टीम बाईमाणूस
- दृक-श्राव्य माध्यमांत क्रांती झाली, लेखन, नाटक-चित्रपट आदी कलांशी संबंधित तंत्रसाधने सर्वसामान्यांच्या हाती आली, तसं मातीशी नातं सांगणाऱ्या बोलींना हक्काचं माध्यम मिळत गेलं.
- आजचा मराठी सिनेमा, आजचे नाटक, आजच्या टीव्ही मालिका, आजच्या वेबसिरीज आणि अर्थातच आजचे साहित्य यात या बोली ठसक्यात झळकू लागल्या.
- मराठी भाषा दिनानिमित्त, बोलीभाषांचे चित्रपट-नाटक,साहित्य आणि वेब सिरीजवर कसे पडसाद उमटले यावर त्या-त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी मांडलेल्या या भूमिका...
प्रसाराची, अभिव्यक्तीची माध्यमं जोवर मर्यादित होती आणि त्यावर विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी होती. तोवर मराठी प्रमाण भाषेचा आग्रह जोरकसपणे लावून धरला जात होता. विशिष्ट समूहाची, विशिष्ट भौगोलिक स्थानी (उदा.सदाशिव पेठी पुणेरी) बोलली -लिहिली जाणारी मराठी हीच शुद्ध, योग्य नि श्रेष्ठ भाषा, बाकीच्या महाराष्ट्रातल्या बोली दुय्यम, अशुद्ध आणि अपरिपक्व असा पक्का समज करून दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रात शतकांपासून रुजलेल्या बोलीभाषा अंग चोरून, अपमानित अवस्थेत खाली मान घालून सार्वजनिक ठिकाणी वावरत होत्या. त्या बोलींचे वाहक असलेले लोक आपण उघडे पडू, या भीतीने चारचौघांत तोंड उघडायला कचरत होते.
वस्तुत: कोणतीही बोली त्या त्या भौगोलिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थितीगतीचे फलीत असते, त्यात शुद्ध-अशुद्ध असा भेदच असत नाही. सदाशिव पेठी मराठी श्रेष्ठ कारण ती सभ्य, स्वच्छ आणि पवित्र आहे आणि इतर बोली अशुद्ध, कारण त्या रासवट, अस्ताव्यस्त नि ओबडधोबड आहेत. हा खरं तर सरळसरळ बुद्धिभेद आहे. मुख्य धारेतल्या मराठीला आक्रसवण्याचाही प्रयत्न आहे. परंतु जशी दृक-श्राव्य माध्यमांत क्रांती झाली, लेखन, नाटक-चित्रपट आदी कलांशी संबंधित तंत्रसाधने सर्वसामान्यांच्या हाती आली, तसं मातीशी नातं सांगणाऱ्या बोलींना हक्काचं माध्यम मिळत गेलं. मराठीच्या मुख्य प्रवाहाला कितीतरी अस्सल ढंगाच्या बोली आपापल्या वैशिष्ट्यांसह येऊन मिसळल्या. आजचा मराठी सिनेमा, आजचे नाटक, आजच्या टीव्ही मालिका, आजच्या वेबसिरीज आणि अर्थातच आजचे साहित्य यात या बोली ठसक्यात झळकू लागल्या.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त, बोलीभाषांचे चित्रपट-नाटक,साहित्य आणि वेब सिरीज या प्रकारांत पडणारे प्रतिबिंब, त्यांची खासियत, त्याचा जनमानसावर पडणारा प्रभाव, प्रमाणभाषेच्या परंपरेचा आग्रह धरणाऱ्यांचा प्रतिसाद-प्रतिक्रिया, कलाकृतीच्या आशय-विषयाला त्यामुळे लाभलेले परिमाण, त्यातून दृश्यमान होत जाणाऱ्या संस्कृती... या अंगांनी त्या-त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी मांडलेल्या या भूमिका...
