शंतनू खुजे
- पुजारींचं बनले रुग्ण आणि आरोग्य व्यवस्थेतील दुवा…
- पुजाऱ्यांना दिलं गेलंय मलेरियाची लक्षणे ओळखण्याचं प्रशिक्षण..
- गडचिरोली जिल्ह्यातील २००० पैकी जवळपास १२०० पुजाऱ्यांचं समुपदेशन
गडचिरोलीमध्ये तब्बल २७०० पुजारी सध्या कार्यरत आहेत. झाडफूक करणं, मंत्राच्या उच्चारात आदिवासींचा आजार दूर करण्याचा दावा करणं, कधीकधी अघोरी कृत्य करणं ही त्यांची कामं… गडचिरोली भागात आजही किमान 40 टक्के आदिवासी आजार बरा करण्यासाठी अशा पुजाऱ्यांवर विश्वास ठेवतात. ताप आल्यावर कोण्या पुजाऱ्याकडे नेणं आदिवासींसाठी काही नवीन नाही. त्यामुळे आजाराचे निदान तर लागतच नाही आणि अनेकजण उपचाराअभावी मरण पावतात.
अशा या अतिदुर्गम गडचिरोलीमध्ये ‘काट्याने काटा काढतात’ या उक्तीप्रमाणे प्रशासनाने काम करायचं ठरवलं आहे. गडचिरोलीमध्ये मलेरियाचे प्रमाण भयंकर आहे. त्यामुळे या आदिवासीबहुल जिल्ह्यात मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने याच स्थानिक पुजाऱ्यांना सामावून घेण्याची एक नाविन्यपूर्ण पद्धत अवलंबली आहे. गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचा वैद्यकीय उपचारांपेक्षा पारंपरिक श्रद्धांवर जास्त विश्वास आहे.
ताप आल्यास तो डासांमुळे नाही, तर वाईट शक्तीमुळे किंवा देवाच्या नाराजीमुळे आला आहे असा त्यांचा समज असतो. त्यामुळे आजारी पडल्यावर रुग्ण डॉक्टरांकडे न जाता आधी गावातील पुजाऱ्याकडे जातो. तिथे पूजा आणि झाडफूंक करण्यात चार-पाच दिवस वाया जातात आणि या विलंबामुळे मलेरिया मेंदूत जाऊन रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. या परंपरेला थेट विरोध करून लोकांना दुरावण्यापेक्षा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने पुजाऱ्यांनाच रुग्ण आणि आरोग्य व्यवस्था यांच्यातील दुवा बनवण्याचा निर्णय घेतला.
“आधी मी काय करायचो की, जर पेशंटला ताप असला तर आम्ही त्याच्यावर झाडफूक करायचो. मग ४-५ दिवस किंवा एक हफ्ता यातचं निघून जायचा आणि कधी कधी पेशंटचा त्यातच मृत्यू होऊन जायचा.”
असं गडचिरोली जिल्ह्याच्या पेकीनमुडझा गावातील ४४ वर्षीय भानुदास सोनुले ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतात.
भानुदास सोनुले(पुजारी)
सोनुले हे गेल्या १० वर्षांपासून भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांत झाडफूक करत आहेत. हा मंत्र, तांदळाचे दाणे आणि श्रद्धेवर आधारित एक उपचार विधी आहे.आजार किंवा भुताटकी ओळखण्यासाठी आणि त्यांना पळवून लावण्यासाठी अंगावर तांदूळ टाकले जातात, मोजले जातात किंवा जमिनीत दाबले जातात, असा सोनुलेंचा दावा आहे.
पण आता सोनूले यांचा दृष्टीकोन बदलायला सुरूवात झालीये. ते सांगतात, “ आता तसं काही नाही, सध्या एखादा आदिवासी माझ्याकडे आला आणि त्याला मलेरियाचं निदान झालं तर मी त्याला लगेच आशा वर्करकडे पाठवतो. मलेरिया आहे की नाही हे कशा पद्धतीनं तपासायचं याचं आम्हाला अलीकडच्या काळात प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
’’गावातील आशा वर्कर्सदेखील पुजाऱ्यांच्या या म्हणण्याला दुजोरा देतात. हेटी गावातील ५८ वर्षीय आशा वर्कर सुरेखा उसेंडी सांगतात, जर रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह निघाला तर परिसरातील पुजारी त्यांना आमच्याकडे पाठवतात आणि मग आम्ही त्याला रुग्णालयात दाखल करू घेतो, तिथं त्याच्यावर योग्य ते उपचार होतात.”
