- प्रमोद मुनघाटे
झाडीपट्टीच्या लोकजीवनाची यथार्थ ओळख करून देणाऱ्या पुस्तकाची उणीव होती. ‘संजोरी’ या धनराज खानोरकर यांच्या पुस्तकाने ती उणीव दूर केली. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे लेखन माहितीपर नाही. झाडीबोलीचा कौशल्याने वापर करीत लिहिलेल्या ललितलेखांचा हा संग्रह आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या परिसरातील लोक, त्यांचे नाना छंद, तेथील निसर्ग, शेतीभातीशी जुळेलेले सांस्कृतिक उत्सव आणि लोकनाट्य यांची ओळख खानोरकरांनी फार बहारदार शैलीत केली आहे.
आमच्याकडे बोलताना शब्दाशब्दाला म्हणींचा वापर होतो. त्या म्हणी या लेखनात खच्चून भरल्या आहेतच. पण खानोरकरांना जागोजाग स्वत:च्या नवीन म्हणी रचण्याचा नाद आहे. त्यांचे कोणतेही वाक्य साधे सरळ नाही; त्यात यमक-श्लेष हे अलंकार असलेच पाहिजेत.
झाडीपट्टीत शंकरपट आणि मंडई हा मोठा उत्सव असतो. हिवाळ्यात धान्याची कापणी झाली असते. शेतात मळणीचे खळे असते. धान्याची रास उभी झाली असते. घामाच्या श्रमाचे पैसे हाती खुळखुळत असतात. जत्रा-यात्रा, रात्रीचे नाटक यांचे दिवस सुरू होतात. मंडईमध्ये अनेक बाजार असतात, त्यात एक ‘कोंबड-बाजार’ असतो. या कोंबड बाजारावरचा या पुस्तकातील लेख फारच मस्त झाला आहे. वाचताना झाडीपट्टीतील वैनगंगेच्या खोऱ्यातील जंगल आणि वाऱ्याचा स्पर्श आपल्या मनाला होतो. ‘संजोरी’ तो लेख इथे सादर करण्याचा मोह आवरता येत नाही. 
कोंबडा कातीचा अन् जेवन रातीचा
'गावठी कोंबडा हळूहळू बोंबला ' झाडीत घरी आलेल्या पावण्यालं कोंबडयाचा जेवन म्हंजे खूपच मोठा पाहुनचार असतो. घरी आलेल्या पावण्यालं आंगणात पाय धुवालं एका बादलीत पाणी, त्यात लोटा अन् पाट बाहेरच ठेवलेला असतो. काही घरी तर बाया मंडळी घरी आलेल्या पावण्याचे पाय धुऊन,अक्षता कपाळावर लाऊन आनंदान स्वागत करतात. पावणा येण्याचे शुभ शकून समजले जाते, ' घरी पावणा आला अन् घर आनंदून गेला ' मग हा पावणा येण्याचे अनेक निमित्त असतात. तो मंडई पाहायला येतो, तो नाटक बघायला येतो, गोपालकाल्याला येतो नाहीतर गावी आडमार्गील भरणा-या ' कोंबडू बाजारा'त कोंबडें खेळवालं येतो. असे अनेक कारण घरी पावणा येण्यामागचे आहे. तो कधीही,कसाही येवो झाडीत त्थाचे झकास स्वागतच केले जाते. 'पावण्यादादा येजो अन् कोंबडा खाजो गा! ' असे प्रेमाचे निमंत्रण खुल्यामनाने आधिच दिलेले असते.
