रितेश शिसोदे
- मधमाशांच्या हल्ल्याची छ. संभाजी नगर येथील अजिंठा लेण्यांमधील सलग पाचवी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात 11 पर्यटक जखमी झाले.
- महाराष्ट्रातही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सिंहगड किल्ल्यावर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दीड वर्षांच्या बालकासह किमान २५ जणांना डंख मारले, तर शिवनेरी किल्ल्याजवळ हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले,
- नेमके कोणत्या कारणांमुळे मधमाश्या माणसांवर हल्ला करतात आणि अशा प्रसंगी नेमकी कोणती योग्य कृती जीव तुमचा वाचवू शकते, याचे हे विश्लेषण.
''आम्ही अजिंठा लेणीला गेलो होतो. १० क्रमांकाच्या लेणीजवळ गेल्यानंतर अचानक मधमाशा आल्या आणि आम्ही सगळे घाबरलो. त्यांनी हल्ला करायला सुरूवात केली.. तो छोटा रस्ता होता त्यामुळे त्या गोंधळात एकमेकांचा धक्का लागला आणि मी खाली कोसळलो, त्यामुळे मी मागे राहिलो आणि मधमाशांनी माझ्यावर हल्ला केला.’’
नुकतीच बारावीची परीक्षा देणारा छ. संभाजी नगरचा रोहित सांगत होता. परीक्षा संपल्यामुळे त्याच्या वर्गाचे काही मित्र अजिंठा लेणी पाहायला आले होते. तो पुढे म्हणाला की, "माशांनी इतका जबरदस्त हल्ला केला होता की त्या माशा माझ्या केसांमध्ये अडकल्या होत्या. मला त्या ओढून बाहेर काढाव्या लागल्या. तब्बल अर्धा किलोमीटर त्या आमच्या मागे-मागे आल्या होत्या."
अजिंठा लेण्यांत गेल्या दोन महिन्यात मधमाश्यांच्या हल्ल्याच्या पाच घटना घडल्या
मधमाशांच्या हल्ल्याची छ. संभाजी नगर येथील अजिंठा लेण्यांमधील ही सलग पाचवी घटना. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात देशी-विदेशी मिळून 11 पर्यटक जखमी झाले. संभाजीनगरमधील अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. गेल्या 2 महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही 5 वी घटना आहे. संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी परिसरात वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे संभाजीनगर प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांना मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असताना एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांवर हे मधमाशांचे हल्ले झाले आहेत.

पहिली घटना अजिंठा लेणी क्रमांक 10 जवळ घडली आहे, जिथे अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर तासाभरानंतर अजिंठा लेणी क्रमांक 26 परिसरात दुसऱ्या वेळी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. या मधमाशांच्या हल्ल्यामुळे संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आहे. अजिंठा लेणी परिसरात अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.
पर्यटक घाबरले, सुरक्षेचा प्रश्न उपस्थित
दररोज हजारो लोक येत असलेल्या या अजिंठा लेणी परिसर या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या कुचकामी ठरत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी हे जागतिक दर्जाचे केंद्र असूनही भारतीय पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाहीत, असा प्रश्न आता संभाजीनगर येथे अजिंठा लेणी परिसर पाहायला येणार्या पर्यटकांकडून विचारला जात आहे.
केवळ तात्पुरते उपाय न करता, या सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे, असे अजिंठा लेणी पाहायला आलेल्या काही पर्यटकांनी म्हटले आहे. वारंवार होणाऱ्या या मधमाशांच्या हल्ल्यांमुळे अजिंठा लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून अजिंठा लेणी पाहायला येणार्या पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, अजिंठा लेणी परिसरात फिरताना भडक रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजिंठा लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे संभाजीनगर प्रशासनाने म्हटले आहे.

फक्त अजिंठा लेण्यांमध्येच नाही तर अलीकडच्या काळात मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये अनेक ठिकाणी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. या हल्ल्यात ६० वर्षीय पंचाचा मृत्यू झाला. त्याआधी डिसेंबरमध्ये गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील महुवा तालुक्यात शेतात काम करत असताना एका आरोग्य कर्मचाऱ्याला १५० हून अधिक डंख बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रातही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. ८ मार्च रोजी पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दीड वर्षांच्या बालकासह किमान २५ जणांना डंख केले. याच वर्षी शिवनेरी किल्ल्याजवळ झालेल्या अशाच एका हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले, तर मागील वर्षभरात मढे घाट परिसरातही अनेक घटना घडल्या आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, उत्तर प्रदेश सरकार मधमाश्यांच्या हल्ल्यांना ‘राज्य-घोषित आपत्ती’ म्हणून वर्गीकृत करण्याचा विचार करत आहे.
