रितेश शिसोदे
- सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय, स्टेडियममध्ये चाहत्यांचा जल्लोष उसळतोय आणि देशभर क्रिकेटचा उत्सव रंगतोय.
- पण या चमकदार सोहळ्याच्या बरोबरीनेच एक दुसरीच लढाई सुरू आहे. ही लढाई आहे उष्णतेशी, दमट हवेशी, प्रदूषणाशी आणि अनिश्चित हवामानाशी.
- यंदाच्या हंगामातील अनेक सामने धोकादायक उष्णतेच्या परिस्थितीत खेळवले गेले, तर काही शहरांत खराब हवेचाही प्रश्न गंभीर ठरला.
- क्रिकेट हा भारताचा आवडता खेळ असला, तरी हवामान बदलामुळे आता त्याच खेळाचं भविष्यच प्रश्नचिन्हाखाली येऊ लागलं आहे.
भारतात उन्हाळा आता फक्त ऋतू उरलेला नाही, तो इशारा बनला आहे. एप्रिल-मे महिन्याच्या दिवसांत तापणारी शहरं, संध्याकाळीही न ओसरलेला उकाडा, अचानक बरसणारा अवकाळी पाऊस, धुळीची वादळं आणि दमट हवेत वाढलेला थकवा ही नवी वास्तवता आहे. अशा काळात देशातील सर्वात मोठी, सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक नफा कमावणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, अर्थात आयपीएल... मैदानात चौकार-षटकारांचा उत्सव असतो, सोशल मीडियावर जल्लोष असतो, ब्रँड्सची आतषबाजी असते. पण या चमकदार सोहळ्याच्या आड एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हवामान बदलाचा फटका क्रिकेट जगतालाही बसू लागला आहे का?
उत्तर अर्थातच होकारार्थी आहे.
क्रिकेट हा मुळातच हवामानावर अवलंबून असलेला खेळ. खुलं मैदान, नैसर्गिक प्रकाश, खेळपट्टीची आर्द्रता, वाऱ्याची दिशा, तापमान, दवबिंदू, पावसाचा अंदाज या सगळ्यावर सामन्याचं गणित ठरतं. म्हणूनच हवामान बदल ही फक्त पर्यावरणाची किंवा विज्ञानाची बाब राहिलेली नाही; ती आता पर्यावरणीय नुकसानाची, क्रीडा व्यवस्थापनाची, खेळाडूंच्या आरोग्याची आणि चाहत्यांच्या अनुभवाची बाब बनली आहे.
तापलेल्या शहरांतील सामने
आयपीएलचा मोसम नेहमीच उन्हाळ्यातच होतो. मार्चच्या शेवटापासून मे अखेरपर्यंत देशातील अनेक शहरांत तापमान ३८ ते ४५ अंशांच्या घरात पोहोचतं. राजस्थान, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, नागपूर, मुंबई कोणतही शहर निवडा, प्रत्येक शहर वेगळ्या प्रकारच्या उष्णतेचा अनुभव घेत असतं. कुठे कोरडी लाट असते, कुठे दमट उकाडा, कुठे गरम वारे. सायंकाळचे सामने असले तरी दिवसाची साठवलेली उष्णता रात्रीही ओसरत नाही. काँक्रीटच्या शहरांत “हीट आयलंड इफेक्ट”मुळे स्टेडियम परिसर जास्त तापतो. फ्लडलाइट्स, गर्दी, आवाज, हालचाल यामुळे वातावरण अधिक जड होतं.

‘हिट फॉर सिक्स: द डेंजर झोन’ या आयपीएलवर आधारित संशोधन अहवालाने याच पार्श्वभूमीवर चिंताजनक वास्तव समोर आणले आहे. हंगामातील तब्बल निम्मे सामने हीट इंडेक्सनुसार ‘एक्स्ट्रीम कॉशन’ किंवा ‘डेंजर’ अशा श्रेणीत खेळवले गेले. हीट इंडेक्स म्हणजे केवळ तापमान नव्हे, तर हवेतला दमटपणा लक्षात घेऊन शरीराला प्रत्यक्ष किती उष्णता जाणवते, याचं मोजमाप. तापमान ३२ अंश असलं, तरी दमट हवा असेल तर शरीरावरचा ताण ४० अंशांपेक्षा जास्त जाणवू शकतो. याचा अर्थ मैदानावर धावणारे खेळाडू, तासन्तास उभे असलेले पंच, काम करणारे ग्राउंड स्टाफ आणि स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षक हे सर्वजण आरोग्याच्या जोखमीच्या झोनमध्ये होते.