यात कोंबडा कातीचा भेटला तर मग काही विचारुच नका, झाडीतल्या घरात अन् पाहुण्यात 'आनंदाच्या लाह्या'च फुटतात. कवाकवा 'कोंबडु बाजार 'खेळायला आलेला पावणाच खेळात डाव हरलेला कवा जिकलेला कातीचा कोंबडा घेऊन येतो तवा, 'पावणा मोठा गुणाचा कोंबडा चारते लाल वानाचा ' म्हणून त्था पावण्याची उम्मस व्वा व्वा केली जाते. घरच्याईल वाटते, 'अस्साच पावणा देवा येऊ दे अन् पोराबाराईलं ठुसा,रस्सापाणी खाऊ दे! ' म्हणून घरची मंडळी मोहरुन जातात.इथल्या लोकांच्या लोकरिती नाना आहेत अन् झाडीत लोकांचे लोकत्सवही बहुरंगी, बहुढंगी आहेत. झाडीत वानावानाच्या कला आहेत अन् वानावानाचे रिती रुतून बसल्या आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) पक पक पकाक… कोंबड्यांची एक अनोखी दुनिया! |
''जवळ नाही दमडी पण खातो म्हणते कोंबडीची चमडी'
झाडीत या अनेकारंगी लोकोत्सवाबरोबरच इथल्या लोकांना काही 'भलत्याच लती' आंगवळणी पडलेल्या आहेत, त्या काहीकेल्या सुटत नाही अन् 'झाडप्या माणूस 'यापासून मागे हटत नाही. अशीच एक अफलातून लत झाडी माणसाला अनेक वर्षानूवर्षापासून झोंबली आहे,ते म्हणजे झाडी परिसरात जोरदार चालणारा 'कोंबडु बाजार' होय. या बाजाराने अनेक झाडप्यांना भला मोठा आजार केल्याचे दिसून येते. मग,' घरी नाही शेंगा पण खातो म्हणते झिंगा ' किंवा ' खिशात नाही नाना पण सावकार म्हणा ' अथवा 'जवळ नाही दमडी पण खातो म्हणते कोंबडीची चमडी' अशी त्याची गत होऊन जाते.
असला नसला पदरचा पै,पैका सारुन बाजारात हारुन झुरमु-या कोंबडयासारखा तो मग खाली हाताने घरी येतो, असे या 'कोंबडु लती'चे इंगीत आहे. हा ' कोंबडु बाजार ' झाडीतल्या खेडयाखुडयातल्या आडवळणाच्या ठायी भरतो. शौकिन लोक लांबून लांबून येतात. हा खेळ खेळण्यात झाडीतल्या अनेक माणसांना खूप मज्जा वाटते. लत म्हणा की रित म्हणा पण झाडप्यांची या खेळावरची प्रित वाखाणण्याजोगी आहे. खेळाला समंती नाही, कुणाची परवानगी नाही पण शौकिनांची पसंती असल्याने वेळेची उसंत काढून हा खेळ सर्वत्र मात्र खेळला जातो.
‘इकडून तिकडून कमवा अन् कोंबडयाइवर कान् गमवा'
विशेषतः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर,भंडारा जिल्ह्यातील भागात 'कोंबडु बाजारा'ने फार मोठे थैमान घातले आहे. या बाजाराला शासनाची बंदी आहे, पण अंधीमंदी हा बाजार मोठया दिमाखाने आठवडयातून दोनदा नाहीतर सोयीनुसार भरविला जातो, जातवान कोंबडा खेळविला जातो. लाखोचा जुगार यात कोंबडयावर लोक नेहमी खेळत असतात. 'इकडून तिकडून कमवा अन् कोंबडयाइवर कान् गमवा' असे खेळात चालत असते. या खेळासाठी दुरुनदुरुन आपआपले कोंबडे धरुन कोंबडाधारी येतात. आणलेला कोंबडा जिकेच हा ईश्वास असतो.
कोंबडयाला तयार करुनच खेळायल आणले जाते. खिशात पै-पैका खणखणत असतोच. ही मंडळी एकतर कोंबडा अन् पैका जिकून जातात नाहीतर कोंबडा व पैसा हारुन जातात पण हा खेळ पुढे खेळायचा नाही,असे कोणीच शिकून जात नाही. एकप्रकारे जोग्याला,जोगण्या लागण्याचा हा प्रकार आहे.' कितीही सांगा पण लगनाच्या जेवणाल वांगा 'अशी गत कोंबडु बाजारवाल्यांची झाली आहे. जसे पत्याच्या जुगारवाल्याला पत्ते खेळल्याशिवाय जमत नाही तसे कोंबडु बाजारवाल्याला या बाजारात कोंबडा खेळविल्याशिवाय त्थाचे मन रमत नाही.
‘आपल्या कोंबडया डसऱ्या अन् दुसऱ्या कोंबडयावर उसऱ्या’
गावाच्या वेशीपासून थोडया दूरवर एका आडोशाला किंवा जंगल गावात जंगलाच्या कपाळी कोणी एक ठेकेदार त्या त्या परिसरात 'कोंबडु बाजार' तेजीत भरवित असतो. हा बाजार भरविणे अन् पैसे कमविणे, त्या ठेकेदाराचा नेहमिचाच धंदा झालेला. बाजाराच्या दिसी ठेकेदाराला लई भाव. सारेच बाजारी या ठेकेदाराला विचारतात.खेळाच्या अटी, शर्ती तो अनेकांना सांगत असतो.