पुजाऱ्यांनाच बनवलं रुग्ण आणि आरोग्य व्यवस्थेतील दुवा..
या प्रक्रियेअंतर्गत आरोग्य विभाग आणि स्थानिक संस्थांमार्फत गावागावातील पुजाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेतलं गेलंय. या पुजाऱ्यांना वैद्यकीय भाषेतील क्लिष्ट ज्ञान न देता अत्यंत साध्या भाषेत मलेरियाची लक्षणं ओळखण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि ताप हा वाईट शक्तीमुळे नाही तर डास चावल्यामुळे येतो हे सुद्धा पटवून देण्यात आलं.
स्थानिक प्रशासनाने पुजाऱ्यांसमोर एक पर्याय ठेवला आहे, ज्यानुसार पुजाऱ्यांनी त्यांची पूजा आणि झाडफूंक सुरूच ठेवावी, परंतू त्यासोबतच रुग्णाला आशा सेविकांकडे किंवा दवाखान्यात जाऊन गोळी घेण्यासही सांगावं. आदिवासी लोक पुजाऱ्याचा शब्द प्रमाण मानतात, त्यामुळे जेव्हा पुजारी स्वतः सांगतो की देवाची शांती झाली आहे आता जाऊन गोळी घे, तेव्हा रुग्ण लगेच औषधोपचारासाठी तयार होतो.

मलेरियाची लक्षणे ओळखण्यासाठी दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाबाबत भानुदास सोनुले सांगतात की, “एक पांढरी काडी पट्टी आहे. ती रुग्णाच्या बोटाला छोटी सुई टोचून नंतर रक्ताचा एक थेंब त्या काडीवर टाकतो आणि वरून पाण्यासारखं दोन थेंब औषध टाकतो. पंधरा-वीस मिनिटे थांबलं की त्या काडीवर लाल रेषा येतात. नंतर काडीवर जर दोन रेषा आल्या की आम्ही समजून जातो की याला मलेरियाचा डास चावलाय. मग त्याला आम्ही आशा सेविकांकडे पाठवतो.
आतापर्यंत १२०० पुजाऱ्यांचे समुपदेशन..
गडचिरोलीचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वडीवे याबाबत सांगतात, "आतापर्यंत, आम्ही आमच्या स्तरावर १७५९ पुजाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद केली आहे. १ एप्रिल २०२५ पासून सुरू असलेल्या आमच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी १२०० जणांचे आम्ही आतापर्यंत समुपदेशन केले आहे. जिल्ह्यात पुजाऱ्यांची एकूण संख्या २००० हून अधिक आहे."
पुढे त्या म्हणतात, “या पारंपारिक उपचार करणाऱ्यांना तापाचा कोणताही रुग्ण आशा सेविकांकडे पाठवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. जानेवारी २०२६ पासून, त्यांनी २७ रुग्णांना पाठवले आहे, त्यापैकी चौघांना मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले आहे. जेव्हा एखादा पुजारी रुग्णाला पाठवतो तेव्हा त्याला १५ रुपये मिळतात आणि जर त्या रुग्णाला मलेरिया असल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांना ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळतो,"
५०० रुपये भत्ता मिळेल असं प्रशासनाकडून सांगितलं गेलं असलं तरी अजून आपल्याला पैसे वगैरे मिळाले नसल्याचं पुजारी सोनुले सांगतात. “रुग्ण ओळखून पुढे पाठवल्यास काही पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय, पण अजूनपर्यंत असे पैसे मिळाले नाही. पण ते मिळत नसतील तरीही एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही हे करत राहू.”
हे ही वाचा : ‘’मलेरियाने माझा मुलगा अन् नवरा बी मेला’’... गडचिरोलीमध्ये तापमान बदलाचा आणि डासांचा काय आहे संबंध?
मलेरियाच्या बाबतीत गडचिरोली अत्यंत संवेदनशील
गडचिरोली हा महाराष्ट्रातील मलेरियासाठी अत्यंत संवेदनशील जिल्हा मानला जातो. महाराष्ट्रातील एकूण मलेरिया रुग्णांपैकी जवळपास ५०% ते ६०% रुग्ण एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. २०२४ मध्ये तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८% रुग्ण याच जिल्ह्यातून होते. जिल्ह्यात आढळणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे Plasmodium Falciparum या प्रकारच्या मलेरियाचे असतात, जो अधिक घातक मानला जातो.
