शंतनू खुजे
- १० महिन्यांची एलिन ठरली केरळची सर्वात लहान अवयवदाता.
- अपघातानंतर पालकांनी घेतला एलिनच्या अवयवदानाचा अत्यंत धाडसी निर्णय.
- एलिनच्या अवयवदानाने पाच रुग्णांना मिळाले जीवदान
केरळमधील सर्वात लहान वयाची अवयवदाता बनलेल्या १० महिन्यांच्या चिमुकल्या एलिन शेरिन अब्राहमने आपल्या छोट्याश्या आयुष्यात दिलेला हा संदेश विलक्षण आहे. जो युगायुगांपर्यंत लक्षात राहील. एका भीषण रस्ते अपघातात आपला जीव गमावल्यानंतरही, चिमुकल्या एलिनने पाच जणांना नवीन आयुष्य दिले. ही गोष्ट केवळ दुःखाची नाही, तर असीम करुणा, धैर्य आणि मानवतेची आहे, विशेषतः त्या अत्यंत वेदनादायी प्रसंगी जेव्हा तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन एन जॉन यांनी आपल्या लाडक्या मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
अपघातानंतर एलिन ब्रेन डेड….
पथनमथिट्टा जिल्ह्यातील मल्लप्पल्ली येथील रहिवासी असलेली एलिन शेरिन अब्राहम ५ फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह कोट्टायमवरून तिरुवल्ला येथे जात होती. दुपारी २.३० च्या सुमारास एमसी रोडवरील पल्लम बोर्मा कवाला जंक्शनजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात एलिनला गंभीर दुखापत झाली, तसेच तिची आई शेरिन एन जॉन आणि आजी आजोबाही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चंगनासेरी आणि तिरुवल्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती बिघडल्याने ७ फेब्रुवारी रोजी एलिनला कोची येथील अमृता रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या पथकाने दिवस-रात्र प्रयत्न केले, परंतु १३ फेब्रुवारी रोजी एलिनला 'ब्रेन डेड' घोषित करण्यात आले.
कठीण प्रसंगी आई वडिलांकडून प्रेरणादायी निर्णय…
अपघाताची ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबला धक्का बसला. परंतु याच अत्यंत दुःखाच्या प्रसंगी तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन एन जॉन यांनी असा एक निर्णय घेतला, जो संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या अवयवदानासाठी संमती दिली, जेणेकरून तिचे छोटेसे आयुष्य दुसऱ्यांच्या रूपाने जिवंत राहील.

ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक होताच, या चिमुकल्या मुलीच्या आकस्मिक आणि दुःखद मृत्यूने राज्यभरातील नागरिक सुन्न झाले आहेत, परंतु एलिनसमोर नतमस्तक होऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. केरळची सर्वात कमी वयाची अवयवदाता बनून, चिमुकल्या एलिनने पाच इतर लोकांना नवीन जीवन दिले आहे.
मुख्यमंत्री विजयन आणि अभिनेता कमल हसनकडून कौतुक
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले की, या निस्वार्थ निर्णयामुळे एलिन केरळची सर्वात लहान वयाची अवयवदाता बनली आहे. तिच्या अवयवांमुळे पाच जणांना नवीन जीवन मिळाले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी देखील या चिमुकल्या एलिनच्या पालकांच्या धाडसी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहून अरुण अब्राहम आणि शेरिन एन जॉन या दांपत्याला सलाम केला.
कमल हसन म्हणाले की, "अरुण अब्राहम आणि शेरिन एन जॉन, तुम्हा दोघांना माझा मनापासून सलाम. आपली लाडकी एलिन नऊ महिने आईच्या गर्भात वाढली आणि त्यानंतरचे १० महिने तुमच्या अथांग प्रेमाच्या सावलीत राहिली. आज तिचे हे छोटेसे आयुष्य पाच जणांना नवीन जीवन देण्यासाठी कामी आले आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "विचाराने आणि मनाने तुम्ही दोघेही एक आदर्श पालक आहात आणि सदैव राहाल. या महान कार्यामुळे मिळणाऱ्या समाधानातून तुम्ही तुमचे सुख पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करावा, हीच सदिच्छा. कारण तुम्ही दोघेही खरोखरच या सुखासाठी पात्र आहात. "
एलिनच्या दोन्ही किडनी तिरुवनंतपुरमच्या एसएटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका १० वर्षांच्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आल्या. तिचे यकृत तिरुवनंतपुरमच्या केआयएमएस रुग्णालयात दाखल असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला देण्यात आले. मरणोत्तर यकृत दानातून अवयव मिळवणारा हा राज्यातील सर्वात लहान रुग्ण ठरला आहे. तसेच हार्ट वाल्व तिरुवनंतपुरमच्या श्री चित्रा इन्स्टिट्यूटमधील एका रुग्णाला मिळाला, तर दोन्ही डोळे अमृता रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले, ज्यामुळे दोन लोकांची दृष्टी परत आली.