ठेकेदार खूप गब्बर असून अनेकांची तो खबर घेतो." कोंबड खेळालं योजो गा ! " ठेकेदारनं आधिच निमंत्रण दिले असते अन् "आम्हालं सांभाळून घे जो गा! "कोंबडु खेळवाले ठेकेदारालं सांगतात. कोंबडयाचा मालक आपल्या कोंबडयाला गहू, टमाटर, मुरमुरे, अंडे, कणकीचे गोळे, मक्याचे पीठ नीट चारुन,चारुन मस्तपैकी आखाडयातला पयलवान तयार करावा तसे तयार करुन झुंजीसाठी आणित असतो.
आपल्या कोंबडया डस-या अन् दुस-या कोंबडयावर उस-या झाला पाहिजे यासाठी कोंबडु मालक अनेक युक्त्या लढवून कोंबडयाला आणतो. कधी हा कोंबडा तीन किलोचा तर कधी चार,पाच किलोचा गब्बर पयलवान तो होतो. बेरड कोंबडं असला तर 'बेरड जोड व त्यावर होड ' लावली जाते. गावठी असला तर 'लाल, पांढ-या, पिवळयाची जोडी अन् भरपूर होडी 'लावल्याच जातात. त्याला घरीच लढवय्या बनविण्याचे शिक्षण दिले जाते.
'आत्ता पाड जमला रे ऽ ऽ जमला'
परिसरातील भरपूर लोक एक अनोखा शौक म्हणून या बाजारात हटकून जातात. काही पाहणारेच शौकिन लोक असतात. ते फक्त बाजारात मज्जा पाहायला येतात. भोवतालच्या रिंगणात हे दर्दी फक्त गर्दी करतात. नेहमीच खेळ पाहूपाहू काही दिवसानी पाहणारेही आपला मेळ बसवून खेळात सामिल होतात. आयोजक ठेकेदार ठेका घेऊन कुणाला धोका होणार नाही,याची पूर्ण दक्षता तो घेतो.
कोंबडयाच्या झुंजीआधी समांतर असे दोन कोंबडे आधी सहज मैदानाबाहेर काही ठिकाणी खेळविले जातात, नाहीतर मैदानात सामोरेसामोरं करुन, "जमते का गा? " म्हणत पाड लावला जातो. एकदा पाड ठरला की, दिवस बारेपर्यंत आपल्या नंबराची कोंबडेवाले वाट पाहत बसतात. या कोंबडु बाजारात दहा -बारा कोंबडुच्या झुंजी एका दिवसाला झुंजतात. यावेळी प्रसंगी कोंबडयांना देशी दारू अथवा मोहाची दारु धुंदीसाठी पाजली जाते.
ते समजा झुंजीला लागले तर, 'आत्ता पाड जमला रे ऽ ऽ जमला ' म्हणून पैज ठरविली जाते.कोणत्या कोंबडयावर कोण किती पैसे लावणार, याचे सारे लिखित गणित ठेकेदाराच्या वहित लिहिलेले असते. जितके जास्त पैसे लावले जातील तितका हा खेळ रंगत जातो. एकदा का खेळ ठरला की, मग दोन्ही कोंबडयांच्या डाव्या पायाला कोंबडयाच मुनकं पालवाने झाकुन,खाली बसून 'लोखंडी काती' बांधली जाते. ही लोखंडी काती गावचा खाती तयार करीत असतो. ती ब्लेडसारखी तेज व धारदार असते.काही कोंबडुमालक आपल्या कातीलं तिखट मिरची लावतात. ही काती म्हणजे लहान लोंखडी पातीच असते. तिनं वार करायचा असतो, म्हणून ती कोंबडयाची तलवार असते. 
"माझा कोंबडु जीकलाच पाहिजे गा ऽ ऽ बावा "
आता हे दोन्ही गब्बरसिंग कोंबडे नंबरनुसार नियोजित मैदानात आमणेसामणे झुंजीसाठी ऐकमेकासमोर सोडले जातात. मुंडकीला मुंडकी लावून, पंचाने डोळाभर पाहून कोंबडयांची झुंज सुरु होते. या झुंजीत ते आपल्या पायाने उडान घेऊ घेऊ लढतात. बराच वेळ एकमेकाला मारतात . 'बासिंगवाल्या कोंबडयाची ही ढीसिंग ढिसिंग' मोठया आवडीनं सुरु असते. पंच झुंज पाहत असतात, त्यांचा निर्णय अंतिम असतो. मैदानाच्या सभोवताल होऊन माणसं या खेळाचा मनमुराद आनंद लुटतात.कोंबडे झगडतात, बिथरतात, एकमेकावर कातीने सपासप वार करतात. रक्त निघायला लागतो. शरीर फाटून जाते. हा जीवघेणा खेळ सुरू असतांना,"माझा कोंबडु जीकलाच पाहिजे गा ऽ ऽ बावा " म्हणत पैसा लावणारे बेंबीच्या देठापासून ओरडतात.
