(राखी यादव)
मेनोपॉज साधारणपणे 45-55 वर्षांच्या वयात होतो. हे काही आजारपण नाहीतर, शरीरात येणारं एक जैविक परिवर्तन आहे. जे या वयात होणं सामान्य असतं. तरीही याविषयी समाजात, लोकांमध्ये अनेक भ्रम, अंधश्रद्धा, कलंक जोडलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांना अनेक शारिरीक, मानसिक, भावनिक आव्हानांना सामोरं जावं लागतं. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात मेनोपॉजविषयी सजगता कमी आहे. पिरीयड्समध्ये स्त्रियांमध्ये मेंनस्ट्रुएश सुरू होतं तर मेनोपॉजमध्ये ते कायमचं थांबतं.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तांतानुसार 66 टक्के ग्रामीण स्त्रियांना याविषयी बोलणं सहज वाटत नाही. मेनोपॉजमध्ये बायकांचं शरीर अचानक तापणं, चिडचीड होणं, झोप न येणं इत्यादी लक्षणं दिसतात. यामुळे तसेच गावात आरोग्य सुविधा कमी असणं व याविषयी जागरुकता नसणं यामुळे गावातील बायका याविषयी कमीच बोलतात. स्त्रीच्या अंडाशयातील एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन असे हॉर्मोन तयार होणं यात थांबतं. त्यामुळे मासिक पाळी थांबते. वर्षभर साधारणपणे मासिक पाळी थांबलेली असेल तर त्याला मेनोपॉज म्हणतात. यामुळे बायका गरोदर होऊ शकत नाहीत. मेनोपॉज 45-55 च्या दरम्यान किंवा त्याआधीही येऊ शकतो.
बीबीसीच्या अहवालानुसार मेनोपॉज हा एकदम आणि सहजतेनं होणारा शारिरीक बदल नाही आहे. स्त्रियांना अनेक अवस्थांमधून जावं लागतं आणि शारिरीक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. मेनोपॉज सर्वच स्त्रियांसाठी एकसारखा नसतो. काही जणी सातेक वर्ष यातून जातात तर काहींना 14 वर्षंही लागू शकतात. 
मेनोपॉजच्या तीन अवस्था…
प्री-मेनोपॉजः- यात 30-40 वर्षांच्या स्त्रिया प्रभावित होतात. यातील स्त्रियांना मासिक पाळी सुरू राहते पण प्रजननासाठी आवश्यक हार्मोन्स एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांचे स्तर अनेकदा बदलतात.
पेरी-मेनोपॉजः- या अवस्थेत स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्त्रियांची प्रजनन क्षमता संपली आहे याची ही अवस्था आहे. यात एस्ट्रोजेनचा स्तर वेगानं कमी होतो. मासिक पाळी अनियमीत होते. अनेकदा महिन्यांपर्यंत होत नाही किंवा वेगानं होऊ लागते. मासिक पाळीतील रक्तस्त्राव जास्त वेगानंही होऊ शकतो. यात शरीरातील उष्णता वाढणं (हॉट फ्लॅशेज) बेचैनी, झोप कमी लागणे अशा अडचणी उद्भवतात.
पोस्ट-मेनोपॉजः- ही शेवटची अवस्था आहे. यात शेवटच्या मासिक पाळीनंतर 12 महिन्यांपर्यंत मासिक पाळी येत नाही. त्यामुळे निश्चित होतं की मेनोपॉज झालेला आहे. आता त्या स्त्रीची आई होण्याची क्षमता संपलेली आहे. स्त्रियांना पेरी-मेनोपॉज मध्ये ज्या अडचणी येतात त्याही आता संपतात.
संबंधित लेख वाचा: 1) ‘मेनोपॉज’ वर बोलू काही…! |
‘स्त्रियांच्या तारुण्याचा अंत’ असं का म्हणायचं…?
मेनोपॉजकडे अनेकदा ‘स्त्रियांच्या तारुण्याचा अंत’ म्हणून पाहिलं जातं. ज्यामुळे बायकांना आपल्या शरीराविषयी लाजही वाटू शकते. समाजात ही धारणा आहे की प्रजनन क्षमता संपल्यावर स्त्रीची भूमिका मर्यादित होते. प्रत्यक्षात हे तिच्या जगण्यातील नवं परिवर्तन असतं. मेनोपॉजविषयी गावांत वेगवेगळ्या धारणा आहेत. ज्या शिक्षण, सांस्कृतिकता, आर्थिक-सामाजिक लक्षणांनी बाधित असतात. काही बायका याला मासिक पाळीपासून सुटका म्हणून बघतात. काहींना आता आपण प्रौढ झालो म्हणून वाईट वाटतं. काही जणी लाजेमुळे काहीच सांगत नाहीत.
बुंदेलखंडच्या 56 वर्षीय ज्ञानबाई याविषयी म्हणतात, “जेव्हा मला घरातील म्हाताऱ्या बायांकडून कळलं की माझी मासिक पाळी आता बंद होईल, कारण मी आता म्हातारी झाली आहे, तेव्हा मला पहिल्यांदा आपल्या म्हातारपणाची जाणीव झाली. त्यानंतर मी करवा चौथ व्रत ठेवणं बंद केलं. मला लाज वाटत होती की साजशृंगार करून व्रत ठेवण्याला काय अर्थ आहे जेव्हा मी आता पूर्वीसारखी तरुण राहिले नाही.” 