संबंधित लेख :
ऐन उन्हाळ्यातली एक ‘त्यांची’ आयपीएल अन् एक खेड्यापाड्यातील आयपीएल अर्थात… ‘इंडियन परेशान लीग’!
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, २०२५ च्या आयपीएलदरम्यान हवेची गुणवत्ता एकदाही ‘गुड’ स्तरावर पोहोचली नाही. जवळपास निम्मे सामने ‘पुअर’ किंवा ‘अनहेल्दी’ अशा हवेच्या दर्जात खेळवले गेले. जेव्हा खेळाडू उच्च तीव्रतेने धावत असतात, तेव्हा ते अधिक खोल श्वास घेतात. त्यामुळे प्रदूषित हवा शरीरात जास्त प्रमाणात जाते. श्वसनाचे त्रास, दम लागणे, घशात जळजळ, फुफ्फुसांवर ताण वाढतो. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांत खराब हवेमुळे सामने पुढे ढकलण्याच्या चर्चा झाल्या, तर काही खेळाडूंना मास्क घालून सराव करावा लागला.
भारतातील स्टेडियमचे परिसर अधिक तापत आहेत
या अहवालानुसार भारतातील जवळपास प्रत्येक प्रमुख क्रिकेट स्टेडियम परिसरात १९७० नंतर धोकादायक उष्णतेच्या दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, मुंबई आणि नवी मुंबईसारख्या शहरांत दरवर्षी अशा दिवसांची संख्या ३८ ते ५७ ने वाढली आहे. मुंबईसारख्या दमट शहरात केवळ २९.६ अंश सेल्सियस तापमानातही उष्णतेचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तर ग्वाल्हेरमध्ये हा स्तर ४०.७ अंशांपर्यंत जातो. म्हणजे धोका फक्त तापमानात नाही, तर तापमान + आर्द्रता या संयुक्त परिणामात आहे.
पावसाने विस्कटलेलं वेळापत्रक
उन्हाळा म्हणजे फक्त उकाडा, ही समजूत आता मोडली आहे. हवामान बदलामुळे ऋतूंचे पारंपरिक पॅटर्न बदलत आहेत. एप्रिल-मे मध्ये अनेक शहरांत अवकाळी पाऊस, गडगडाटी वादळं, विजांचा कडकडाट आणि अचानक मुसळधार सरी अनुभवायला मिळतात. आयपीएलमध्ये एखादा सामना पावसामुळे उशिरा सुरू होणं, ओव्हर्स कमी होणं किंवा रद्द होणं आता क्वचितली घटना राहिलेली नाही. प्रेक्षक तासन्तास प्रतीक्षा करतात, मैदान कर्मचारी कव्हर्स ओढतात, ब्रॉडकास्ट वेळापत्रक ढासळतं, संघांच्या रणनीती बदलतात. पावसाचा प्रश्न फक्त त्या दिवसापुरता नसतो. सतत बदलणाऱ्या आर्द्रतेमुळे पिचचे वर्तन बदलते. काही मैदानांवर चेंडू जास्त थांबतो, काही ठिकाणी सीम मूव्हमेंट वाढते, काही ठिकाणी दवाचा परिणाम खेळ बदलून टाकतो.
भारतीय किनारपट्टी शहरांत मुंबई, चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम अशा भागात उष्णतेसोबत दमटपणा मोठा घटक असतो. तापमान ३४ असलं तरी शरीराला ४० पेक्षा जास्त जाणवतं. याला ‘फील्स लाईक’ तापमान म्हणतात. रात्रीच्या सामन्यांत दवबिंदूमुळे चेंडू ओला होतो. फिरकी गोलंदाजांना पकड मिळत नाही. फिल्डरच्या हातून कॅच सुटू शकतो. म्हणूनच नाणेफेक जिंकून दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा ट्रेंड वाढला. म्हणजे हवामान आता फक्त पार्श्वभूमी राहिलेलं नाही; ते सामना जिंकण्याच्या रणनितीचा भाग बनला आहे.