मधमाश्यांचे हल्ले किती धोकादायक असतात?
मधमाशांचा हल्ला ही गंभीर घटना असते आणि जर का वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. मधमाशा डंख मारतात तेव्हा त्यांचा काटा म्हणजेच स्ट्रिंगर शरिरात टोचला जातो. त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. एकाच वेळी अनेक मधमाशा अनेक जागी दंश करतात. त्यामुळे चेहऱ्यावर, अंगावर सूज येते, पुरळ येतं. मधमाशांचे जास्त दंश असले तर रुग्णाच्या नाडीचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. श्वसननलिकेच्या तोंडाशी सूज येते आणि रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याची फुफ्फुसं आकुंचन पावतात. रक्तदाब कमी झाल्याने त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन रुग्ण गंभीर होतो. ही लक्षणं काही मिनिटांत दिसू लागतात. अशावेळी तातडीच्या उपचारांची गरज असते.

एक-दोन मधमाश्या चावल्या तर साधी वेदना होते आणि थोडी सूज येते, जी बहुतेक वेळा गंभीर नसते. परंतु, जर मोठ्या संख्येने मधमाश्यांनी हल्ला केला की धोका खूप वाढतो. एकाच वेळी खूप डंख बसल्यास, अॅलर्जी नसलेल्या व्यक्तीलाही गंभीर त्रास (टॉक्सिक शॉक) होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजार असलेले लोक यांच्यासाठी हा धोका जास्त असतो. काही लोकांना मधमाश्यांच्या डंखाची अॅलर्जी असते. अशा वेळी कमी डंख झाले तरी शरीरात तीव्र प्रतिक्रिया (अॅनाफायलॅक्सिस) होऊ शकते. घसा सूजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात, ही लक्षणे जीवघेणी ठरू शकतात. विशेषतः डोंगर-किल्ल्यांसारख्या दुर्गम ठिकाणी मदत पोहोचायला वेळ लागतो, त्यामुळे अशा प्रसंगी वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
या हल्ल्यामागे मधमाश्यांची नेमकी कोणती प्रजाती आहे?
या बहुतांश घटनांसाठी जबाबदार असलेली प्रजाती (Apis dorsata) म्हणजेच ‘जायंट रॉक बी’ (मोठ्या खडकांवर राहणारी मधमाशी). ही प्रजाती कड्यांच्या भिंतींवर, किल्ल्यांच्या तटबंदीवर आणि उंच झाडांवर मोठ्या आकाराचे पोळे बांधते.
“मधमाश्या सहसा उंच आणि सुरक्षित ठिकाणे निवडतात, जिथे वातावरण तुलनेने थंड आणि स्थिर असते. एका पोळ्यात सुमारे ६०,००० मधमाश्या राहू शकतात. ही प्रजाती अत्यंत संरक्षक स्वभावाची असते. धोका जाणवल्यास त्या आपल्या समूहातील मोठ्या संख्येने एकत्रितपणे सक्रिय होतात. चिडलेल्या मधमाश्या सुमारे ताशी ३५ किमी वेगाने लांब अंतरापर्यंत पाठलाग करू शकतात,” असे मुंबईचे पर्यावरण अभ्यासक नरेंद्र नायक यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितले.
“हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, मधमाश्या स्वतःहून हल्ला करत नाहीत. त्यामागे नेहमी बाह्य व्यत्यय किंवा संभाव्य धोका असतो. मधमाशीने डंख केल्यानंतर तिचा मृत्यू होतो. त्या सैनिकांप्रमाणे वागतात, पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण देतात,” असेही नायक म्हणाले.
मधमाश्या हल्ला का करतात?