दोन्ही कोंबडे एकमेकावर तुटून पडतात, ते फाटून जातात पण काहीकेल्या नटत नाही. सारे कसे डोळयात तेल घालून पाहत असतात. 'पाडास पाड' असले तर सामना कसून रंगतो. कुणीतरी एक संपेपर्यंत किंवा मैदान सोडून जाईपर्यंत ही ' एक झुंज जीवाची' चालूच असते. या झुंजीत मात्र एकाला जीव गमवावा लागत असतो नाहीतर 'घायाळ हरिणी 'सारखी त्याची अवस्था होते.झगडून झगडून दोनपैकी एक कोंबडा थकतो. तलवारीचे वार व्हावा अन् सैनिक जमिनीवर धारातीर्थी पडावा तसेच पायाला बांधलेल्या कातीच्या वाराने तो घायल होतो, कधी जमिनीवर पडतो, नाहीतर मैदान सोडून बाहेर पळतो.
अशावेळी पळणारा किंवा मरणारा कोंबडा हरल्याचे पंच घोषित करतात. जो मैदानावर खटखूबा असतो, त्याला विजयी घोषित केले जाते. समजा जीवंत कोंबडा मैदान सोडून पळून गेला अन् घायल कोंबडा मैदानात असला तर, मैदानवाला जिकतो. मग त्याच्या मालकाला भल्ली खूषी होते. तो विजयाच्या उन्मादात त्याचा तोरा वाढून एका ऐटीत तो आपला विजयी कोंबडा उचलतो. त्याला कुरवाळतो अन् हरणारा कोंबडाही मेलेला किंवा जीवंत का असेना तो नेतो आणि लावलेले पैसेही जिंकतो.
‘जवापर्यंत 'कोंबडु बाजार' जिकत नाही तवापर्यंत कोंबडु हरणारा दम खात नाही,
पैज लावलेल्या एकंदरीत पैसाच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम यात ठेकेदाराला द्यावयाची असते. काही ठिकाणी प्रती कोंबडा शंभर रुपये ठेकेदार घेत असतो. जिंकणा-या कोंबडयावर ज्यांनी ज्यांनी पैज लावली ते सारे जिंकतात, हरणारा सारे पैसे हरतो, त्याचा कोंबडाही मरतो. ' तेल गेलं, तुप गेलं ,हाती धुपारणं आलं ' अशी हरणा-या कोंबडुमालकाची व त्याच्या साथीदाराची गत होते.
हरणारा पळत जातो उद्या, परवा भरणा-या कोंबडु बाजाराकडे तो जिकण्यासाठी पुनःपुन्हा वळत जातो. हरणारा कोंबडुवाला खालच्या मानेन पैसा हारुन अन् कोंबडा मारुन माघारी सरळ आपल्या मुक्कामी जातो. त्याला पश्चाताप होते पण पुन्हा बाजारात जाईन अन् बदला मी घेईनच, या भावनेने त्याचे मन पेटत असते. तो दुस-या तयार कोंबडयात सतत शोधात असतो. तसा कोंबडु भेटला अन् त्थाला पटला तर दुस-या लढाईसाठी हा कोंबडु मालक आपल्या कोंबडया सर्व शक्तीनिशी आखाडयात उतरवतोच उतरवतो.
काहीही झालेतरी चालेल पण जवापर्यंत ' कोंबडु बाजार ' जिकत नाही तवापर्यंत कोंबडु हरणारा दम खात नाही, यासाठी तो बरबाद होईल पण कोंबडा खेळविणे सोडणार नाही, इतकी विखारी ही लत आहे. अशा या कोंबडु बाजार लतीने झाडीतल्या भल्याभल्या सावकाराईची, पाटलाईची, सरपंच्याईची, मुजुमदाराईची जिरवली आहे. काहींना बाजार भावतोही पण, ' जुगार तो जुगार, कितीही खेळा,माणूस बेजार! ' हेच शेवटी खरे.खेळणा-याच्या मनाला माॅलिस करा की, पाॅलिस करा त्याचे मन तिकडेच.
