विठ्ठल साबळे
- तरुण मुलांची लग्न न होणे हा आता फक्त ग्रामीण महाराष्ट्राचा मुद्दा बनला नसून तो आता मुंबई, ठाणे सारख्या शहरी भागांचाही मुद्दा बनत चालला आहे .
- लोकलच्या भीषण गर्दीमुळे बदलापूर, डोंबिवली, कल्याण, अबरनाथ, कसारा, वसई, विरार इथल्या मुलांशी लग्न करायचं नाही अशी प्रतिक्रिया मुलींनी व्यक्त केली आहे.
- मुंबईतील जीवघेणा लोकल प्रवास आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई, हे दोन्ही प्रश्न सामाजिक निर्णयांवर थेट परिणाम करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून एका ज्वलंत मुद्द्यावर राज्यात बऱ्यापैकी चर्चा होताना दिसतेय ती म्हणजे मुलींच्या लग्नापेक्षाही शेतकरी मुलांची लग्न जमणे अवघड झाले आहे. शेती आणि शेतकरी यांचे जे चित्र बनले आहे किंवा निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी नवरा नकोच अशी मुलींची भावना झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भ या समस्येमुळे त्रासले आहेत.
परंतू मुलांची लग्न न होणे हा आता फक्त ग्रामीण महाराष्ट्राचा मुद्दा बनला नसून तो आता मुंबई, ठाणे सारख्या शहरी भागांचाही मुद्दा बनत चालला आहे. त्यामागची कारणे ही शेती व्यवस्थेशी निगडीत नसून मुंबईच्या मायानगरीत जगण्यासाठी जो जीवघेणा संघर्ष करावा लागतोय त्याच्याशी संबंधित आहे.
काही दिवसांपूर्वीच एक अशी दु:खद घटना घडली की शहरातील मुलींची एक वेगळीच बाजू समोर आली. काय होती ती घटना…?
शनिवार, तारीख 31 जानेवारी, सकाळी आठ वाजताची वेळ. बदलापूर रेल्वे स्थानकावर रोजच्या सारखीच प्रचंड गर्दी होती. लोकल पकडायची घाई, वेळेचा ताण आणि डब्यात शिरण्यासाठीची धावपळ सुरू होती. याच गडबडीत चेतना देवरुखकर ही २८ वर्षांची तरुणी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. तो एक क्षण, एक चूक आणि क्षणार्धात तिचं आयुष्य संपलं. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना अपघात म्हणून नोंदवली गेली, मात्र तो अपघात नव्हता; तो व्यवस्थेचा, गर्दीचा आणि दुर्लक्षित सुरक्षिततेचा परिणाम होता.
मुंबई उपनगरातील लोकल प्रवास हा आता केवळ दळणवळणाचा मार्ग राहिलेला नाही, तर रोजचा जगण्याचा संघर्ष बनला आहे. बदलापूर, डोंबिवली, कल्याण, अबरनाथ, कसारा, वसई, विरार ही नावं आता फक्त स्टेशनची नाहीत, तर ताणतणाव, गर्दी आणि धोक्याची ओळख बनली आहेत. वेळेत लोकल न मिळाल्यास नोकरी धोक्यात येते, आणि लोकल मिळाली तर जीव धोक्यात जातो, अशी अवस्था लाखो प्रवाशांची आहे. चेतनासारख्या अनेक प्रवाशांना हा प्रश्न रोज भेडसावतो, पण प्रत्येक वेळी त्याची किंमत जीवाने मोजावी लागेलच, ही केवळ नशिबाची बाब ठरते.
नोकरी वाचवताना जीव गमावण्याची वेळ का येते?
लोकल प्रवाशांसाठी वेळ ही सर्वात मोठी चिंता आहे. नोकरीवर उशीर झाला, तर पगार कापला जातो; वारंवार उशीर झाला, तर नोकरी जाते. त्यामुळे प्रवासी स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या लोकलमध्ये चढतात. रेल्वे प्रशासन अनेकदा अपघात प्रवाशाच्या चुकीमुळे झाल्याचं सांगून हात झटकतात, पण प्रवाशाला तसं करायला भाग पाडणारी परिस्थिती कोणी निर्माण केली, हा प्रश्न आजही दुर्लक्षितच राहतो.
