Skip to main content

देवाची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर? महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याला का होतोय विरोध?

Article in Marathi
Apsara Aga
26 May 2026
4 min read
9 views
देवाची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर? महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याला का होतोय विरोध?

अप्सरा आगा



  • १० लाख एकर देवस्थान जमिनी थेट शेतकऱ्यांच्या नावावर होणार; त्यामुळे बँकांकडून अधिकृत कर्ज मिळणे सोपे होईल.


  • वक्फ बोर्डाला वगळल्यामुळे धार्मिक भेदभावाचा आरोप करत मंदिर ट्रस्ट न्यायालयात जाण्याच्या तयारीत.


  • शहरांनजीकच्या मौल्यवान जमिनी बिल्डर लॉबी लाटण्याचा धोका. नेमक या कायद्याला विरोध का होतोय?




राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा २०२६’मुळे ग्रामीण अर्थकारण आणि धार्मिक अस्मितेचा नवा संघर्ष पेटला आहे. तब्बल १० लाख एकर जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्यांना मिळणार असल्याने कोट्यवधींची व्होटबँक आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल, पण दुसरीकडे या कायद्यातून वक्फ बोर्डाला वगळल्याने भेदभावाचा आरोप करत, मंदिर ट्रस्ट न्यायालयात जाणार असल्याचं दिसतंय. असं असलं तरी, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी? हाच मुळात प्रश्‍न उभा राहिला आहे.

 

सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, चावडीवर आणि कट्ट्या कट्ट्यांवर एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे, सरकारनं आणलेला नवा कायदा. या कायद्याचं नाव आहे, ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम-२०२६’. सरकारनं या कायद्याचा एक मसुदा तयार केला असून, त्यावर ५ जून २०२६ पर्यंत लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, या एका निर्णयामुळे राज्यभरातील तब्बल १० लाख एकर (४ लाख हेक्टर) जमिनीचा प्रश्न सुटणार आहे. पण दुसरीकडे, या कायद्यामुळं मंदिर देवस्थान आणि शेतकरी यांच्यात नवीनच वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. नेमकं कारण काय, यामुळे कोणाचा फायदा होणार आणि कोणाचं नुकसान? याबाबत ‘बाईमाणूस’ने केलेला स्पेशल रिपोर्ट.

 
User Image

आधी इतिहास समजून घेऊ. पूर्वीच्या काळात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, पेशवाईत किंवा इंग्रजांच्या काळात राजे-राजवाड्यांनी गावातील मंदिरांच्या देखभालीसाठी, पूजाअर्चेसाठी आणि दिवाबत्तीचा खर्च भागावा म्हणून काही जमिनी 'इनाम' म्हणून दिल्या होत्या. या जमिनींना सातबाऱ्यावर देवस्थान इनाम जमीन किंवा भोगवटादार वर्ग-३ ची जमीन म्हटलं जातं. या जमिनीचा खरा मालक स्वतः देव किंवा ते मंदिर ट्रस्ट असतं, असं म्हटलं जातं. जुन्या कायद्यानुसार, या जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही, ती कोणाला विकता येत नाही की गहाण ठेवता येत नाही. पिढ्यानपिढ्या अनेक शेतकरी (कुळ किंवा वहिवाटदार) या जमिनीवर घाम गाळून शेती करत आहेत, पण सातबाऱ्यावर मालक म्हणून त्यांचं नाव कधीच लागू शकलं नाही.

 

इनाम जमिनीचा थेट मालकी हक्क

 

आता सरकारनं याच पद्धतीत सर्वात मोठा बदल करायचं ठरवलं आहे. नव्या कायद्यानुसार, सरकार ही शेकडो वर्षांची 'इनाम' पद्धत आता पूर्णपणे बंद करणार आहे. म्हणजेच, ज्या जमिनींवर वर्षानुवर्षे शेतकरी किंवा जुने वहिवाटदार कायदेशीररित्या शेती करत आहेत किंवा राहत आहेत, त्यांना त्या जमिनीचा थेट मालकी हक्क म्हणजे वर्ग एक दिला जाईल. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्राला लागू असेल. असं असलं तरी यात वक्फ बोर्डाच्या जमिनींनाआणि मराठवाड्यातील काही विशिष्ट जमिनींना यातून वगळण्यात आलं आहे.

