दहशतवाद्याला सुवर्णसंधीसारखं वाटलं. त्याने ट्विटरवर शाहरुख खानला पाकिस्तानचा नागरिक बनण्याचं आमंत्रण दिल. भारतात मुस्लिम लोकांची कशी गळचेपी होते, हे दाखवून देण्याचा त्याचा उद्देश होता. त्याला अनुकूल प्रतिसाद आपल्याकडच्या कट्टरतावाद्यांनी दिला.
जणू शाहरुखच पाकिस्तानला मला तुमचं नागरिकत्व द्या अशी विनंती करायला गेला होता, अशा आविर्भावात या कट्टरतावाद्यांनी शाहरुखखानवर जहरी टीका सुरू केली. त्याने पाकिस्तानला निघून जावं, अशी त्यांची भूमिका होती. हाफिज सईदने टाकलेला हा डाव यशस्वी ठरला.
दोन्ही बाजूच्या कट्टरवाद्यांना उभय देशांत कोणतीही सांस्कृतिक देवाणघेवाण नको आहे. पाकिस्तानी कलाकार आपल्याकडच्या कट्टरवाद्यांना नको असतात, तर बॉलीवूड चित्रपटांचं प्रदर्शन पाकिस्तानी कट्टरतावाद्यांना नको असतं. सांस्कृतिक साहचर्य वाढून दोन्ही देशांमधले संबंध सुधारले तर आपली जहाल विचारसरणी पोरकी होईल, अशी साधार भीती त्यांना वाटते.