ट्रेकिंगशी संबंधित स्थळांवर होणारे मधमाश्यांचे हल्ले बहुतेक वेळा मानवी वर्तनामुळेच होतात. “उन्हाळ्यात मधमाश्या अधिक आक्रमक होतात, कारण त्या वेळी मधाने भरलेल्या पोळ्याचे संरक्षण करण्याची गरज अधिक असते. पोळ्याजवळ दगड फेकणे, ड्रोन उडवणे, मोठा आवाज करणे आणि अरुंद वाटांवर गर्दी करणे ही सर्व हल्ल्याची प्रमुख कारणं असतात,” असे पुण्यातील मधमाशी संवर्धक देवेंद्र जानी म्हणतात.
“पोळ्याजवळ शेकोटी पेटवणे, स्वयंपाक करणे किंवा धूर करणे यामुळेही मधमाश्या चिडतात. परफ्यूम, सुगंधी लोशन, केसांचे तेल किंवा अगरबत्ती यांसारख्या तीव्र वासांकडे त्या आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा वाढतो,” असे त्यांनी पुढे सांगितले.

लेण्यांच्या परिसरातही मधमाशांचा वावर अधिक असतो. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये वसंत ऋतू दरम्यान मधमाशा आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतात. फुलांचा बहर असलेला हा काळ मधमाशांसाठी 'गोल्डन पिरिअड' असतो. परफ्युमचा वासाने, कोणी सिगारेट ओढली किंवा जाळपोळ केला तर मधमाशा हल्ला करत असतात. आपण त्यांच्या अधिवासात आलोय त्यामुळे मोबाईलचा फ्लॅशही वापरू नयेत. पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी एखादी मधमाशी आपल्याला चावली आणि आपण ती चुरगळली तर त्यातील कंपलहरी इतर मधमाशांपर्यंत पोहोचत असतात. मधमाशा धोका समजून लगेच हल्ला करतात. अलीकडे वाढलेला आणखी एक धोका म्हणजे पर्यटकांनी सेल्फी स्टिक वापरून पोळ्याजवळ जाऊन फोटो काढणे. मधमाश्या याला थेट धोका मानतो.
मधमाश्यांनी हल्ला केल्यास काय करायचं?
- एखादी माशी आपल्याजवळ आली तर कुठलीही हालचाल करायची नाही. आपण हाताने त्यांना दूर करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना वाटतं त्यांच्यावर हल्ला होतोय. तेव्हा ती डंख करते.
- डंख केल्यानंतर ती तिचा गंध त्या ठिकाणी सोडते. मग त्याच ठिकाणी इतर माशा येऊन डंख करतात. त्यामुळे अशावेळी मधमाशीने डंख केल्यानंतर त्या ठिकाणी जवळचा एखादा पाला चोळायला हवा जेणेकरुन त्या मधमाशीने सोडलेला गंध निघून जाईल आणि इतर माशा डंख करणार नाहीत.
- ताबडतोब एखाद्या बंदिस्त जागेकडे जसे की खोली, वाहन किंवा दाट झुडुपामध्ये धाव घ्या. मधमाश्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे फेरोमोन्स (वासावर आधारित संकेत) बाहेर पडतात आणि आणखी मधमाश्या आकर्षित होतात. पळून जाणे शक्य नसेल तर चेहरा आणि महत्त्वाचे अवयव जाड कपड्यांनी झाका.
- सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर डंख नखाने किंवा कार्डच्या कडेला बाजूने खरवडून काढा. चिमटा काढू नका किंवा ओढू नका. सूज कमी करण्यासाठी बर्फ लावा.
- ट्रेकला जाण्यापूर्वी तीव्र सुगंध असलेले परफ्यूम, लोशन्स आणि सनस्क्रीन वापरणे टाळा. जर कड्याजवळ, भिंतीजवळ किंवा झाडाजवळ सतत भुणभुण ऐकू येत असेल, तर अचानक हालचाल न करता सावकाश दूर व्हा. ओरडू नका, वस्तू फेकू नका, पोळ्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका आणि खडकाळ किंवा जंगल भागात आग लावू नका.
- ट्रेक करताना आपल्याकडे प्रथमोपचाराची साधनं म्हणजेच फस्ट एड किट हवं. एकटं फिरत असताना माशांचा हल्ला झाला तर वाचवायला कोणी येऊ शकत नाही. त्यासाठी बॅगेत एक चादर हवी. हात, तोंड झाकण्यासाठीचं साहित्य असावं.