हवामान बदल आणि प्रदूषण या अनेकदा जोडलेल्या समस्या आहेत. दिल्लीसारख्या शहरांत हवेची गुणवत्ता गंभीर प्रश्न आहे. जरी आयपीएल उन्हाळ्यात होत असला आणि हिवाळ्याइतकी धोकादायक स्थिती नसली, तरी धूळकण, वाहनधूर, उष्णतेमुळे वाढणारे ओझोन स्तर यांचा परिणाम खेळाडूंच्या श्वसनावर होऊ शकतो. उच्च तीव्रतेच्या खेळात फुफ्फुसांवर ताण वाढतो. दमा किंवा श्वसनसंवेदनशीलता असलेल्या खेळाडूंना विशेष काळजी घ्यावी लागते. हा मुद्दा भारतात फारसा चर्चिला जात नाही.

खेळाडूंच्या शरीरावर आणि मनावरही ताण
अत्यंत उष्ण हवामानात खेळण्याचे परिणाम गंभीर असतात. निर्जलीकरण, स्नायूंना गोळे येणे, थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, हीट एक्झॉशन आणि हीटस्ट्रोकचा धोका वाढतो. खेळाडूंच्या शरीरावर त्याचा परिणाम होणं अपरिहार्य आहे. वेगवान गोलंदाजाला चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये धाव घेत वारंवार शरीर झोकावं लागतं. फलंदाजाला हेल्मेट, पॅड्स, ग्लोव्हजसह खेळावं लागतं. फील्डरला सतत धावावं लागतं. शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतं. स्नायूंना गोळे येणं, थकवा, चक्कर, निर्जलीकरण, हीट स्ट्रेस यांचा धोका वाढतो. आजकाल टाइम-आउटमध्ये स्ट्रॅटेजीपेक्षा पाण्याच्या बाटल्या अधिक महत्त्वाच्या वाटतात, हा योगायोग नाही.
आयपीएल हा टीव्हीवरील कार्यक्रम नाही; तो स्टेडियममधील सामूहिक अनुभव आहे. कुटुंबं, तरुण, मुलं, मित्रमंडळी सगळे सामना पाहायला येतात. पण उष्णतेमुळे प्रेक्षकांसाठी स्टेडियम अनुभव कठीण होत चालला आहे. लांब रांगा, पार्किंगपासून चालत येणं, गरम आसनव्यवस्था, पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव हे प्रश्न वाढत आहेत. भविष्यात स्टेडियम डिझाइनमध्ये हवामान अनुकूल बदल अपरिहार्य ठरतील. अधिक शेड, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कूलिंग झोन, मेडिकल हेल्प पॉइंट्स याशिवाय पर्याय उरणार नाही
आयपीएलचा स्वतःचा कार्बन ठसा
कोणत्याही मोठ्या क्रीडा स्पर्धा आता जगात पर्यावरणाला घातक ठरत आहेत. ऑलिम्पिक, फिफा वर्ल्ड कप, आयपीएल इत्यादी मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा लोक त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागतोच पण अशा स्पर्धांमध्ये उर्जाही मोठ्या प्रमाणात वापरली जाते, ज्यातून लाखो टन कार्बन उत्सर्जीत होतो आणि कचऱ्याचे ढिगारेही. यामुळे हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर होत चाललं आहे. यामुळे खेळाडूच नाहीतर सामान्य लोकही प्रभावित होत आहेत.
‘द हिंदू’ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, आयपीएल स्पर्धेत एका सामन्यातच 10-14 हजार टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. संपूर्ण आयोजनाच्या दरम्यान 7.5-9 लाख टन कार्बन उत्सर्जीत होतो. पर्यावरणासाठी ही घातक गोष्ट आहे. ‘अर्थ’ मध्ये आलेल्या बातमीनुसार एक क्रिकेट मैदान व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवड्याला 3 लाख लीटर्स पर्यंत पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात याचं प्रमाण आणखी वाढतं. ही भीषण परिस्थिती आहे, कारण भारतात उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आटतात आणि लोकांना पाण्यासाठी भटकावं लागतं.