 
User Image

जर एखाद्या शेतकऱ्याला ही जमीन स्वतःच्या नावावर करायची असेल, तर त्याला एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जे अधिकृत कुळ आहेत आणि स्वतः ती जमीन कसतात, त्यांनाच हा हक्क मिळेल. ज्यांनी बेकायदेशीर ताबा घेतलाय, त्यांचं अतिक्रमण जर १ जानेवारी २०११ पूर्वीचं असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर ते नियमित होऊ शकतं. जर ती जमीन गावाच्या हद्दीत असेल आणि २०११ पूर्वीपासून तिथं कोणाचं घर असेल, तर ती जमीन नावावर करायला एकही रुपया लागणार नाही, ती मोफत होईल. पण शेती किंवा व्यवसायासाठी मात्र सरकारला रेडी रेकनरच्या दरानुसार ठराविक नजराणा भरावा लागणार आहे. हा जमा झालेला पैसा सरकार स्वतःकडे ठेवणार नाही, तर तो संबंधित मंदिर ट्रस्टला देणार आहे, जेणेकरून मंदिराचा खर्च चालू राहील.

 

बँकांकडून कर्ज मिळणार?

 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय खूप मोठा आणि फायद्याचा आहे. एकदा का नजराणा भरून जमीन वर्ग-१ झाली, की शेतकरी त्या जमिनीचा पूर्ण मालक बनेल आणि सातबाऱ्यावर त्याचं नाव लागेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकांकडून कर्ज मिळणं सुलभ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या जमिनींवर बँका कर्ज देत नव्हत्या, कारण त्या गहाण ठेवता येत नव्हत्या. आता मालकी हक्क मिळाल्यामुळे शेतकरी विहीर खणण्यासाठी, ट्रॅक्टरसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून अधिकृत कर्ज घेऊ शकतील. तसेच मसुद्यानुसार सर्वसाधारणपणे या जमिनी विकण्यावर किंवा गहाण ठेवण्यावर कोणतीही कायमची बंदी नसेल, फक्त जमीन धारणा कायद्यानुसार एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जमीन नावावर करता येणार नाही.

 

अनेक मंदिर ट्रस्टचा निर्णयाला विरोध

 

या निर्णयामुळे न्यायालयातील जुने वाद मिटणार का, हाही एक मोठा प्रश्न आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रात देवस्थान ट्रस्ट विरुद्ध शेतकरी असे हजारो खटले सुरू आहेत. नव्या कायद्यामुळं जमिनीची मालकी नेमकी कोणाकडे जाणार, याचे कडक नियम तयार होतील. त्यामुळे अनेक वर्षांचे न्यायालयीन खटले मिटतील, असा सरकारचा अंदाज आहे. पण, दुसरीकडे बघितलं तर, ज्या जमिनींवरून आधीच वाद आहेत, तिथे देवस्थान ट्रस्ट सहजासहजी आपली मालकी सोडणार नाही, त्यामुळे नवीन वादही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच या कायद्याची बातमी बाहेर येताच धार्मिक संघटना आणि मंदिर प्रशासनाने कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि पुण्यातील अष्टविनायक मंदिर ट्रस्ट सारख्या मोठ्या संस्थांनी याला तीव्र विरोध केला आहे.

 

श्री अष्टविनायक मंदिर समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी १८ मे रोजी पुण्यातील सारसबाग येथे एक बैठक घेतली होती. यावेळी सरकारनं आणलेला हा नवा कायदा तत्काळ आणि बिनशर्त मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या कायद्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे आणि लाखो हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या अष्टविनायक देवस्थानांची शेकडो एकर जमीन धोक्यात येऊ शकते. या बैठकीत महाराष्ट्रातील मंदिरांच्या जमिनींसंबंधीच्या प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यावर सविस्तर चर्चा झाली.

 
User Image

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विद्वान सांगतात, 'शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि विविध राजघराण्यांनी मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथील अष्टविनायक मंदिरांना शेकडो एकर जमीन 'इनाम' (दान) म्हणून दिली होती. त्रिकाल पूजा-अर्चा, महाप्रसाद, अखंड सामुदायिक अन्नछत्र, नैवेद्य आणि वार्षिक उत्सव यांसारखे आवश्यक आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम अविरतपणे चालू राहावेत, हे सुनिश्चित करण्यासाठी ही दाने विशेषतः देण्यात आली होती. आता जर देवतांकडून जमिनीची मालकी काढून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होईल, ज्यामुळे भूमाफियांना या पवित्र भूमीवर व्यावसायिक मॉल्स किंवा हॉटेल्स बांधण्यासाठी मार्ग मोकळा होईल. एकदा का उत्पन्नाचे त्यांचे प्राथमिक स्वतंत्र स्रोत नष्ट झाले, की ही ऐतिहासिकदृष्ट्या आत्मनिर्भर देवस्थाने सरकारी अनुदानाच्या दयेवर अवलंबून राहतील.'