प्रवीण तरडे
"बोली'वर कात्री चालवणारेच बेखबर - प्रवीण तरडे (लेखक-दिग्दर्शक)
‘परिस्थितीचे टक्केटोणपे खात विकसित झालेल्या परिघाबाहेरच्या बोली या अस्पृश्य आणि शिव्या या अश्लील समजल्या जात असल्याने त्यांची अधिकृतपणे कुठेही नोंद केली जात नाही. सिनेमासारख्या सशक्त माध्यमात या बोली, त्यातल्या नित्य बोलण्यातले शब्दसन नि शिव्या जशाच्या तशा वापरता येत नाहीत. सौम्य शिव्या वापरल्या तरी सेन्सॉरच्या कात्रीत त्या सापडतात. अर्थात शिव्यांचे समर्थन होऊ शकत नाही, पण तोही दैनंदिन जगण्यातला, बोलीभाषतल्या अभिव्यक्तीचा एक भाग आहे, हे नाकारून चालणार नाही. ‘मुर्खा’, ‘वेड्या’ या पलीकडं मराठी माणूस गेलंय,आता मराठी सिनेमाही गेला पाहिजे.
माझ्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळते वेळी मला खूप झगडावं लागतं. ग्रामीण भागात शिव्या या भावभावना अभिव्यक्त करण्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि तो सिनेमातं येणं गरजेचं आहे. मात्र, सेन्सॉरसारख्या व्यवस्थेत असणाऱ्या लोकांनाच बोलींच्या आधारे सदा विकसित होत जाणाऱ्या मराठी भाषेची जाण नाही, हे आजचे वास्तव आहे.
शुद्ध-अशुद्धतेच्या भिंती कुणी उभारू नये - कैलास वाघमारे (अभिनेता)
मी जालना जिल्ह्यातल्या तांबे-ठोंबरी या गावच्या शेतकरी कुटुंबात वाढलेला. मराठवाड्यात बोलल्या जाणाऱ्या मराठीपेक्षा दुसरी मराठी भाषा किंवा शुद्ध-अशुद्ध भाषा असते, याचा कधी विचारही मी कधी केला नव्हता. आज दहा-पंधरा वर्षापासून मी कामानिमित्त मोठ्या शहरात राहतोय. पण माझ्या भाषेत, बोलीच्या ढंगात फारसा काही बदल झाला नाहीये. मी माझ्या भाषेतचं काम करतो. उच्चवर्णीय शुद्ध भाषेच्या भूमिका मला मिळत नाहीत, याचं दुःख मला आजिबात नाही. उलट माझ्या मातीतल्या लोकांचं जगणं मी माझ्या माध्यमातून माडंतो याचा मला आनंदच वाटतो. जातीनुसार आपल्याकडे भाषा बदलत जाते.
कैलास वाघमारे
त्यामुळे भाषेच्या अंगाने आजच्या घडीला जर कोणतं एकच प्रमाण ठरवलं जात असेल, तर तो जातीचं वर्चस्व ठसविण्याचा प्रयत्न असेल. मी मागल्या वर्षी ‘मयत’ नावाची शॉर्टफिल्म केली. त्या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्या चित्रपटात साताऱ्याकडची मराठी बोली वापरली आहे. आता काळ बदलतोय. जागतिकीकरणाचे परिणाम बोलीभाषेवरही होताहेत. त्यामुळे प्रमाण भाषा, शुद्ध भाषा अशी काही भिंती आता नाहीत. त्या कुणी उभारण्याच्या फंदातही पडू नये.
आपली बोली ठसक्यातच हवी… - उषा जाधव (अभिनेत्री)
‘शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा हे कुणी ठरवलं? प्रत्येक भाषेचं आपलं एक वेगळं स्थान आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही बरेच लोक बोलताना हिंदीत बोलायला सुरु करतात. आपण आपल्या बोलीत जर बोललोच नाही तर भाषा टिकणार कशी? सिनेमात काम करताना भाषेकडे मी एक प्रभावी माध्यम म्हणून पाहते.’ भले ती कोणतीही भाषा असो, त्याला श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवायचा अधिकार कुणालाचं नाही.‘धग’मध्ये काम करत असताना मी आवश्यक तो लहेजा शिकून घेतला.
उषा जाधव
त्याच तडफेनं मी स्पॅनिश भाषा शिकलीय आणि स्पॅनिश चित्रपटातही काम करत आहे. कलाकारांनी भाषेकडे व्यापक पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक भाषेचा आदर करुन इतरही भाषा आपल्याला शिकता यायला पाहिजते. मी जी शिकेन, तीच माझी सोबती होऊन जाते. त्यामुळे बोली भाषा शिकणं, तिचा विनासंकोच विनाभय उच्चार करणं ही माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची प्रक्रिया आहे, असं माझं मत आहे.