याच पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने उपनगरात राहणाऱ्या, लोकलच्या जिवघेण्या गर्दीतून दररोज प्रवास करणाऱ्या काही मुलींशी संपर्क साधला. ‘बाईमाणूस’शी बोलताना बदलापूर मध्ये राहणाऱ्या दिपाली शिंदे सांगते की, रोज लोकलने प्रवास करताना किती अपघात होतात हे आम्ही पाहतो. धावत्या लोकलमधून पडून लोकांचा मृत्यू होतो, हे आता नवीन राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत या उपनगारत राहणाऱ्या मुलांना लग्नासाठी नकार देण्याचा निर्णय आम्ही घेतो, कारण लग्नानंतरही हाच असुरक्षित प्रवास आमच्या आयुष्याचा भाग बनेल, ही भीती वाटते. सुरक्षित आणि स्थिर आयुष्य ही गरज आहे, लक्झरी नाही. असं त्या ठामपणे सांगतात.
या सगळ्या वास्तवाचा परिणाम फक्त नोकरी किंवा आरोग्यावर मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट वैयक्तिक आयुष्यावर उमटू लागला आहे. बदलापूर, अंबरनाथ डोंबिवलीसारख्या भागांतून रोज मुंबईत प्रवास करणाऱ्या मुलांबाबत लग्नासाठी नकार दिला जात असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. इतका प्रवास, इतकी धावपळ आणि रोजचा जीवघेणा संघर्ष या कारणांमुळे काही मुली लग्नाला नकार देत असल्याचं बोललं जातं. सुरक्षितता, स्थिरता आणि भविष्यातील निश्चिततेची अपेक्षा या निर्णयामागे ठळकपणे दिसून येते.

अंबरनाथ येथे राहणारी मानसी चिटणीस म्हणते की, दिवसेंदिवस रेल्वे लोकलमधील गर्दीतील प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. महिलांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर अगदी तीन मिनिटांना लोकल सेवा असल्याचा दावा होऊनही सकाळी आणि संध्याकाळी महिला प्रवाशांना लटकत प्रवास करावा लागतो. नियोजित स्थानकात उतरेपर्यंत महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो.
उपनगरीय आणि मध्य रेल्वेमध्येही पश्चिम उपनगरातील महिलांप्रमाणेच रेल्वे प्रवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दररोज गर्दीमुळे धक्का लागल्याने होणारे वाद विकोपाला जाऊन जीव गमावण्याची वेळ प्रवाशावर येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांचे तीनच डबे असतात, त्यातच फर्स्ट क्लास डबादेखील असतो. तरी गर्दीच्या वेळी या लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. रेल्वे प्रवासादरम्यान आसनावर बसलेल्या महिलेची जागा ती उतरल्यानंतर बसण्यासाठी आधीच अडवली जाते, यावरून महिलांमध्ये वाद होतात.
प्रवास, सुरक्षितता आणि विवाहाचा बदलता अर्थ…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चांमधून हे चित्र अधिक ठळक होतं. मुंबईचा मुलगा म्हटलं की, आधी लोकल प्रवासाचा विषय निघतो, मग नोकरी, वेळ आणि शेवटी सुरक्षिततेचा प्रश्न. ही चर्चा कुणाला दोष देण्यासाठी नाही, तर बदललेल्या सामाजिक अपेक्षा दाखवण्यासाठी आहे. आज विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं उरलेलं नाही, तर तो जीवनशैलीचा निर्णय बनला आहे, आणि त्या निर्णयावर प्रवासाचं गणित भारी पडताना दिसतं.
कल्याणमध्ये राहणारी श्वेता काळे चर्चगेटच्या एका खासगी कंपनीत काम करते. ‘बाईमाणूस’शी बोलताना ती म्हणते की, ‘’मी तर घरी साफ सांगून ठेवलयं, मला या उपनगरातील मुलाशी लग्नच करायचं नाहीये. दररोज लोंबकळत प्रवास करण्यात माझं अर्ध आयुष्य संपलय, आता उर्वरित आयुष्य तरी जरा शांततेत जाऊ दे. या शहरात स्थिरावण्यासाठी अगोदरच काय कमी त्रास आहे का? मग होणारा नवरा पण याच उपनगरातील असेल तर मग हा लोकलचा संघर्ष कायमचाच चिटकेल.’’