 

सरकारच्या या कायद्याला विरोध करण्यासाठी नुकतंच पुरंदर तालुक्यातील मंदिर आणि देवस्थान विश्वस्तांची बैठक झाली. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सासवडच्या काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. या वेळी माजी आमदार संजय जगताप, जेजुरीचे देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दत्तात्रय महाराज चोरघे, दीपक आगवणे उपस्थित होते. नव्या कायद्यामुळे राज्यातील साडेचार लाख हेक्टर देवस्थान जमिनी सरकारच्या ताब्यात जाण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. या विरोधात ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करण्यासाठी ५ जूनपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.

 

हिंदू मंदिरांच्याच जमिनी का काढल्या जातायत?

 

अनेक मंदिर ट्रस्टचं म्हणणं आहे की, ‘देवस्थानची जमीन ही देवाची संपत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मंदिरातील मूर्ती ही 'अल्पवयीन व्यक्ती' मानली जाते आणि तिची जमीन कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मग सरकार देवाच्या जमिनी खासगी लोकांच्या घशात कशी घालतंय? जर वक्फ बोर्डाच्या जमिनींना हात लावला नाही, तर मग फक्त हिंदू मंदिरांच्याच जमिनी का काढल्या जात आहेत? हा कायदा पास झाला, तर मंदिर संघटना न्यायालयात धाव घेण्याच्या पूर्ण तयारीत आहेत.

 

नव्या देवस्थान कायद्यामुळे शेतकऱ्यांना मालकी हक्क आणि बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हिंदू मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करत वक्फ बोर्डाला यातून वगळल्यानं धार्मिक भेदभावाचा नवा वाद पेटला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आहे की यामागे केवळ राजकीय व्होटबँक आणि बिल्डर लॉबीचा फायदा आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सरकारच्या निर्णयाचा बिल्डर लॉबीला फायदा?

 

या सगळ्या वादात मोक्याच्या जमिनी आणि बिल्डर लॉबीचा एक मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरांच्या आसपास देवस्थानच्या हजारो एकर जमिनी आहेत, ज्यांची किंमत आज अब्जावधी रुपये आहे. आजवर कायद्यामुळे तिथे व्यावसायिक बांधकाम करता येत नव्हतं. पण, जर या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या, तर बिल्डर लॉबी आणि भूमाफिया लगेच त्या जमिनी घेतली. गरिबी किंवा कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना पैशांचं आमिष दाखवून या मोक्याच्या जमिनी बिल्डर कवडीमोलाने लाटण्याची दाट शक्यता असल्याचं अनेक मंदिर ट्रस्ट म्हणत आहेत.

 
User Image

सरकारच्या या निर्णयामुळं बातमी वाऱ्यागत पसरली. त्यानंतर अनेक तज्ज्ञांनी यावर आपली मते व्यक्त केली आहेत. हा कायदा न्यायालयीन लढाईत टिकणं सोपं नाही. एकीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार चांगला असला, तरी कायद्याच्या कसोटीवर हे टिकणं अवघड आहे. सरकार हे देवाच्या मालमत्तेचं रक्षक असतं. रक्षकानेच जर जमीन दुसऱ्याला दिली, तर ते संविधानातील धार्मिक स्वातंत्र्य आणि मालमत्तेच्या अधिकाराचं उल्लंघन ठरू शकतं. वक्फ बोर्डाला वगळल्यामुळे न्यायालयात' समानतेच्या अधिकाराचा मुद्दाही उपस्थित केला जाऊ शकतो.’

 

राजकीय वास्तव...

 

सध्या २०२६ चं राजकीय वास्तव पाहिलं, तर ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि मोठी व्होट बँक तयार करण्यासाठी सरकारनं हा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात याचा मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. पण, हिंदू संघटनांना नाराज करणंही सरकारला परवडणार नाही. त्यामुळे ५ जूनपर्यंत येणाऱ्या हरकतींनंतर, सरकार यात काही मार्ग काढू शकते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

थोडक्यात सांगायचं की, हा कायदा दिसायला शेतकरी हिताचा असला, तरी त्यामध्ये कायदेशीर, राजकीय आणि धार्मिक पेच खूप मोठे आहेत. आता ५ जूनपर्यंत जनता काय हरकती नोंदवते आणि त्यानंतर सरकार काय मधला मार्ग काढते, यावरच महाराष्ट्रातील या दहा लाख एकर जमिनींचं आणि ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचं भविष्य ठरणार आहे.


Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...