प्रत्येक सामन्यात मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम मध्येच दरवर्षी 1.6 लाख युनिट वीज वापरली जाते. ज्यावर 14400 डॉलर्सचा खर्च होतो. वीजेचा खर्च जास्त वाटत असला तरीही कार्बन उत्सर्जनाचा मोठा भाग हा वाहन व्यवस्था आणि रसद पुरवठ्यातून होतो. 3.7 टक्के ग्रीनहाऊस गॅसेससाठी वाहने जबाबदार असतात. त्यामुळे त्यांच्यात बदल करणं गरजेचं आहे.
‘द वायर’ मध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, आशियाई देशांमध्ये क्रिकेट अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेट खेळणारे देश सध्या हवामान बदल उदा. उष्णतेच्या लाटा, वणवे, वादळ, दुष्काळ यांचा सामना करत आहेत. टेस्ट क्रिकेट पाच दिवस खेळलं जातं आणि त्यात खेळाडू जाडजूड पॅड, ग्लोव्ज घालतात व हेल्मेटही. यामुळे हवेचा संचार रोखला जातो. क्रिकेट आणि हवामान बदल यांच्यावरील 2019 च्या अहवालात म्हटलं आहे की एक व्यावसायिक फलंदाज एक दिवसाच्या खेळात आपल्या शरीरात तेवढीच उष्णता निर्माण करतो जेवढी एक मॅराथॉन (42 किमी) धावणारा खेळाडू. त्यामुळे अनेक खेळाडूंना उन्हामुळे थकवा, तणाव, शुद्ध हरपणे, उलटी, जुलाब, श्वसनाचा त्रास जाणवतो.
हवामान बदलाचा फटका आयपीएलला बसतो, पण मोठ्या स्पर्धा स्वतःही त्या संकटात भर घालतात, हेही मान्य करावं लागेल. संघांचे सततचे विमान प्रवास, मोठ्या प्रमाणावर वीज वापरणारे फ्लडलाइट्स, स्टेडियम ऑपरेशन्स, प्लास्टिक कचरा, जाहिरातींचं प्रचंड लॉजिस्टिक्स या सगळ्याचा पर्यावरणीय ठसा असतो.
पुढचा रस्ता आणि सुधारणांसाठी उपाय
‘स्पोर्ट अँड डेव्हलपमेंट’ मध्ये आलेल्या लेखानुसार भारतात हवामान संकट वाढवणारी धोरणं अजूनही राबवली जात आहेत. बीसीसीआय तसेच बँगलोर एफसी इत्यादी संस्थांनी आपल्या परीनं या संकटावर मात देण्यासाठी काही उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे, पण एकूण देशभरात याविषयी एकचएक योजना लागू झालेली नाही. आयपीएलने कचरा व्यवस्थापन तसेच उर्जाबचत याविषयी काम करणं सुरू केलं आहे. पण यात व्यापकता व स्थैर्य आलेलं दिसत नाही. उदा. लद्दाख फुटबॉल क्लबने स्पर्धा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी क्लायमेट कप आयोजित केला होता. पण असे उपाय स्थानिक पातळीवरच दिसून येतात. देशात अनेक ठिकाणी क्रिकेट मैदानात साचलेलं पाणी साठवणं, सोलर पॅनेल लावणं, मैदानावरील गवत आणि मातीची देखभाल करताना पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेणं यासाठी प्रयत्न करणं सुरू झालं आहे.
जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा “ग्रीन स्पोर्ट्स” संकल्पनेकडे वळत आहेत. कार्बन ऑफसेट, सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, पुनर्वापरयोग्य साहित्य, पाणी पुनर्चक्रण यावर भर दिला जातो. भारतात आयपीएलसारख्या प्रचंड प्रभावशाली स्पर्धेने या दिशेने पुढाकार घेतला तर संदेश दूरवर जाईल.

