विक्रांत पाटील
- 10-10 मुले जन्माला घालणाऱ्या मुस्लिमांचा भारतातील हिंदूंना धोका" हा उजव्या पक्षांनी जनतेच्या डोक्यात उभा केलेला बागुलबुवा!
- प्रत्यक्षात काय आहे धर्मनिहाय प्रजनन क्षमतेची स्थिती?
राज्याच्या काही प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिका निवडणूक कामाच्या निमित्ताने गेले काही दिवस प्रत्यक्ष फील्डवर फिरण्याचा योग आला. अनेक "नॅरेटिव्ह" निवडणूक काळात, वेगवेगळ्या पातळ्यांवर पसरवले जात होते. यातला सर्वात घातक म्हणजे - मुस्लिमांचा हिंदूंना असलेला धोका! हिंदूंची लोकसंख्या भयानक वेगाने कमी होत आहे आणि मुस्लिमांची भयानक वेगाने वाढत आहे!
जर, एका विशिष्ट उजव्या पक्षाला मत दिले गेले नाही, तर येत्या काही वर्षांत 10-10 मुले जन्माला घालणाऱ्या मुस्लिमांचे देशावर राज्य असेल!! अनेक मतदार या "नॅरेटिव्ह"ला सहजपणे बळी पडलेले दिसत होते. विशेषत: रिटायर मंडळी आणि काही बैठांकातील तरुण मंडळी! यांना अशा जबरदस्त पद्धतीने संमोहित केले गेले होते की, समजावणे कठीण!
दुसरीकडे, महिला वर्ग आपला लाडका भाऊ आपल्याला पैसे देतोय, या भ्रमातून अन् त्या कथित उपकाराच्या ओझ्यातून अजून बाहेर पडलेल्या दिसत नाहीत. तूर्तास, इतर "नॅरेटिव्ह" बाजूला ठेवूया अन् सर्वसामान्य जनतेच्या मनात उभ्या केल्या गेलेल्या मुस्लिमांच्या "भोकाडी"बद्दल वस्तुस्थिती जाणून घेऊया. 
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात, 10-10 मुले जन्माला घालणारे कोणतेही बहाद्दर कुटुंब दाखवून द्या. कोणत्याही जाती-धर्माचे दाखवून द्या. बघा, तुमच्या आजूबाजूला शोध घेऊन, मिळते का एक तरी....?
सध्या संपूर्ण जगभरात, सर्वच जाती-धर्मात, निरंतर खालावत चाललेली प्रजननक्षमता हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय होत चालला आहे. प्रजननक्षमता दर, म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट (TFR) जगभर वेगाने घसरत आहे. जागोजागी IVF फर्टिलिटी सेंटर्सची दुकाने दिसू लागली आहेत, ती काही उगाच नव्हे! पुरुष आणि महिलांच्या प्रजनन दरावर वय, अनुवंशशास्त्र, जीवनशैली (धूम्रपान, मद्यपान, वजन, आहार), वैद्यकीय परिस्थिती (पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल समस्या, शुक्राणू विकार) आणि पर्यावरणीय घटक (विषारी पदार्थ, उष्णता, रेडिएशन) यांचा परिणाम होत आहे. महिलांमध्ये, ओव्हुलेशन, फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या समस्या; तर पुरुषांमध्ये, शुक्राणूंची संख्या, गतिशीलता प्रभावित होत चालली आहे.
NFHS-5 डेटा (2019-2021) वर आधारित, संपूर्ण भारतातील धर्मानुसार TFR पुढीलप्रमाणे आहे:
- हिंदू: 1.94
- मुस्लिम: 2.3
- ख्रिश्चन: 1.88
- बौद्ध/नव-बौद्ध: 1.39 (देशातील सर्वात कमी)
- जैन: 1.6
- शीख: 1.61
महाराष्ट्रातही प्रजनन दर समुदायानुसार बदलतात, मुस्लिमांमध्ये सामान्यतः हिंदूंपेक्षा जास्त दर असले तरी वेगाने फर्टिलिटी कमी होत आहे. NFHS-5 नुसार, राज्याचा सरासरी TFR 1.7 आहे. म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले (सरासरी) कुणी जन्माला घालू शकत नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्रात तर एकूण प्रजनन क्षमता प्रतिस्थापन पातळी ही राष्ट्रीय सरासरी 2.1 पेक्षा कमी आहे.
पुरुषांमध्ये वाढत्या वंध्यत्वाची कारणे
- शुक्राणूंच्या समस्या: शुक्राणूंची संख्या कमी, हालचाल कमी असणे किंवा आकारात असामान्यता असणे.
- हार्मोनल असंतुलन: शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम.
- संरचनात्मक समस्या: स्खलन नलिका किंवा व्हॅस डेफरेन्समध्ये अडथळा.
- वैद्यकीय स्थिती: व्हॅरिकोसेल (अंडकोषातील वाढलेल्या शिरा), संसर्ग, अनुवांशिक विकार.
- जीवनशैली: धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज, लठ्ठपणा, जास्त उष्णतेचा संपर्क (हॉट टब, घट्ट अंडरवेअर), काही औषधे.

महिलांमध्ये वाढत्या वंध्यत्वाची कारणे
- वय: प्रजनन क्षमता 20 व्या वर्षी शिखरावर पोहोचते आणि 35 व्या वर्षानंतर लक्षणीयरीत्या कमी होते.
- ओव्हुलेशन विकार: पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), अकाली ओव्हुलेशन निकामी होणे किंवा हार्मोनल असंतुलन नियमित ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय आणतात.
- संरचनात्मक समस्या: ब्लॉक झालेल्या फॅलोपियन ट्यूब (संसर्ग, शस्त्रक्रियेमुळे) किंवा फायब्रॉइड्स, पॉलीप्स आणि जन्मजात विकृतींसारख्या गर्भाशयाच्या समस्या.
- वैद्यकीय स्थिती: एंडोमेट्रिओसिस, थायरॉईड समस्या आणि संसर्ग.
- जीवनशैली: कमी वजन किंवा जास्त वजन असणे, धूम्रपान करणे, जास्त मद्यपान करणे, जास्त व्यायाम करणे, जास्त ताणतणाव.
स्त्री अन् पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे सामायिक घटक
- वजन: लठ्ठपणा आणि कमी वजन दोन्ही प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतात.
- पदार्थांचा वापर: धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचा वापर प्रजनन क्षमता कमी करतो.
- पर्यावरणीय संपर्क: विषारी पदार्थ, कीटकनाशके आणि किरणोत्सर्ग.
- जुनाट आजार: मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर.
- अनुवंशशास्त्र: गुणसूत्रांच्या समस्या दोन्ही जोडीदारांमध्ये प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात.