अशा या खेळावर शासनाची पूर्ण बंदी आहे. पोलिसांनी धाड टाकली तर 'कोंबडु बाजार 'खेळणा-यांवर जुगाराची केस लागते. कधीकधी असे घडतेही नाहीतर बरेच वेळा पोलिस आणि बाजार भरविणारा ठेकेदार ' जुगाड टेक्नॉलॉजी ' करुन सर्रास बाजार भरवितात. भ्रष्टाचार कुरणामध्ये आपले अधिकारी हाथ धुऊन घेतात. या भ्रष्टांमुळे कोंबडु बाजार भरविणा-या ठेकेदाराला धोका नसते. 'ज्याच्या साथीला पोलिस तो कशालं जाईल ओलिस' मग पोलिसांच्या आशीर्वादाने याच बाजारात 'झेंडीमुंडी',' चक्रीखेळ', 'तीनपत्ती'असे जोडजुगारही भरविले जातात.
पोलिसदादाला काही पैका नाहीतर कातीचं कोंबडु देऊन खूष केले जाते. पोलिसाचीही मज्जा अन् ठेकेदाराली मलिदा, यामुळे 'कोंबडु बाजार'काही बंद होत नाही. प्रश्न कातीच्या कोंबडयाचा असतो अन् कातीचा कोंबडा भेटला तर तो कुणाला नको असतो? या खेळात खेळ खेळल्याचा आनंदही अन् कोंबडा खाण्याचा स्वानंदही, त्यामुळे 'कोंबडु बाजार ' झाडीत तेजीत आहे.
‘घरवाली कोंबडु रांधते अन् घरवाला तो जिकला म्हणून गावभर सांगते.’
आता तर शासनाने बैलांच्या शंकरपटांवरची बंदी उठविली आहे. त्यामुळे आता झाडीत 'शंकरपट जेथे जेथे कोंबडु बाजार बहुतेक तेथे तेथे' असे होणार आहे, कारण झाडीतला माणूस कमालीचा शौकिन आहे. तो पटात जसा जातो तसाच 'कोंबडु बाजारा'तही रमतो. रात्री नाटकात जीव गमवतो. वर्षभर कमवतो खरा पण या शौकामध्ये तो खूप सारे गमावतो. म्हणजेच तो खपतो, राबतो अन् शौकांसाठी जागतोही.' कोंबडु बाजार ' जिकलेला झाडपी यादिवशी भलत्याच रंगात रंगलेला असतो. 'शौक पुरलेला अन् खिशा भरलेला'असल्याने 'मन प्रफुल्ल अन् शरीर तर्र 'असते.

जिकलेला कातीचा कोंबडा तो कधीकधी आठशे, एक हजार रुपये किलोने दुस-याला विकून टाकतो, नाहीतर बहुतेक वेळेला 'कातीचा कोंबडु' घरी आणून साथीदार पाहुण्यासोबत त्याची खमंग भाजी घरच्याच हांडीत केली जाते. घरवाली कोंबडु रांधते अन् घरवाला तो जिकला म्हणून गावभर सांगते. भाजी खदरली की, ती शिजली की नाही म्हणून त्याच्यातले काही पीस टेस्ट केले जातात, म्हणजे चावून खाऊन पायले जाते. हा कातीचा कोंबडु शिजायला फार वेळ लागतो. एकदा तो शिजला अन् निवा मोडला की, संगतीने पहिले पंगत बसते. मग सर्वांना भाजी वाढली जाते.
सोबतीला पोळी अन् भात आन् कातीच्या कोंबडुच्या भाजीवर सारे कसे ताव मारतात. हा विजयी उत्सव कोंबडुच्या चिकनने साजरा होतो. कधीकधी 'घरची दवाई अन् जेवालं इवाई 'असतो. ही दवाई म्हणजे,' गावच्या मोवाची अन् घरीच पेवाची 'असते. घरधनी आपल्या 'लढाईवाल्या कोंबडयाची बढाई ' घरवालीजवळ सांगत जातो.मध्यरात होते पण बात संपत नाही. उरलेला 'ठुसारस्सा' दुस-याही दिसी आवडीनं,सवड काढून खाल्ला जातो.त्या आठवणीच्या राती माञ जेवणारेही अदबिनं म्हणत जातात, क्या बात है ऽ ऽ 'कोंबडा कातीचा अन् जेवन रातीचा ! '
संजोरी : धनराज खानोरकर
भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन
पृष्ठे : 192
किमंत फक्त : रु. 400/-