एकीकडे मुंबई उपनगरात गर्दीमुळे लग्नाला नकार मिळतो, तर दुसरीकडे मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे मुलांना मुलगी मिळत नाही. पाणी नाही, शेती नाही, उत्पन्न नाही आणि त्यामुळे स्थिरता नाही. पाणीटंचाईमुळे अनेक गावांत लग्नाचे निर्णय पुढे ढकलले जात असल्याचं चित्र आहे. मुलींच्या कुटुंबांना भीती वाटते की या भागात लग्न केल्यास भविष्यातील आयुष्य संघर्षमय होईल, आणि त्यामुळे लग्नाला नकार वाढत आहेत.
‘बाईमाणूस’शी बोलताना जालना जिल्ह्यातील आकाश काळे सांगतो की, मी 33 वर्षाचा आहे. अजून माझं लग्न झालेलं नाही. कारण आमच्या भागात दुष्काळ आणि पाणीटंचाई ही काही एका वर्षाची समस्या राहिलेली नाही. पाणी नाही, शेती नाही, उत्पन्नाची खात्री नाही, त्यामुळे लग्नाचे निर्णय पुढे ढकलले जात आहेत. मुलींच्या कुटुंबीयांना भीती वाटते की, या परिस्थितीत लग्न केल्यावर मुलीचं आयुष्य संघर्षात जाईल. त्यामुळे अनेक ठिकाणी मुलांना मुलगी मिळत नाही, ही आजची वास्तव परिस्थिती आहे. हे नकार व्यक्तीला नाहीत, तर या भागातील अस्थिर परिस्थितीला आहेत. पाणी आणि रोजगाराची शाश्वत व्यवस्था उभी राहिली, तर हे चित्र बदलू शकतं. असं ते सांगतात.
मुंबई लोकलच्या आकड्यांमागचं भीषण वास्तव
मुंबई उपनगरी लोकल रेल्वेतील अपघातांची आकडेवारी पाहिली, तर समस्या किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं.
- 2025 या वर्षात सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गांवर मिळून एकूण 2,287 प्रवाशांचा मृत्यू नोंदवण्यात आला.
- 2024 मध्ये हा आकडा 2,468 होता, म्हणजे 2025 मध्ये सुमारे 7 टक्के घट दिसते, मात्र दररोज सरासरी 6 ते 7 प्रवासी लोकल प्रवासात प्राण गमावत असल्याचं वास्तव बदललेलं नाही.
- यामध्ये 1,063 मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाले, तर सुमारे 525 मृत्यू धावत्या किंवा गर्दीच्या लोकलमधून पडल्यामुळे झाले आहेत.
- 2025 च्या जानेवारी ते मे या अवघ्या पाच महिन्यांतच 922 मृत्यू नोंदवले गेले होते. 2026 हे वर्ष सुरू असतानाच बदलापूरसारख्या घटनांनी ही समस्या अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं आहे, आणि रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र आज दोन टोकांच्या वास्तवात अडकलेला आहे. एका बाजूला मुंबई उपनगरात गर्दीमुळे जीव धोक्यात घालून जगावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात पाण्याअभावी जीवनच थांबलेलं आहे. दोन्ही ठिकाणी प्रश्न एकच आहे
सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा. चेतना देवरुखकरचा मृत्यू आणि मराठवाड्यातील लग्नाचे नकार वेगवेगळे वाटले, तरी त्यांची मुळं व्यवस्थेतील अपयशातच आहेत. हा प्रश्न फक्त लोकलचा नाही, किंवा पाण्याचाच नाही. हा प्रश्न आहे धोरणांचा, नियोजनाचा आणि संवेदनशीलतेचा. आज लग्न नाकारणं हा सामाजिक संकेत आहे, उद्या तो आक्रोश बनेल. आणि तो आक्रोश दुर्लक्षित करणं, हेच खरं धोकादायक आहे.