विनोदी पात्रांपलीकडे बोलीचं अस्तिव विस्तारावं -अरविंद जगताप ( लेखक-कवी)
मला कधी कधी दुःख वाटतं, की विदर्भ, मराठवाडा, कोकणातली भाषा ही बऱ्याचवेळा चित्रपटात विनोदी पात्रांसाठी वापरली जाते. खरं तर गंभीर, संवेदनशील जगणं मांडण्यासाठी सुद्धा या भागातल्या बोली भाषा आल्या पाहिजेत. एक लेखक म्हणून मलाही कारकीर्दीच्या सुरुवातीला प्रमाण भाषेचे दडपण होते. जेव्हा मी या क्षेत्रात आलो त्यावेळी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत होती. त्यामुळे मला माझ्या भाषेत लिहिण्याची संधी मिळाली.
अरविंद जगताप
पण बऱ्याचवेळा संवाद लिहिणारेच आग्रही असतात. त्यामुळे अनेकदा ग्रामीण म्हणून लिहिले जाणारे संवादही चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात. त्यामुळे भाषेचं विद्रुपीकरण होतं. मात्र प्रवाहा विरोधात जावून नागराज मंजुळे, उमेश कुलकर्णी, भाऊसाहेब कऱ्हाडे अशा दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या भागातल्या मराठी बोली भाषेला एक स्थान निर्माण करुन देण्याचं महत्वाचं काम केलं आहे, ते भाषेच्या समृद्धीसाठी मोलाचं आहे.
शुद्ध भाषेचा हव्यास कशाला? - मिनाक्षी राठोड (नाट्य-चित्रपट अभिनेत्री)
माझी मातृभाषा बंजारा. माझी बोली तांड्यावरची. पण कलाकार म्हणून भूमिकेनुसार बदलता येणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आमच्या तांड्यात बंजारा भाषा बोलली जायची. मात्र मी शिकले मराठी माध्यमातून. पण जेव्हा मंुबईत आले त्यावेळी जाणवू लागलं ,आपण जी मराठी भाषा शिकलो ती खूप वेगळी आहे. त्यात बोलताना मला अडचणी येत होत्या. पण, सुदैवानं शाहीर संभाजी भगत व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या दोघांनीही माझ्यावर भूमिकेनुरूप भाषेचे संस्कार केले. भाषेचा अभिनयाशी संबंध असल्याची जाणीव मला त्यांच्यामुळे झाली. पण, अनेकदा निर्माते, दिग्दर्शक, संवाद लेखकांना माहीत नसतं की, नेमकं एखाद्या बोली भाषेत एखाद्या शब्दाला काय म्हणतात.
मिनाक्षी राठोड
यामुळे काही दिवसांनी मूळ ग्रामीण भाषा बोलणारे कलाकार मिळणं खूप कठीण होणार आहे. एकीकडे आता ग्रामीण भाषा पूर्वीसारखी ग्रामीण राहिली नाहीये. पण बोलीभाषा जतन केली पाहिजे कारण आपलं व्यक्त होण्याचं ते एक सशक्त साधन आहे. मी काही दिवसांपूर्वी बंजारा भाषेतल्या गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला होता. तो लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. मला वाटत होतं की, ते गाणं कुणाला कळणार नाही. पण आपण आपल्या बोली भाषेत जेव्हा बोलतो, ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचतं. "शुद्ध' बोलण्याच्या हव्यासापायी आपण आपली भाषा मारतो...
बोलींचा संघर्ष हा जातींचाही संघर्ष - नागनाथ खरात (लेखक-दिग्दर्शक)
मी खेड्यापाड्यातलं वास्तव पाहून अस्वस्थ व्हायचो. मग त्यावरच कथा लिहिली. मोबाइलवर शूट केली. जागतिकीकरणानंतर बदलत चाललेली ही खेड्यांची गोष्ट. ‘दिसाड–दिस’. ही शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली. सुरुवातीला माझ्या सिनेमाची भाषा कुणाला कळायची नाही. महाराष्ट्रातील अनेक फेस्टिवलमध्ये नकार मिळायचा. पण बोस्निया, वॉशिग्टंन, इटली इथं ‘दिसाड दिस’ची निवड झाली आणि अनेक पुरस्कारही मिळाले. मग कुठे माझ्या शॉर्ट फिल्मची दखल महाराष्ट्रात घेतली गेली.