अनेक स्त्रिया याविषयीच्या आरोग्य समस्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. कारण या गोष्टी स्वाभाविक आहेत असं समजून चुपचार सहन करण्याची शिकवण दिली जाते. यावर मोकळेपणानं बोललं जात नाही त्यामुळे बाया आरोग्य तपासणी करत नाहीत. 53 वर्षीय कैलाशपती याविषयी म्हणतात, “मला जेव्हा समजलं की या अडचणीनंतर (पेरी-मेनोपॉज) माझी मासिक पाळी कायमची बंद होणार आहे तर मला वाटलं की चला, चांगलंच झालं. ही दर महिन्याची झंझट बंद होईल एकदाची म्हणून. कारण मासिक पाळीत मला सुती कपडे वापरायला मुश्किलीनंच मिळायचे.”
बायकांच्या आव्हानाचा काळ…
मेनोपॉजच्या अडचणींना अनेकदा मुड स्विंग्स म्हणून दुर्लक्ष केलं जातं. प्रत्यक्षात बायकांना हा काळ आव्हानाचा असू शकतो. अनेकींना हेच सांगितलं जातं की या गोष्टी सोसाव्याच लागतील, त्यामुळे त्या याविषयी काही बोलूही शकत नाहीत. 50 वर्षीय सावित्री म्हणतात, “मला वाटलं की माझं वय आता झालं आहे. देवाची भक्ती आता निट करू शकेन आणि मंदिरात जायला काही अडचण असणार नाही.”
जागरुकता नसल्यामुळे मेनोपॉज म्हणजे वय वाढणं, म्हातारपण येणं अशाच गोष्टींचा बायका विचार करतात व त्यातच आपल्या जगण्याचा एक-तृतियांश हिस्सा या विचारात घालवतात की त्या आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं सजून-धजून राहण्याची गरज नाही किंवा ते शोभत नाही.
भारतात मेनोपॉज लवकर होतो
जागतिक आरोग्य संघटनेनुसार मेनोपॉजच्या सामान्य लक्षणांमध्ये हॉट फ्लॅशेज्, झोप उडणे, नैराश्य, बेचैनी, ब्रेन फॉग आणि लैंगिक संबंधातील उदासिनता प्रमुख आहेत. याशिवाय 48 लक्षणं आहेत. भारतात मेनोपॉज होणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे. जागतिक स्तरावर याचे सरासरी वय 50 आहे पण भारतात ते 46-47 आहे. देशात आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे मेनोपॉजविषयी उपचार घेण्याचं प्रमाण कमी आहे. महानगरांमध्ये फक्त दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालय हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे जिथं मेनोपॉजशी संबंधीत अडचणींवर उपचार केले जातात. ग्रामीण भागात तर अशी कोणतीही सुविधा नाही. ही गंभीर समस्या आहे कारण भारतीय स्त्रिया आपल्या आयुष्याचा तिसरा भाग मेनोपॉज झाल्यानंतर जगत असतात.
या सर्व समस्यांविषयी ग्रामीण स्त्रियांना जास्तकरून माहितीच नसते. 50 वर्षीय प्रेमा देवी म्हणतात, “मला या काळात अनेकदा त्रास झाला. पण हे मेनोपॉजमुळे होत आहे हे समजत नव्हतं. एकदा तर पोटातलं दुखणं असह्य झालं होतं. तेव्हा गावातील एका वैद्यानं जडी-बूटी दिली ज्यामुळे आराम पडला. त्यानंतर जेव्हा केव्हा त्रास व्हायचा मी तोच इलाज करून घ्यायची. माझी सासू म्हणाली की सर्वच बायकांना हा त्रास होतो आणि जडी-बूटीनं तो दूर होतो. यात डॉक्टरला दाखवण्याची काही गरज नाही.”
49 वर्षीय सर्वेश म्हणतात, “मला या मेनोपॉजमुळे अंगात खूप उष्णता जाणवते तेव्हा मी थंड पाण्याचं शरबत तयार करून पीते. त्यानं आराम पडतो.” तर 47 वर्षीय रीना देवी म्हणतात, “जेव्हापासून मेनोपॉज सुरू झालाय मला गुघडेदुखी व कंबरदुखी सुरू झाली आहे. दिवसभर घरी आणि शेतात काम करताना याची जाणीव होत नव्हती. हे पण माहिती नव्हतं की अशा अवस्थेत डॉक्टरांना दाखवायला पाहिजे म्हणून.” जागरुकता नसल्यानं ग्रामीण स्त्रियांना मेनोपॉजची लक्षणं शारिरीक दुखणी वाटतात जी सर्वच बायकांना होतच असतात.
त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची काही गरज नाही. या विचारसरणीमुळे त्या चुपचाप सारा त्रास सहन करतात. मेनोपॉजवर उघडपणे बोलणं झालं तर स्त्रियांना याविषयी बोलणं सहज होईल. या अवस्थेतून जाणं सोपं पडेल. ही एक सामान्य जैविक प्रक्रिया आहे. समाजात याविषयी जागरुकता वाढवणं आणि चर्चा करणं गरजेचं आहे ज्यामुळे बायका आपल्या समस्यांविषयी मुक्तपणे बोलू शकतील आणि या परिवर्तनाला अधिक सकारात्मकपणे स्वीकारू शकतील.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