याच पार्श्वभूमीवर मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिल २०२५ पासून गडचिरोलीमध्ये 'मलेरिया निर्मूलन आराखडा' राबवण्यास सुरुवात केली. यासाठी साधारण २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.२०२२ मध्ये केंद्र सरकारच्या अहवालानुसार, भारतातील १० सर्वात जास्त मलेरिया-ग्रस्त जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होता, जिथे वार्षिक परजीवी प्रादुर्भाव १ पेक्षा जास्त होता. त्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे हा धोका आणखी वाढतो. जिल्ह्याचा ७० टक्क्यांहून अधिक भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे, सरासरी वार्षिक पर्जन्यमान १७०० मिमी आहे आणि लोकसंख्येचा मोठा भाग डास प्रतिबंधक जाळीशिवाय घराबाहेर झोपतो, त्यामुळे संक्रमण जास्त राहते.
मलेरियामुळे मृत्यूची नोंद झालेल्या भागात विशेष मोहिमा
गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना सांगितले की, "जुलै ते ऑगस्ट आणि डिसेंबर ते जानेवारी या दोन ऋतूंमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या सहसा वाढते."
गडचिरोलीमध्ये २०१३ साली मलेरियाचे ६,४३६ रुग्ण आढळले होते, ही संख्या २०१५ मध्ये वाढून ३४,२०६ वर पोहोचली. त्यानंतरच्या वर्षांत रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, २०२१ मध्ये पुन्हा वाढ होऊन १२,३२६ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात हा आजार अजूनही कायम असून, २०२५ मध्ये ७,२९३ रुग्ण आणि १४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या नव्या उपक्रमाचे लक्ष्य एक दीर्घकाळ चालत आलेली पोकळी भरून काढणे आहे आणि ती पोकळी म्हणजे ताप आल्यापासून ते वैद्यकीय निदान होण्यापर्यंत वाया जाणारा वेळ. अनेक गावांमध्ये, कुटुंबे आधी पुजाऱ्यांचा सल्ला घेतात, अनेकदा आजाराला दुष्ट प्रवृत्ती किंवा काळी जादू कारणीभूत असल्याचे मानतात.
संसर्गाचे लवकर निदान करण्यासाठी, जास्त परजीवी प्रादुर्भाव पातळी असलेल्या गावांमध्ये आणि मलेरियामुळे मृत्यूची नोंद झालेल्या भागात विशेष मोहिमा राबवल्या जातात. पुजाऱ्यांना या प्रणालीत आणणे आता या प्रयत्नांचे मुख्य लक्ष बनले आहे.
आगामी काळात, त्यांना रॅपिड डायग्नोस्टिक किट्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याचीही अपेक्षा आहे. "बाळंतपण, नियमित तपासणी, सिकलसेल, ॲनिमिया यांसारख्या इतर आरोग्यविषयक समस्यांची माहिती देण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी आम्ही त्यांना सामावून घेणार आहोत," असे डॉ. शिंदे सांगतात.
पुजाऱ्यांची भूमिका मध्यवर्ती - डॉ.अभय बंग
तीन दशकांहून अधिक काळापासून, गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेली 'सर्च' ही स्वयंसेवी संस्था अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्यरत आहे. आहे. सध्या सुरु असलेल्या या नवीन प्रयत्नात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत ही संस्था काम करत आहेत.
'सर्च'चे संस्थापक डॉ.अभय बंग बाईमाणूसशी बोलतांना म्हणाले की, "आमच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, बहुतांश आदिवासी लोक ताप आल्यावर सर्वप्रथम त्यांच्या पारंपारिक उपचार करणाऱ्याकडे जातात. परंतु हा विलंब, अगदी काही दिवसांचा असला तरी, प्राणघातक ठरू शकतो."

पुजाऱ्यांची मध्यवर्ती भूमिका समजावून सांगताना ते म्हणतात, "बाळंतपण, मृत्यू, लग्न, गृहप्रवेश किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी पुजाऱ्यांची गरज असते.आदिवासी समाजात, या पुजाऱ्यांना समाजाला संरक्षक कवच देणारे मानले जाते."
ही व्यवस्था बदलण्याऐवजी, 'सर्च'ने त्याच व्यवस्थेत राहून काम करणे पसंत केले. "हा श्रद्धा आणि वैद्यकीय विज्ञान यापैकी एकाची निवड करण्याचा प्रश्न नाही; हा जगण्याचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना सांगितले की जर दोन्ही उपचार एकाच वेळी झाले, तर रुग्ण दगावणार नाहीत," असे डॉ. बंग म्हणतात.






