विठ्ठल साबळे
- मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवारी भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या गोळ्या वाटण्यात येत होत्या.
- मोहरमच्या मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फैयाज प्रेमजी याने आपल्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यातील उलथापालथीसाठी समाजालाच जबाबदार धरल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
- याच भावनेतून विशिष्ट समाजाविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि त्यातूनच विषप्रयोगाचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
मोहरमच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवारी भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या (झिंक फॉस्फेट) गोळ्या वाटण्यात येत होत्या. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यावर पेनकिलरच्या नावाखाली विषाच्या गोळ्या वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले.
फैयाज प्रेमजीच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात उलथापालथ झाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आपल्या या परिस्थितीला आपलाच समाजच जबाबदार असल्याच्या धारणेतून मुस्लिम धर्मातील विशिष्ट समाजाबद्दल निर्माण झालेला द्वेष हेच विषप्रयोगाचे कारण ठरल्याचे तपासातून पुढे आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिस कोठडीत असलेल्या फैयाज प्रेमजीच्या चौकशीत त्याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक अस्थिरतेविषयी माहिती मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला, मात्र पत्नी सोडून गेली. भाऊ, वहिनी, कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने तो मानसिक दडपणाखाली होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि गोळ्या याचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फैयाज याच्या मनात होती. पत्नी सोडून जाण्यास, कौटुंबिक अस्थिरतेला समाजच कारणीभूत असल्याचे त्याला वाटायचे. याचाच सूड उगवण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता. मोहरमला गर्दी उसळत असल्याने याचवेळी विषप्रयोग करण्याचे त्याने ठरविल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे.

फैयाज प्रेमजीकडून तब्बल १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त केल्या.
भायखळा येथील मिरवणुकीत हजारोंच्या गर्दींमध्ये एक तरुण कॅप्सूल वाटत होता. मिरवणुकीत जखमा करून घेणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हर्बल पेन किलर गोळ्या असल्याचे तो सांगत होता. याचदरम्यान सलमान सय्यद याला उलट्या होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी फैयाज याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची तपासणी केली. दरम्यान, फैयाज याने ५० किलो झिंक फॉस्फेस्टची पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सुलची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
पोलिसांची गर्दीमध्ये स्पीकरवरुन घोषणा
गर्दीत वाटल्या जाणाऱ्या गोळ्या विषारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गर्दीमध्ये जाऊन स्पीकरवर घोषणा केली. यामुळे फैयाज याने वाटलेल्या कॅप्सूल अनेकांनी घेण्याचे टाळले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा फैयाज प्रेमजी हा १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता, असे तपासातून समोर आले आहे.
पोलिस कोठडीत असलेल्या फय्याज याच्या चौकशीत त्याच्या वैवाहिक व कौटुंबिक अस्थिरतेविषयी माहिती मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. मात्र, पत्नी सोडून गेली. भाऊ, वहिनी, कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने तो मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि गोळ्या याचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात होती. पत्नी सोडून जाण्यास, कौटुंबिक अस्थिरतेला समाजच कारणीभूत असल्याचे त्याला वाटायचे. याचाच सूड उगवण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता. मोहरमला गर्दी उसळत असल्याने याच वेळी विषप्रयोग करण्याचे त्याने ठरवल्याचे तपासातून समोर आले.
फय्याज याने दिलेली कॅप्सूल खाल्ल्याने सलमान यांची प्रकृती ढासळली. घरी पोहोचलेल्या सलमान यांनी तब्येत खालावल्याने डोंगरीतील रुग्णालयात जायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी डोंगरीतील इमामवाडा परिसरातील शिया समाजातील नेत्यांना याबाबत कळवले. त्यानंतर या नेत्यांनी जुलूसमध्ये अनेकांना कळवले. त्यामुळे अनेकांनी फय्याजने दिलेली कॅप्सूल खाल्ली नाही. सलमान यांनी कळवलेच नसते, तर अनेकांना त्रास झाला असता.