वेदनेतही माता-पित्याने घेतलेला निर्णय असाधारण…
केरळ स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (KSOTTO) ने कुटुंबाच्या या धाडसी पाऊलाचे भरभरून कौतुक केले. या संपूर्ण प्रक्रियेत आरोग्य विभाग, पोलीस आणि KSOTTO च्या टीमने उत्कृष्ट समन्वय साधला. अमृता रुग्णालयातून तिरुवनंतपुरमपर्यंत अवयव सुरक्षित आणि वेगाने पोहोचवण्यात आले. संघटनेने म्हटले की, या अतीव वेदनेतही माता-पित्याने दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला, जो असाधारण आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनीही सोशल मीडियावर लिहिले की, त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत आणि या निर्णयाच्या ताकदीची प्रशंसा करतात. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही याला "मानवतेचा ऐतिहासिक संदेश" आणि "केरळची खरी भावना" असल्याचे सांगत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली.

केरळ सरकारने एलिनला शासकीय सन्मान देण्याचा आदेश जारी केला. रविवारी दुपारी ३ वाजता सेंट थॉमस सीएसआय चर्च, नेदुंगदप्पल्ली येथे एलिनचे अंतिम संस्कार होतील. जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने पुष्पांजली अर्पण करण्याचे, तर जिल्हा पोलीस प्रमुखांना बिगुल सलामीसह पोलीस सन्मान देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अवयवदानाच्या चळवळींमागे अविरत काम करणाऱ्या संस्था
एलिन शेरिन अब्राहमच्या या हृदयद्रावक घटनेमुळे अवयवदानाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, एखाद्या कुटुंबाने घेतलेला हा उदात्त निर्णय प्रत्यक्षात आणण्यामागे आणि ही चळवळ अविरतपणे चालवण्यामागे अनेक संस्था, डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी साखळी कार्यरत असते. भारतात या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने 'नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन'ची स्थापना केली आहे. ही संस्था राष्ट्रीय पातळीवर दात्यांची आणि गरजू रुग्णांची नोंद ठेवते, तर राज्यांच्या पातळीवर 'SOTTO' आणि विभागवार 'ROTTO' या संस्था समन्वयाचे काम पाहतात. केरळमध्ये एलिनच्या बाबतीत 'KNOS' या सरकारी यंत्रणेने आणि त्यांच्या समन्वयीकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
सरकारी प्रयत्नांना बळ देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही या क्षेत्रात निस्वार्थपणे काम करत आहेत. यामध्ये मोहन फाऊंडेशनचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासारख्या व्यक्तींनी स्थापन केलेली ही संस्था गेली अनेक दशके अवयवदानाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, डोनर कार्ड वितरीत करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी झटत आहे. यासोबतच महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये सक्रिय असलेली शतायू आणि तरुणांमध्ये जागृती करणारी गिफ्ट युअर ऑर्गन यांसारख्या संस्था समाजात सकारात्मकता रुजवत आहेत. रिना राजू यांच्यासारख्या कार्यकर्त्या, ज्या स्वतः अवयवदानाच्या लाभार्थी आहेत, त्या लाईट अ लाईफ या संस्थेद्वारे इतरांना प्रेरित करत आहेत.
एलिनचे आयुष्य जरी अल्प असले, तरी तिच्या पालकांचा हा निर्णय समाजासाठी एक दिशादर्शक उदाहरण ठरले आहे. अत्यंत कठीण प्रसंगी तिच्या पालकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय, वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. केरळ सरकारने दिलेला शासकीय सन्मान या त्यागाची योग्य दखल असून, या घटनेमुळे समाजात अवयवदानाबाबत नक्कीच सकारात्मक जागृती निर्माण होईल.