‘अर्थ’ मध्ये आलेल्या बातमीनुसार जगभरातील लोकांमध्ये हवामान बदलांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी खेळ हे एक चांगलं माध्यम ठरू शकतं. मग त्यांची भौगोलिक परिस्थिती व सामाजिकता कोणतीही असू दे. खेळांशी संबंधित अब्जावधी लोकांना खेळाच्या माध्यमातूनच पर्यावरण संरक्षणाविषयी संदेश देता येऊ शकतो. ‘सेंटर फॉर स्पोर्ट्स’च्या अहवालानुसार सरकारी योजना, उद्योगसमूह, आर्थिक प्रोत्साहन आणि पर्यावरणीय जागृती यांचाही यात समावेश करता येऊ शकेल. खेळाडू देखील कचरा व्यवस्थापन, हरित उर्जेचा वापर, उर्जाबचत याविषयी लोकांना प्रेरीत करू शकतात.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर, रिसायकलिंग, इत्यादींद्वारेही मोठा बदल घडवून आणता येऊ शकतो. खेळ केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही. समाजात जागरुकता आणि जबाबदारी निर्माण करण्याचं प्रतीकही आहे. साऱ्या जगावर हवामान बदलाचं संकट कोसळलं आहे. त्यामुळे खेळ जगतालाही पर्यावरण संरक्षणाची आपली जबाबदारी उचलावी लागणार आहे. यातून होणारं कार्बन उत्सर्जन, उर्जेची बर्बादी, नैसर्गिस संपदेचं नुकसान यावर आवाज उठवणं आता गरजेचं झालं आहे. ही प्रत्येक खेळाडूची, प्रेक्षकाची जबाबदारी आहे की त्यानं खेळांना पर्यावरणानुकूल बनवावं. पर्यावरण स्वच्छ असेल, सुरक्षित असेल तरच खेळ व खेळाडू सुरक्षित राहू शकतील.
उपाय काय?
‘हिट फॉर सिक्स: द डेंजर झोन’ अहवालाने काही ठोस उपाय सुचवले आहेत:
- उष्णता आणि वायू गुणवत्तेबाबत स्पष्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियम
- हवामान डेटा लक्षात घेऊन नियमित धोरण बदल
- स्टेडियममध्ये पर्यावरणपूरक सुविधा
- पाणी, हायड्रेशन, सावली आणि मेडिकल सपोर्ट
- अधिक रात्रीचे सामने
- वेळापत्रकात ऋतूनुसार बदल
- कमी प्रवास असलेली स्पर्धा रचना
- आच्छादित किंवा अंशतः झाकलेली स्टेडियम संकल्पना
- क्रिकेट आणि जीवाश्म इंधन उद्योगातील संबंधांचा पुनर्विचार
उद्याचं क्रिकेट कसं असेल?
जर तापमान वाढतच राहिलं, उष्णतेच्या लाटा तीव्र होत राहिल्या, पावसाचे पॅटर्न अनिश्चित झाले, तर भविष्यात स्पर्धांचं वेळापत्रक बदलू शकतं. एप्रिल-मेऐवजी वेगळ्या महिन्यांत सामने? अधिक रात्रीचे सामने? कमी प्रवास असलेली प्रादेशिक रचना? इनडोअर तंत्रज्ञानयुक्त सुविधा? हे प्रश्न आज कल्पनारम्य वाटतील, पण उद्या वास्तव ठरू शकतात. क्रिकेटने आधीच अनेक बदल स्वीकारले आहेत. टेस्टपासून टी-२० पर्यंत, DRS पासून Impact Player पर्यंत. हवामान बदल हा पुढचा मोठा बदल घडवणारा घटक ठरू शकतो.
आयपीएलमध्ये जेव्हा फलंदाज चेंडू सीमारेषेबाहेर पाठवतो, तेव्हा लाखो लोक जल्लोष करतात. पण त्या जल्लोषाच्या पलीकडे आपण एक वेगळं दृश्यही पाहायला हवं. गरम होत जाणारी शहरं, पाण्यासाठी झगडणारी गावं, अवेळी पावसाने त्रस्त शेतकरी, आणि त्याच देशात उन्हाच्या कडाक्यात खेळला जाणारा करोडोंचा उत्सव. खेळ हा समाजापासून वेगळा नसतो. तो त्याच हवेत श्वास घेतो, त्याच जमिनीवर धावतो, त्याच आकाशाखाली खेळला जातो. म्हणूनच प्रश्न फक्त एवढाच नाही की यंदाचा आयपीएल कोण जिंकेल. प्रश्न हा आहे, उद्याच्या भारतात, बदलत्या हवामानात, क्रिकेट तसंच खेळता येईल का?