दहशतवादाशी संबंध नाही
आपल्याच समाजाबद्दल द्वेष असला, तरी फय्याज धर्मांध, कट्टरपंथीय नाही. तो कोणत्याही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नसल्याचे तपासात आढळले आहे. त्याने इराक आणि इराण वारी केल्याने अजूनही कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मोबाइल तपासणीसाठी न्यायवैद्यक शाळेकडे पाठवण्यात आला असून, गेल्या काही दिवसांत इंटरनेटद्वारे केलेल्या हालचाली, संपर्क याची माहिती जाणून घेतली जात आहे.
पुण्यात कुटुंबाची चौकशी
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. की आरोपी फय्याज प्रेमजी याच्या पुण्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदीर होते. या उंदरांचा नायनाट करण्यासाठी तो नियमितपणे ‘झिंक फॉस्फाइड’ या विषारी रसायनाचा वापर करीत असे. मुंबईतील मोहरम मिरवणुकीत कथित विषारी कॅप्सुल वाटप प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी पुण्यातील विमानतळ परिसरातील फय्याज प्रेमजी याच्या घरी जाऊन चौकशी केली. या वेळी त्याचे आई-वडील आणि भावाची सुमारे पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली.
तपास यंत्रणांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडून त्याच्या हालचाली, संपर्क, राहण्याची पद्धत; तसेच अलिकडील व्यवहारांबाबत माहिती घेतली. घराची पाहणी करून काही आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातील विमानतळ परिसरातील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो कुटुंबापासून वेगळा राहत असून, मुंबईत वास्तव्यास होता. या काळात त्याचे नेमके कोणाशी संबंध होते; तसेच त्याच्या हालचालींचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
तपास अजून सुरू; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाइड असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला असला, तरी याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमधील रासायनिक घटक आणि त्याचे प्रमाण याबाबत तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार आरोपीने ऑनलाइन माध्यमातून सुमारे ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि मोठ्या प्रमाणात झिंक फॉस्फाइड मागवले होते. या कॅप्सूलवर हर्बल किंवा नैसर्गिक आरोग्यपूरक औषध असल्याचे भासवणारे पॅकिंग करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. धार्मिक मिरवणुकीत स्वतःला जखमी करणाऱ्या भाविकांना वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात, या प्रथेला आडोसा बनवत आरोपीने विषारी कॅप्सूल वाटल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.

तपासादरम्यान आरोपीच्या परदेश प्रवासाची माहितीही समोर आली आहे. त्याने यापूर्वी इराण आणि इराकला प्रवास केला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कांची तपासणी सुरू असली, तरी आतापर्यंतच्या चौकशीत त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पुरावा मिळालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात आरोपीचा हेतू, विषारी पदार्थाचा नेमका स्रोत, त्याला कोणाची मदत मिळाली होती का आणि किती लोकांनी या कॅप्सूलचे सेवन केले, या सर्व बाबींचा तपास अद्याप सुरू आहे.
झिंक फॉस्फाइड काय आहे?
झिंक फॉस्फाइड एक अत्यंत विषारी रासायनिक पदार्थ आहे. याचा वापर सर्वसाधारणपणे घर आणि शेतात उच्छाद मांडणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी केला जातो. झिंक फॉस्फाइड शरीरात गेल्यानं गंभीर पॉयजनिंग होऊ शकतं आणि जीव जाण्याची भीती असते. पोटात गेल्यानंतर हे रसायन पोटातील अॅसिडसह प्रतिक्रिया करीत फॉस्फीन गॅस तयार करतं. हा गॅस शरीरासाठी अत्यंत घातक असतो. ज्याचा थेट परिणाम हृदय, फुप्फुसं, लिव्हर, किडनी आणि मेंदूवर होतो.
शरीरावर होणारे परिणाम
- शरीरातील पेशींना ऑक्सिजन वापरण्याची प्रक्रिया बाधित होते
- हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात
- रक्तदाब झपाट्याने कमी होऊ शकतो
- श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
- अनेक अवयव निकामी होण्याचा धोका
झिंक फॉस्फाइडच्या सेवनानंतर दिसणारी लक्षणं…
- सातत्याने उलट्या होणं
- अस्वस्थ वाटणं
- पोटात वेदना जाणवणं
- उलट्यांमधून तीव्र वास येणं
- चक्कर येणं