कोणतीही मुख्य प्रवाही भाषा ही बोलीभाषेमुळेच समृद्ध बनत असते. भाषा बोलणारे लोक टिकले नाहीत, तर भाषा जिवंत कशी राहील? पण प्रत्यक्षात काय होतं तर, आपल्या इथं भाषेला खूप मर्यादित निकष लावून तपासलं जातं. भाषेवरुन तुम्ही वेगळे आहात याची जाणीव करुन दिली जाते. असं रोजच्या जगण्यात नाही तर सिनेमा, व्यवहांरामध्ये पण दिसायचं. पूर्वी ग्रामीण बोलीभाषेत बोलणारी व्यक्तिरेखा ही गरीब, शोषित अशी दाखविली जायची. पण आता यात बदल होत आहेत. ग्रामीण भागातून आशय निर्माण होतोय आणि तो लोकप्रिय होतोय हे लक्षात आल्यावर असे बोलीभाषाकेंद्री सिनेमे बनविण्याचे प्रमाण वाढतंय.
नागनाथ खरात
या सिनेमांचे नायक आत्मविश्वासाने आपली बोली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताहेत. पण अजूनही ग्रामीण भाषा, त्यातली संवेदना, भावना या पूर्णपणे समजून घेतल्या गेलेल्या नाहीत. बोलीभाषेला जातीचं एक अस्तर आहे. त्यामुळं बोलींचा संघर्ष हा कुठंतरी जातीयसंघर्ष सुद्धा आहे. पण सिनेमा एक व्यापक माध्यम आहे, इथं असा भाषिक दुजाभाव नसला पाहिजे. सिनेमातला आशय हा जसा आहे तशी भाषा वापरली पाहिजे, आणि आशय हा सर्वसमावेशक असला पाहिजे. जे भाषेला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात, ते खरं तर त्या भाषेला मारत असतात. ग्रामीण जीवनात खऱ्या अर्थाने शब्दांची निर्मिती होत असते. त्याला अव्हेरणं भाषेच्या मुळांवर घाव घालण्यासारखं आहे.
उच्चार व्याकरणाचे स्तोम बोलींच्या मुळाशी… - शशांक शेंडे (अभिनेता)
‘ख्वाडा,’ ‘रिंगण,’ ‘बंदुक्या,’ आणि इराणी दिग्दर्शक माजीद माजिदी यांचा ‘बियाँड द क्लाउड’ हा माझा आजवरचा अनुभवपट. त्यात माजिदी यांना फक्त पर्शियन भाषा यायची. त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं कसं, हाच मोठा प्रश्न होता. पण अशा दिग्दर्शकांसाठी सिनेमा हा भाषेच्या पलीकडचा असतो. त्यामुळे तिथं काम करताना भाषेचा अडसर फारसा आला नाही.भाषेच्या पलीकडं जाता आलं पाहिजे, हे मला त्या अनुभवाने शिकवलं. हेही शिकवलं की प्रत्येकाची बोली कळली नाही तरीही तुम्हाला थेट भिडते. मराठी सिनेमांच्या बाबतीत अजून हे घडत नाहीय. तरी बोलींना स्थान मिळावे, याकडे मराठी सिनेमांची वाटचाल सुरु आहे.
शशांक शेंडे
मला एका वेगळ्या लहेजामध्ये मराठी भाषा बोलता येते, हे माझं वेगळेपण वाटतं. खरं तर भाषा आधी आली आणि व्याकरण नंतर आलं. त्यामुळे आपण उच्चार आणि व्याकरणापेक्षा बोली भाषेला महत्त्व दिले पाहिजे. प्रत्यक्षात, वेगवेगळ्या पद्धतीची बोलीभाषा बोलणाऱ्या कलाकारांना सिनेमांमध्ये काम करत असताना आपल्या भाषिक वेगळेपणाबद्दल अपमान सहन करावा लागत असतो. ‘चगाळा घालून डोंगळा बुजविला’ या म्हणीचा अर्थ कुणाला माहीत असेल काय? ‘चगाळा’ या शब्दाला आजही ग्रामीण भाषेत खूप महत्व आहे. मग हे शब्द चुकीचे किंवा कमी दर्जाचे आहेत हे कोण ठरवतं? खरं तर मराठी शुद्ध-अशुद्ध हा भेद करण्यापेक्षा आपल्या बोलीभाषेला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’






