कोमल ठोंबरे
- नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना
- वैद्यकीय तपासणीत १२ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट
- अल्पवयीन आरोपीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित १२ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमानुसार पोलिसांना माहिती दिल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक चौकशीत मुलीवर तिच्याच सख्ख्या अल्पवयीन भावाकडून अत्याचार झाल्याची माहिती पुढे आली.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.दोन्ही मुले अल्पवयीन असल्यामुळे प्रकरण बाल न्याय मंडळाच्या प्रक्रियेनुसार हाताळले जात असून आरोपीला बाल निरीक्षणगृहात ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून संबंधित विभागांकडून संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
याआधीही समोर आलेल्या घटना..
देशातील विविध भागांमध्ये अल्पवयीनांकडून घडणाऱ्या अशा स्वरूपाच्या घटना यापूर्वीही नोंदवण्यात आल्या आहेत. सन २०२३ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या लहान मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.

तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे २०२२ मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी इंटरनेटवरील अश्लील सामग्रीच्या प्रभावातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण पोलिस तपासात उघड झाले होते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही ओळखीतील किंवा नात्यातील व्यक्तींमार्फत अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंद झाल्याचे पोलिस आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
मानसोपचारतज्ज्ञाचे निरीक्षण..
या संदर्भात टीम बाईमाणूसशी बोलताना मानसोपचारतज्ञ डॉ. अमित टाक यांनी सांगितले की,
“प्रत्येक व्यक्तीचा मानसिक स्वभाव वेगळा असतो. मात्र अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या काही व्यक्ती अँटी-सोशल प्रवृत्तीच्या असतात. अशा व्यक्तींमध्ये भावनिक जडणघडण कमी असते तसेच नातेसंबंध, सामाजिक नियम किंवा नैतिक मर्यादांची जाणीव कमी राहते. त्यामुळे नियमांच्या विरोधात जाण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येते.अशा स्वभावासोबतच इंटरनेट आणि मोबाईलमुळे सहज उपलब्ध झालेल्या पॉर्नोग्राफीचा प्रभावही महत्त्वाचा ठरतो. सतत अशा आशयाचा संपर्क आल्यास लैंगिक वर्तनाबाबत चुकीची समज तयार होऊ शकते आणि गुन्हेगारी कृतीकडे प्रवृत्ती वाढू शकते. घरातीलच व्यक्ती सहज उपलब्ध ठरल्यास, विशेषतः भीतीमुळे पीडित व्यक्ती आवाज उठवत नसल्यास, अशा घटना घडण्याची शक्यता वाढते.
याशिवाय इंपल्सिविटी म्हणजे विचार न करता त्वरित कृती करण्याची प्रवृत्तीही महत्त्वाची भूमिका बजावते. मेंदूतील रासायनिक किंवा मानसिक बदलांमुळे स्वतःवरील नियंत्रण कमी होऊ शकते. समाजात लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि किशोरवयातील हार्मोनल बदल, विशेषतः टेस्टोस्टेरॉनची वाढ, योग्य मार्गदर्शन नसल्यास गोंधळ निर्माण करू शकते. पॉर्न व्यसन, व्यक्तिमत्त्वातील त्रुटी आणि सहज उपलब्ध बळी या घटकांच्या एकत्र परिणामातून अशा गंभीर घटना घडताना दिसतात.”
लैंगिक शिक्षणाचा अभाव ठरतोय धोकादायक..
अल्पवयीनांकडून घडणाऱ्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये शरीरातील शारीरिक बदल, संमतीची संकल्पना, वैयक्तिक मर्यादा आणि सुरक्षित वर्तन याविषयी योग्य वयात माहिती पोहोचणे आवश्यक मानले जाते.

मात्र अनेक ठिकाणी या विषयावर खुलेपणाने संवाद न होत असल्याने किशोरवयीन मुले माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतात. अपुरी किंवा चुकीची माहिती मिळाल्यास लैंगिक वर्तनाबाबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पालकांचे डिजिटल निरीक्षण महत्त्वाचे..
डिजिटल साधनांचा वाढता वापर तपासाचा एक महत्त्वाचा पैलू ठरत आहे. सध्या अनेक घरांमध्ये लहान वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. मात्र इंटरनेट वापर, स्क्रीन टाइम किंवा पाहिल्या जाणाऱ्या सामग्रीवर सातत्यपूर्ण देखरेख नसल्याची बाब विविध प्रकरणांमध्ये समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,अल्पवयीनांशी संबंधित काही गुन्ह्यांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट वापर हा महत्त्वाचा घटक म्हणून पुढे आला आहे.
घरातील सुरक्षिततेबाबत चिंता
बाल लैंगिक अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आणि पीडित एकमेकांच्या ओळखीतील किंवा नात्यातील असल्याचे राष्ट्रीय स्तरावरील अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. भीती, सामाजिक दबाव किंवा परिस्थितीची जाणीव नसल्यामुळे अनेक अल्पवयीन पीडित घटना दीर्घकाळ उघड करत नाहीत. परिणामी, अशा घटना उशिरा समोर येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संबंधित यंत्रणांनी नमूद केले आहे.






